तिएनशान : चीन व रशियातील तुर्कस्तानचे प्रदेश वेगळे करणारी ईशान्य–नैर्ऋत्य दिशेने सु. २,४०० किमी. पसरलेली, हिमालयासारखीच वली पर्वतांची ही अर्वाचीन रांग असून सरासरी उंची ५,७९० मी. आहे. खानतेंग्री हे शिखर ७,०१० मी. व पोबेडा हे शिखर ७,४३६ मी. उंच आहे. हा भाग बराच कोरडा असल्याने हिमरेषा ३,३०० मी. पेक्षा जास्त उंचीवर आहे. पश्चिमेस तारीम पठारात रांग मिसळून जाते.

शिखरावरील भूभाग ग्रॅनाइटी खडकांचा व इतरत्र मात्र चुनखडीचा आढळतो. काही भागात ज्वालामुखीचे पुरावे आढळतात. कुल्जा या सुपीक प्रदेशाच्या सभोवताली, खानतेंग्रीच्या पूर्वेला ३२० किमी. वर ईशान्य दिशेला दुसरी उपश्रेणी आढळते. या पर्वतश्रेणीतील काही शिखरे बर्फाच्छादित असून सर्वसामान्यपणे ५,७९० मी. उंचीची आहेत.

मूझारट खिंड हा दळणवळणास योग्य असा पर्वतश्रेणीत एकमेव मार्ग आहे. पर्वतश्रेणीचा इतर भाग दुर्गम असून ३,४०० मी. वरील एवढाच मार्ग सिंक्यांग प्रदेश आणि उत्तरेकडील कुल्जा प्रदेश यांतील दळणवळण साधतो.

दक्षिण व उत्तर उतारावरील हवामानात विषमता आहे. पर्जन्यहीन दक्षिण उतार व अतिवृष्टीचा उत्तर उतार हे तिएनशानचे वैशिष्ट्य आहे. लांबीच्या दृष्टीने तुलना करता हिमालयातील हिमनद्यापेक्षा येथील हिमनद्या लांब आहेत. खानतेंग्रीवरून निघणाऱ्या दोन हिमनद्यांची लांबी ७० किमी. आहे. पर्वतातून सिरदर्या, चू आणि ईली या नद्या उगम पावतात. विविध जातींच्या पशुपक्ष्यांचे हे वसतीस्थान आहे. आयबेक्स, ओव्हिस–पोली, बर्फातील चित्ते, कोल्हे, रानटी घोडे इ. प्राणी येथे आहेत. १९३६ मध्ये स्वीस गिर्यारोहक लोरेन्स सालाडीन व रशियातील एल्. गुटमन खानतेंग्री प्रथमच चढून गेले.

खातु, कृ. का.