राष्ट्रीय प्रकल्प बांधकाम निगम : भारताच्या विकास योजनांमध्ये जलसिंचन, वीजनिर्मिती तसेच पूरनियंत्रण करणाऱ्या प्रकल्पांना महत्त्वाचे स्थान आहे. अशा प्रकल्पांना लागणारे तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि पैसा ते ज्या राज्यात उभारायचे तेथील शासनाकडे सहसा नसल्यामुळे त्याला केंद्र शासनाकडे मदत हवी असते. तसेच राज्यातील असा प्रकल्प पुरा झाला की, त्यावर काम करणारे अभियंते, इतर तंत्रज्ञ आणि त्यासाठी वापरलेली यंत्रसामग्री दुसऱ्या राज्यातील प्रकल्पांसाठी उपयोगात आणणे, हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने इष्ट असते. या विचारातून राष्ट्रीय प्रकल्प बांधकाम निगमाची १९५७ मध्ये स्थापना झाली. उपलब्ध तज्ञ आणि पुरे होत असलेल्या प्रकल्पांमध्ये न लागणारी यंत्रसामग्री यांचा इष्टतम उपयोग केला जावा व ज्या राज्यशासनांकडे मोठे प्रकल्प तडीस नेण्यासाठी पुरेशी संघटना नाही त्यांना साहाय्य केले जावे, हा या नगिमाचा प्रमुख उद्देश आहे. असे केंद्र शासनाच्या जलसिंचन आणि शक्ती मंत्रालयाने निगमाच्या प्रस्थापनेच्या संदर्भात निवेदन केले होते. या निगमात बांधकाम करणाऱ्या खाजगी संस्थांच्या कार्यपद्धतीतील लवचिकपणा आणि शासन विभागाद्वारा बांधकाम करण्याचे फायदे, या दोहोंचा संगम आहे.

प्रारंभी निगमाचे अधिकृत भांडवल पाच कोटी रुपयांवरून १० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. ३१ मार्च १९८० अखेर निगमाचे भरणा झालेले भांडवल (केंद्र व राज्यशासने यांनी मिळून दिलेले) पाच कोटी रु. होते. निगमाच्या कामाचा व्याप जसजसा वाढत गेला, तसतसे त्याचे भांडवलही वाढविले गेले व १९८३-८४ च्या अखेरीस ते १२·३९ कोटी रुपये झाले. याशिवाय राखीव निधी २·२५ कोटी रु. आणि बॅंका व केंद्र शासन यांच्याकडून ५४·१२ कोटी रु. असे एकूण ६८·८६ कोटी रुपयांचे वित्त निगमाच्या वापरात होते. याचा उपयोग घसारा वजा जाता ३२·६५ कोटी रुपयांची स्थिर मालमत्ता, ३५·५२ कोटी रुपयांची निव्वळ चालू मालमत्ता व ०·६९ कोटी रु. किरकोळ यांकडे करण्यात आला होता. १९८३-८४ मध्ये निगमाचे एकूण उत्पन्न १०४·८१ कोटी व नफा १·३९ रु. होता.

निगम विविध प्रकारची बांधकामे करतो. त्यांत मोठी धरणे, औष्णिक आणि जलविद्युत्‌ केंद्रांसाठी सर्व प्रकारचे बांधकाम, पाणी वाहून नेण्यासाठी बोगदे, कालवे, सिमेंट, पोलाद, कोकभट्ट्या इ. प्रकारच्या मोठ्या कारखान्यांसाठी बांधकाम, पाणीपुरवठा, दगडखाणी, मोठमोठ्या कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी निवास व इतर सुविधा पुरविणाऱ्या इमारती, टेकड्यांचे संरक्षण करणारे बांधकाम ही कामे प्रामुख्याने आहेत.

निगमाने १९८३-८४ मध्ये आंध्र प्रदेश, बिहार, हरयाणा, जम्मू व काश्मीर, महाराष्ट्र, मणिपूर, मध्य प्रदेश, ओरिसा, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि प. बंगाल या राज्यांतील ३९ प्रकल्पांवरील कामे हाती घेतली होती. त्यांतील मुख्य कामांची यादी पुढीलप्रमाणे आहे : राउरकेला पोलाद कारखाना ११·८ कोटी रु. फराक्का राख-व्यवस्था-संयंत्र ११·९ कोटी रु. तेहरी जलविद्युत् केंद्र १५·८ कोटी रु. मणेरीभाली विद्युत् केंद्र-दुसरा टप्पा १७·४ कोटी रु. सलाल विद्युत् केंद्र १८·७ कोटी रु. कांगम्‌ जलविद्युत् केंद्र १९·९ कोटी रु. रिहांड अति-औष्णिक विद्युत् केंद्र ३७·४ कोटी रु. सिंग्रौली पाणीपुरवठा आणि मध्यवर्ती कर्मशाळा ३०·७ कोटी रु. तोतलाडोह मुख्य धरण २४·५ कोटी रु. राजघाट धरण २४·० कोटी रु. गोदावरी बंधारा २०·९ कोटी रु. विशाखापटनम्‌ कोकभट्टी आनुषंगिक पदार्थ कारखाना ५८·५ कोटी रु. आणि सिंटरिंग कारखाना १७·६ कोटी रु.

निगमाचे कार्यक्षेत्र भारतापुरते मर्यादित नसून तो इतर देशांतही कामे करतो व भारताला परदेशी चलन मिळवून देतो. १९८३-८४ मध्ये त्याच्याकडे इराकमध्ये जलसिंचन कालवे, जमीन पुनःप्रापण प्रकल्पासाठी जलनिकास योजना आणि भूतानमध्ये जलविद्युत् केंद्रासाठी बोगदे बांधणे अशी अनुक्रमे ३०·६ कोटी रु. व १५·४ कोटी रु. ची कामे होती.

पेंढारकर, वि. गो.