चिंचवड : पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील एक प्रसिद्ध देवस्थान व आता औद्योगिक केंद्र. लोकसंख्या पिंपरीसह ८३,५४२ (१९७१). हे पुणे-मुंबई लोहमार्गाजवळ, पुण्याच्या उत्तरेस सु. १७·५ किमी. वर पवना नदीकाठी आहे. येथे चिंचेच्या झाडांची विपुलता असल्यामुळे यास चिंचवड हे नाव पडले असावे. प्रसिद्ध गाणपत्य साधू मोरया गोसावी यांची येथे समाधी असून त्यांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्य तृतीयेपासून षष्ठीपर्यंत मुख्य महोत्सव म्हणून साजरी करतात. येथील देवस्थान शासनाने नेमलेल्या विश्वस्तांच्या देखरेखीखाली असून त्याला शिवाजी, संभाजी, राजाराम व थोरला शाहू यांनी अनेक इनामे दिली आहेत. पेशव्यांनी येथे टांकसाळ घालण्यास आणि त्याचे उत्पन्न या देवस्थानास देण्याकरिता उत्तेजन दिले होते. सध्या येथे रबर, अभियांत्रिकी, रासायनिक व पेनिसिलीन वगैरे औषधांचे कारखाने असून येथील कौशल्यपूर्ण मातीची भांडी प्रसिद्ध आहेत. १ मे १९७५ रोजी महाराष्ट्र शासनाने पिंपरी-चिंचवड नवनगरपालिकेच्या नव्याने विकास पावत असलेल्या औद्योगिक परिसरात ‘कामगार कल्याण नगरी’ प्रकल्पाचा शिलान्यास केला. हा प्रकल्प ११ हे. जमिनीत प्रारंभी ५० लक्ष रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे.

कांबळे, य. रा.