चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या ४१,७२० (१९७१). हे धुळ्याच्या दक्षिणेस ४८ किमी. व जळगावच्या नैर्ऋत्येस ८० किमी. आहे. मुंबई–भुसावळ–दिल्ली या मध्य रेल्वेवरील हे प्रस्थानक असून येथून धुळ्यास एक फाटा गेला आहे. धुळे–औरंगाबाद हा राजमार्ग चाळीसगावावरून जातो. याच्या आसमंतात कापूस, भुईमूग, मिरची, केळी, मोसंबी, कुळीथ, ऊस इ. पिके काढली जातात. तसेच येथे बीजसंवर्धन केंद्र असून कापूस व भुईमुगाची बाजारपेठ आहे. येथे माध्यमिक शाळा, महाविद्यालय, वाचनालय, वसतिगृहे, रुग्णालये, सूतिकागृहे चित्रपटगृहे व डाकघर इ. सोयी असून एक कुष्ठरोग निवारणकेंद्र आहे. तसेच कापडगिरणी, चर्मोद्योग, अभियांत्रिकी कारखाने, तेलगिरण्या इ. लहानमोठे उद्योगधंदे आहेत. येथील नगरपालिकेची स्थापना १९१७ साली झाली. हे सातमाळा रांगेच्या पायथ्याशी असून अजिंठा लेण्यास जाण्यासाठी येथून जवळचा मार्ग आहे. येथे ऑगस्ट महिन्यात उरूस भरतो.
कांबळे, य. रा.