चिंपँझी : हा मानवसदृश कपी पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील वर्षावनात (ज्यात निदान २५४ सेंमी. पाऊस पडतो आणि अतिशय दाट, हिरवेगार व उंच वृक्ष असतात असे अरण्य) राहतो. याच्या एकदोन जाती आहेत. त्यांपैकी विशेष माहीत असलेल्या जातीचे शास्त्रीय नाव पॅन ट्राग्लोडायटीझ असे आहे.
याची उंची १–१·७ मी. असते. हात गुडघ्यांपर्यंत पोहोचतात. शेपूट आणि आसन-किण (ढुंगणावरील घट्टे) नसतात. नराचे वजन ५६–८० किग्रॅ. व मादीचे ४५–६८ किग्रॅ. असते. अंगावर दाट काळे केस असतात. चेहरा काळसर तांबूस रंगाचा असून त्यावर केस नसतात. डोळे तपकिरी रंगाचे भ्रूकटक (भुवईचा कंगोरा) मोठे ओठ पुढे आलेले व भावदर्शक कान लहान कपोल-कोष्ठ (गालातील पिशाव्या) नसतात दृष्टी व श्रवणेंद्रिये तीक्ष्ण असतात.
हा ताठ उभा राहून थोड्या अंतरापर्यंत चालू शकतो, पण बहुधा हातापायांचा उपयोग करून चतुष्पादांप्रमाणे चालतो व चालताना अंगुलिपर्वे (हाताच्या बोटांचे सांधे) जमिनीवर टेकलेली असतात.
यांची कुटुंबे असतात. एका कुटुंबात एक नर, अनेक माद्या व पिल्ले असतात. फळे, पाने आणि इतर शाकान्नावर हे निर्वाह करतात, पण संधी मिळेल तेव्हा मांसदेखील खातात. रात्री झोपण्याकरिता हे झाडावर खोपटी बांधतात, पण एक खोपटे एकदाच वापरतात.
मादीला दर खेपेस एकच पिल्लू होते. गर्भावधी सु. २६१ दिवसांचा असतो.
माणसाच्या खालोखाल चिंपँझी हाच बुद्धिमान प्राणी आहे. कोणतीही गोष्ट तो लवकर शिकतो. हा उत्तम सोंगाड्या असल्यामुळे सर्कसमध्ये खेळ करून दाखविण्याकरिता याचा उपयोग करतात. शारीर (प्राण्याचे रूप किंवा आकृती व संरचना यांचा अभ्यास), वैद्यक, शरीरक्रियाविज्ञान आणि मानसशास्त्र यांच्या अभ्यासाकरिता प्रयोगशाळांत चिंपँझीचा उपयोग करतात.
पहा : मानवसदृश कपि.
जोशी, मीनाक्षी
“