तिरुनेलवेली : तिनेवेल्ली. तमिळनाडू राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या १,०८,४९८ (१९७१). हे ताम्रपर्णी नदीच्या डाव्या तीरावर, पालमकोटा–क्विलॉन लोहमार्गावर शेनकोट्टा खिंडीच्या सु. ८० किमी. आग्नेयीस आहे. पालमकोटा हे ७०,०७० लोकवस्तीचे त्याचे जुळे शहर नदीच्या उजव्या तीरावर आहे. पांड्य राजवटीत व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर सध्याही कापडधंदा, सिगारेटी, दागदागिने, मोटारींच्या कर्मशाळा यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्याला पापनाशम् येथील वीज मिळते. इमारती लाकूड, कापूस व गळिताची धान्ये यांची ही मोठी बाजारपेठ आहे.
येथील शिव–पार्वती मंदिर द्राविडी शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. सेंट फ्रान्सिस झेव्हिअरने भारतातील आपल्या मिशनरी कार्यास येथूनच सुरुवात केली.
फडके, वि. शं.