चॅटानूगा : अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील औद्योगिक शहर लोकवस्ती १,१९,०९२ (१९७०). हॅमिल्टन परगण्याचे हे मुख्य ठाणे टेनेसी नदीच्या मोठ्या वळणात जॉर्जियाच्या सीमेजवळ मोक्याच्या जागी वसले असून पर्वत व टेकड्या यांनी वेढलेले आहे. याच्या आसमंतात अमेरिकेच्या यादवी युद्धातील निर्णायक लढाया झालेल्या आहेत. ॲलाबॅमातील बर्मिंगहॅमच्या लोखंड व कोळसा खाणी उपलब्ध होईपर्यंत येथील लोखंड व कोळसा उद्योग अधिक महत्त्वाचा होता. लोहमार्गांनी अटलांटिककडील मार्ग खुला झाल्यामुळे येथे धातुकाम, कापडउद्योग, कृत्रिम धागा, यंत्रे, घरगुती सामान, रसायने, कातडी वस्तू, कागद, काच, औषधे, अन्नप्रक्रिया, वीजउत्पादन इ. उद्योगांची वेगाने वाढ झाली. सुप्रसिद्ध टेनेसी खोरे प्रकल्पाची काही कार्यालये येथे असून पूरनियंत्रण व वाहतूक या दृष्टींनी टेनेसी उपयोगी ठरू लागली आहे. आता रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व आकाशमार्ग यांचे हे मोठे केंद्र बनले असून आधुनिक वाढत्या औद्योगिक शहराच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथे विद्यापीठीय व इतर शिक्षणाच्या सर्व सोयी आहेत. जवळच्या लुकआउट पर्वतावरील गुहा, अवघड चढावरील लोहमार्ग, माथ्यावरील रॉकसिटीची विचित्र खडक रचना, ४४ मी. उंचीचा धबधबा, सिग्नल पर्वत, ऑर्थर्ड नॉब, मिशनरी कटक, टेनेसीची घळई, ११ किमी. वरील चिकमॉग धरण व तेथील विश्रामस्थाने, निसर्गरम्य वनश्री, सुरम्य उद्याने, राष्ट्रीय सैनिकी उद्याने यांमुळे चॅटानूगा हे पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे.
कांबळे, य. रा.