चार्नोकाइट माला : भरडकणी, गडद रंगाच्या व हायपर्स्थीन खनिजयुक्त ग्रॅनाइट खडकांच्या समूहाचे नाव. यातील ऑर्थोपायरोक्सीन अणि कणमय वयन (पोत) प्रथम जड यांनी १८८५ मध्ये ओळखले. कलकत्त्याचे संस्थापक जाब चार्नक यांच्या थडग्यावरील स्मारकशीला मद्रासजवळच्या सेंट टॉमस मौंट येथील खाणीतून काढलेल्या या खडकाची बनविली होती. सर टॉमस हेन्री हॉलंड यांनी १८९३ साली चार्नक यांच्या बहुमानार्थ या खडकाला चार्नोकाइट नाव दिले. हॉलंड यांनी १९०० साली लिहिलेल्या चार्नोकाइट मालेवरील लेखात मद्रासजवळच्या व दक्षिण तमिळनाडूतील चार्नोकाइटाचे वर्णन केले. त्यात त्यांनी चार्नोकाइटाची व्याख्या क्वॉर्ट्झ-फेल्स्पार-हायपर्स्थीन लोह धातुकयुक्त खडक अशी दिली आहे. त्यांच्या मते संबंधित सिकत (विपुल सिलिका असणाऱ्या), अल्पसिकत आणि अत्यल्प सिकत (सिलिका अतिशय कमी असणाऱ्या) संघटनाचे खडक उत्पत्तीच्या दृष्टीने चार्नोकाइटाशी निगडीत आहेत. त्यांनी हायपर्स्थीनयुक्त व कणमय वयनाच्या सर्व खडकांचा चार्नोकाइट मालेत समावेश केला होता.
खनिज संघटन : चार्नोकाइट संचातील खडकांमध्ये पुढील खनिजे असतात. (१) आवश्यक खनिजे : निळसर क्वॉर्ट्झ, २०–३०% ॲनॉर्थाइट असलेले प्लॅजिओक्लेज फेल्स्पार अँटिपर्थाइट, मायक्रोपर्थाइट व मायक्रोक्लीन ही असणारा निळसर हिरवट फेल्स्पार यूलाइट व हायपर्स्थीन दरम्यानचे संघटन असणारे ऑर्थोपायरोक्सीन. (२) प्रकारदर्शक खनिजे : क्लिनोपायरोक्सीन, गार्नेट, हॉर्नब्लेंड आणि कृष्णाभ्रक. (३) गौण खनिजे : ॲपेटाइट, झिर्कॉन, इल्मेनाइट, टिटॅनोमॅग्नेटाइट, पायरोटाइट व ग्रॅफाइट.
उत्पत्ती : हॉलंड यांच्या मते चार्नोकाइट माला अग्निज खडकांचा एक गट होय. एच्. एस्. वॉशिंग्टन व आर्. ए. होवी यांनी या मताला नंतर पाठिंबा दिला. व्रेडेनबर्ग यांनी भारतीय चार्नोकाइट रूपांतरित धारवाडी संघाचे खडक आहेत, असे १९१८ मध्ये प्रतिपादिले. पी. के. घोष यांच्या मते कॅल्शियम, लोह व मॅग्नेशियम ही ज्यांत आहेत, अशा गाळांचे पुनःपुन्हा रूपांतरण झाल्यानंतर त्यांचे क्षारीय (अल्कलिक) द्रायूंनी (वायू व द्रव यांनी) कायांतरण झाल्यामुळे पूर्व घाटातील चार्नोकाइट निर्माण झाले आहेत (१९४१). बी. राम राव यांच्या मतानुसार निरनिराळ्या काळातील खडकांच्या गटांच्या रूपांतरण-बदलांच्या पुनरावृत्त मालांच्या एकत्रित परिणामांमुळे कर्नाटकातील चार्नोकाइट उत्क्रांत झाले आहेत व परिणामी विविध संघटनांचे हायपर्स्थीन ग्रॅन्युलाइट बनले आहेत (१९४५). चार्नोकाइट म्हणजे रूपांतरणाच्या दोन घटनांमध्ये तयार झालेले रूपांतरित खडक होत, असे पिचमुथू यांचे मत आहे (१९५३). चार्नोकाइट सिकत अग्निज संच होत हे सुब्रह्मण्यम् यांचे मत आता होवी यांना मान्य झाले आहे (१९५४). चार्नोकाइट हे ग्रॅन्युलाइट संलक्षणीच्या प्रदेशापुरते मर्यादित असून काही भागांमध्ये त्यांचे निम्नीकरण व बहुरूपांतरण झालेले आहे. सुब्रह्मण्यम् यांच्या मताप्रमाणे चार्नोकाइट संचातील खडक ग्रॅन्युलाइट ⇨संलक्षणीच्या निर्जलीय व अत्युच्च दाबाच्या परिस्थितीमध्ये शिलारसापासून स्फटिकीभवनाने तयार झाले (१९५९). इतर देशांमधील तज्ञांनी चार्नोकाइटाच्या उत्पत्तीसंबंधी भिन्न भिन्न मते प्रतिपादिली आहेत. एफ्. एल्. स्टिलवेल यांच्या मते अंटार्क्टिकातील चार्नोकाइट पातालिक रूपांतरणाने तर ए. डब्ल्यू. ग्रव्हज यांच्या मते युगांडातील खडक अग्निज खडकांच्या खूप खोलीवरील रूपांतरणाने झाले आहेत (१९३५). थोडक्यात ते अतिशय खोल जागी तयार होत असावेत. परंतु त्यांची वैशिष्ट्ये अग्निज खडकांसारखी असतात, मात्र या खडकांच्या उत्पत्तीपेक्षा त्यांची भूवैज्ञानिक मांडणी अधिक महत्त्वाची असल्याचे लक्षात येत आहे.
वय : उपलब्ध झालेल्या किरणोत्सर्गी कालमापन माहितीच्या [⟶ खडकांचे वय] आधारे भारतीय द्वीपकल्पातील चार्नोकाइटांची वये ५० ते २५० कोटी वर्षे एवढी येतात. त्या वयांवरून गिरिजननाच्या विविध घटनांमध्ये चार्नोकाइटांची अभिस्थापना (ठराविक स्थितीत अग्निज राशी घुसून) झाली असण्याची शक्यता सूचित होते. बहुतेकांच्या मतानुसार चार्नोकाइट द्वीपकल्पी पट्टिताश्मांपेक्षा नवीन आहेत.
संदर्भ : 1. Krishnan, M. S. Geology of India and Burma, Madras, 1960.
2. Pascoe, E. H. A Manual of the Geology of India and Burma, Delhi, 1965.
सुब्रह्मण्यम्, ए. पी. (इं.) ठाकूर, अ. ना. (म.)