कर्मचारी नियुक्ति पद्धति : कोणत्याही व्यवसाय संघटनेला स्पर्धायुक्त बाजारात तोंड देण्यासाठी आपल्या व्यवसायाची प्रतिमा विशुद्ध व दर्जेदार ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी संघटनेच्या विविध विभागांत काम करणारे कर्मचारी व त्यांच्याकडून होणारे काम या दोनही गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणून कर्मचार्‍यांची भरती करण्यापूर्वी आणि त्यांची कार्यक्षमता उच्च राहण्यासाठी योग्य भरतीपद्धतीचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे असते. आवश्यक तेवढेच कार्यक्षम कर्मचारी नियुक्त करणे, हे संघटनेच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. कारण ह्यामुळे उत्पादकता जास्त राहून सर्व प्रकारचा अपव्यय टाळण्यास मदत होते.

 योग्य कार्यक्षमतेचा कर्मचारी नियुक्त करण्यापूर्वी त्याला कराव्या लागणार्‍या कामाची निश्चिती, त्याच्यामध्ये असावी लागणारी कार्यक्षमता आणि त्यासाठी लागणारे विशेष गुण लक्षात घेऊन संघटनेच्या प्रत्येक विभागात कार्यविश्लेषण होणे महत्त्वाचे ठरते. 

कोणत्याही व्यावसायिक संघटनेत कर्मचारी पुढील पद्धतींनी नियुक्त केले जातात : (१) प्रत्यक्ष भरती : भरती करण्यासाठी स्वतंत्र विभाग उघडून या विभागाद्वारे रिकाम्या जागांसाठी भरती करण्यास वर्तमानपत्रे, मासिके इ. माध्यमांतून जाहिरात देण्यात येते. उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतात. अर्जांची छाननी करून योग्य उमेदवारांस मुलाखतीसाठी बोलविण्यात येते. लेखी चाचणी, गटवार चर्चा, वैयक्तिक मुलाखत अशा निरनिराळ्या कसोट्यांनी मूल्यमापन करून आवश्यक त्या उमेदवारांची निवड करून नियुक्ती केली जाते. (२) मध्यस्थामार्फत भरती : बर्‍याच व्यवसायांत कर्मचार्‍यांची भरती ही मुकादमांमार्फत किंवा मध्यस्थांमार्फत केली जाते. हे मध्यस्थ किंवा मुकादम संघटनेच्या आवश्यकतेप्रमाणे कर्मचारी पुरविण्याची जबाबदारी घेतात. (३) ठेकेदारीने नियुक्ती : ठेकेदार हा कर्मचारी पुरविणारा एक मध्यस्थच असतो व कोणत्याही कार्यासाठी श्रमिकांचा किंवा कर्मचार्‍यांचा पुरवठा करण्याचा करार करून त्या कराराप्रमाणे तो कर्मचारी उपलब्ध करतो वा त्यांच्याकडून कामे पूर्ण करून घेतो. (४) दरवाजावर भरती : संघटनेस आवश्यक असणार्‍या कर्मचार्‍यांची भरती कारखान्याच्या दरवाजावरही केली जाते. ‘कामगार पाहिजे’ असा फलक कारखान्याच्या दारावर लावण्यात येतो. दारावर आलेल्या उमेदवारांतून आवश्यक तेवढ्या कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाते. (५) रोजगार कार्यालयामार्फत भरती : कर्मचार्‍यांची भरती करताना रोजगार कार्यालये फार महत्त्वाची मदत करतात. या कार्यालयात ज्यांना नोकरी पाहिजे असे कर्मचारी उमेदवार आपल्या माहितीची नोंद करतात व त्या नोंदीच्या आधारावर हे कार्यालय निरनिराळ्या व्यवसाय संघटनांना कर्मचार्‍यांची जागा भरताना उपलब्ध व लायक उमेदवारांची पूर्ण माहिती देऊन योग्य उमेदवारांची नियुक्ती करण्यास मदत करते. बेकार उमेदवारांना नोकरी उपलब्ध करून देण्यास मदत करण्याचे महत्त्वाचे काम रोजगार कार्यालय करते. (६) शैक्षणिक संस्थांद्वारा भरती : आधुनिक काळात निरनिराळ्या पर्यवेक्षक किंवा त्याही वरच्या अधिकार्‍यांची भरती करताना महाविद्यालये वा विद्यापीठे या संस्थांचाही मध्यस्थ म्हणून वापर केला जातो. पदवी किंवा पदव्युत्तर वर्गांमध्ये शिकणार्‍या हुशार विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली जाते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणार्थी किंवा अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते. अशी पद्धत निरनिराळ्या संघटनांकडून अवलंबिली जाते. (७) श्रमिक संघटनांमार्फत भरती : श्रमिकांच्या संघटनाही कर्मचार्‍यांची योग्य नियुक्ती करण्यासाठी मदत करतात. काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कारखान्यांतील रिकाम्या जागांची किंवा नव्याने निघणार्‍या कामाची चांगली कल्पना असते. त्यामुळे त्यांच्या संघटनेमार्फन किंवा काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या प्रत्यक्ष ओळखीनेही नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची पद्धत अवलंबिली, तर असलेल्या कर्मचार्‍यांचीही व्यवसायाबद्दलची आपुलकी वाढीस लागते. (८) गुणवत्तेनुसार नियुक्ती : आपल्या कर्मचार्‍यांच्या कामांचे सतत निरीक्षण करून आणि त्यांच्या कार्यक्षमतेची शास्त्रीय पद्धतीने नोंद ठेवून गुणवत्तेप्रमाणे यथाकाळ त्यांना बढती देऊन त्यांची नियुक्ती केल्यास कर्मचारी आणि व्यवस्थापक यांचे संबंध दृढ होण्यास मदत होते. निरनिराळ्या व्यवसायांमध्ये जागा भरताना, काही टक्के जागा अंतर्गत बढतीवर आणि उरलेल्या जागा बाह्य नियुक्तिपद्धतीने करण्याची पद्धत सर्रास प्रचलित झाली आहे. 

गोसावी, मो.स.