तुतिकोरिन : (तमिळ–तुत्तुक्कुडि). भारताच्या दहा प्रमुख बंदरापैकी एक व तमिळनाडू राज्यातील मद्रासच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे बंदर. लोकसंख्या १,५५,३१० (१९७१). हे तिरुनेलवेली जिल्ह्यात, तिरुनेलवेली शहराच्या पूर्वेस, मदुराईपासून १२० किमी., मानारच्या आखातावर असून पूर्वी मोती व शंख यांसाठी प्रसिद्ध होते. येथे १५४० मध्ये पोर्तुगीजांची वसाहत होती. १६५८ मध्ये ते डचांनी व १७८२ मध्ये इंग्रजांनी घेतले. नंतर डच व इंग्रजांकडे आलटून पालटून जाऊन अखेर १८२५ मध्ये कायम इंग्रजांकडे आले. १८६६ मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली. मद्रासच्या वाढीमुळे व कृत्रिम मोत्यांच्या शोधामुळे हे मागे पडले होते. १९६० नंतर येथील सुरक्षित बंदर खोल केले गेले व माल साठविण्याच्या आणि मच्छीमारीच्या सोयी वाढविण्यात आल्या. येथून कापूस, कापसाचे पदार्थ, ताडजन्य पदार्थ, चहा, कॉफी, कातडी, मिरच्या, तांदूळ, मीठ इ. निर्यात होतात. १९७० मध्ये राज्याच्या १२% विदेशी व्यापार येथून झाला. येथे कापसाच्या गिरण्या, मिठागरे, मच्छीमारी, मासे वाळविणे इ. उद्योग चालतात. येथे कॅथलिकांची संख्या मोठी आहे. मदुराई विद्यापीठाला जोडलेली पाच महाविद्यालये येथे आहेत. हे देशाच्या अंतर्भागाशी दक्षिण रेल्वेने जोडलेले असून याच्याजवळ समुद्रात सु. ४ किमी.वर एक दीपगृह आहे.

फडके, वि. शं.