चिटफंड : (चिठ्ठी निधी). भारतातील पुरातन वित्तीय संस्था. तिचे मुख्य प्रकार तीन : (१) साधी चिट, (२) बक्षीस चिट व (३) व्यापारी चिट, साधी चिट म्हणजेच भिशी, हीमध्ये सभासदांच्या वर्गणीतून दर हप्त्यास जमा झालेली रक्कम चिठ्ठ्या टाकून, ज्याचे नाव येईल त्याला मिळते. दरवेळी एकास अशा रीतीने पाळीपाळीने सर्वांना रक्कम दिली जाते. बक्षीस चिट म्हणजे केवळ लॉटरी. वर्गणीद्वारा जमा झालेल्या रकमेतून सोडवणुकीच्या वेळी ज्याच्या नावाची चिठ्ठी येईल, त्याला बक्षीस दिले जाते. बक्षीस मिळाल्यास त्याला पुढील हप्त्यांची वर्गणी द्यावी लागत नाही. सर्व सभासदांची बक्षिसाची पाळी संपल्यावरच त्याला वर्गणीचा हप्ता द्यावा लागतो. बक्षीस चिटच्या प्रवर्तकास कमिशन मिळते व जमा झालेल्या रकमेतून उरलेली रोकड स्वतःच्या व्यवसायात वापरता येते. व्यापारी चिटचा प्रवर्तक सभासदांकडून जितके सभासद तितक्या हप्त्यांमध्ये रक्कम जमा करतो. दर हप्त्यात जमा झालेल्या रकमेचा सभासदांमध्ये लिलाव करतात. जो सभासद सर्वांत अधिक कसर देण्यास तयार होतो, त्याला जमा झालेल्या वर्गणीतून कसर व प्रवर्तकाचे कमिशन वजा करून उरलेली रक्कम देण्यात येते. मात्र पुढील हप्त्यांची वर्गणी भरण्याची हमी त्याच्याकडून प्रवर्तक घेतो. सर्वच प्रकारचे चिट फंड हे बचत करण्याचेच मार्ग आहेत. त्या सर्वांचे कायद्याने नियंत्रण करणे आवश्यक आहे, असे मत बॅंकिंग आयोगाने (१९७२) आपल्या अहवालात दिले आहे.
धोंगडे, ए. रा.