चर्मोद्योग : मृत प्राण्याच्या त्वचेवर (म्हणजेच कातड्यावर) नैसर्गिक वा रासायनिक पदार्थांच्या प्रक्रिया करून ती न कुजणारी वा न सडणारी अशी केली जाते. अशा प्रक्रियित त्वचेला कमावलेले कातडे, चामडे वा चर्म म्हणतात. कातडी कमावणे आणि त्यांपासून पादत्राणे, पाकिटे, पेट्या इ. विविध वस्तू तयार करण्याच्या उद्योगाला चर्मोद्योग असे म्हणतात. मृत प्राण्याचे कातडे जर तसेच हवेत वा बंद जागेत ठेवले, तर त्यावर हवामानाचा व सूक्ष्मजंतूंचा परिणाम होऊन सडण्याची क्रिया हळूहळू सुरू होते, त्याचे भौतिक गुणधर्म बदलतात व असे कातडे जास्त दिवस टिकत नाही. परंतु त्यावर बाभळीच्या सालीसारख्या पदार्थांची प्रक्रिया केल्यास ते कातडे बरेच दिवस टिकते. त्यावर बदलत्या हवामानाचा वा सूक्ष्मजंतूंचा परिणाम होत नाही. शिवाय त्याचे भौतिक गुणधर्म तसेच राहतात, एवढेच नव्हे, तर त्यामध्ये आणखी काही उपयुक्त गुणधर्मांची भर पडते. अशा प्रक्रियांना ‘कातडे कमावणे’ (टॅनिंग) म्हणतात.
इतिहास : कातडी कमावणे ही माणसाला माहीत असलेली एक जुनी कला आहे. बऱ्याच प्राचीन संस्कृतींच्या अवशेषांत कातडी कामाचे अवशेष वा वस्तू सापडतात. अन्नासाठी मारलेल्या प्राण्यांची कातडी आदिवासींनी कपड्यांसाठी प्रथम वापरली असावीत व नंतर ती इतर उपयोगांसाठी वापरली असावीत. कातड्यांचे संरक्षण करण्याची वा कमावण्याची कला मानवाला पूर्वीपासून माहीत होती आणि ती वंशपरंपरागत पुढे चालू राहिली. प्राचीन हिब्रू लोकांनी ओक वृक्षाच्या सालीचा कातडी कमावण्यासाठी प्रथम उपयोग केला. हे लोक कातडी कमावण्याच्या कामी तरबेज होते. ही कला त्यांनी ईजिप्शियन लोकांकडून घेतली. ईजिप्तमधील उत्खननांत सापडलेली कातडी व कातडी वस्तू सु. ३,३०० वर्षांपूर्वीच्या असून त्या अद्यापि उत्तम स्थितीत आहेत. सोने, चांदी, हस्तिदंत इ. मौल्यवान वस्तूंएवढी कातड्याला प्राचीन ईजिप्तमध्ये किंमत असे. प्राचीन ग्रीक लोक कातड्याचा उपयोग चिलखत, नावा, कपडे इत्यादींसाठी करीत. रोमन लोक त्याचा नाण्यासारखा उपयोग करीत.
हल्लीच्या जेरिको शहरापासून सु. ११ किमी. वरील आणि मृत समुद्राच्या उत्तरेकडील पर्वतांमधील गुहांमध्ये १९४७ मध्ये बरीच चर्मपत्रे (स्क्रॉल्स) सापडली. ती इ. स. पू. दूसरे शतक ते इ. स. ६८ या कालावधीतील असावीत असे मानले जाते. ही चर्मपत्रे हिब्रू भाषेत आहेत. ती अद्यापि खराब झालेली नाहीत.
ईजिप्त, चीन, ग्रीस, बॅबिलोनिया इ. देशांतही हा व्यवसाय बराच प्रगत होता. ह्या देशांमधून निर्यात होणाऱ्या कलाकुसरीच्या व टिकाऊ कातडी मालाची जगभर प्रशंसा होत असे. वाघाचे कातडे काढून ते कमावीत असलेल्या एका कारागिराची दगडी मूर्ती बर्लिन येथील संग्रहालयामध्ये आहे. ती सु. ४,००० वर्षांपूर्वीची असावी. हल्ली वापरतात त्या प्रकारासारख्या रंगीबेरंगी चपला रोमन काळामध्ये राजघराण्यातील आणि सरदारांच्या स्त्रिया वापरीत असाव्यात, असा तत्कालीन ग्रंथांमधून उल्लेख आढळतो. कातडी चेंडूचा उपयोग प्रथम जपानमध्ये करण्यात आला. आशिया व मध्यपूर्वेतील देशांत विशेषतः स्त्रियांनी वापरावयाच्या कातडी पोशाखावर जर व रेशीम यांचे उत्तम भरतकाम होत असे.
मध्ययुगीन काळात यूरोपातील सर्व देशांत कातडी कमावण्याचा आणि त्यांपासून वस्तू तयार करण्याचा धंदा जोरात होता. यूरोपमध्ये त्यावेळी चालणाऱ्या सतत युद्धांमुळे या धंद्याला ऊर्जितावस्था आली. सोळाव्या शतकापर्यंत निर्यातीची एक वस्तू म्हणून तिला महत्त्व होते. अमेरिकेतील इंडियन लोक कातडी कमावण्याच्या कामी तरबेज होते.
वैदिक काळामधील व त्यापूर्वीच्या ग्रंथांमधून (इ.स.पू. १५०० ते १००० वर्षे) ‘चर्मकार’ म्हणन हिंदू धर्मातील काही जातींचा उल्लेख असून ‘जनावरांपासून कातडी काढून ती कमावणे त्यांपासून पादत्राणे, पखाली, रथांच्या घोड्यांचा सरंजाम, योद्ध्यांनी घालावयाचा पोशाख, चिलखताच्या आतून घालावयाचा कातडी अंगरखा, सोमरस व इतर द्रव पदार्थ साठविण्यासाठी लागणारी बुधली इ. वस्तू तयार करणारी जमात’ असे त्यांचे वर्णन आढळते. रामायण, महाभारत इ. ग्रंथांत त्या काळात कातड्याच्या टिकाऊ व रंगीबेरंगी वस्तू वापरण्यात येत असत, असा उल्लेख आढळतो.
सुरुवातीला शेकोटीच्या धुरावर कातडी टांगून ठेवून किंवा त्यांना तेलकट (ग्रीज) पदार्थ लावून, धूर देऊन, ताणून व मऊ करून कातडी कमावण्यात येत. वनस्पतिजन्य टॅनिनांचा उपयोगही इतिहासपूर्व काळातील आहे. इंग्लंडमध्ये कातडी कमावण्यासाठी ओक वृक्षाच्या सालीचा उपयोग करीत. त्यामुळे तेथे हा धंदा ओक वृक्षांच्या जंगलानजीकच वसला होता. आशिया मायनर व ग्रीस ह्या प्रदेशांमधून इंग्लंडमध्ये १७८० च्या सुमारास व्हॅलोनिया ओक (क्वर्कस एजिलॉप्स, ओक वृक्षाची एक जात) या वृक्षाच्या फळांची आयात होऊ लागली. ओक वृक्षाच्या सालीबरोबर कातडी कमावण्यासाठी त्यांचा उपयोग करण्यात येऊ लागला. ही पद्धत जवळजवळ शंभर वर्षे वापरात होती. तुरटीच्या साहाय्याने कातडी कमावण्याची प्रक्रियाही जुनीच आहे. ह्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करून ती अद्यापिही हातमोजे तयार करण्याच्या कातड्यासाठी वापरण्यात येते. १८५८ मध्ये क्नाप यांनी आणि १८७९ मध्ये हाइन्झरलिंग यांनी क्रोम प्रक्रियेचे एकस्व (पेटंट) घेतले, पण या प्रक्रियेचा प्रथम औद्योगिक वापर १८८४ मध्ये शूल्ट्झ यांनी केला. मार्टिन डेनिस यांनी १८९३ मध्ये क्रोम टॅनिंगसाठी लागणाऱ्या मूलभूत विद्रावाचे एकाच कुंडात करावयाच्या प्रक्रियेसाठी इंग्लंड व अमेरिका येथील एकस्व घेतले. पोटॅशियम बायक्रोमेट विद्रावामध्ये उसाची साखर घालून डेनिस यांच्यासारखाच टॅनिंग विद्राव १८९७ मध्ये प्रॉक्टर यांनी तयार केला.
आल्डिहाइडे वापरून कातडी कमावण्याची प्रक्रिया १८९८ च्या सुमारास प्रथम वापरात आली. पुल्मन-पेन यांची प्रक्रिया लष्करासाठी वापरावयाच्या कातड्यासाठी वापरली जात असे. पण सध्या तिचा उपयोग इतर प्रक्रियांबरोबर करण्यात येतो. १९१० मध्ये लीड्स विद्यापीठात स्टिआन्सी यांनी फिनॉल आणि सल्फ्यूरिक अम्ल यांची विक्रिया करून मिळणाऱ्या पदार्थांचे फॉर्माल्डिहाइडाशी संघनन (दोन अथवा अधिक रेणूंची जोडणी) करून मिळणाऱ्या संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेल्या) टॅनिनाचा उपयोग प्रथम केला.
कातडे, त्यातील घटक व गुणधर्म : कातड्याचा आडवा छेद घेऊन तो सूक्ष्मदर्शकातून पाहिला असता तो छेद आ. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे दिसतो.
कातड्यातील केशपुटकामधून (कातड्यामध्ये असलेल्या वरच्या थरातील पेशीच्या बनलेल्या नळीसारख्या रचनेमधून) केसाची वाढ होत असते. केशकंदाचा म्हणजे केसाच्या मूळाचा आकार फुगीर असतो. केशपुटकाला एका लहान रक्तवाहिनीमार्फत रक्तपुरवठा केला जातो. केशपुटकातील प्रथिने व इतर द्रव्ये यांपासून केशकंदातील पेशी तयार होतात. केसाची वाढ होत असताना या पेशी कातड्याच्या पृष्ठभागाकडे सरकत जातात आणि जाताना लांबट बनतात. पृष्ठभागावर पोहोचल्यावर त्या केसाच्या आतील संरचनेच्या स्वरूपात राहतात. केस बव्हंशी केराटीन या पदार्थाचा बनलेला असतो. केशपुटकाचे अस्तर — आतील पडदा
– केराटिनासारख्या प्रथिनांचा बनलेला असतो व तो केशपुटकात आत वळून पुन्हा वर येऊन दोन्ही बाजूंस पसरून कातड्याच्या सलग वरचा थर बनतो. याला बाह्यत्वचा म्हणतात. हा थर कठीण, रासायनिक प्रक्रियांना प्रतिरोधी असून यातील पेशींची पुनःस्थापना (पहिल्यांच्या जागी दुसऱ्या येणे) होत असते. बाह्यत्वचेतील खालच्या थरातील पेशी वरच्या थरातील पेशींना एकसारख्या वरच्या बाजूला रेटत असतात, त्यामुळे सर्वांत वरच्या पेशी पडून जाऊन त्या जागी नवीन येत राहतात. केशपुटकाच्या मध्यावर कुठेतरी त्वक्-स्नेह ग्रंथीतून (तैलयुक्त पदार्थ स्रवणाऱ्या ग्रंथीतून) निघणारी वाहिनी येऊन मिळते. या वाहिनीवाटे ग्रंथीमध्ये तयार होणारी तेले केसाच्या आत तसेच कातड्याच्या पृष्ठभागावर येतात. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी तसेच केसतंतूंना तैलपुरणासाठी (वंगणासाठी) याचा उपयोग होतो. स्वेद ग्रंथीमधून (घाम आणणाऱ्या ग्रंथीमधून) बाहेर पडणारे पाणी तसेच शरीरातील अनावश्यक पदार्थ कातड्यावरील छिद्रांवाटे बाहेर टाकले जातात. या पाण्याचे बाष्पीभवन होते व या क्रियेमध्ये शरीरात उत्पन्न होणारी उष्णता कमी होते व त्याचे तापमान उतरते. कातड्याच्या बाह्यत्वचेखाली लागोलग असणारा थर कोलॅजेनाच्या तंतूंच्या ऊतकाचा (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाचा) बनलेला असून त्यातील तंतूंची रचना केशपुटकाच्या तिरप्या किंवा कललेल्या रेषेशी समांतर असलेल्या तंतूंची असते. या ठिकाणी हे तंतू बारीक तलम असून त्यांची रचना बांधील असते त्यामुळे यापासून बनलेल्या ऊतकाचा पोत कणीदार अथवा रवाळ असतो. त्याला कणीदार ऊतक थर म्हणतात.
केशकंदाच्या खालील मध्यभागात असणारे कोलॅजेन तंतू विस्कळीत, एकमेकांत कसेही गुंतलेले, वजनदार व विशिष्ट रचना नसलेले असतात. मात्र त्यांची संख्या कणीदार ऊतक थरातील तंतूंपेक्षा अधिक असते. वरच्या कणीदार ऊतक थरातील तंतू आणि मध्य थरातील जाडसर तंतू यांमुळे कातड्याचे चर्म बनण्यासाठी लागणारे गुणधर्म प्राप्त होतात. कातड्याची उपयुक्तता व दिखाऊपणा हे गुण या तंतूंचा आकार व पोत यांवर अवलंबून असतात. या दोनही थरांना मिळून मध्यत्वचा म्हणतात व यामध्ये त्वक्-स्नेह ग्रंथी व स्वेद ग्रंथी असतात.
कोलॅजेनाशिवाय इलॅस्टीन तंतूही कातड्यामध्ये असतात. या तंतूंमुळे कातड्याला बळकटी येते. कातड्याच्या सर्वांत खालच्या थरामधील तंतू आडवे व पृष्ठभागाशी समांतर असून त्यांच्या जुड्यांमधील रिकाम्या जागांमध्ये वसा (चरबी) साठवलेली असते. ही वसा कातडे मऊ ठेवणे व शरीराचे तापमान नियंत्रण करणे या शरीरक्रियात्मक कार्यासाठी, तसेच अन्नसाठा म्हणून उपयोगी असते. कातड्यामध्ये असणारा आणि जनावरांना केस ताठ उभे करण्यास उपयोगी पडणारा स्नायू महत्त्वाचा आहे. कातड्याचे चर्म बनविण्यासाठी या स्नायूचा काहीही उपयोग होत नाही, उलट ते प्रत्यक्ष वा रासायनिक क्रियेने काढून टाकावे लागतात. कातड्यामध्ये रोहिण्या व नीला यांची संपूर्ण यंत्रणा असते.
कातडे कमावणे : कातडे कमावण्याच्या प्रक्रियांचे प्रामुख्याने तीन विभागांत वर्गीकरण केले जाते.
(१) प्राथमिक प्रक्रिया, (२) कमावण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रिया आणि (३) कमावल्यानंतरच्या प्रक्रिया.
(१) प्राथमिक प्रक्रिया : मृत जनावराच्या शरीरावरून कातडे काढल्यानंतर ते कमावण्यासाठी योग्य असे करावे लागते. त्यासाठी विविध प्रक्रिया वापरल्या जातात. त्यांना पूर्व वा प्राथमिक प्रक्रिया म्हणतात. कच्ची कातडी चर्मालयात (टॅनरीमध्ये) विविध स्वरूपांत आणली जातात. ही कातडी ओल्या स्थितीत पण मिठाने पूर्वसंस्कार केलेली, कोरड्या स्थितीत पण मिठाने पूर्वसंस्कार केलेली वा वाळविलेली असतात, तसेच काही वेळा ताजी कातडी म्हणजे मृत जनावरावरून नुकतीच काढलेली अशीही असतात. ताजी कातडी फक्त स्वच्छ करून मग ती इतर प्रक्रियांसाठी वापरतात, तर पूर्वसंस्कारित कातडी पाण्यात भिजवावी लागतात.
(अ) भिजविणे : कातड्याच्या मांसल भागावर मीठ पसरवून कातडी एकावर एक ठेऊन त्यांचे गठ्ठे करतात. यालाच पूर्वसंस्कारण (क्यूअरिंग) प्रक्रिया असे म्हणतात. असे गठ्ठे चर्मालयात आल्यावर त्यांतील कमावण्यास योग्य अशीच कातडी काढून इतर अनावश्यक कातडी इतरत्र पाठविण्यात येतात. कमावण्यास योग्य अशीच कातडी गोल फिरणाऱ्या पिपामधून पुष्कळ वेळा धुण्यात येतात. कातड्यामध्ये पाणी मुक्त स्वरूपात व प्रथिनांशी बद्ध स्वरूपात असते. पूर्वसंस्कारित कातड्यामध्ये मुक्त स्वरूपातील पाणी मिठाकडून शोषले जाते. पूर्व संस्कारित कातडी मूळ स्थितीत आणण्यासाठी त्यांतील मीठ काढून टाकण्याबरोबर मुक्त स्वरूपातील पाण्याचे कातड्यात शोषण करून पाण्याचे योग्य ते प्रमाण राखणे आवश्यक असते. यासाठी ती कातडी पाण्यात भिजविली आणि धुतली जातात. कातड्याच्या पृष्ठभागावरील पाण्यात विद्राव्य (विरघळणारे) असलेले भाग या क्रियेमध्ये पाण्यात विरघळतात. त्यामुळे सूक्ष्मजंतूंची वाढ होण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम तयार होते. भिजविण्याची प्रक्रिया जास्त वेळ लांबली, तर कातड्याच्या पृष्ठभागावरील केसांवर विक्रिया होऊन ते गळून पडतात. ही क्रिया चोवीस तासानंतर होते. म्हणून चोवीस तास पूर्ण होण्याआधीच कातडी पाण्यातून बाहेर काढली जातात. कातड्यात पाणी शोषले जाण्याच्या क्रियेचा संबंध पाण्याच्या pH मूल्याशी [→ पी. एच मूल्य] असतो. उन्हात वाळविलेल्या कातड्यामध्ये पाणी लवकर शोषले जावे म्हणून पाण्यात दाहक (कॉस्टिक) सोडा, सोडियम सल्फाइड किंवा कातड्याच्या पृष्ठभाग पाणी शोषण्यास योग्य करणारे पदार्थ मिसळले जातात.
(आ) चुन्याची प्रक्रिया : (लाइमिंग). भिजविलेली कातडी मिल्क ऑफ लाइममध्ये (पाण्यामध्ये निलंबित म्हणजे लोंबकळत्या स्वरूपातील कॅल्शियम हायड्रॉक्साइडामध्ये) बुडवून ठेवल्यास रासायनिक विक्रिया घडून येऊन कातड्यावरील बाह्यत्वचेचा नाश होतो किंवा बाह्यत्वचेचा भाग वेगळा होतो. या प्रक्रियेला चुन्याची प्रक्रिया असे म्हणतात. भिजलेली कातडी जमिनीसपाट काठ असलेल्या मिल्क ऑफ लाइमच्या कुंडात बुडवितात. एक दिवसाआड कुंडातून कातडी बाहेर काढून ती काठावर ठेवतात. नंतर आवश्यकतेनुसर मिल्क ऑफ लाइम मिसळतात व कुंडातील विद्राव ढवळतात आणि कातडी परत त्यात बुडवितात. दहा दिवस मिल्क ऑफ लाइमची वर सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया केल्यास बाह्यत्वचेचा भाग नष्ट होतो, केस सैल होतात व ते सहज काढता येतात.याशिवाय मिल्क ऑफ लाइमचा सर्व कातड्यावरही परिणाम होतो. कातड्यातील तंतू फुगतात आणि त्यांमधील बुळबुळीत पदार्थ बाहेर येण्यास मदत होते. चुन्याची प्रक्रिया करण्यासाठी मिल्क ऑफ लाइमचे एकच कुंड किंवा निरनिराळे प्रमाण असलेली तीन कुंडे वापरतात. काही कातड्यांच्या बाबतीत, विशेषतः मेंढीच्या कातड्यांच्या चुन्याच्या प्रक्रियेच्या अगोदर कातड्याच्या आतील मांसल भागावर कॅल्शियम हायड्रॉक्साइड आणि सोडियम सल्फाइड यांच्या मिश्रणाचा थर देण्यात येतो. कारण चुन्याच्या प्रक्रियेमुळे मेंढींच्या कातड्यावरील लोकर खराब होऊ नये हा त्याच्यामागील उद्देश आहे. अशा थरामुळे मेंढीच्या कातड्यावरील लोकर खराब होत नाही व ती हाताने ओढून काढणे सोपे जाते. चुन्याच्या प्रक्रियेतील विद्रावात सोडियम सल्फाइड, सोडियम हायड्रोसल्फेट, डायमिथिलअमाइन, सोडियम थायोसल्फेट, सोडियम सायनाइड इत्यादींसारखी केस लवकर निघण्यास मदत करणारी रसायने मिसळतात. विद्राव कातड्यात आतपर्यंत जावा म्हणून कातड्याच्या मांसल भाग काही वेळा काढून टाकतात. ही क्रिया यंत्राने करण्यात येते.
फरसाठीच वापरावयाच्या कातड्यांसाठी मात्र चुन्याची प्रक्रिया वापरली जात नाही कारण फरच्या कातड्यावरील केस मूळ स्थितीतच राहणे अत्यावश्यक असते. [→ फर – २].
(इ) केस काढणे : कोणत्याही प्रकारचे कातडे असले, तरी चुन्याच्या प्रक्रियेनंतरच केस काढून टाकण्याची प्रक्रिया करतात. चुन्याच्या प्रक्रियेत सोडिअम हायड्रोसल्फाइडयुक्त विद्राव वापरल्यास तीन दिवसांनंतर केस काढून टाकणे सोपे जाते. ही क्रिया विशिष्ट दंतुर चाकूने हाताने केली जाते. पण जास्त करून ह्यासाठी विविध प्रकारच्या यंत्रांचाच उपयोग केला जातो. यानंतर काही वेळा कातड्यावरील मांसल भाग कातडे ताणून धरून एका बोथट चाकूने वा यंत्राने काढून टाकतात.
(ई) चुन्याच्या प्रक्रियेतील रसायने काढून टाकणे : (डीलाइमिंग). केस, मांसल भाग इ. काढून टाकल्यानंतर फक्त मध्यत्वचेचा भाग शिल्लक राहतो. ह्या भागात चुन्याच्या प्रक्रियेतील रसायने असतात त्यामुळे कातडे फुगलेले दिसते. कातड्यातून ही रसायने काढून टाकणे आवश्यक असते. कारण वनस्पतिज टॅनिंग पदार्थाबरोबर त्यांची विक्रिया होऊन कातड्याला गडद रंग येतात व क्रोमियम लवणांच्या विद्रावांची विक्रिया कातड्यांवर व्यवस्थित होत नाही. कातड्यातून चुन्याच्या प्रक्रियेतील रसायने काही वेळा पूर्णपणे काढून टाकतात, तर पादत्राणांच्या तळव्याच्या (सोलच्या) कातड्यासाठी फक्त एका पृष्ठाकडची रसायने काढून टाकतात. चुन्याच्या प्रक्रियेतील रसायने काढून टाकण्यासाठी सौम्य अम्लांचे विद्राव वापरले जातात. प्रथम कातडी १५०–२३० से. तापमानाच्या पाण्याने धुतात व नंतर ती अम्लमिश्रित पाण्यात बुडवितात. बोरिक, हायड्रोक्लोरिक, लॅक्टिक, सल्फ्यूरस इ. अम्ले ह्यासाठी वापरली जातात. काही वेळा ह्या अम्लांचे प्रमाण वाढविण्यात येते.
पूर्वी चुन्याच्या प्रक्रियेनंतर त्यातील रसायने काढून टाकण्यासाठी कुत्र्याच्या विष्ठेच्या (प्युअर) गरम विद्रावात कातडी भिजवीत असत (प्युअरिंग). कोंबड्या व इतर पक्षी यांच्या विष्ठाही या प्रक्रियेत वापरीत असत. गायी आणि वासरे यांच्या कातड्यांसाठी ही प्रक्रिया प्राचीन काळापासून वापरली जात आहे. विष्ठेसारख्या घृणा निर्माण करणाऱ्या पदार्थाच्या ऐवजी आता तत्सम कार्य करणारे कृत्रिम पदार्थ वापरतात (बेटिंग). ह्या दोन्ही प्रक्रियांमुळे कातड्यावरील राहिलेले अनावश्यक भाग पूर्णपणे निघतात, कातडी मऊ होतात आणि टॅनिंगसाठी योग्य होतात. वासरांच्या कातड्यांवर बेटिंग प्रक्रिया जास्त काळ करावी लागते. जोखडांच्या कातड्यांसाठी कमी वेळ बेटिंग करतात. मेंढीच्या व शेळीच्या कातड्यांवर, ती सच्छिद्र असल्यामुळे त्यांमधून हवा बाहेर निघून जाईपर्यंत बेटिंग प्रक्रिया केली जाते. खडबडीत व कठीण कातड्यावर अद्यापिही प्युअरिंग प्रक्रियेचा उपयोग काही ठिकाणी केला जातो.
विष्ठेचा पाण्यातील विद्राव करून तो तसाच सहा-सात दिवस ठेवतात. या काळात हा विद्राव आंबतो. नंतर एका भांड्यात आंबलेला विद्राव घेवून त्यात कातडी बुडवितात व ती विशिष्ट चाकात आता फिरविली जातात. विद्रावाचे तापमान २७०–३७० से. च्या दरम्यान कातड्याच्या प्रकारानुसार ठेवले जाते. नाजूक कातड्यांसाठी वरीलपेक्षा कमी तापमान वापरले जाते. बेटिंग प्रक्रियेसाठी विष्ठेसारखा गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचा ०·५–१·५% विद्राव वापरतात. बेटिंग विद्रावात लाकडाचा भुसा, नवसागर व गुरांची अग्निपिंडे [⟶ अग्निपिंड] यांचे मिश्रण असते. अग्निपिंडांमुळे आवश्यक त्या एंझाइमांचा (जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त कार्बनी पदार्थांचा) पुरवठा होतो. अशीच एंझाइमे विष्ठेमध्येही असतात. बेटिंग विद्रावाचे तापमान २७०–३५० से. ठेवण्यात येते. दोन्ही प्रक्रियांमधील विद्रावाचे pH मूल्य ८·०० इतके ठेवतात. कातड्यांवरील अनावश्यक भाग निघून जाईपर्यंत आणि कातड्यावर आंगठ्यांचे ठसे उमटेपर्यंत दोन्ही प्रक्रिया केल्या जातात. नंतर ही कातडी एबोनाइटाच्या सर्पिलाकार पात्यांनी खरवडतात. बेटिंग केलेली कातडी पाण्यात खळबळतात.
(उ) ओलेचिंब करणे : (ड्रेचिंग). वासरे, मेंढ्या आणि शेळ्या यांच्या कातड्यांसाठीच ही प्रक्रिया वापरली जाते. यासाठी गव्हाच्या कोंड्याचे पाणी आंबवून तयार केलेल्या आणि २७० से. तापमानाच्या विद्रावात कातडी भिजवितात. कातडी तळाशी दाबून बसवितात. विद्रावात तयार होणाऱ्या सौम्य अम्लामुळे कातड्यातून वायू निघतो. त्यामुळे कातडे मऊ आणि टॅनिंगसाठी योग्य होते. काही वेळा रंगहीन लॅक्टिक अम्लाचा कोंड्याच्या विद्रावाच्या pH एवढा विद्राव या प्रक्रियेसाठी वापरतात.
(ऊ) मुरविणे : दहा भाग मीठ व १ – १ १/२ भाग सल्फ्यूरिक अम्ल यांच्या २०० भाग पाण्यातील विद्रावाच्या कातड्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेला मुरविणे म्हणतात. मेंढ्यांची कातडी सामान्यतः मुरविली जातात. इतर कातडी क्रोम टॅनिंग करण्याच्या आधीच मुरविली जातात. कातड्यात अम्ल शोषल्यामुळे त्यातील तंतुमय भाग मोकळा होतो व कातड्यात एकसंधपणा येतो. मीठ व सल्फ्यूरिक अम्ल यांचे मिश्रण असलेल्या एका पिपामध्ये कातडी जोरजोरात फिरवितात. काही पिपांमध्ये फिरत्या पट्ट्यांचा वापर करतात. कातडी पिपांमधील विद्रावात दोन तासांपर्यंतच ठेवतात. काही वेळा पॅरानायट्रोफिनॉल, बीटा नॅप्थॉल ह्यांसारखी जंतुनाशक संयुगे विद्रावात किण्वनाची (आंबण्याची) क्रिया सुरू होऊ नये म्हणून मिसळतात. जाड कातडी टॅनिंगपूर्वी मुरविली जातात.
(ए) उपयोगानुसार कातड्याचे भाग करणे : चुन्याच्या प्रक्रियेनंतर सामान्यतः व काही वेळा कमावण्याच्या आधी कातड्यातील जाड भाग कापून काढतात. सर्वसाधारणतः कातड्याचे पोटाकडचा, पाठीचा व खांद्याचा
असे तीन भाग करतात. कातड्याच्या वापरानुसार ती कापण्यात येतात. आ. २ मध्ये कातड्याचे तुकडे कसे करतात ते दाखविले आहे. पाठीवरील तुटक रेषा पाठीचा कणा दर्शविते.
कातड्याचे मानेपासून शेपटीपर्यंत पाठीच्या कण्याच्या रेषेनुसार दोन तुकडे पाडण्याची दुसरीही एक पद्धत आहे. ही पद्धत सामान्यतः कातडे कमाविल्यानंतर वापरण्यात येते. या पद्धतीमुळे कातडे हाताळण्यास व त्यावर विशेष संस्करण करण्यास सोयीचे होते.
(२) कमावण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रिया : प्राथमिक प्रक्रिया
झाल्यानंतर कातड्यांवर रासायनिक विक्रिया करून त्यांचे चामड्यात रूपांतर करण्यात येते. टॅनीन वा टॅनिक अम्ल असलेल्या वनस्पतिज पदार्थाच्या साहाय्याने कातडी कमावणे ही फार जुनी पद्धत आहे. आधुनिक पद्धतीत विविध रसायने आणि रासायनिक प्रक्रिया वापरून कातडी कमावली जातात. क्रोमियम संयुगांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर कातडी कमावली जातात (क्रोम टॅनिंग). तथापि विशिष्ट प्रकाराच्या उपयोगाच्या कातड्यांसाठी अद्यापिही वनस्पतिज पदार्थांचा वापर करण्यात येतो.
फिनॉले व हायड्रोकार्बने यांच्यापासून मिळणाऱ्या काही पदार्थांत कातडी कमावण्याचा गुणधर्म असतो. अशा पदार्थांना ‘सिनटॅन’ असे म्हणतात. हे पदार्थ सामान्यतः फिनॉल सल्फॉनिक अम्ले व फॉर्माल्डिहाइड यांच्यापासून बनवितात. क्रोमियम संयुगांनी तसेच वनस्पतिज पदार्थांनी कमावलेल्या कातड्यांमध्ये विशिष्ट उपयोगांकरिता काही गुणधर्म आणण्यासाठी कातडी कमाविण्याकरिता वापरलेला काही मूळ पदार्थ काढून नवीन योग्य पदार्थाने कातडी पुन्हा कमवावी लागतात (रिटॅनिंग) आणि याकरिता सिनटॅनांचा उपयोग करतात. याशिवाय कातडी कमावण्याचे साहाय्यक साधन म्हणून सिनटॅनांचा वापर केल्यास कातड्यास आवश्यक तो रंग आणता येतो वा रंगात सुधारणा करता येते, टॅनिंग विद्रावाचे कातड्यात जलद शोषण होते इ. फायदे होतात. सरीसृप (सरपटणाऱ्या) प्राण्यांच्या काळ्या-पांढऱ्या कातड्यांसाठी सिनटॅनांचा उपयोग करीत नाहीत.
सिनटॅनांशिवाय रेझिनांचा वापर केल्यास कच्च्या कातड्याचे स्थिर कातड्यात रूपांतर होते. हे रूपांतर होताना त्यात बरेच गुणधर्म आणता येतात. पण रेझिने मोठ्या प्रमाणावर वापरली जात नाहीत.
(अ) वनस्पतिज पदार्थ वापरून कातडे कमावणे : टॅनीन किंवा टॅनिक अम्ल असलेले वनस्पतींचे
साल, लाकूड, मुळे, फळे इ. भाग पाण्यात भिजवून मिळणाऱ्या विद्रावाने कातडी कमाविली जातात. सामान्यतः जास्त प्रमाणात टॅनिक अम्ल वा टॅनीन असणाऱ्या वनस्पतींचाच वापर केला जातो. अशा वनस्पतींमधील टॅनीन नसणारा (शर्करा, गॅलिक अम्ल, कार्बनी अम्ले इ. असलेला) भागही कातडी कमावण्याच्या दृष्टीने उपयुक्त असतो. टॅनिंग पदार्थांतील फिनॉल व हायड्रॉक्सिल गट यांची कातड्यातील प्रथिन घटकाशी विक्रिया होऊन कातडे कमावले जाते. कातडी कमावण्यासाठी वापरण्यात येणारे वनस्पतिज पदार्थ हे पायरोगॅलॉल व कॅटेचोल या दोन प्रकारांचे तसेच यांच्या मिश्रणाचेही असतात.
(१) पायरोगॅलॉल : चेस्ट नट (कॅस्टानिया व्हेस्का ), कायफळ, ओक वृक्षाचे लाकूड व साल (क्वर्कस वंशाच्या भिन्न जाती), सुमाक (ऱ्हस वंशाच्या काही जाती), हिरडा, व्हॅलोनिया ओक, सीसॅल्पिनियाच्या वंशातील अनेक जाती (गजगा, चिल्हार, संकेश्वर इ.), दिवी-दिवी, डाळिंबाची साल, बाभळीच्या शेंगा, धावड्याची पाने, काजू, ऐन, वाकेरी (तेरी), बेहडा इत्यादी.
(२) कॅटेचोल : क्वेब्रॅको वृक्ष (शिनॉप्सिस बालानसी ), हेमलॉक, गॅंबिअर, वॅटल (ॲकेशिया मॉलिसिमा ), लाजाळू, तरवड, बाभूळ, हिवर, खैर, बाहवा, उरिमेदी, खडशेरणी, चौरी, गरारी, आवळा, जांभा, कॉपरपॉड, विलायती चिंच, साल वृक्ष इत्यादींच्या साली, कच्छ वनस्पती (मॅनग्रूव्ह), बोराच्या वंशातील जाती (फळे) इत्यादी.
(३) मिश्र : ओक, मॅलेट (यूकॅलिप्टस ऑक्सिडेंटॅलिस ), रेंडुका (ॲकेशिया एंडुका ), अर्जुन या वृक्षांच्या साली.
पायरोगॅलॉलाचा विद्राव आयर्न ॲलमबरोबर जांभळा निळा रंग देतो, तर कॅटेचोलाचा विद्राव लोह संयुगाबरोबर हिरवट काळा रंग देतो. पायरोगॅलॉलाच्या साहाय्याने कमावलेल्या कातड्यावर प्रकाशाचा परिणाम होत नाही पण कॅटेचोलाच्या साहाय्याने कमावलेले कातडे प्रकाशामुळे तांबडसर करडे होते व ठिसूळही होते.
वनस्पतिज पदार्थांच्या साहाय्याने कातडी कमावण्याच्या प्रक्रियांचे प्रामुख्याने दोन गट पडतात. पहिल्या गटात पादत्राणांचे तळ, पट्टे, यंत्रात वापरण्यात येणारे भाग, आच्छादने इत्यादींसाठी लागणारी व वजनाने जड असणारी कातडी कमावण्याच्या प्रक्रियांचा आणि दुसऱ्या गटात पादत्राणांचे वरचे भाग, शोभेच्या व कलाकुसरीच्या वस्तू, पुस्तक कमावण्याच्या प्रक्रियांचा समावेश केला जातो. दोन्ही गटांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रक्रिया तत्त्वतः सारख्याच आहेत पण तांत्रिक दृष्ट्या मात्र त्या भिन्न आहेत. सर्व प्रक्रियांमध्ये टॅनिंग विद्रावांची संहती (विद्रावातील विरघळणाऱ्या पदार्थाचे प्रमाण), विशिष्ट गुरुत्व व अम्लता मोजणाऱ्या उपकरणांच्या साहाय्याने प्रक्रिया संपेपर्यंत कायम ठेवण्यात येते.
जड कातडे कमावण्याची प्रक्रिया ही सामान्यतः पुढील तीन टप्प्यांची असते. (१) वाढत्या संहतीचे (परंतु सापेक्षतः विरल) विद्राव ठेवलेल्या निरनिराळ्या कुंडांत कातडी क्रमाक्रमाने टांगून ठेवतात. ही कुंडे लाकूड व माती, काँक्रीट किंवा काँक्रीट व विटा यांचा उपयोग करून जमिनीत बनविलेली असतात. एकाच विद्रावातील कातड्यांची बाजू दररोज एक दोनदा बदलतात तसेच दररोज क्रमाक्रमाने अधिक संहतीच्या कुंडांत कातडी बदलतात. कातडी टांगण्यासाठी हलक्या चौकटींचा उपयोग करतात. चर्मालयांनुसार कुंडांची संख्या व विद्रावामध्ये कातडी ठेवण्याचा काळ निरनिराळे असतात. (२) वाढत्या (व सापेक्षतः जास्त) संहतीचे विद्राव ठेवलेल्या कुंडांत आडव्या स्थितीत कातडी क्रमाक्रमाने ठेवतात. कुंडातून कातडी दररोज (किंवा काही वेळ एक दिवसाआड) काढून ती कुंडाच्या काठावर निथळत ठेवतात व नंतर कातडी दुसऱ्या जास्त संहती असलेल्या विद्रावाच्या कुंडात आडव्या स्थितीतच नेतात, अशी प्रक्रिया बऱ्याच वेळा करण्यात येते. (३) नंतर कातडी काढून घेऊन त्यावर थोडासा घन टॅनिंग पदार्थ पसरतात व एका कुंडात कातडी एकावर एक ठेवतात आणि पुष्कळच जास्त संहती असलेला विद्राव कुंडात ते पूर्ण भरेपर्यंत सोडतात. या विद्रावात कातडी बराच काळ (सु. दोन ते चार आठवडे) तशीच ठेवतात. यामुळे कातड्यातील तंतूंवर अविद्राव्य पदार्थांचे (दोन कातड्यांमध्ये पसरलेल्या टॅनिंग पदार्थांपासून तयार होणाऱ्या पदार्थांचे) थर जमतात व कातडे अधिक चिवट, जड, कठीण व टिकाऊ होते.
वासरांची आणि इतर हलकी कातडी कमावण्यापूर्वी त्यांतील चुना पूर्णपणे काढून टाकणे आवश्यक असते वा ती बेटिंग प्रक्रिया केलेली असतात. काही वेळा बेटिंगनंतर कातडी मुरविलेली असतात. हलक्या प्रकारच्या कातड्यांसाठी दोन अथवा अधिक वनस्पतिज पदार्थांच्या अर्कांचे मिश्रण वापरण्यात येते. या मिश्रणात कातडी सात- आठ दिवस टांगून ठेवतात व नंतर वर वर्णन केलेली क्रमांक दोनची प्रक्रिया वापरण्यात येते. या प्रक्रियेच्या शेवटी टॅनिंगची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर रंग कमी करण्यासाठी सुमाक वनस्पतीच्या पाण्यात भिजवून काढलेल्या व गरम केलेल्या अर्कात कातडी टांगून ठेवतात व त्यात पायट्याच्या साहाय्याने खळबळतात किंवा फिरत्या पिपात ठेवतात. बऱ्याच वेळा कातडी पायटे असलेल्या कुंडात, प्रथम गॅंबिअर अर्क वापरून व नंतर त्या विद्रावात क्वेब्रॅको-हिरडा यांचा अर्क, चेस्ट नट अर्क इ. अर्क वापरतात. वासरांची कातडी या प्रक्रियेने कमावली जातात. अशा कातड्यावर थर जमू देत नाहीत कारण त्यामुळे कातड्यांना रंग देण्याची क्रिया अवघड होते.
मेंढीच्या कातड्याचा चुन्याच्या प्रक्रियेने शिल्लक राहिलेला कणीदार भाग कमावण्यासाठी प्रथम धुतात, चुना काढून टाकण्याची प्रक्रिया करतात व बेटिंग प्रक्रिया करून तो भाग मुरवितात व पायटे असलेल्या चक्राच्या साहाय्याने सुमाक वनस्पतीच्या अर्काने ती कमावतात. या प्रक्रियेस १२ तास लागतात. ही कातडी कमावल्यावर पांढरी होतात व त्यांना आवश्यक तो रंग देता येतो.
(आ) खनिज पदार्थांच्या साहाय्याने कातडी कमावण्याच्या प्रक्रिया : हलकी कातडी कमावण्यासाठी बहुतांशी वनस्पतिज पदार्थांऐवजी खनिज पदार्थ वापरण्यात येतात. तुरटी प्रक्रिया ही यांपैकी सर्वांत जुनी प्रक्रिया आहे.
(१) तुरटी प्रक्रिया : ही प्रक्रिया अद्यापही काही प्रमाणात हातमोज्यांसाठी लागणाऱ्या कातड्यांकरिता वापरली जाते. या प्रक्रियेत तुरटी, मीठ, पीठ (किंवा फ्रेंच चॉक), अंड्याचा बलक व पाणी यांचे मिश्रण करून एका पिपामध्ये घेतात व त्यात कातडी घालून पीप फिरवितात. सु. दोन तासांत कातडी कमावली जातात, नंतर ती त्यातून काढून निथळत ठेवतात व वाळवितात. या प्रक्रियेने मिळणारी कातडी पांढरी असून बऱ्याच प्रमाणात ती ताणली जातात तसेच ती बळकट व चिवट असतात. पण या कातड्यांवर पाण्याचा अनिष्ट परिणाम होतो. ही प्रक्रिया हातमोज्यांकरिता लागणाऱ्या शेळ्यांच्या आणि मेंढ्यांच्या कातड्यांसाठी, पांढऱ्या कातड्यांसाठी आणि क्रिकेटच्या चेंडूसाठी लागणाऱ्या कातड्यांसाठी वापरण्यात येते.
(२) क्रोम प्रक्रिया : क्रोमियम लवणांचा उपयोग करून कातडी कमावण्याच्या प्रक्रिया दोन प्रकारच्या आहेत : (क) एक-कुंडी प्रक्रिया व (ख) दोन-कुंडी प्रक्रिया (येथे कुंड हा शब्द प्रकिया करण्यासाठी वापरावयाचा विद्राव ठेवलेले पात्र, टाकी, पीप इ. या अर्थाने वापरला आहे.) (क) एक-कुंडी प्रक्रिया : ही प्रक्रिया जास्त प्रमाणात वासरांच्या कातड्यांसाठी (पेट्यांसाठी लागणाऱ्या) आणि मुलायम कातड्यांसाठी तसेच हातमोजे, पादत्राणाचे वरचे भाग व अस्तर आणि सुशोभित वस्तू यांसाठी लागणाऱ्या शेळ्यांच्या कातड्यांसाठी वापरली जाते. एक-कुंडी प्रक्रिया सोपी असून तीमुळे कातड्यावर वाईट परिणाम होण्याचे प्रमाण कमी असते. या प्रक्रियेत क्रोमियम लवणांचे क्रमाक्रमाने वाढत्या संहतींचे विद्राव वापरतात. क्रोमियम सल्फेट किंवा क्रोमियम तुरटीच्या विद्रावात सोडियम कार्बोनेटाचा विद्राव घालून तयार होणारे मिश्रण पूर्णपणे ढवळतात. शिशाचे अस्तर असणाऱ्या टाकीत हे मिश्रण व सल्फ्यूरिक अम्ल सारख्या प्रमाणात मिसळतात. नंतर त्यात क्षपणकारक [⟶ क्षपण] पदार्थ मिसळतात. सामान्यतः साखर, ग्लुकोज, स्टार्च, लाकडाचा भुसा, ग्लिसरीन, मोलॅसीस, सल्फर डाय-ऑक्साइड इ. क्षपणकारक पदार्थ वापरले जातात.
वनस्पतिज पदार्थ वापरून कातडी कमावण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच वरील मिश्रण वापरून क्रोम प्रक्रिया करण्यात येते. फिरते पीप किंवा पायट्यांच्या चक्रांचा वापर हलक्या कातड्यासाठी तर पादत्राणांचे तळ, पंपाच्या झडपा व तत्सम उपयोगासाठी लागणारे कातडे यांसाठी कुंडात कातडी टांगून ती कमावली जातात. वनस्पतिज पदार्थांच्या साह्याने कातडी कमावण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा क्रोम प्रक्रियेला कमी वेळ लागतो व त्यामुळे कमावलेल्या कातड्याचे स्वरूप नियंत्रित करता येते. क्रोम प्रक्रियेत कातडी ही रसायनांचा परिणाम होण्यास रोध करणारी, न फाटता उच्च ताण सहन करणारी, शुष्क वा ओल्या स्थितीत उच्च तापमानाला अनिष्ट परिणाम न होणारी व अतिशय टिकाऊ असतात.(ख) दोन-कुंडी क्रोम प्रक्रिया : ही प्रक्रिया पादत्राणांचे वरचे भाग व शोभिवंत वस्तू तयार करण्यासाठी चमकदार कातडी मिळविण्याकरिता शेळ्यांच्या कातड्यांवर आणि गुळगुळीत व यंत्रांकरिता उपयोगी पडणारी कातडी मिळविण्यासाठी वासरांच्या कातड्यांवर करण्यात येते. पूर्व-प्रक्रियित कातडी हायड्रोक्लोरिक किंवा सल्फ्यूरिक अम्लयुक्त पोटॅशियम किंवा सोडियम बायक्रोमेट यांच्या सापेक्षतः दुर्बल विद्रावात बुडवितात. कातड्यामध्ये हा विद्राव शोषला गेल्यानंतर हायड्रोक्लोरिक वा सल्फ्यूरिक अम्लयुक्त सोडियम थायोसल्फेटाच्या विद्रावात बुडवितात. यामुळे कातड्याच्या तंतूवर क्रोमियम लवणे तयार होतात. तसेच प्रक्रियेत तयार होणारे गंधकही तंतूंवर तसेच त्यांच्याभोवतीही निक्षेपित होते. गंधक निक्षेप तयार होणे हे दोन- कुंडी प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे.
आधुनिक दोन-कुंडी प्रक्रियfत पूर्व-प्रक्रियित कातडी प्रथम मीठ व सल्फ्यूरिक अम्ल यांच्या विद्रावात मुरवितात. नंतर ती कातडी सोडियम डायक्रोमेट व अम्ल यांचा विद्राव असलेल्या पिपामध्ये घालतात. कातड्यात विद्राव पूर्णपणे शोषला गेल्यावर त्यांना चकचकीत पिवळसर नारिंगी रंग येतो. यानंतर विद्रावातून कातडी काढून घेऊन ती चोवीस तास निथळत ठेवतात. नंतर यंत्राच्या साहाय्याने ताण देऊन सुरकुत्या काढून टाकून कातडी पूर्णपणे सपाट करतात.
कातड्याच्या रंगाने क्षपण पिपात वा पायट्यांच्या चक्रात किंवा जड कातड्यांसाठी कुंडात करण्यात येते. सामान्यतः क्षपणाच्या क्रियेचा टप्पा कातड्याच्या रंगावरून ओळखता येतो. सुरुवातीला मूळच्या पिवळसर नारिंगी रंगाचे गडद पिवळ्यात व नंतर त्याचे फिकट तपकिरी पिवळ्यात रूपांतर होते. त्यानंतर त्याचे ऑलिव्हसारख्या हिरव्या रंगात व शेवटी फिक्कट निळसर हिरव्या रंगात रूपांतर होते.
(इ) तेलांच्या साहाय्याने कातडी कमावण्याच्या प्रक्रिया : तेल किंवा वसायुक्त पदार्थ वापरून फार पूर्वीपासून कातडी कमावली जात आहेत. कातड्यातील पाण्याच्या जागी तेलाने विस्थापन करणे हा तेलाच्या प्रक्रियेचा उद्देश असतो. प्रथम कातडी निथळत ठेवतात आणि नंतर दाबयंत्राने त्यातील जास्तीत जास्त पाणी बाहेर काढतात. नंतर कातडी टांगून अर्धवट वाळवितात. पूर्णपणे वाळविल्यास कातड्यात तेल शोषले जात नाही. जास्तीत जास्त पाणी काढून टाकल्यावर कातडी एका यंत्रात ठेवतात. या यंत्रात एक अर्धदंडगोलाकार भांडे असून त्यात कातडी ठेवण्यात येतात व ती दोन जड हातोड्यांनी बडवितात व त्याच वेळी सतत ती उलटी-पालटी केली जातात. कातड्यावर माशांपासून तयार केलेली तेले, सामान्यतः कॉड माशाच्या यकृतापासून काढलेले तेल, फवारतात. बडविण्याची आणि तेल फवारण्याची क्रिया कातडी तेलानी पुरेशी संपृक्त (चिंब) होईपर्यंत करतात. नंतर ती वाळवितात, तेलाची परत फवारणी करतात व रचून ठेवतात. कातड्यातून पाणी पूर्ण निघून जाईपर्यंत व तेलानी संपृक्त होईपर्यंत ही प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर उष्णता देऊन या तेलाचे तंतूंवर अपघटन करण्यात येते (मोठ्या रेणूंचे तुकडे होऊन लहान रेणूंत रूपांतरण करण्यात येते).
मेंढीच्या कातडीपासून शॅमॉय चामडे तयार करण्याच्या तसेच हरिण, काळवीट इ. तत्सम प्राण्यांच्या कातड्यांपासून चामडी तयार करण्याच्या आधुनिक पद्धतीत कातडी माशांच्या ⇨ऑक्सिडीभवन होऊ शकणाऱ्या तेलात भिजवतात. यावेळी कातडी अत्यल्प प्रमाणात क्षारीय (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देण्याचा गुणधर्म असणारी, अल्कलाइन) असणे आवश्यक असते. प्रक्रिया चालू असताना कातड्याच्या तंतूंवरील तेलाचे आणखी ऑक्सिडीभवन होते. कातडी कापण्याच्या यंत्रातून कातडी बाहेर पडताच त्यातील तंतू फुगण्यासाठी आणि वसेचे अपघटन होण्यासाठी कातड्यांवर चुन्याची प्रक्रिया पुन्हा करतात. नंतर कापलेल्या बाजूकडील कणीदार पृष्ठातील खरबरीत तंतूंचा पातळ थर काढून टाकतात आणि त्यानंतर विशिष्ट अम्लाने अथवा कोंड्याच्या आंबलेल्या विद्रावाने चुना काढून टाकण्याची प्रक्रिया करतात.
वर उल्लेख केलेल्या प्रक्रियांशिवाय फॉर्माल्डिहाइड, गंधक, लोह संयुगे, विद्रावके इ. वापरून कातडी कमावण्यात येतात. विद्रावक पद्धतीत टॅनिंग पदार्थाच्या पाण्यातील विद्रावाऐवजी ॲसिटोनासारखे विद्रावक वापरतात. या विद्रावकांमुळे कातड्यांत टॅनिंग पदार्थाचे जलद शोषण होते व प्रक्रिया लवकर पूर्ण होते. या पद्धतीत कातड्यातील पाणी प्रथमतः काढून टाकणे आवश्यक असते. पाऱ्याची लवणे, झिर्कोनियम, व्हॅनेडियम, टंगस्टन, कोबाल्ट इ. पदार्थांमध्ये टॅनिंग विक्रिया करण्याचा गुणधर्म आहे, असे आढळून आले आहे. तसेच क्विनोने, सिलिसिक अम्ल आणि पॉलिमेटाफॉस्फेट इ. पदार्थांतही हा गुणधर्म आढळतो.
(उ) कातडी कमावण्याच्या भारतीय पद्धती : (१) ढोरी पद्धत : (बॅग टॅनिंग). भारतातील
खेडेगावांत वापरात असलेली एक लोकप्रिय पद्धत. या पद्धतीत कच्ची कातडी सोडियम कार्बोनेटाच्या विद्रावात दोन दिवस भिजत ठेवतात. नंतर त्या कातड्यांवर चुन्याची प्रक्रिया १५ दिवसांपर्यंत करतात. यानंतर कातड्यावरील केस व मांसल भाग काढून टाकतात. नंतर रुईची (कॅलॉट्रॉपिस जायगॅंशिया ) पाने व कातड्यावरील खरवडलेल्या मांसाचे किण्वन करून मिसळलेले पदार्थ यांच्या दुर्बल अम्लीय विद्रावाने एक-दोन दिवस चुना काढून टाकण्याची प्रक्रिया करतात. ताज्या पाण्याने धुवून ही कातडी नंतर बाभळीच्या सालीपासून केलेल्या विरल टॅनिंग विद्रावात बुडवितात. काही तासांनंतर कातडी व विद्राव एका पिपात उभी ठेवून कडांवर व घड्यांवर बाभळीच्या सालीचे चूर्ण फवारतात. कातडी न हालविता, आतील विद्रावाचे किण्वन होईपर्यंत ठेवतात. सालीचे चूर्ण फसफसून वर येते. नंतर कातडी बाहेर काढतात व परत वरील प्रक्रिया करतात. काही वेळा विद्रावाचे चांगले शोषण व्हावे म्हणून कातडी पायांनी तुडविली जातात.
कातडी बाहेर काढून त्यातील विद्राव काढून टाकून केकतीच्या किंवा घायपाताच्या पानांच्या पिशवीत कातडी घालून शिवतात. मात्र वरच्या बाजूला एक मोकळे तोंड ठेवतात. त्यांतून पिशवीच्या आकारमानाच्या २/३ इतके बाभळीच्या सालीचे चूर्ण भरतात. कधीकधी हिरडा व बाभूळ यांचे मिश्रण वापरतात, तर काही वेळा फक्त हिरडाच वापरतात. नंतर त्यात पाणी भरतात व तोंड बंद करून टांगून ठेवतात. पिशवीखाली मातीचे भांडे किंवा बांधलेले कुंड असते. यामध्ये वरील पिशवीतील पाणी झिरपून पडते. ते पाणी परत पिशवीत टाकले जाते. नंतर पिशवी खाली काढतात व उसवून आतील कातडी बाहेर काढतात व टॅनिंग विद्राव असलेल्या पिपात ठेवतात. तीन-चार दिवसानंतर कातडी बाहेर काढतात व जादा विद्राव पिळून काढतात व कडा सपाट करतात. नंतर कातडी खरवडतात व धुतात. कातड्यांवर मीठ व मोलॅसीस यांचा थर देतात, वाळवितात व बाजारात पाठवितात. म्हशीच्या कातड्यापासून या पद्धतीने पादत्राणांच्या तळाचे कातडे तयार करण्यास ३०—४० दिवस लागतात. या कातड्यांना तेल देत नाहीत. कामाच्या वेळी ती परत भिजवून सहज कापता येतात. ही कातडी मऊ व स्पंजासारखी सच्छिद्र असून त्यांना चांगला रंग असतो. त्यांत पाणी सहज शोषले जाते व त्यांना थोडा घाण वास येतो. पाणी कातड्यांत शोषले जाऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी केंद्रांत व सहकारी संस्थांत अशी कातडी पुन्हा कमावतात. त्यासाठी एका पिपात हिरड्याचा किंवा वॅटलचा अर्क घालून त्यात कातडी ठेवतात. नंतर ही कातडी तेल, साबण व पाणी यांचे गरम पाण्यात मिसळलेले पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांचे मिश्रण) असलेल्या एका फिरत्या पिपात ठेवतात, त्यातून काढल्यावर कातड्यांवरील सुरकुत्या यंत्राने काढून टाकतात व नंतर वाळवून त्यांच्या गुंडाळ्या करतात. अशाप्रकारे पुन्हा कमावलेले कातडे अधिक जलरोधक होते व त्याची झीजही कमी होते.
(२) ईस्ट इंडिया टॅनिंग प्रक्रिया : (ई. आय. पद्धत). या प्रक्रियेत कधी कधी कातडी कुंडात भिजत ठेवतात व चांगली धुतात. त्यावर चुन्याची प्रक्रिया ७–१० दिवस करतात. ह्या काळात कातडी दररोज हालवितात, कुंडाच्या कडेवर ठेवून त्यांतील विद्राव निथळतात व परत कुंडात टाकतात. नंतर त्यावरील केस काढून टाकतात व विरल विद्रावात तीन-चार दिवस ठेवून पहिल्या कुंडाप्रमाणेच क्रिया करतात. विद्राव तयार करण्यासाठी शिंपल्यांचा चुना व सोडियम सल्फाईड वापरतात. नंतर चुना काढून टाकतात. यासाठी बोरिक अम्ल आणि ऑक्झॅलिक अम्ल यांचा वापर करतात. काही चर्मालयांत कातडी मुरविली जातात आणि त्यासाठी कातडी प्रथम सु. २० मिनिटे ०·५% सल्फ्यूरिक अम्ल व ५% मीठ यांच्या विद्रावात व नंतर १% सोडियम थायोसल्फेटाच्या विद्रावात सु. १० मिनिटे ठेवतात. तरवडीची साल १९२० पूर्वी कातडी कमावण्यासाठी वापरली जात असे. सध्या वॅटलची साल व अर्क तरवडीबरोबर वापरला जातो. टॅनिंग प्रक्रिया दोन कुंडात केली जाते. पहिल्या कुंडात कातडी आठ-नऊ दिवस ठेवतात, तर दुसऱ्या कुंडात सात-आठ दिवस ठेवतात. पूर्वी वापरलेल्या विद्रावापासून तयार केलेला विद्राव पहिल्या कुंडात वापरतात. प्रथम विद्राव गाळून त्यात तरवडीच्या सालीचे लहान तुकडे घालतात. हा विद्राव एक रात्रभर तसाच ठेवून दुसऱ्या दिवशी त्यात तितकेच पाणी घालून वापरतात. मुरविलेली कातडी विद्रावात ठेवून तरवडीच्या सालींचे निम्मे तुकडे कातड्यांच्या तळाशी व निम्मे वरच्या बाजूला ठेवतात. दुसऱ्या दिवशी कणीदार भाग एकमेकांना लागलेल्या स्थितीत कातड्याच्या जोड्या करून त्यांच्या मध्ये ताज्या सालीचे तुकडे ठेवतात. कातडी रोज हाताळतात व बोथट चाकूने मांस असलेली कातड्याची बाजू वारंवार खरवडतात. दुसऱ्या कुंडात साल काढून टाकलेला पण पहिल्या कुंडाच्या निम्मा विद्राव वापरतात व दोन कातड्यांच्या मध्ये आणखी सालींचे तुकडे ठेवून प्रक्रिया करतात. बॅटलच्या सालीचा उपयोग करण्याची पद्धत अशीच आहे, परंतु तीत टॅनिनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे सालींचे प्रमाण कमी वापरले तरी चालते. कमावलेल्या कातड्यावर (लहान प्राण्यांची कातडी सोडून) सिनटॅनांची विक्रिया सु. १०—१५ मिनिटे विद्रावात बुडवून करतात. नंतर हिरड्यांच्या विद्रावाची विक्रिया करतात त्यामुळे रंगात सुधारणा होऊन कातड्यावर डाग पडत नाहीत. याकरिता सिनटॅनांची विक्रिया केलेली कातडी स्वच्छ पाण्याने धुतात व हिरड्याच्या विद्रावात एक रात्र ठेवतात. त्यातून कातडी काढून परत दुसऱ्या हिरड्याच्या विद्रावात २४ तास ठेवतात. काही वेळा शेळ्यांची व मेंढ्याची कमी प्रतीची कातडी मॅग्नेशियम सल्फेटाच्या विद्रावात बुडवितात. नंतर कातडी काही तास रचून ठेवतात. त्यानंतर त्यांवर मुख्यत्वे तिळाच्या वा भुईमुगाच्या तेलाची प्रक्रिया करतात व शेवटी अंतिम संस्करणाच्या प्रक्रिया करतात. या एकूण पद्धतीला सु. ३५–४० दिवस लागतात.
(३) कमावल्यानंतरच्या प्रक्रिया : वनस्पतिज पदार्थांनी कमावलेली किंवा क्रोम प्रक्रियित कातडीही पूर्णतः कमावलेली नसतात. त्यांवर आणखी बऱ्याच संस्करण प्रक्रिया करण्यात येतात. यामुळे कातड्यांत भरीवपणा व वाकवता येण्याचा गुण येतो. कातड्यातील तेलाचे प्रमाण ग्रीज वगैरे वापरून पूर्वीइतके करता येते. त्यावर रंजन क्रिया करता येते व पृष्ठभागाला चकाकी आणता येते.
(अ) शुष्कीकरण : कमावण्याची प्रक्रिया झाल्यानंतर कातड्यांवर करण्यात येणारी पहिली
महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे शुष्कीकरण होय. कातड्यांच्या पृष्ठभागात विकृती उत्पन्न होऊ नये यासाठी आर्द्रता व तापमान यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. पादत्राणांच्या तळासारखी जाड कातडी एका कोरड्या व वायुवीजनाची (हवा खेळती ठेवण्याची) सोय असलेल्या खोलीत टांगून कोरडी करतात. ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कातड्यांमधून जादा बाष्प जाऊ नये म्हणून तेलाचा हलका थर देतात. खोलीत एका दांड्याला कातडी टांगून ठेवून त्यांवरून हवा खेळवितात. कातड्याचा रंग आणि मऊपणा हा बाष्पीभवनाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. जाड कातडी हलक्या वा पातळ कातड्यांपेक्षा हळू कोरडी करतात. क्रोम कातड्यांपेक्षा वनस्पतिज पदार्थांनी प्रक्रिया केलेली कातडी हळूहळू वाळवितात. नियंत्रित तापमान आणि आर्द्रता ठेवलेल्या बोगद्यासारख्या खोलीत कातडी टांगून तसेच अवरक्त किरणांचे (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य किरणांचे) दिवे वापरूनही कातडी कोरडी करण्यात येतात.
(आ) तेल देण्याची प्रक्रिया : शुष्कीकरणानंतर मिळणारी कातडी कडक व कठीण असून त्यांमध्ये
लवचिकपणा, मऊपणा आणि भरीवपणा या गुणांचा अभाव असतो. कातड्यामध्ये मऊपणा, बळ व फाटण्यास विरोध करण्याचा गुणधर्म येण्यासाठी त्यामध्ये तेल आणि ग्रीज असणे आवश्यक असते. तेल व ग्रीज कातड्याच्या पृष्ठभागावर लावण्याच्या जुन्या पद्धतीत सुधारणा करून व यंत्रे वापरून हल्ली कातड्यांना तेल दिले जाते. कातड्यात एकसारखे तेल मुरण्यासाठी पाण्यातील तेलाचे पायस वापरतात. सामान्यतः तेले पाण्यात अविद्राव्य असल्याने स्थिर पायस मिळण्यासाठी नुसत्या पाण्याऐवजी साबणाचा विद्राव वापरतात. फिरत्या पिपामध्ये असे पायस ठेवून त्यात ओली कातडी घातली, तर तेलाचे लहान लहान थेंब कातड्यात शिरतात व कातड्याच्या तंतूंशी मिसळतात. तेल देण्यासाठी विविध प्रकारची तेले वापरली जातात. संस्कारित कातड्यात कोणते गुण यावेत आणि टॅनिंगमध्ये कोणते तेल वापरले आहे त्यानुसार योग्य तेल निवडले जाते.
(इ) ग्रीज देण्याची प्रक्रिया : (क्युरिंग आणि स्टफिंग). वरील प्रक्रियेने मुरलेल्या तेलापेक्षा जास्त तेल वा ग्रीज काही प्रकारच्या कातड्यांत असणे आवश्यक असते. कोणतेही कातडे ग्रीजने भरावयाच्या जुन्या प्रक्रियेला ‘क्युरिंग’ असे म्हणतात. हल्ली ही प्रक्रिया पट्टे, जोखडे व यंत्रासाठी लागणाऱ्या जाड कातड्यांसाठी वापरली जाते. शिकारी बुटाच्या वरच्या भागासाठी लागणारे हलके कातडे सूक्ष्मस्फटिकी ग्रीज वापरून तयार करतात. याला ‘स्टफिंग’ असे म्हणतात. असे कातडे लवचिक व जलरोधी असते.
स्टफिंगसाठी येणाऱ्या कातड्याचा (शुष्कीकरणानंतर) कणीदार पृष्ठभागाकडून विशिष्ट चाकूने पातळ थर कापतात. याने कातड्याची जाडीही कमी होते. नंतर कातडे हाताने किंवा यंत्राने कणीदार पृष्ठभागातील जादा असलेले टॅनीन द्रव्य असलेला आणि फुलारलेला भाग स्वच्छ करण्यासाठी घासतात. चांगला रंग येण्यासाठी कातड्यावर परत टॅनिंग प्रक्रिया केली जाते. यानंतर ग्रीजाची प्रक्रिया कातड्यांवर करण्यात येते. ही प्रक्रिया तीन प्रकारे करण्यात येते. (१) हाताने, (२) फिरत्या पिपाच्या साहाय्याने व (३) ग्रीजात कातडी बुडवून. हाताने करावयाच्या प्रकारात कातडी आधी ओली करतात व मग त्यांवर कॉड माशाचे तेल व गायीची चरबी यांच्या मिश्रणाचा जाड थर देतात. हा थर बहुधा मांसल भागाच्या पृष्ठभागावर ब्रशाने देतात व कातडी हळूहळू वाळवितात. कातडे वाळत असताना त्यात तेल शोषले जाते. पिपाच्या प्रकारात कातडी आधी वाफेने गरम करतात व नंतर ग्रीजाची प्रक्रिया करतात. तिसऱ्या प्रकारात आधी वाळलिलेली कातडी वितळलेल्या ग्रीजात बुडवितात. काही मिनिटांत वितळलेले ग्रीज कातड्यात शिरते. ग्रीजाच्या वंगण गुणधर्मामुळे आणि ऑक्सिडीभवन न होण्याच्या गुणधर्मामुळे तिसरा प्रकार खात्रीलायक वाटत नाही.
(ई) रंजन क्रिया : रंजन क्रियेने किंवा पृष्ठभागावर रंगद्रव्ये पसरून कातड्याला रंग देतात. रंगद्रव्यांचा वापर करण्यापूर्वी कातड्याचा पृष्ठभाग रंग देण्याच्या दृष्टीने एकसारखा रहावा म्हणून काही वेळा क्षारकीय रंजकद्रव्यांनी (खनिज अम्लांबरोबर व काही विशिष्ट कार्बनी अम्लांबरोबर विक्रिया झाल्यास विद्राव्य लवणे देणाऱ्या आणि अम्लीय तंतूबरोबर विक्रिया झाल्यास विद्राव्य संयुगे देणाऱ्या रंजकद्रव्यांनी) रंजन क्रिया केली जाते. कातड्याला रंग देण्यासाठी फिरत्या पिपाची, फवाऱ्याची वा ब्रशाने लावण्याची पद्धत वापरतात.
कोणत्या प्रकारचे रंजकद्रव्य वापरावयाचे हे कातड्याला कोणता रंग द्यावयाचा किंवा कमावण्याची प्रक्रिया कोणती वापरली व अंतिम संस्करणाच्या कोणत्या प्रक्रिया वापरावयाच्या यांवर अवलंबून असते. पिपाच्या पद्धतीत एका पिपामध्ये रंजकद्रव्य घालून त्यात कातडी घालतात व पीप फिरवितात. पिपातील तापमान आवश्यक तेवढे ठेवण्याची व्यवस्था केलेली असते. दाब फवारा यंत्राने कातड्यांवर अतिसूक्ष्म कणांच्या स्वरूपात रंजकद्रव्ये फवारतात. पाण्यात किंवा लॅकरमध्ये अतिद्रव्य असणाऱ्या रंगद्रव्यांचा आणखी एक जादा थर देण्यासाठी फवारा पद्धत वापरली जाते. रंगद्रव्यांबरोबर काही वेळा केसीन, लॅकर इत्यादींचा बंधक म्हणून वापर करतात. जाड कातड्यांसाठी ब्रशाने कातड्यांवर रंग देण्यात येतो. योग्य प्रकारांनी तयार केलेल्या कातड्यांवर रंजकद्रव्यांच्या विरल विद्रावाचे दोन-तीन थर ब्रशाने देतात. हात मोज्याच्या फक्त बाह्य बाजूवर रंग दिसणे आवश्यक असल्यास त्यासाठी अशाच पद्धतीने रंग देतात.
(उ) अंतिम संस्करण : वरील सर्व प्रक्रिया झाल्यानंतर चर्मालयात कातड्यांवर काही अंतिम संस्कार करण्यात येतात. अंतिम वस्तू दिसावयास कशी दिसेल, कातड्याचा पोत, चकाकी इत्यादींवर अंतिम संस्करणाच्या पद्धती आणि कृती अवलंबून असतात.
पादत्राणांच्या तळाचे कातडे जास्त झिजू नये म्हणून अधिक दृढ व भरीव असावे लागते, तसेच पादत्राण सुलभतेने तयार करण्याजोगे असावे लागते. यासाठी चर्मालयातच हे कातडे यांत्रिक रीत्या व बऱ्याच दाबाखाली लाटतात किंवा ठोकतात. काही देशांत याकरिता वायवीय (दाबाखालील हवेचा उपयोग करणाऱ्या) यंत्रांचा वापर करण्यात येतो.
पादत्राणांच्या वरच्या भागांसाठी निरनिराळ्या प्रकारची कातडी लागतात. त्याकरिता अशा कातड्यांवर विविध अंतिम संस्कार करतात. प्रथम यंत्राच्या साहाय्याने कातडे ताणून त्यातील तंतू थोडे फार मोकळे करून त्यात आवश्यक तो मऊपणा आणतात. यानंतर चकाकी आणणाऱ्या यंत्राने कातड्याच्या मांसल भागाकडील पृष्ठभागाला चकाकी आणतात. या यंत्रात अपघर्षक (खरवडून व घासून गुळगुळीतपणा आणणारे) द्रव्य लावलेला एक शीघ्र गतीने फिरणारा दंडगोल असून त्याच्या साहाय्याने कातड्याचा पृष्ठभाग एकसारखा गुळगुळीत होतो. गुरांची कातडी पादत्राणाच्या वरच्या भागासाठी वापरावयाची झाल्यास आधी आडव्या दिशेने विशिष्ट प्रकारचे चाकू बसविलेल्या यंत्राने त्यांचे दोन भाग करतात. वरचा भाग कणीदार असून तो भाग महत्त्वाचा असतो. मांसल भागाकडील भागावर स्वतंत्र रीत्या संस्कार करतात. प्रवासी साहित्य, फर्निचरची आच्छादने, कपडे इ. वस्तू बनविण्यासाठीही गुरांच्या कातड्यांचे अशाप्रकारे दोन भाग करतात.
कातडे मुलायम व चकचकीत होण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया कराव्या लागतात. कातड्यात घर्षणरोधकता, ओले होणे व बदलते तापमान यांच्या परिणामास प्रतिरोध इ. गुणधर्म आणणे, वरचा चकचकीत भाग कातड्याशी एकजीव होईल असा तयार करणे व बाष्प बाहेर टाकण्याचा कातड्याचा नैसर्गिक गुणधर्म टिकविणे हे या प्रक्रियांचे प्रमुख उद्देश असतात. यासाठी वापरावयाच्या संस्करण विद्रावात केसीन, अल्ब्युमीन, मेण, जटिल रेझिने वा लॅकर यांच्याबरोबर रंजकद्रव्य वा रंगद्रव्ये मिसळतात. ही यंत्राने किंवा हाताने फवारून वा रूळांच्या साहाय्याने देतात. जास्त चकचकीतपणा आणण्यासाठी वेगाने फिरणाऱ्या काचेच्या घन दंडगोलाखालून दाबाने कातडी नेतात. यामुळे निर्माण होणाऱ्या घर्षणाने व उष्णतेने संस्करण विद्राव फ्लॅस्टिकसारखा होऊन पृष्ठभाग चकचकीत होतो. कातड्यावर उठावदार कणीदार परिणाम आणण्यासाठी कातड्याचा कणीदार भाग एकमेकांवर आणून घडी घालतात व त्यावर योग्य दिशेने यंत्राने दाब देतात व कातड्यातील मूळचे कण उठावदार होतात. यानंतर कातड्याचा कणीदार पृष्ठभाग एका पॉलिश केलेल्या सपाट पोलादी पत्र्याच्या पृष्ठभागावर अतिदाबाखाली ठेऊन कातडे मऊ करतात. काही वेळा वैशिष्ट्यपूर्ण कणीदार पृष्ठभाग तयार करण्यासाठी छाप उठवणारी दाबयंत्रे वापरतात. याकरिता आवश्यक तो आकृतिबंध वा नक्षी कोरलेल्या लोखंडी तबकडीशी कातड्याच्या कणीदार भागाचा दाबयंत्राने संबंध आणतात. उच्च दाब व उष्णता यांमुळे कातड्यावर उठलेला आकृतिबंध कायम स्वरूपाचा राहतो. नरम कातड्यावर एकसंघ लवदारपणा आणणे जरूर असते. यासाठी कातड्याच्या मांसल भागाकडील पृष्ठभाग एमरी वा कार्बोरंडम या अपघर्षक पदार्थांचा थर असलेल्या व वेगाने फिरणाऱ्या दंडगोलावर योग्य दाब देऊन घासतात. त्यामुळे कातड्याच्या पृष्ठभागावर मखमलीसारखी लव तयार होते. यात तयार होणारी कातड्याची अतिसूक्ष्म धूळ काढण्यासाठी वायवीय ब्रश वा तत्सम साधने वापरतात.
मोरोक्को चामडे या शेळीच्या कातड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चामड्याला विशिष्ट प्रकारच्या यंत्राने झिलई आणतात व नंतर कातडे ओले करून त्यातील कणीदार भागाला हाताने योग्य साधनांच्या मदतीने पाच वा अधिक दिशांनी उठावदारपणा आणतात. उच्च तापमानावर कातडी वाळविल्यास उठाव दिलेला कणीदार परिणाम कायम राहतो. पेटंट चामडे मिळविण्यासाठी जवसाच्या तेलात संस्करण विद्राव मिसळून कातड्यावर थर देतात व ते वाळवितात. प्रत्येक थर वाळवून मग पुढचा थर देतात. बूट व त्याचे भाग तयार करण्याकरिता या चामड्याचा विशेषतः उपयोग करतात. यूरेथान संयुगांनी युक्त अशा संस्करण विद्रावामुळे कातड्यावर घर्षणाचा परिणाम कमी होतो आणि ते कमी झिजते. गुळगुळीतपणातील दोष काढून टाकण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या चामड्यांवर कमी तापमानाच्या खास यंत्रांनी इस्त्री करतात.
ईस्ट इंडिया पद्धतीने तेलाची प्रक्रिया केलेली कातडी वाळविण्याकरिता एका खोलीत टांगून ठेवतात. ती पूर्ण वाळल्यावर एका कुंडात एकावर एक रचून ठेवतात व एक रात्रभर तशीच ठेवतात. नंतर ती काचेचा वा संगमरवराचा पृष्ठभाग असलेल्या टेबलावर ठेवतात आणि एका पितळेच्या वा तांब्याच्या साधनाने कातड्याच्या मांसल भागाकडील सुरकुत्या काढून टाकतात. यामुळे कणीदार भागाला चकचकीतपणा येतो. त्यानंतर कातड्यातील तंतू थोडेफार सुटे करण्यासाठी कातडे ताणतात व मांसल भागावर जास्त भाजलेल्या विटेने वा काचकागदाने घासून लवदारपणा आणतात. काही चर्मालयांत लवदारपणा आणण्यासाठी यंत्रांचा उपयोग करतात. शेवटी कातड्याचे योग्य त्या आकाराचे तुकडे कापून व आवेष्टित करून बाजारात पाठवितात.
कातड्यांचे प्रकार : सामान्यतः स्तनी प्राणी, सरीसृप प्राणी आणि मासे यांची कातडी कमावण्यासाठी वापरतात. यांपैकी स्तनिवर्गातील प्राण्यांची कातडी महत्त्वाची आहेत. गाय, बैल, वासरे, म्हैस, झीब्रा, घोडा, शेळी व मेंढी ह्यांची कातडी जास्त प्रमाणात वापरली जातात. डुक्कर, हरिण, खेचर, गाढव व इतर बऱ्याच लहान प्राण्यांची कातडीही वापरतात, पण ती महत्त्वाची नाहीत. काही वेळा हत्ती, वॉलरस यांसारख्या प्राण्यांची कातडी काही खास उपयोगांसाठी कमावतात. शेळ्या, मेंढ्या ह्यांसारख्या लहान प्राण्यांच्या कातड्यांना त्वचा (स्किन) या नावाने ओळखले जाते. भारतात व तांबड्या समुद्राकाठच्या प्रदेशांत शेळ्या-मेंढ्यांची कातडी पोटाकडून फाडीत नाहीत व त्यामुळे ती मानेपाशी आणि मागील भागापाशी या दोनच ठिकाणी उघडी असतात.
वर उल्लेख केलेल्या प्राण्यांची कातडी ही आकारमान, जाडी व पोत यांच्या बाबतीत वेगवेगळी असतातच शिवाय त्यांतील कणांचे वैशिष्ट्य व स्वरूप, तंतूंची जाडी, केस काढून टाकणाऱ्या रसायनांना विरोध व बेटिंग प्रक्रियेसाठी वापरण्याच्या साधनांना विरोध या गुणधर्मांतही ती वेगवेगळी असतात. तसेच त्यांच्यापासून तयार होणारी चामडी विविध गुणधर्माची असतात. एकाच जातीतील प्राण्यांच्या कातड्यांतही फरक आढळतो. त्याचप्रमाणे प्राण्याचे वय, लिंग, अन्न, मूलस्थान, कातडे काढण्याचा काळ इत्यादींचाही कातड्यावर व त्यावर प्रक्रिया करून तयार केलेल्या चामड्याच्या गुणधर्मावर परिणाम होतो.
गुरांची कातडी : गुरांची कातडी औद्योगिक वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. गाय, बैल, वासरे यांच्या कातड्यांचा यात समावेश होतो. खच्ची केलेल्या बैलांची कातडी पोताच्या दृष्टीने उत्कृष्ट असतात, तसेच त्यांपासून मिळणारी कातडी बळकट आणि टिकाऊ असतात. वळू बैलांची कातडी खरबरीत असून मानेजवळील कातड्याला बऱ्याच सुरकुत्या पडलेल्या असतात, तर पाठीवरचा भाग पातळ असून पोटाजवळचा भाग बळकट असतो. कालवडीची कातडी खच्ची केलेल्या बैलाच्या कातडीसारखा पोत असलेली आणि सूक्ष्म कण असलेली पण तितकी बळकट नसतात. वळू बैलांपासून मिळणारी कातडी कमी बळकट असून त्यांपासून हलक्या दर्जाचे पट्टे तयार केले जातात. गाईची कातडी ही हलक्या दर्जाची, कमी पोताची व पातळ असून बळकटपणा व स्थितिस्थापकता या गुणधर्मांचा त्यांमध्ये अभाव दिसून येतो. जनावराचे वय जसजसे वाढत जाईल तसतशी त्याच्या कातड्यातील स्थितिस्थापकता कमी होत जाते व पाठीवरचा भाग जाड होत जातो.
गुरांची कातडी दोन प्रकारांची असतात : (१) पाळीव जनावरांची व (२)रानटी जनावरांची. यूरोप व उत्तर अमेरिका येथील गुरांची कातडी पहिल्या प्रकारची, तर दक्षिण अमेरिकेतील गुरांची कातडी दुसऱ्या प्रकारची आहेत. गवळीवाड्यातील गुरांच्या कातड्यांपेक्षा कुरणात चरणाऱ्या गुरांची कातडी जाड आणि घट्ट असतात, तर पर्वतमय प्रदेशातील गुरांची कातडी ही इतरांपेक्षा बळकट व उत्कृष्ट असतात. पेंड, बटाटे आदींवर गुरांची निपज केल्यास त्यांच्या कातडीची प्रत वाढते. उष्ण कटिबंधापेक्षा समशीतोष्ण कटिबंधातील गुरांची कातडी चांगली असतात. अपुरे खाद्य, जादा काम तसेच गुरांच्या निवासाची वाईट परिस्थिती यांचाही गुरांच्या कातड्यांवर वाईट परिणाम होतो.
दक्षिण अमेरिका हा कातड्यांचा पुरवठा करणारा एक महत्त्वाचा प्रदेश असून या खंडातील क्रिओलो ह्या लहान बळकट गुरांची कातडी महत्त्वाची आहेत. हेरफर्ड, डेव्हन, ॲबर्डीन इ. उत्कृष्ट अशा इंग्लिश अभिजातींशी (अस्सल जातींशी) क्रिओलोचा संकर करण्यात आला असून अशा संकरित गुरांपासून मिळणारी कातडी अत्युत्कृष्ट समजली जातात. ‘फिगोरोफिकोस’ ही संकरित जात मासांसाठी आणि उत्कृष्ट कातड्यांसाठी प्रसिद्ध आहे. ‘सालाडेरॉस’ ही कातडी वरच्यापेक्षा कमी प्रतीची असतात आणि ती लहान प्रमाणावर मासाचा धंदा करणाऱ्याकडून मिळवितात, तर ‘माताडेरॉस’ ही कातडी बाह्य स्वरूप व स्थिती यांबाबतीत कमी प्रतीची असून ती शहरी कत्तलखान्यातून मिळवितात. ही सर्व कातडी ओलसर स्थितीतच खारवतात. ‘कॅम्पोस’ कातडी ही कोरड्या स्थितीत खारवलेली असून उन्हात वाळविलेली असतात. ती ग्रामीण भागातून येतात. ही कातडी वाईट स्थितीत सोललेली असतात. ब्राझीलमधील कातडी कोरड्या स्थितीत खारवलेली असून अर्जेंटिनामधील कातड्यांपेक्षा त्यांची सोलताना कमी काळजी घेतलेली आढळते. मध्य अमेरिका, कोलंबिया व व्हेनेझुएला येथील कातडी सुकविलेली व काही कमी प्रतीची असतात. यांतील बरीच कातडी जास्त सुकविलेली व काही कमी सुकविल्यामुळे कुजून दोष निर्माण झालेली असतात.
चीनमधून येणारी कातडी ही बहुशः वाळविलेली असून बऱ्याच वेळा सांसर्गिक काळपुळी या रोगाने ग्रस्त झालेली असतात. इंडोनेशिया मधील कातडी चांगली व योग्य रीतीने सोललेली आणि वाळविलेली असतात. ही कातडी तासलेली व चांगल्या प्रकारे वर्गीकरण केलेली असून त्यांना जास्त किंमत येते. इंडोनेशियातील ‘जावा’ या नावाने ओळखण्यात येणारी कातडी जगातील सर्वोत्कृष्ट वाळविलेली कातडी समजण्यात येतात. ही कातडी चांगली सोललेली व कापलेली, सर्व अतिरिक्त मांस काढून टाकलेली व योग्य वर्गीकरण केलेली असतात. द. चीनमधील कातडी तासलेली व चांगल्या आकृतिबंधाची असतात. हांगजो व शांघाय या बंदरांतून निर्यात होणारी कातडी चांगली व उत्तम कणीदार पृष्ठभागाची असतात. पण बऱ्याच वेळा योग्य रीतीने खारवलेली नसतात. मॅंचुरियातील कातडी निकृष्ट असतात.
पश्चिम आफ्रिका, केप, पूर्व व उत्तर आफ्रिका असे कातड्यांच्या दृष्टीने आफ्रिकेचे चार भाग पडतात. केप भागातील कातडी ही ऱ्होडेशिया, द. आफ्रिका व त्यांच्या जवळपासचा प्रदेश यांतून आलेली असतात. ही कातडी वाळविलेली किंवा कोरड्या स्थितीत खारवलेली असून साधारण बऱ्या प्रतीची असतात. प. आफ्रिका भागापैकी नायजेरियातून जास्त प्रमाणात कातडी मिळतात. ती वाळविलेली असून काही वेळा मात्र चांगल्या प्रकारे सोललेली नसतात. औद्योगिक वापरासाठी त्यांचा वापर केला जात नाही. पूर्व आफ्रिकेपैकी केन्या, टांझानिया, युगांडा, इथिओपिया, सोमालिया व मॅलॅगॅसी (मादागास्कर) येथूनही मोठ्या प्रमाणात कातडी मिळतात. केन्या, टांझानिया व युगांडा येथील कातडी दार-ए-सलाम वा मोंबासा या नावानेही ओळखली जातात. ही वाळविलेली, योग्य रीतीने कापलेली व चांगली कणीदार असतात, पण यातील बराच भाग अयोग्य खारवण्यामुळे खराब होतो. इथिओपियातील कातडी वाळविलेली व खेचरांवरून वाहतूक करण्यासाठी घड्या घातलेली असतात. मॅलॅगॅसीतील कातडी ओल्या किंवा कोरड्या स्थितीत खारवलेली व उन्हात वाळविलेली असतात. उत्तर आफ्रिका, ईजिप्त व सूदान येथे हलक्या प्रतीची कातडी थोड्या प्रमाणात मिळतात.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत मोठ्या प्रमाणावर गुरांच्या कातड्यांचे उत्पादन होते. मांसाकरिता वाढविलेल्या गुरांची कातडी बहुतेक मध्य पश्चिमेकडील प्रदेशात मिळतात. ही गुरे बहुधा हेरफर्ड किंवा त्या प्रकारची आणि त्याच्या खालोखाल ब्लॅक अँगस या प्रकारची असतात. दुधाकरिता वाढविलेल्या गुरांच्या कातड्यांत मांसाकरिता वाढविलेल्या गुरांच्या कातड्यांपेक्षा कमी वसा असते. तसेच ती पातळ व पसरट असतात. दुधाकरिता वाढविलेल्या गुरांची कत्तल सामान्यतः लहान प्रमाणावर धंदा करणाऱ्या कंपन्यांतर्फे होते.
हलकी कातडी : भारतातून ह्या प्रकारच्या कातड्यांचा जास्तीत जास्त पुरवठा होतो. भारतातील कातडी १२—२० किग्रॅ. वजनाची असून त्यांतील बहुतेक ‘किप्स’ (ही संज्ञा एक वर्षाच्या जनावराच्या किंवा लहान जातीच्या प्रौढ जनावराच्या कातड्याला देण्यात येते) प्रकारची असतात. युरोपीय गुरांपेक्षा भारतीय गुरे लहान असतात. त्यांची कातडी बहुतकरून वाळविलेली असतात. मात्र पावसाळ्यात ती खारवतात. ह्या कातड्यांचा पोत चांगला असला, तरी ती तितकीशी बळकट नसतात. पूर्वी भारतातून अर्धवट कमावलेली कातडी निर्यात होत असत. काही हलकी कातडी पाकिस्तान, इंडोचायना, चीन व गुरे असलेल्या बहुतेक इतर देशांत मिळतात.
म्हशींची कातडी : ही कातडी ईजिप्त ते चीन या दरम्यानच्या प्रदेशातून मिळतात. भारतातून व इंडोनेशियातून ती निर्यात होतात. जावा व सुमात्रा येथील कातडी उत्कृष्ट असतात. सिंगापूर व पेनांग येथून कमी प्रतीची कातडी निर्यात केली जातात. ही कातडी भरड चामड्यासाठी वापरतात. ती अतिशय बळकट पण अनियमित असून विस्कळीत तंतुमय ऊतक असलेली व अतिशय भरडकणी असतात.
वासरांची कातडी : ही गुरे असलेल्या बऱ्याच देशांतून मिळतात. पण त्यांपैकी काही थोड्याच देशांतील कातडी महत्त्वाची आहेत. ही कातडी वयानुसार तसेच वासरांना देण्यात येणाऱ्या खाद्याच्या प्रकारानुसार वेगवेगळी असतात. दुधावर वाढणाऱ्या वासरांची कातडी उत्कृष्ट असून ती सूक्ष्म कणीदार आणि उत्कृष्ट पोताची असतात, तर गवतावर व पेंडीवर वाढणाऱ्या वासरांची कातडी काहीशी भरड असतात. खोंडांपेक्षा कालवडींची कातडी चांगली असतात. फ्रान्स, द. जर्मनी आणि झेकोस्लोव्हाकिया येथील वासरांची कातडी उत्कृष्ट असतात. कारण ती वासरे दुधावर पोसण्यात येतात. डेन्मार्क, रिगा, नेदर्लंड्स व ब्रिटन येथील कातडी बऱ्या प्रकारची असतात. वाळलेली भारतीय व मोंबासा वासरांची कातडी पातळ असतात व बऱ्याच वेळा त्यांतील कण खराब झालेले असतात. कोरड्या स्थितीत खारवलेली केप (ऱ्होडेशिया) व न्यूझीलंड येथील कातडी चांगली असतात. बहुतेक वासरांची कातडी क्रोम पद्धतीने कमावतात. त्यांचा उपयोग पादत्राणाच्या वरच्या भागांसाठी करतात. भारतीय वासरांची अर्धवट कमावलेली कातडी पुन्हा कमावून पादत्राणांच्या अस्तरांसाठी वापरली जातात.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील दुग्ध व्यवसायाच्या प्रदेशात वासरांची कातडी ही उप-उत्पादन म्हणून मिळवितात. या कातड्यांच्या सूक्ष्म कणीदार रचनेमुळे त्यांची किंमत गुरांच्या जड कातड्यांपेक्षा तीन ते पाच पटीने जास्त येते. यामुळे ही कातडी चांगल्या प्रकारे धुतात व शुद्ध सुक्ष्मकणी मिठाने खारवतात.
घोडा, खेचर व गाढव यांची कातडी : क्रोम पद्धतीचा वापर सुरू झाल्यापासून ह्या कातड्यांना महत्त्व आले आहे. द. जर्मनी, स्वित्झर्लंड व स्कॅडिनेव्हिया येथील घोड्यांची कातडी उत्कृष्ट असतात. इंग्लंड, फ्रान्स व बेल्जियम येथील घोड्यांची कातडीही चांगली असतात. पू. जर्मनी, रशिया, पोलंड आणि द. यूरोपीय प्रदेशांतील घोड्यांची कातडी हलक्या प्रतीची असतात. दक्षिण अमेरिकेतील रानटी घोड्यांची कातडी अतिसूक्ष्म कणीदार असतात. घोड्यांच्या कातड्यांची विशिष्ट संरचना असते. ढुंगणाकडील कातडी (क्रप) इतर भागापेक्षा जाड व तंतुमय भाग घन असलेली असतात. क्रप कातडी झिजण्यास अत्यंत प्रतिरोधक असून त्यांचा उपयोग वस्ताऱ्याला धार आणण्याचे पट्टे तयार करण्यासाठी करतात. इतर भागांपासून पादत्राणांचे वरचे भाग व जाड (उदा., मोटारगाडी चालविताना वापरण्यात येणारे व उद्योगधंद्यात विशिष्ट कामासाठी वापरण्यात येणारे) हातमोजे तयार करण्यात येतात. शिंगराचे कातडे क्रोम पद्धतीने कमावतात व त्यांचा उपयोग पादत्राणाच्या वरच्या भागांसाठी व कमरपट्ट्यांसाठी करतात.
शेळ्यांची कातडी : या कातड्यांच्या जगातील एकूण पुरवठ्यापैकी जवळजवळ ७०% कातडी भारतातून मिळतात. उ. भारतात शेळ्यांची कातडी गोळा करण्याचा धंदा चांगल्या संघटित स्वरूपात आहे. ही कातडी चांगली सोललेली आणि बहुशः कोरड्या स्थितीत खारवलेली असतात. उ. भारतातील कातडी लांब पण अरुंद असतात, तर द. भारतातील कातडी चौरस आकाराची असतात. उ. भारतातील पाटणा व कलकत्ता येथील आणि द. भारतातील त्रिचनापल्ली, मद्रास व बंगलोर येथील कातडी चांगली असतात. पाकिस्तानच्या वायव्य भागातील आणि बांगला देशातील डाक्का व दिनाजपूर येथील कातडी उत्कृष्ट समजतात. नायजेरियातून निर्यात होणारी शेळ्यांची कातडी उत्कृष्ट असतात. आफ्रिकेच्या केप भागातील मोठ्या आणि भरडकणी कातड्यांपासून भारी कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू बनविण्यात येतात. पूर्व आफ्रिकेतील कातडी चांगली व वजनाने हलकी असतात पण ती निष्काळजीपणे वाळविल्यामुळे बऱ्याच वेळा खराब झालेली असतात. उ. आफ्रिकेतील कातडी मोठी व पसरट असतात. उ. चीन मधील कातडी मोठी, भरड व निकृष्ट प्रतीची असतात. वेस्ट इंडीज, द.अमेरिका, स्पेन व बाल्कन प्रदेशातून थोड्या प्रमाणात कातडी निर्यात होतात.
मेंढ्यांची कातडी : ही कातडी मुख्यतः दोन प्रकारच्या मेंढ्यांपासून मिळतात. (१) केस असलेल्या मेंढ्या आणि (२) लोकर असलेल्या मेंढ्या. दुसऱ्या प्रकारच्या मेंढ्या जास्त प्रमाणात करण्यात आलेल्या प्रजननामुळे व माणसाळविल्यामुळे निर्माण झालेल्या आहेत. या मेंढ्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्पेन, द. आफ्रिका, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स आणि द. अमेरिका या प्रदेशात लोकरीसाठी पाळतात. अशा प्रजननामुळे व चरण्यास उत्तम कुरणे असल्यामुळे या मेंढ्यांची कातडी तेलकट, हलक्या पोताची आणि दोन थरांत वेगळी होतील अशी असतात. स्पेनमधील मेंढ्यांची कातडी उत्कृष्ट असून त्यांपासून हातमोज्याचे जाड चामडे मिळते. द. आफ्रिकेतील कातडी चांगली सूक्ष्म कणीदार असून त्यांतील तंतू जवळजवळ असतात व त्यामुळे कातडी बळकट असतात. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथील कातडी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून अस्तरासाठी व हलक्या हातमोज्यांसाठी कमावतात. काही जड कातड्यावर जनावराच्या फासळ्यांशी संलग्न असलेल्या भागांवर तेलकट पुरळ दिसतात. काही वेळा असे पुरळ इतके असतात की, कोणत्याच प्रक्रियेने त्या कातड्याचे स्वरूप सुधारता येत नाही. पुरळ कमी असल्यास योग्य आकृतिबंधाचा उपयोग करून अशा कातड्यांवर उठावरेखन करतात व दोष झाकून टाकण्यात येतो. काही वेळा असा भाग कापून टाकण्यात येतो किंवा तासण्यात येतो.
यूरोपीय देशांपैकी स्पेन व फ्रान्समधील मेंढ्यांची कातडी उत्कृष्ट असतात. त्या खालोखाल इंग्लंड व स्कॉटलंडमधील कातडी असतात. जर्मनी व नेदर्लंड्समधील कातडी हलकी असतात. लॅटव्हियामधील कातडी कपड्यांसाठी आणि हातमोज्यांसाठी वापरतात. रशियामधील कातडी मोठी व पसरट असून त्यांच्यापासून मिळणारी चामडी बळकट पण हलक्या प्रतीची असतात. बाल्कन प्रदेशातील कातडी चांगली असतात व त्यांपासून गुळगुळीत चामडी बनवितात.
आशिया मायनर व अरबस्तान येथील मेंढ्या इतरांपेक्षा वेगळ्या आणि आखूड व भरड केस असलेल्या असतात. केसांच्या रंगानुसार या मेंढ्यांचे काळ्या व पांढऱ्या रंगांच्या अशा दोन जाती आहेत. ह्या मेंढ्यांच्या कातड्यांमध्ये वसा कमी असते व त्यांतील कण शेळ्यांच्या कातड्यांसारखे असतात. ईजिप्त, सिरिया व आशिया मायनर येथील कातडी मोठी, पातळ व पसरट असून त्यांच्यावर लोकर अगदी कमी असते. त्यांपासून बळकट चामडे तयार होत नाही. दक्षिण अमेरिकेमधील अर्जेंटिनातील कातडी पातळ व पसरट असतात आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.
दक्षिण भारताच्या आग्नेय भागातील मेंढ्यांच्या कातड्यांची जगातील उत्कृष्ट कातड्यांत गणना होते व त्यांना मागणीही भरपूर असते. द. भारतात प्रतिवर्षी सु. १-१·२ कोटी मेंढ्यांची कातडी कमावतात. अगदी दक्षिणेकडील मेंढ्या तांबड्या केसाच्या व कातडीतील कण दाट असलेल्या असतात आणि त्यांची कातडी घट्ट पोताची असतात. मद्रासच्या उत्तरेकडील मेंढ्या लोकरीच्या असून हैदराबादजवळील मेंढ्या काळ्या लोकरीच्या, तर पंजाबकडील मेंढ्या पांढऱ्या लोकरीच्या आहेत. पंजाबकडील मेंढ्याची कातडी खारवतात व वाळवितात.
डुकरांची कातडी : ही कातडी अतिशय तेलकट असून त्यांच्यावरील केस उपयुक्त कातडीच्या आत घुसलेले असतात व त्यामुळे कातड्यांवर प्रक्रिया केल्यानंतर त्यांत भोके राहतात. रानडुकराचे कातडे अतिशय चिवट व मजबूत असून ते हातमोजे, कपडे आणि बूट यांकरिता वापरतात. यूरोपातील (विशेषतः पूर्व युरोपातील) डुकरांची कातडी खारवतात व अनेक प्रकारची चामडी त्यांपासून तयार करतात. या कातड्यांत अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील डुकरांपेक्षा कमी वसा असते व त्यांच्यापासून तयार होणारी चामडीही चांगली असतात. अमेरिकेत डुकरांवर प्रथम गरम पाण्याची प्रक्रिया करतात. त्यामुळे केस ढिले होतात व ब्रशाने ते काढून टाकतात. कमरेभोवतालच्या भागातील कातडेच फक्त वापरण्यात येते व ते मुख्यत्वे जिलेटीन मिळविण्यासाठी उपयोगात आणतात. बूट तयार करण्यासाठीही या कातड्यांचा उपयोग करण्यात येत आहे.
वॉलरसाची कातडी : वॉलरस ह्या सागरी स्तनी प्राण्यांची कातडी विशिष्ट पद्धतींनी कमावतात. वॉलरसांची कातडी सर्व प्राण्यांच्या कातड्यांपेक्षा जाड असतात. काही कातड्यांत कमावल्यानंतर संस्करण विद्राव सु. ५ सेंमी. पर्यंत आत जाऊ शकतो. इतर प्राण्यांमध्ये ही मर्यादा सरासरीने सु. २·५ सेंमी. इतकी असते. वॉलरसाची कातडी कमावण्यासाठी वापरावयाच्या पद्धती ब्रिटनमध्ये विकसित झाल्या. कमावलेले वॉलरस कातडे चकाकी आणणाऱ्या चाकावर बसवितात. अशा कातड्यावर कार्बोरंडमचे चूर्ण लावलेले असते. या चाकांचा उपयोग लोखंडाच्या ओतकामातील ओतीव पृष्ठभागावरील तयार होणारा सैलसर पापुद्र्यासारखा भाग खरडून काढण्यासाठी करतात. सौम्य विद्रावाने कमावलेले कातडे लोह व पोलाद यांना चकाकी आणण्यासाठी वापरले जाते. तसेच सरकीपासून कापूस (रुई) वेगळे करण्याच्या यंत्रातही वॉलरसाचे कातडे वापरण्यात येते. लहान वयाच्या वॉलरसाच्या कातड्यांपासून पिशव्या, पट्टे इ. वस्तू बनविण्यात येतात.
सरीसृप प्राण्यांची कातडी : ॲलिगेटर, सुसर (मगर), सरडा, अजगर, पाणसर्प इ. सरीसृप प्राण्यांची कातडी कमावली जातात. चर्मोद्योगाच्या दृष्टीने या प्राण्यांचे सर्प, सरडा व सुसर वा ॲलिगेटर असे तीन वर्ग करण्यात येतात. अशा कातड्यांतील कण किंवा त्यांवरील नैसर्गिक आकृतिबंध हे त्यांचे वैशिष्ट्य असते. ह्या कातड्यांची तंतुमय संरचना घन असून कमावल्यावर ती टिकाऊ असतात, पण त्यांत ताणबल कमी असते. कणीदार पृष्ठभागाच्या कठीणपणामुळे आणि स्थितिस्थापकतेचा अभाव यांमुळे वापरताना अशा कातड्यांच्या वाकलेल्या कडा तुटतात. ह्या कातड्यांचा उपयोग प्रामुख्याने शोभेच्या वस्तू करण्यासाठी करतात.
ॲलिगेटर व सुसरी यांची कातडी दक्षिण अमेरिका आणि आग्नेय आशिया येथे मिळतात. लहान ॲलिगेटर व सुसरींची कातडी पोटावर कापतात व त्यांची पाठ उपयोगात आणतात. मोठ्या ॲलिगेटर व सुसरी पाठीवर कापतात व पोटाच्या चौरस आकाराच्या कातड्यांचा वापर करतात. चांगल्या गुणवत्तेची कातडी सातत्याने मिळणे आणि विश्वासार्ह पुरवठ्याचे केंद्र यांच्या अभावी सरीसृपांच्या कातड्यांचा व्यवसाय फारच अस्थिर स्वरूपाचा झालेला आहे.
विशेष प्रकारची कातडी : वर वर्णन केलेल्या कातड्यांखेरीज काही विशेष प्रकारची कातडीही वेळोवेळी लोकप्रियतेनुसार वापरण्यात आलेली आहेत. यांत शहामृग, शार्क मासा, हत्ती, कांगारू, उंट, लामा, अल्पाका, याक, कासवाचे पाय यांच्या, इतकेच नव्हे तर बेडकांच्या कातड्यांचाही समावेश होतो. यांपैकी शार्क माशाची व कांगारूंची कातडी मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध आहेत. शार्क माशाच्या कातड्याच्या कणांची मांडणी विशिष्ट स्वरूपाची असून ते चिवट व मजबूत असते. जेथे घर्षणास उच्च रोध होण्याची आवश्यकता असते तेथे या कातड्याचा उपयोग करतात. कांगारूंचे कातडे अतिशय घट्ट, कणीदार असून अतिशय मऊ असते.
कमावलेल्या कातड्यांचे प्रकार : विविध प्रकारांनी कमावलेले कातडे विविध उपयोगांसाठी वापरले जाते. अशा कातड्यांत वापरानुसार काही गुणधर्म असणे आवश्यक असते. उपयोगानुसार कातड्यांचे पुढील प्रकार होतात.
पट्ट्याचे कातडे : शक्तीचे प्रेषण करण्यासाठी लागणाऱ्या पट्ट्याकरिता वापरावयाचे कातडे बळकट, टिकाऊ व लवचिक असणे आवश्यक असते. तसेच पट्टा म्हणून कार्य करताना अडथळे येतील असे दोष कातड्यात असू नयेत. पट्टा कप्पीवरून निसटणार नाही असा असावा लागतो. तसेच त्यावर उष्णता, आर्द्रता व वाफ यांचा परिणाम होता कामा नये. वनस्पतिज पदार्थांनी जास्त काळ प्रक्रिया केलेली कातडी पट्ट्यांसाठी उत्तम ठरलेली आहेत. क्रोम प्रक्रिया केलेली कातडीही पट्ट्यांच्या निर्मितीसाठी काही देशांत वापरली जातात.
खोगिराचे कातडे : खोगिरासाठी लागणारे कातडे पट्ट्याकरिता वापरावयाच्या कातड्यासारखेच असणे आवश्यक असते. खोगिरासाठी हलकी कातडी वापरली जातात. खोगिरासाठी लागणारी कातडी बळकट असणे आवश्यक असते. तसेच त्यात वजन वाहून नेण्याची व धक्के सहन करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
कापड उद्योगासाठी लागणारे कातडे : कापसाच्या पिंजण यंत्रात वापरावयाच्या कातडी पट्ट्या विशिष्ट पद्धतीने तयार करतात. या पट्ट्यांमुळे कापसाचे पेळूमध्ये रूपांतर होते. ह्यासाठी लागणारे कातडे लवचिक पण लहान व्यासाच्या रुळावर वळविता येणारे, तसेच जास्त ताणाला टिकणारे असे असावे लागते. उच्च प्रतीच्या वनस्पतिज पदार्थांनी ही कातडी कमावलेली असतात. भरड कणाचे कातडे लोकर पिंजण्यास अयोग्य असते. फणी यंत्रासाठी लागणारे कातडे बळकट, लवचिक व घट्ट असते. पूर्वी वनस्पतिज पदार्थांनी कमावलेले कातडे यासाठी वापरीत पण त्याची जागा हळूहळू क्रोम प्रक्रियित कातडे घेत आहे.
सूतकताईमध्ये सूत गुंडाळण्यासाठी जे रुळ असतात त्यांच्यावर कातड्याचा थर असतो. हे कातडे कठीण, पातळ आणि ताणशक्तीचा ऱ्हास न होणारे असे असणे जरूर असते. वेल्समधील मेंढ्यांचे कातडे यासाठी उत्कृष्ट असते. ई. आय. प्रक्रियित कातडेही यासाठी वापरले जाते.
वायुमापकातील पटलाचे कातडे : हे कातडे लवचिक व वाताभेद्य असणे आवश्यक असते, तसेच ते धातूमुळे खराब होता कामा नये व झिजणारे नसावे. सामान्यतः ई.आय. पद्धतीने कमावलेले मेंढीचे कातडे यासाठी वापरले जाते. एक-कुंडी क्रोम प्रक्रियित कातडेही पटलासाठी वापरण्यात येते. यासाठी न्यूझीलंडमधील मेंढ्यांची कातडी वापरली जातात. पटलासाठी वापरावयाचे कातडे हे त्यावर वायूतील रसायनांचा परिणाम होऊ नये असे असावे.
औद्योगिक हातमोज्यांकरिता लागणारे कातडे : औद्योगिक हातमोजे बऱ्याच प्रकारांचे आहेत. काही हातमोजे वनस्पतिज पदार्थ वापरून कमावलेल्या कातड्यापासून तयार करतात. हे मोजे पूर्णपणे कातड्यांचे असतात, पण काही मोज्यांच्या हाताच्या मागील बाजूस कापड वापरलेले असते व तळहाताच्या बाजूस कातडे असते. वनस्पतिज पदार्थांनी कमावलेली मेंढ्यांची कातडी उष्णतेला व घर्षणाला टिकत नाहीत. त्यासाठी विशिष्ट प्रकाराचे कातडे वापरतात. काही वेळा क्रोम प्रक्रियित मेंढीचे कातडे मोज्यांसाठी वापरले जाते. घोड्याच्या कातड्यापासून केलेले मोजे बळकट व टिकाऊ असतात.
वादीचे कातडे : वादीचे कातडे वापरानुसार विविध प्रकारचे असते. पट्टे जोडण्यासाठी वापरण्यात येणारी वादी बळकट, कठीण व क्रोम वा तुरटी प्रक्रियित अशा कातड्यापासून बनवितात. पादत्राणे, फूटबॉल इत्यादींमध्ये वापरण्यात येणारी वादी तितकी कठीण नसावी पण टिकाऊ असणे आवश्यक असते. अशी कातडी वनस्पतिज पदार्थांनी, क्रोम वा तुरटी पद्धतीने कमावलेली असतात. काही वेळा कच्च्या कातड्यांच्याच वाद्या वापरतात.
द्रवीय व यांत्रिक कातडे : धातूच्या दोन पृष्ठभागांचा घट्ट व ज्यातून द्रव (पाणी, तेल इ.) वा वायू (हवा, वाफ इ.) झिरपणार नाहीत असा जोड करण्यासाठी कातड्याची कडी (गास्केट) भरणद्रव्य म्हणून वापरतात. विविध आकारांचे वायसर, पंपातील झडपा इ. कातड्याच्या बनवितात. या सर्व कातड्यांचा द्रवीय व यांत्रिक कातड्यांमध्ये समावेश होतो. ऑइल सील ही कातड्याची करण्यात येतात व त्यांचा उपयोग दुग्ध यंत्रांपासून ते विमानापर्यंत करतात. ती पाणी, रसायने, खाद्य वसा व द्रव पदार्थ, वायू, पायसीकृत तेले इ. सील करण्याकरिता वापरतात. यासाठी लागणारे कातडे मात्र यंत्रानुसार वेगवेगळे वापरतात. वनस्पतिज पदार्थांनी कमावलेली कातडी द्रवीय उपयोगासाठी उत्कृष्ट असतात. साच्याच्या साह्याने त्यांना आकार देण्यात येतात. अशी कातडी ७०० से. पर्यंत टिकतात. ५०० से. तापमानाच्या गरम पाण्याचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. ७५०–८०० से. तापमानात वंगणे आणि एंजिन तेले यांचा परिणाम न होणाऱ्या कातड्यांपासून ऑइल सील, वायसर इ. वस्तू तयार करतात. उष्ण पाण्याचा संबंध येतो अशा ठिकाणी क्रोम प्रक्रियित कातडे वापरले जाते.
पादत्राणांचे कातडे : पादत्राणासाठी लागणारे कातडे दोन प्रकारांचे असते. (१) तळासाठी लागणारे व (२) वरच्या भागासाठी लागणारे कातडे. तळाचे कातडे कमी झीज होणारे व वरचे कातडे चकचकीत पॉलीश करता येईल असे वापरतात. तळाचे कातडे भारतात ढोरी पद्धतीने कमावतात. वनस्पतिज पदार्थांच्या साहाय्याने कमावलेली कातडी तळांसाठी वापरतात, तर क्रोम प्रक्रियित कातड्यांचा उपयोग वरच्या भागांसाठी करतात.
शोभिवंत व इतर वस्तूंसाठी लागणारे कातडे : यांमध्ये विविध आकारांच्या कातडी पेट्या, पर्स, पाकिटे, फर्निचरवरील आच्छादने इत्यादींसाठी लागणाऱ्या कातड्यांचा समावेश होतो. यासाठी विविध प्रकारे कमावलेली विविध प्राण्यांची कातडी वापरतात. अशी कातडी सर्वसामान्य तापमानाला व आर्द्रतेला टिकणारी अशी असावी लागतात.
नकली (इमिटेशन) कातडे : कापडावर विशिष्ट रसायनांचा लेप देऊन कातड्यासारखा दिसणारा पृष्ठभाग असणाऱ्या कापडाला प्रथमतः ‘नकली कातडे’ ही संज्ञा वापरली गेली. १८५१ साली इंग्लंडमध्ये देण्यात आलेल्या एकस्वानुसार पहिले ‘नकली कातडे’ तयार करण्यात आले. विविध प्रकारांच्या कापडांवर सेल्युलोज नायट्रेटाचे निरनिराळे संघटन असलेल्या विद्रावांचा लेप देऊन तयार करण्यात आलेले जलरोधी कापड या प्रकारचे होते. या आधी वाळणाऱ्या तेलांचा कापडावर लेप देऊन नकली कातडे करण्याचे प्रयत्न झाले. पण त्यात सेल्युलोज नायट्रेट विलेपित कापडाइतका बळकटपणा नसतो. आधुनिक प्लॅस्टिक उद्योगाच्या विकासामुळे नकली कातड्यांचे विविध प्रकार तयार करण्यात आले. यांपैकी सर्वांत महत्त्वाचा प्रकार व्हिनिल वा व्हिनिल प्लॅस्टिक या नावाने ओळखला जातो. १९६४ च्या सुमारास मानवनिर्मित तंतू रासायनिक बंधकात बुडवून एक नवीन प्रकाराचे नकली कातडे तयार करण्यात आले. त्याला वरून लेप देऊन वा संस्करण करून निरनिराळ्या प्रकारच्या कातड्यांसारखे बाह्यरूप आणतात. पादत्राणे, पेट्या, पाकिटे, फर्निचरची आच्छादने इत्यादींसाठी नकली कातड्यांचा उपयोग करण्यात येतो.
कमावलेल्या कातड्यांचे गुणधर्म : कातड्याचा प्रकार व ते कमाविण्याकरिता वापरलेली पद्धत यांवर त्याचे गुणधर्म अवलंबून असतात. वापरण्याच्या उद्देशानुसार कातड्यात निरनिराळे गुणधर्म असण्याची आवश्यकता असते. कमावलेल्या कातड्यांची घडी केल्यास त्याला फटी, घड्या वा सुरकुत्या पडू नयेत. तसेच ते जरूर तो आकार घेण्यायोग्य असावे. कातडी वस्तू शरीरावर वापरल्यास त्यांतून बाष्पबाहेर पडणे आवश्यक असते, तर वायुमापकातील पटलासाठी वापरलेल्या कातड्यातून वायू बाहेर जाता कामा नये. कातड्यावर घर्षणाचा तसेच हवामान, तापमान व पाणी यांचा काय परिणाम होतो हेही पाहिले जाते. सामान्यतः क्रोम पद्धतीने कमावलेल्या कातड्यात पाणी शोषले जात नाही. पाणी शोषले गेले तर कातडे योग्य प्रकारे कमावले गेलेले नाही हे सिद्ध होते. कातडे वापरावयाचा उद्देश व तापमान यांचा जवळचा संबंध आहे. पादत्राणाच्या कातड्यावर शरीराच्या तापमानाचा काहीही परिणाम होत नाही, पण वायसरांकरिता वापरावयाचे कातडे ६५० से. च्या वरील तापमानात आंकुचन न होता टिकले पाहिजे. क्रोम प्रक्रियित कातडे १००० से. पर्यंत आंकुचन न होता टिकते. तुरटीने कमावलेले कातडे हातमोज्यांसाठी वापरतात. पण त्यात जलरोधकता फारच कमी असते. असे कातडे वाळविल्यास कडक होते आणि कोणत्याही उपायांनी पूर्वस्थितीस येऊ शकत नाही. तेलाने कमावलेल्या कातड्यावर ५००–६०० से. तापमानाच्या पाण्याचा परिणाम होत नाही. फॉर्माल्डिहाइडाने कमावलेल्या कातड्यांवर वरीलप्रमाणेच पाण्याचा परिणाम होत नाही. वनस्पतिज पदार्थांनी कमावलेली कातडी लवकर ओली होतात, तसेच तेल न दिलेल्या कातड्यावरही पाण्याचा परिणाम होतो. कातडे साफ करण्याच्या दृष्टीने त्यावर पाण्याच्या होणाऱ्या परिणामाला फार महत्त्व आहे. तेल वा फॉर्माल्डिहाईड पद्धतींनी कमावलेल्या कातड्याच्या वस्तू साबण व गरम पाणी यांनी स्वच्छ करता येतात, पण वनस्पतिज पदार्थांनी कमावलेली कातडी स्वच्छ करण्यासाठी साबणाचा उपयोग करणे अयोग्य ठरते. कारण साबणातील क्षाराचा (अल्कलीचा) कातड्यावर परिणाम होऊन कातडे काळे पडते. क्रोम कातड्याच्या सफाईसाठी फक्त साबण व पाणी वापरतात. कातड्याच्या ताणले जाण्याच्या गुणधर्मावर त्याचा औद्योगिक वापर अवलंबून असतो. पट्ट्याकरिता वापरावयाचे कातडे ताणले न जाता कप्पीवर घट्ट व धरून बसणारे असले पाहिजे. कातड्यांची ताणशक्ती ताणमापकासारख्या उपकरणांनी मोजली जाते.
कातड्याची काळजी घेणे : सर्व प्रकारच्या कातड्यांची आणि कातडी वस्तूंची काळजी घेण्यासाठी सर्वसाधारणतः पुढील चार तत्त्वे महत्त्वाची आहेत. (१) ओली झालेली कातडी वा वस्तू साधारण तापमानावर हळुवार वाळवावीत. जास्त उष्णतेचा वापर करू नये. उदा., ओली पादत्राणे व हातमोजे उष्ण तापकाने (तापविण्याच्या उपकरणाने) वाळविण्यास कातड्यातील तंतू विकृत होतात आणि ती वापरण्यास अयोग्य होतात. (२) कातड्यावरील वा कातडी वस्तूवरील माती वा मातीचे डाग काढण्यासाठी बेंझीन, कार्बन टेट्राक्लोराइड वा नॅप्था यासारखे विद्रावक वापरून हळुवारपणे डाग काढावेत. हल्ली तयार होणाऱ्या काही कातड्यांवर विशिष्ट रसायनाचा लेप असतो. त्यांवर विद्रावकाचा काहीही परिणाम होत नाही. यासाठी औद्योगिक विद्रावके वापरून कातड्यांची निर्जल धुलाई करण्यात येते. (३) मऊ कातड्यांच्या पृष्ठभागावरील धूळ काढण्यासाठी कठीण साबण उत्तम असतो. पण कोणताही चांगल्या प्रतीचा अंगाचा (टॉवेल) साबण वा कॅस्टाईल साबण (सोडियम हायड्रॉक्साईड व ऑलिव्ह तेल यांच्यापासून तयार केलेला साबण) यांचा वापर केला तरी चालतो. (४) कातड्याला वेळोवेळी मेणे व तेले यांच्या मिश्रणाने चकाकी आणावी. त्यामुळे कातड्याच्या पृष्ठभागाचे संरक्षण होते व कातड्यातील तंतूच्या वंगणक्रियेला मदत होते.
मुलायम व चकचकीत कातड्यांच्या पादत्राणे, प्रवासी साहित्य, खुर्च्या, पिशव्या इ. वस्तूंना चकाकी असल्यास सर्वसाधारण सारख्याच प्रकारची काळजी घेतात. पृष्ठभागावर जर धूळ असेल, तर ती ब्रशाने वा ओलसर फडक्याने साफ करतात. जर माती वरवर लागली असेल, तर पॉलिश व मेण यांच्या साहाय्याने मूळ चकाकी परत आणता येते. माती जर कातड्याला घट्ट चिकटलेली असेल, तर त्यासाठी साबण-पाणी यांचा संस्कार करतात. पाणी व साबण यांच्या संस्काराने न निघणाऱ्या डागांसाठी स्वच्छ करणारी विद्रावके काळजीपूर्वक वापरावीत. पाणी व साबण यांचा संस्कार केल्यावर वस्तू स्वच्छ, ओलसर कापडाने पुसतात व वाळत ठेवतात आणि वाळल्यानंतर पॉलिश करतात.
मऊ लव असलेल्या कातड्यांसाठी कडक ब्रश वापरतात. बारीक तारेच्या ब्रशाने धूळ सहज काढता येते व लवदारपणा परत आणता येतो. लवदार कातड्यांवर असणारी बारीक धूळ कृत्रिम स्पंजाने वा मऊ रबराने काढता येते. तेलकट डाग काढण्यासाठी ते विरघळू शकतील असा विद्रावक वापरतात. लवदार भाग दडपला गेला असेल, तर प्रथम सूक्ष्म कण असलेल्या घासकागदाने कातडे घासतात आणि नंतर ब्रशाने तो भाग साफ केल्यास मूळचा लवदारपणा पुन्हा आणता येतो. बहुतेक लवदार वस्तू निर्जल धुलाईने स्वच्छ करता येतात.
पांढऱ्या कातड्यात असणारा मूळचा तेलाचा अंश राखणे आवश्यक असते. असे कातडे धुताना व वापरताना त्यातील तेलाचा काही अंश कमी होतो. यासाठी तेलयुक्त चांगला पांढरा स्वच्छक वापरल्यास हा कमी झालेला अंश भरून काढता येतो. वासराच्या कातड्यांपासून तयार केलेल्या पांढऱ्या पादत्राणांसाठी साबणयुक्त पाण्याने ओले केलेल्या फडक्याने ती पुसतात व लगेच कोरड्या फडक्याने कोरडी करतात आणि तेलयुक्त पांढऱ्या स्वच्छकाचा योग्य जाडीचा थर देतात. लवदार पांढऱ्या पादत्राणांसाठी ब्रशाने कातडे स्वच्छ करतात व नंतर त्यावर पांढऱ्या स्वच्छकाचा वापर करतात.
तेलयुक्त कातड्यांसाठी आणि शिकारी पादत्राणांसाठी सौम्य साबणपाणी यांनी प्रथम कातडे स्वच्छ करतात व नंतर तेलाचा हात देतात. कातड्यात लवचिकपणा व कोरडेपणा किती असावा यावर तेलाचा हात देणे अवलंबून असते. साधारणतः एक दिवसाआड तेल दिले जाते.
फर्निचर इत्यादींवरील कातडी वारंवार स्वच्छ करीत नाहीत. मेणपॉलिश यांचा वापर क्वचितच करतात. असे कातडे सौम्य साबण व कमीत कमी पाणी वापरून धुतात व स्वच्छ आणि ओल्या कापडाने पुसतात. जेव्हा असे कातडे जास्त वेळ उपयोगात असेल व ते जास्त प्रमाणात कोरडे असेल तेव्हा सल्फोनीकृत तेलाचा कातड्यावर थर देतात व त्यामुळे कातड्यास मूळची छटा येते.
औद्योगिक व खोगिराची कातडी सौम्य साबण व पाणी यांनी धुतात व त्यांना योग्य प्रमाणात तेल देतात. पट्ट्याच्या कातड्याला सल्फोनीकृत तेल देतात. खोगीर व जोखडाच्या कातड्यांवरील माती व घाम काढून टाकण्यासाठी ती नियमितपणे साबण व पाण्याने धुतात आणि नंतर सल्फोनीकृत तेल देतात.
कातड्यावर तयार होणारी बुरशी दोन पद्धतींनी नष्ट करता येते. कोणत्याही प्रकाराची बुरशी आर्द्रतेशिवाय जगू शकत नसल्यामुळे कातडी व कातड्याच्या वस्तू नेहमी कोरड्या आणि जादा आर्द्रतेपासून मुक्त ठेवाव्यात. जेथे वायुवीजनाची सोय नाही व तापमान जास्त असते अशा आर्द्रतायुक्त ठिकाणी कातडी साठवू नयेत. अशी खबरदारी घेता येणे अशक्य असल्यास खास बुरशीप्रतिबंधक रसायनांचा उपयोग करतात. उदा., कातड्याच्या वजनाच्या १% च्या ०·३ – ०·५ इतके पॅरानायट्रोफिनॉल वापरल्यास बुरशीची वाढ खुंटते.
वनस्पतिज पदार्थांनी कमावलेल्या कातड्याचा उपयोग पुस्तक बांधणी, फर्निचर इत्यादींसाठी करतात. वनस्पतिज पदार्थांत असणाऱ्या प्रतिऑक्सिडीकारक संयुगामुळे व हवेतील ऑक्सिजनामुळे कातड्यातील अम्लता वाढते व कातड्याचा भुगा होण्यास सुरुवात होते. तसेच कातड्यासाठी वापरलेल्या अम्लीय रंगामुळेही अम्लता वाढण्यास मदत होते. यासाठी सोडियम क्लोराइड, पोटॅशियम सायट्रेट वा पोटॅशियम लॅक्टेट या क्षारीय संयुगांचा कातड्यावर थर देतात. त्यामुळे ऑक्सिडीभवनाची क्रिया रोखली जाते. याबाबतीत पोटॅशियमाची संयुगे जास्त प्रभावी ठरतात.
कातड्यांचे उपयोग : कातडी कमावल्यानंतर त्यांचा उपयोग विविध कामांकरिता करतात. प्राण्यांच्या कातड्यांनुसार त्यांचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.
(अ) गाई, बैल यांची कातडी पादत्राणांचे तळवे, टाचा व वरचे भाग, खोगिरे, घोड्यास लागणाऱ्या विविध पट्ट्या व त्यांच्या डोळ्यांवरची झापडे, विविध आकारांच्या प्रवासी पेट्या, पट्टे, हातमोजे व कपडे, यंत्रांचे पट्टे, वाहनांतील बैठकांवरील व फर्निचरवरील आवरण, सुशोभित वस्तू, कमरपट्टे, हात-पिशव्या (हॅंड बॅग्ज) व शोभिवंत वस्तू, पुस्तक बांधणी, मलवस्त्र, चकाकी आणणारी चाके, कापड उद्योगातील विविध यंत्रांत, द्रवीय उपकरणांत भरणद्रव्य व वायसर, पट्ट्यांच्या वाद्या, शिळामुद्रण, खेळांचे साहित्य, वस्तऱ्याला धार लावण्याचे पट्टे, तलवार, खंजीर वगैरेंच्या म्यानांसाठी वापरतात.
मोठ्या वासरांची वा लहान जातीच्या गुरांची कातडी पादत्राणांचे वरचे भाग, हात-पिशव्या, शोभिवंत वस्तू, हातमोजे आणि कपडे, पादत्राणांचे पट्टे इत्यादींसाठी वापरतात. लहान वासरांची कातडी पादत्राणांचे वरचे भाग, पिशव्या व शोभिवंत वस्तू, हातमोजे व कपडे, हॅटचे पट्टे, चर्मपत्रे, लष्करी शिरस्राणे व वायु-मुखवटे, पादत्राणांचे नाजुक भाग, पुस्तक बांधणी, हस्तकलावस्तू, गोल्फच्या काठीच्या मुठी इत्यादींसाठी वापरतात.
(आ) मेंढ्यांची कातडी पादत्राणांचे वरचे भाग व अस्तर, सपाता, हातमोजे, पुस्तक बांधणी हात-पिशव्या, मलवस्त्र, शॅमॉय कातडीच्या वस्तू, वैमानिकांचे कपडे, कातडी कोट, हॅटचे पट्टे, चर्मपत्रे, कापड उद्योगातील रूळ, लष्करी शिरस्राणे, खेळ साहित्य (चेंडू, हातमोजे इ.), स्त्रियांच्या टोप्या इत्यादींसाठी वापरतात.
(इ) शेळीची कातडी पादत्राणांचे वरचे भाग, शोभिवंत वस्तू व हात-पिशव्या, हातमोजे व कपडे, वैमानिकांचे कपडे, पुस्तक बांधणी, फर्निचराचे आवरण इत्यादींसाठी वापरतात.
(ई) घोडा, खेचर, गाढव व झीब्रा यांची कातडी हातमोजे, पादत्राणे, कपडे, वैमानिकाचे कपडे, खेळ साहित्य, पायावर बांधावयाचे लांब पट्टे, प्रवासी साहित्य, वस्तऱ्याला धार लावण्याचे पट्टे इत्यादींसाठी वापरतात.
(उ) म्हशींच्या कातड्याचा उपयोग पादत्राणांचे तळवे आणि वरचे भाग, चकाकी आणण्याची चाके, प्रवासी साहित्य, हात-पिशव्या इत्यादीसाठी केला जातो.
(ऊ) डुक्कर व तत्सम प्राण्यांची कातडी शोभिवंत वस्तू व प्रवासी साहित्य, हातमोजे, पादत्राणांच्या तळव्यांचे आतील भाग, खोगिरे व घोड्याचे पट्टे इत्यादींसाठी वापरतात.
(ए) हरिण व तत्सम प्राण्यांची कातडी पादत्राणांचे वरचे भाग, हातमोजे, कपडे, शोभिवंत वस्तू, एस्किमो लोकांचे बूट इत्यादींसाठी वापरतात.
(ऐ) कांगारू आणि तत्सम प्राण्यांची कातडी पादत्राणाच्या वरच्या भागासाठी वापरतात.
(ओ) जलचर प्राण्यांपैकी सील, वॉलरस इत्यादींची कातडी प्रवासी साहित्य, शोभिवंत वस्तू, चकाकी आणणारी चाके इत्यादींसाठी शार्क, देवमासा, डॉल्फिन वगैरे माशांची कातडी शोभिवंत वस्तू, प्रवासी साहित्य, पादत्राणांचे वरचे भाग इत्यादींसाठी सुसर, ॲलिगेटर यांची कातडी पादत्राणे, हात-पिशव्या, प्रवासी साहित्य, शोभिवंत वस्तू इत्यादींसाठी वापरतात.
(औ) शहामृगाची कातडी प्रवासी साहित्य, शोभिवंत वस्तू इत्यादींसाठी उंट, लामा, अल्पाका, याक वगैरे प्राण्यांची कातडी त्या त्या देशात स्थानिक वापरासाठी सरडा, साप, बेडूक इ. प्राण्यांची कातडी पादत्राणांचे वरचे भाग, शोभिवंत वस्तू इत्यादींसाठी वापरतात.
विविध प्रकारच्या आघात वाद्यांसाठी कातड्यांचा उपयोग केला जातो. मृदंग, तबला, ढोल, ताशा, नगारा, खंजिरी, डफ यांसारख्या भारतीय वाद्यांप्रमाणेच पाश्चात्त्य संगीतातील निरनिराळ्या प्रकारच्या ड्रमामध्ये (उदा., केटल ड्रम, बोंगो ड्रम इ.) कातडे वापरतात. याकरिता गाय, वासरू, म्हैस, माकड, गाढव, साप इत्यादींची कातडी वापरतात. मृदंगाच्या उजव्या बाजूला बाहेरच्या कातड्यासाठी वासराचे व आतल्या कड्यासाठी मेंढीचे कातडे वापरतात आणि डाव्या बाजूला बाहेरच्या कड्यासाठी म्हशीचे व आतल्या कड्यासाठी मेंढीचे कातडे वापरतात. याशिवाय म्हशीच्या कातड्याच्या वाद्या (पट्ट्या) मृदंगाकरिता वापरतात. ड्रमकरीता वासरांची किंवा गाढवांची कातडी उपयोगात आणतात. आघात वाद्यांखेरीज सारंगी, दिलरूबा, सरोद यांसारख्या वाद्यांत तारांच्या बाजूच्या पृष्ठभागाकरिता कातडे वापरतात.
जागतिक उद्योग : चर्मोद्योगाचे कातडी कमावणे आणि कातडी वस्तू बनविणे असे दोन भाग आहेत. जगातील बहुतेक देशांमधील चर्मोद्योग यांपैकी एका वा दोन्ही स्वरूपांत आहेत. कातडी कमावण्याच्या प्रक्रियांमधील बहुतेक सुधारणा, तसेच त्यांसाठी लागणारी यंत्रे यांचे शोध युरोपातील देशांतच लागले त्यामुळे युरोपीय देश या उद्योगात अग्रेसर आहेत.
यूरोपमधून अमेरिकेत येणाऱ्या कातडी वस्तूंच्या जास्त किंमतीमुळे अमेरिकेतील चर्मोद्योगास चालना मिळाली. सुरुवातीला कातडी कमावणे हा उद्योग तेथे लहान प्रमाणात होता. कातड्यांची मागणी वाढल्यामुळे कातडी कमावण्याचा धंदा वाढीस लागला. अठराव्या शतकाअखेर अमेरिकेत जवळजवळ २,००० चर्मालये होती. १८०९ च्या सुमारास कातडी कमावण्यासाठी यंत्रांचा वापर सुरू झाला. हळूहळू चर्मालयातील बहुतेक सर्व प्रक्रिया यंत्रांनी करण्यात येऊ लागल्या आणि मोठ्या स्वरूपाची चर्मालये स्थापिली गेली. रेल्वेच्या विकासामुळे चर्मोद्योगाचा विकास जलद झाला. पेनसिल्व्हेनिया, न्यूयॉर्क, मिशिगन, विस्कॉन्सिन, व्हर्जिनिया, कॅरोलायना, टेनेसी इ. राज्यांत कातडी कमावण्याचे कारखाने आहेत. सॅन फ्रॅन्सिस्को, बोस्टन, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, सिनसिनटी, शिकागो आणि सेंट लूईस ही शहरे कातड्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहेत. सॅन फ्रॅन्सिको या बंदरातून कातड्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. आजमितीला अमेरिकेचा चर्मोद्योगामध्ये जगात पहिला क्रमांक लागतो.
आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका ह्या प्रदेशांत जगाच्या ६०% गायी-म्हशी, ५०% शेळ्या आणि ३३% मेंढ्या असल्या, तरी योग्य सोयीअभावी त्या प्रदेशांत चर्मोद्योग म्हणावा तसा प्रगत झालेला नाही. सर्वसाधारणतः या देशांतून कच्चीच कातडी निर्यात होतात. कातडी कमावणे हा एक कुटिरोद्योग म्हणूनच या देशांत गणला जातो. आधुनिक तंत्रे व पद्धती वापरण्याचे प्रमाण ह्या देशांत वाढत आहे.
चर्मोद्योग हा ज्यांचा व्यापार आपापसांतच चालतो अशा प्रगत देशांतच केंद्रित झालेला आहे. या देशांचा आपापसांतच कातड्यांचा व्यापार चालतो. फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, अमेरिका व इटली या देशांतून मोठ्या प्रमाणात तयार कातडी निर्यात होतात त्याचप्रमाणे न्यूझीलंडमधून मेंढ्यांची कातडी अमेरिकेला निर्यात होतात व तेथे ती कमावण्यात येऊन यूरोपला निर्यात होतात आणि तेथे त्यांचे उपयुक्त वस्तूंत रूपांतर होते. तसेच भारतात अंशतः प्रक्रियित केलेली कातडी यूरोपात कमावली जातात आणि तेथे त्यांपासून तयार झालेल्या वस्तू अमेरिकेतील बाजारात जातात. इटली पादत्राणांच्या निर्यातीत अग्रेसर असून जपानचा क्रमांक त्यानंतर लागतो. या देशांत एकूण जागतिक उत्पादनापैकी सु. ५०% कातडी वस्तू, ७०–८०% पादत्राणाच्या तळांची कातडी आणि २–१५% पादत्राणांची वरची कातडी तयार होतात.
जगात दर वर्षी सु. ६८·६ कोटी कातडी तयार होतात. त्यांची किंमत सु. २०० कोटी डॉलर आहे व सु. १०० कोटी डॉलरच्या कातड्यांचा जागतिक व्यापार चालतो. रशिया (४·५ कोटी), अमेरिका (३·७ कोटी) आणि भारत (२·८ कोटी) हे देश कातड्यांचे मोठे उत्पादक आहेत. शेळ्यांची कातडी भारत व चीन तर मेंढ्यांची कातडी रशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड येथून मोठ्या प्रमाणावर पुरविली जातात.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी बऱ्याच देशांत कातड्यासंबंधी संशोधन करणाऱ्या संस्था सुरू झाल्या. जीवविज्ञान, रसायनशास्त्र व इतर संलग्न शास्त्रांच्या साहाय्याने कातडी कमावण्यासंबंधी महत्त्वाचे संशोधन वरील संस्थांत करण्यात आले. बहुतेक सर्व देशांत कातड्यांसंबंधीच्या तांत्रिक संस्था आहेत. ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ लेदर केमिस्ट्स सोसायटी’ या जागतिक संस्थेची बैठक दर दोन वर्षांनी होते. ‘अमेरिकन लेदर केमिस्ट्स ॲसोसिएशन’ या संस्थेतर्फे दर महिन्याला एक माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यात येते. त्या माहिती पत्रकात संशोधनात्मक मूळ लेख, तांत्रिक माहिती, कातड्यांविषयी विविध भाषांत प्रसिद्ध झालेल्या तांत्रिक माहितीचा सारांश, एकस्वांबद्दलची माहिती इ. माहिती प्रसिद्ध करण्यात येते.
वाया गेलेल्या वा टाकाऊ ठरलेल्या कातड्यापासून बुटाच्या वरच्या भागासाठी लागणारे कातडे तयार करण्याचे प्रयत्न जर्मनी, जपान, अमेरिका आणि झेकोस्लोव्हाकिया ह्या देशांत सुरू आहेत. यासाठी कोलॅजेनयुक्त पोरोमेरिक (प्रथिन-कोलॅजेनापासून तयार करण्यात येणारे सच्छिद्र बहुवारिक – म्हणजे अनेक रेणूंच्या संयोगाने तयार झालेले अधिक जटिल रेणू असलेले संयुग) वापरण्यात येते. यामुळे तयार होणारे कातडे तंतुरूप चटईच्या स्वरूपात असून त्याची तंतुमय संरचना व पृष्ठरूप याबाबतीत ते नैसर्गिक कातड्यासारखे दिसते. या तंतुरूप चटया दोन पद्धतींनी तयार करता येतात. कागद निर्मितीत वापरण्यात येणाऱ्या पद्धतीसारख्या ओल्या पद्धती असे कातडे मोठ्या प्रमाणावर तयार करता येते, पण ते कडक व नैसर्गिक कातड्यापेक्षा हलक्या प्रतीचे असते. कृत्रिम कापड तयार करण्याच्या तंत्रासारखी पद्धत कोरड्या पद्धतीत वापरली जाते व या पद्धतीनेच औद्योगिक उत्पादन करणे शक्य आहे. नैसर्गिक कातड्यापेक्षा यांची किंमत अद्यापिही जास्त आहे.
भारतीय उद्योग : कातडी कमावण्याची कला भारतीयांना ख्रिस्तपूर्व काळापासून माहीत आहे व कातडी कमावण्याच्या पद्धती पूर्वापार चालत आलेल्या होत्या. उत्तर भारतात वापरात असलेली ढोरी पद्धत आणि दक्षिण भारतातील ईस्ट इंडिया टॅनिंग पद्धत ह्या पद्धती पूर्णपणे भारतीय आहेत.
इतिहास व विकास : भारतीय चर्मोद्योग १८५७ सालापर्यंत कुटिरोद्योग म्हणूनच चालत होता. हा उद्योग बहुधा खेड्यांमध्येच चाले. याच सुमारास दक्षिण भारतातून निर्यात होणाऱ्या अर्ध-संस्कारित कातड्यांच्या निर्मितीत सुरुवात झाली. इंग्लंडमध्ये वापरीत असलेले वनस्पतिज पदार्थ वापरून कातडे कमाविण्याच्या प्रक्रियेचा उपयोग कानपूर येथे १८६७ मध्ये स्थापन झालेल्या ‘गव्हर्न्मेंट हार्नेस अँड सॅडलरी फॅक्टरी’ या सरकारी कारखान्यात करण्यात आला. लष्करासाठी लागणाऱ्या बुटांच्या कातड्यांसाठी कानपूर येथेच ‘कूपर, ॲलन अँड कंपनी’ हा कारखाना १८८१ मध्ये स्थापन झाला. तेथेही वनस्पतीज पदार्थ वापरून कातडी कमावण्यात येत. त्यानंतर पाश्चिमात्य तंत्र व यंत्रे यांचा वापर करणारे बरेच कारखाने कानपूर व आग्रा येथे स्थापन झाले.
मुंबई येथील मिनोचर लेदर वर्क्समधील तलारी यांनी अमेरिकेतील क्रोम पद्धतीचा अभ्यास केला व त्यानुसार १९०० च्या सुमारास क्रोम कातडे तयार करण्यात यश मिळविले. याच सुमारास मद्रास येथे क्रोम कातडे तयार करण्याचे प्रयोग यशस्वी झाले. ‘गव्हर्न्मेंट स्कूल ऑफ आर्ट्स’ या संस्थेत क्रोम प्रक्रिया शिकविण्यात येऊ लागली. तेथे शिकून तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांनी मद्रास, कलकत्ता व कानपूर येथे क्रोम प्रक्रियित चर्मालये स्थापन केली. १९०३ मध्ये मद्रास येथे पहिले क्रोम प्रक्रियित चर्मालय सुरू झाले.
ब्रिटिश राजवटीमध्ये चर्मोद्योग मागासलेल्या वर्गातील लोकांकडे होता. त्यांचा कल पूर्वापार चालत आलेल्या पद्धतींकडे होता. नवीन सुधारणा करणे व यंत्रांचा वापर करणे ह्या गोष्टी त्यांच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. देशातील कच्चा माल निर्यात होत असे व त्यापासून तयार केलेला पक्का माल भारतात येत असे. कच्च्या कातड्यांच्या निर्यातीवर त्यावेळी १५% अबकारी कर होता. पण इंग्लंडमधील कारखानदार व व्यापारी यांच्या विरोधाने तो १० टक्क्यांनी कमी करण्यात आला. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांनी मात्र भारतीय चर्मोद्योगाच्या वाढीस व विकासास हातभार लावला. लष्करासाठी आवश्यक असणाऱ्या कातड्यांसाठी देशातील चर्मालयांचा विकास व वाढ करण्यात आली तसेच नवीन चर्मालयेही स्थापन करण्यात आली.
इ.स. १९४७ नंतरच्या काळात चर्मोद्योगाची खूपच प्रगती झाली. कित्येक लहान-मोठे नवीन कारखाने सरकारी मदतीने, खाजगी भांडवलाने व बॅंकांच्या मदतीने सुरू झाले आहेत. हे कारखाने सहकारी पद्धतीचे तसेच खाजगी स्वरूपांचे आहेत. भारतातील चर्मालये चार प्रकारांची आहेत : (१) वनस्पतिज पदार्थ वापरून व क्रोम प्रक्रियेने कातडी कमावणारी संघटित चर्मालये, (२) पादत्राणांचे वरचे कातडे तयार करण्यासाठी क्रोम प्रक्रिया वापरणारी लहान चर्मालये, (३) ई. आय. प्रक्रियेने कातडी कमावणारी लहान चर्मालये आणि (४) वनस्पतीज पदार्थ वापरून कातडी कमावणारी ग्रामीण चर्मालये.
१ ) संघटित चर्मालये : गव्हर्न्मेंट हार्नेस अँड सॅडलरी फॅक्टरी आणि कूपर, ॲलन अँड कंपनी ही दोन चर्मालये कानपूर येथे स्थापन झाल्यानंतर कानपूर टॅनरी व शेवान टॅनरी ही दोन चर्मालये सरकारी चर्मालयांतून टाकाऊ ठरविण्यात आलेली कातडी कमावण्यासाठी कानपूर येथे स्थापन झाली. आजमितीस कानपूर हे शहर आधुनिक पद्धतीने वनस्पतिज पदार्थ वापरून कातडी कमावण्याचे भारतातील मोठे शहर गणले जाते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला क्रोम लेदर कं., मद्रास नॅशनल टॅनरी, कलकत्ता उत्कल टॅनरी, कटक व म्हैसूर टॅनरी, बंगलोर ही चार क्रोम चर्मालये स्थापन झाली. पहिल्या महायुद्धाच्या काळात कलकत्ता, कानपूर, मद्रास आणि मुंबई येथे क्रोम चर्मालये निघाली. तथापि त्यांपैकी बरीच चर्मालये मागणी अभावी बंद पडली. दुसऱ्या महायुद्धाच्या कामात चर्मालयांत वाढ झाली पण नंतरच्या काळात त्यातील उत्पादनात मागणीच्या अभावी घट झाली. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या आरंभी २६ संघटित चर्मालये होती. त्यांची उत्पादनक्षमता क्रोमसाठी १९·७६ लक्ष व वनस्पतिज पदार्थासाठी ३१·८४ लक्ष नग एवढी (गायीच्या कातड्याच्या स्वरूपात) होती. १९५८ मध्ये २९ संघटित चर्मालये होती. त्यांपैकी १३ चर्मालयांतून क्रोम प्रक्रियित कातडी तयार करीत. क्रोम चर्मालयांची उत्पादनक्षमता १५·८ लक्ष नग व वनस्पतिज पदार्थांच्या चर्मालयांची ३८·५७ लक्ष नग इतकी होती. ही चर्मालये उत्तर प्रदेश, प. बंगाल, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांत आहेत. त्यांच्या उत्पादनक्षमतेच्या फक्त ५०% उत्पादनक्षमता वापरण्यात येते. ही चर्मालये यंत्रांनी व उपकरणांनी सुसज्ज असून त्यांचे उत्पादन आयात मालाच्या दर्जाएवढे असते. दर्जातील कमतरता ही हलक्या प्रतीच्या कच्च्या मालामुळे येते. हे कातडे पादत्राणांचे तळवे, वरचे भाग, पेट्या, पिशव्या इत्यादींसाठी वापरले जाते. ह्या चर्मालयांतून गायी-म्हशींची कातडी कमावली जातात. शेळीच्या कातड्यांपासून तयार करण्यात येणारी शॅमॉय कातडी देशातच खपतात. औद्योगिक उपयोगासाठी लागणारे कातडे थोड्या प्रमाणात तयार होते व बाकीच्या कातड्यांची आयात करावी लागते.
(२) लहान प्रमाणावरील क्रोम चर्मालये : ही चर्मालये कलकत्यात किंवा त्याच्या आसपास आहेत. ही चर्मालये भारतातील चिनी लोकांची मक्तेदारी होय. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी ती सुरू झाली. सुरुवातीला या चर्मालयांत वनस्पतिज पदार्थ वापरण्यात येत होते. पण नंतर क्रोम प्रक्रियेचा व यंत्राचा वापर करण्यात आला. कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार त्यांनी तंत्रात आवश्यक ते फेरफार केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुसज्ज अशी नवीन चर्मालये स्थापन झाली. कलकत्ता शहरात लहान प्रमाणावरील क्रोम चर्मालये १९५८ मध्ये सु. २५० होती व यंत्रांनी सुसज्ज अशी ६५ चर्मालये होती आणि त्यांपैकी ५५ चिनी लोकांच्या मालकीची होती. क्रोम प्रक्रियित कातड्याच्या निर्यातीतील ८०% कातडी ह्या चर्मालयांत तयार होतात. पादत्राणांच्या वरच्या भागांसाठी लागणारी कातडी येथेच तयार होतात. पण त्यांचा दर्जा हलक्या प्रतीची कच्ची कातडी वापरल्यामुळे कमी प्रतीचा असतो.
(३) ई. आय. चर्मालये : द. भारतात तरवडीची साल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे इ. आय. चर्मालये द. भारतातच आहेत. या पद्धतीने कमावलेली कातडी ब्रिटन, अमेरिका इ. देशांकडे पाठविण्यात येतात. ही कातडी पुन्हा कमावण्यात येतात व त्यापासून मखमली, मोरोक्को, हातमोजाचे इ. संस्कारित कातडी तयार करण्यात येतात. १९५८ च्या सुमारास सु. ५०० ई. आय. चर्मालये भारतात होती. त्यांपैकी ९०% तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश, ५% महाराष्ट्र, २·५% कर्नाटक व उरलेली २·५% इतर भागांत होती. सु. दोन कोटी रुपयांची ई. आय. प्रक्रिया केलेली कातडी दरवर्षी भारतातून निर्यात करण्यात येतात. मद्रास, बंगलोर, अर्काट, एलोर, बेझवाडा ही ई. आय. चर्मालये असलेली महत्त्वाची शहरे होत. तिरुचिरापल्ली, डिंडिगल व कोईमतूर येथे शेळ्या व मेंढ्या यांची कातडी कमावण्याची चर्मालये आहेत. गायीवासरांपासून मिळणारी ‘किप्स’, मेंढ्यापासून मिळणारी ‘पर्शियन’ व शेळ्यांपासून मिळणारी ‘मोरोक्को’ या तीन प्रकारांची कातडी तयार करण्यात येतात.
(४) ग्रामीण चर्मालये : ही चर्मालये भारताच्या सर्व ग्रामीण भागात विखुरलेली आहेत. यांसाठी लागणारा कच्चा माल स्थानिक स्वरूपाचा असून त्यापासून तयार होणारा माल तेथेच पादत्राणे, पट्टे, खोगिरे, जोखडे इत्यादींसाठी वापरतात. ही चर्मालये कुटिरद्योगांच्या स्वरूपाची असून ती स्थानिक चांभारांकडून चालविण्यात येतात. कच्ची कातडी सामान्यतः मेलेल्या जनावरांची असतात. कातडी कमावण्यासाठी स्थानिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या वनस्पतिज पदार्थांचा वापर केला जातो. ग्रामीण बाजारपेठांतून फिरते दलाल कच्ची कातडी विकत घेतात व मोठ्या कारखान्यांना पुरवितात.
चर्मोद्योगाच्या गरजांकडे लक्ष पुरविण्याच्या हेतूने १९५८ मध्ये केंद्र सरकारने लेदर इंडस्ट्रीज पॅनेलची स्थापना केली. नंतर त्या पॅनेलचे कार्यक्षेत्र वाढून त्याचे रूपांतर डेव्हलपमेंट कौन्सिलमध्ये करण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या उद्योग व व्यापार विभागातर्फे सर्व राज्यांत ‘स्मॉल इंडस्ट्रीज सर्व्हिस इन्स्टिट्यूट’ स्थापन करण्यात आल्या. इतर उद्योगधंद्याप्रमाणेच चर्मोद्योगासाठी नवीन लहान मोठे कारखाने सुरू करणे व त्यासंबंधीच्या योजना तयार करणे, तांत्रिक सल्ला व साहाय्य देणे, यंत्रसामग्रीची खरेदी व आयात यांविषयी मदत देणे इ. कामे या संस्थांतर्फे केली जातात. तसेच नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन इ. निगमही चर्मोद्योगाला आवश्यक ती मदत करतात. राज्य सरकारांच्या उद्योग खात्यातर्फे, तसेच सहकार खात्यातर्फे चर्मोद्योग तज्ञांची नेमणूक करण्यात येते. सहकारी संस्थांच्या आणि लहान मोठ्या कारखान्यांच्या अडचणी, तपासणी, तांत्रिक सल्ला व प्रशिक्षण, पाहणी इ. कामे हे तज्ञ करतात.
इंडस्ट्रीज रेग्युलेशन ॲक्ट १९५१ प्रमाणे मोठ्या प्रमाणावरील नवीन कारखाना सुरू करण्यासाठी केंद्र सरकारचा परवाना मिळविणे आवश्यक असते. कारखाना लहान प्रमाणावरील असेल, तर त्याची योजना मान्य करून घेणे आणि राज्य सरकारची संमती घेणे आवश्यक असते. धंद्यासाठी आवश्यक ते कर्ज लहान प्रमाणात राज्य सरकार देते, तर मोठ्या प्रमाणावर स्टेट फायनान्स कॉर्पोरेशनमार्फत उद्योग खात्याच्या शिफारशीवर मिळू शकते. सहकारी संस्थांना मिळणारी कर्जे सहकारी खात्याच्या तपासणी-शिफारशीनंतर सहकारी बॅंका आणि खादी व ग्रामोद्योग आयोगातर्फे मिळू शकतात.
धार्मिक भावनेमुळे देशात गायी-म्हशींची कातडी कमी प्रमाणात मिळतात. त्यामानाने शेळ्या-मेंढ्यांची कातडी मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे कच्ची कातडी काही प्रमाणात आयात करावी लागतात.
तिसऱ्या व चौथ्या पंचवार्षिक योजनांमध्ये या उद्योगाला फारसे महत्त्व देण्यात आले नाही. १९७२ मध्ये केंद्र सरकारचे व्यापार खाते व लेदर एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल यांनी चर्मोद्योगाकडे लक्ष देऊन चर्मोद्योगाच्या समग्र एकीकरणाबाबत प्रयत्न केले. पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये संकल्पित लेदर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या निगमासाठी दोन कोटी रू. राखून ठेवण्यात आले आहेत. यांशिवाय जेथे चर्मोद्योग मोठ्या प्रमाणावर आहे अशा अकरा राज्यांनी या उद्योगासाठी काही रक्कम राखून ठेवावी, असे नियोजन मंडळाने सुचविले आहे. तसेच चर्मोद्योगाच्या एकूण निर्यातीपैकी सु. ७५% निर्यात संस्कारित कातड्यांची व्हावी हे पाचव्या योजनेचे लक्ष्य आहे.
देशातील चर्मोद्योगामधील एकूण गुंतवणूक (१९६५ च्या किंमतीत) सु. १८ कोटी रूपयांची असून त्यांपैकी १·५ कोटी रु. कारखान्यांची आहे व बाकी ग्रामीण भागातील आहे. या उद्योगात सु. ५ लाख मजूर काम करतात. भारताच्या विविध भागांत निरनिराळ्या प्रकारांची कातडी तयार होतात. उदा., कलकत्ता भागात क्रोमची मुंबई-पुणे-कोल्हापूर येथे पादत्राणांचे तळ, क्रोम व प्रवासी साहित्याची तामिळनाडू व कर्नाटक भागात ई. आय. व क्रोमची. भारतात १९६९ क्रोम प्रक्रियित ७·३५ लक्ष नग आणि वनस्पतिज पदार्थांनी कमावलेले २३·४५ लक्ष नग इतकी संस्कारित कातडी आणि १.१२ कोटी मी. लांबीचे कातड्याचे कापड तयार करण्यात आले.
चर्मोद्योगात महाराष्ट्राचा क्रमांक प. बंगाल, तमिळनाडू व उत्तर प्रदेश यांच्या नंतर लागतो. १९५१-५२ मध्ये जुन्या मुंबई राज्यात चर्मोद्योग व कातडी वस्तू बनविणाऱ्या १८९ सहकारी संस्था होत्या, तर १९६४-६५ मध्ये ती संख्या ४३२ इतकी होती. मुंबई येथील स्टेट इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह ॲसोसिएशन ही औद्योगिक सहकारी संस्था चर्मकारांच्या संस्थांना सर्व तऱ्हेचे साहाय्य करते. तसेच उत्पादनही करते. राज्य सरकारच्या कातडी वस्तूंच्या मागणीचा जास्तीत जास्त पुरवठा ही संस्था करते. सरकारी मागणी पुरविणाऱ्यांमध्ये ह्या संस्थेला अग्रहक्क आहे. सहकारी संस्थांखेरीज महाराष्ट्रात इतरही संस्था चर्मोद्योग करतात. महाराष्ट्रातील चर्मोद्योगाची प्रमुख केंद्रे म्हणजे मुंबई, पुणे, कोल्हापूर, दौंड, सातारा, सांगली, मिरज, सोलापूर, चाळीसगाव, अमरावती, दर्यापूर, नागपूर, कामटी, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, लातूर व बार्शी ही होत. त्यांपैकी मुंबई, सोलापूर, दौंड, सातारा, कामटी, चाळीसगाव, अमरावती, हिंगोली, दर्यापूर व कोल्हापूर येथे यंत्रसामग्रीने कातडी कमवितात व वस्तूही बनवितात बाकीच्या केंद्रांत व ग्रामीण भागात ढोरी पद्धतीचा वापर करतात.
मुंबई राज्यातील चर्मोद्योगाची पाहणी करून योग्य त्या शिफारसी करण्यासाठी १९२७ मध्ये वाय. आर. गायतोंडे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या शिफारशींनुसार चर्मोद्योगाच्या वाढीस खेड्यातून चालना देण्यासाठी चर्मकारांच्या लहान लहान सहकारी संस्था स्थापन करण्याची योजना कार्यान्वित झाली. १९५१ मध्ये आर.पी. मसानी यांच्या शिफारशीनुसार कच्च्या कातड्यांची वर्गवारी करण्याची पद्धती सुरू झाली. १९५९ मध्ये जी. आर. वाळूंजकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई राज्यातील चर्मोद्योगांची पाहणी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीने मार्च १९६० मध्ये अहवाल सादर केला.
भारतात कातडी कमावण्याचे कारखाने थोडे आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात चालणारा कातडी कमावण्याचा व्यवसाय हा चर्मोद्योगाच्या व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. एकूण कमावलेल्या कातड्यांपैकी सु. ८०% कातडी ग्रामीण भागातील असतात. भारताच्या विविध भागांत उपलब्ध होणारे विविध वनस्पतिज पदार्थ कातडी कमावण्यासाठी वापरले जातात. ग्रामीण भागात कमावलेल्या कातड्यांपैकी सु. ८०% कातडी ग्रामीण भागातच पादत्राणे, पट्टे , खोगीर इ. वस्तू बनविण्यासाठी वापरली जातात. मेलेल्या गायी-म्हशीची कातडी ग्रामीण भागात वापरली जातात. केंद्रीय नियोजन मंडळाने ग्रामीण चर्मोद्योगासाठी कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली. मोठ्या कारखान्याची वाढ न करता, ग्रामीण भागातील चर्मोद्योगाच्या विकासाकडे लक्ष पुरवावे अशी या समितीने शिफारस केली. त्यानुसार सरकारने मोठ्या कारखान्यांतील मालावर मार्च १९६३ पासून १०% अबकारी कर आकारला, पण त्यातील निर्यात होणाऱ्या मालाला या करात सूट देण्यात आली.
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत हा उद्योग खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या अखत्यारीत आल्यामुळे ग्रामीण चर्मोद्योगाचा विकास होण्यास मदत झाली. आयोगाने या उद्योगाचे तीन भाग केले : (१) मेलेल्या गुरांची कातडी काढणे (२) कातडी कमावणे आणि (३) पादत्राणे व इतर वस्तू तयार करणे. ग्रामीण चर्मोद्योग संस्थांना आयोगातर्फे आर्थिक, तांत्रिक व व्यवस्थापकीय प्रकाराची मदत करण्यात येते. या सर्व उपायांचा चांगला परिणाम दिसून आला व ग्रामीण चर्मोद्योगाची सर्वांगीण प्रगती होऊ लागली. १९६९-७० पेक्षा १९७०-७१ मध्ये उत्पादन ९·४९% व विक्री १२·३६ टक्क्यांनी वाढली. १९७३ मध्ये आयोगाने मदत दिलेली १,०३२ केंद्रे होती. त्यांपैकी ३३९ केंद्रे कातडी कमावण्याची, २४३ पादत्राणे निर्माण करण्याची व १८२ कातडी सोलण्याची केंद्रे होती. ह्या केंद्रांत १९७३ मध्ये सु. ६·१२ कोटी रुपयांच्या वस्तू तयार झाल्या. उत्तर प्रदेश (४१%), राजस्थान (११%) व गुजरात (९%) या राज्यांत ही केंद्रे आहेत. या केंद्रांतून १६,२४० मजूर पूर्णवेळ व १६,८७३ मजूर अर्धवेळ काम करतात. आयोगातर्फे विविध तांत्रिक प्रकारचे तसेच आर्थिक साहाय्य मिळते. मालाचा दर्जा सुधारावा म्हणून तांत्रिक शिक्षण देणारी आयोगाची वर्धा व मुंबई येथे प्रशिक्षण केंद्रे आहेत. १९६५ मध्ये चंद्रपूर येथे निर्वासितांसाठी प्रशिक्षण व उत्पादन केंद्र आयोगाने सुरू केले.
निर्यात : भारतात तयार होणाऱ्या कातड्यावर ई. आय. प्रक्रिया, मुरविणे इ. संस्कार झालेले असतात. बहुतेक कातडी देशातच पादत्राणे आणि इतर वस्तू बनविण्यासाठी वापरली जातात व अल्प प्रमाणात निर्यात होतात. सरीसृप प्राण्यांची जी कातडी तयार होतात ती बहुतेक सर्व निर्यात होतात. नाग, मंडली सर्प (व्हायपर), पाणसाप इ. सापांची कातडी निर्यात होतात. अजगर व सुसर यांच्या कातड्यांच्या निर्यातीस बंदी आहे. सरड्यांची कातडी फ्रान्स, ब्रिटन, इटली, जपान व प. जर्मनी येथे पाठविली जातात. शेळ्यांची कातडी पुरविण्यात भारत अग्रेसर आहे. दक्षिण भारतातील शेळ्यांची कातडी उच्च प्रतीची असतात, तर जसजसे उत्तरेकडे जावे तसतशी त्यांची प्रत कमी कमी होत जाते. कलकत्ता, कानपूर व केरळ भागातील गायीवासरांची कातडी चांगल्या प्रकारची असतात.
अर्धप्रक्रियित कातडी निर्यात कर न देता निर्यात करता येतात. संस्कारित कातडी व कातड्यांच्या वस्तू यांची निर्यात होते, पण गायी, म्हशी, वासरे व मेंढ्या यांची कच्ची कातडी निर्यात करण्यास बंदी आहे. शेळ्यांच्या, कातड्यांची निर्यात हळूहळू कमी करून पुढे पूर्णपणे बंद करण्याचे उद्दिष्ट आहे.
सध्या भारतातून ई. आय. प्रक्रियित व ‘वेट ब्ल्यू’ प्रकारांची कातडी निर्यात होतात. अशी निर्यात आणखी काही वर्षे तरी चालेल. हळूहळू कारखानदार संस्कारित कातडी आणि त्यांपासून करण्यात येणाऱ्या वस्तू निर्यात करण्याकडे लक्ष देऊ लागले आहेत. अशा वस्तूंत पादत्राणांचा वाटा मोठा आहे. १९७२ मध्ये ७·१ कोटी रूपयांची पादत्राणे निर्यात झाली. कातडी व वस्तू यांची भारतातून सु. ९८·४ कोटी रूपयांची निर्यात होते. अमेरिका, जपान, रशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड इ. देशांना कातडी आणि तयार वस्तू निर्यात करण्यात येतात. यांमध्ये कातड्यांचे तयार कपडे जास्त प्रमाणात असतात. तथापि ही निर्यात ग्राहक देशांतील लोकांच्या आवडीवर अवलंबून असल्यामुळे त्यानुसार पुरवठा झाल्यावरच निर्यात वाढ होऊ शकेल.
भारतातून १९६७-६८ ते १९७०-७१ या काळात निर्यात झालेल्या कातड्याचे व त्यांच्या किंमतीचे आकडे कोष्टकामध्ये दिलेले आहेत.
भारतातून निर्यात होणाऱ्या मालात कातडी वस्तूंना महत्त्वाचे स्थान आहे. १९७२-७३ मध्ये निर्यातीत चर्मोद्योगाचा क्रमांक दुसरा होता. त्यावर्षी एकूण निर्यात १७५ कोटी रूपयांची होती. १९७३-७४ मध्ये ती १९० कोटी रूपयांची झाली व १९७४-७५ मध्ये मंदीमुळे १५० कोटी रुपयांपर्यंत खाली आली.
भारत हा देश विस्ताराने मोठा असल्याने कातडी गोळा करणे व ती योग्य तऱ्हेने संरक्षित करणे ही कामे महत्त्वाची आहेत. ‘रॉ हाइड्स अँड स्किन्स इंप्रुव्हमेंट सोसायटी‘, ‘सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट‘, ‘लेदर एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’ आणि ‘खादी व ग्रामोद्योग आयोग’ ह्या संस्थांनी केलेल्या प्रयत्नांनीही त्यात विशेष सुधारणा होऊ शकलेली नाही. कच्च्या कातड्यांची भारतीय बाजारपेठ मोठी असून विविध भागांतील दरांमध्ये बरीच तफावत आढळून येते. कातड्यांना योग्य किंमत यावी यासाटी ‘लेदर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ हा केंद्र सरकारच्या उद्योग खात्याचा निगम थोडी फार मदत करतो. सीतारामय्या समितीच्या अहवालानुसार पाचव्या पंचवार्षिक योजनेत निर्यातीच्या प्रयत्नांना अधिक चालना देण्यात येणार आहे.
तमिळनाडू राज्यातून जवळजवळ ७०% निर्यात होते. त्या राज्यातील व्यवसाय उत्तर अर्काट जिल्ह्यात केंद्रीभूत झालेला आहे. तमिळनाडूमध्ये एकूण ४३३ कारखाने आहेत. त्यांपैकी ६७ मोठे, १३२ मध्यम आणि बाकीचे ग्रामीण भागात आहेत. भारतातील इतर कारखाने कलकत्ता २००, कानपूर २५, जलंदर ३, श्रीनगर १, जम्मू १, मुंबई १०, कर्नाटक ४ व आंध्र प्रदेश ६ असे आहेत.
१९६७-६८ ते १९७०-७१ मध्ये निर्यात झालेली कातडी व त्यांची किंमत (आकडे लाखात) | |||||||||
कातड्याचा प्रकार |
१९६७ – ६८ |
१९६८ – ६९ |
१९६९ – ७० |
१९७० – ७१ |
|||||
नग |
किंमत (रु.) |
नग |
किंमत (रु.) |
नग |
किंमत (रु.) |
नग |
किंमत (रु.) |
||
ई. आय. प्रक्रियित |
|||||||||
गायीच्या वासरांची |
१० |
१६५ |
१२ |
१९४ |
१० |
१६९ |
१२ |
१८९ |
|
म्हशीच्या पारडांची |
२१ |
३११ |
२३ |
३३९ |
२२ |
३६७ |
२१ |
२९५ |
|
गाय |
४५ |
४१४ |
६९ |
६१७ |
६८ |
५७९ |
५९ |
५५४ |
|
म्हैस |
३ |
२२ |
६ |
५६ |
४ |
३९ |
२ |
१६ |
|
शेळी |
३७ |
१,२४० |
६४ |
२,१५४ |
५९ |
२,२८४ |
६४ |
२,०२९ |
|
मेंढी |
३४ |
१,३२५ |
४६ |
१,५९३ |
३९ |
१,५३० |
३५ |
१,३५० |
|
मुरविलेल्या शेळ्यांची |
– |
६३ |
– |
५५ |
– |
१४८ |
– |
८७ |
|
कमाविलेली (सरीसृप) |
– |
३५९ |
– |
२७५ |
– |
१४० |
– |
७६ |
लेदर एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल : भारतातून कातड्यांची योग्य निर्यात होण्यासाठी व निर्यात वाढ करण्यास उत्तेजन मिळावे या दृष्टीने केंद्र सरकारने १९५६ मध्ये मद्रास येथे या संस्थेची स्थापना केली. ही एक व्यापारी, स्वायत्त आणि फायदा न घेता काम करणारी संस्था आहे. भारतातील कातड्यांचे कारखाने व परदेशांतील ग्राहक यांच्यामधील मध्यस्थाचे कार्य ही संस्था करते. सरकारी योजना कारखानदारांपर्यंत पोहोचविणे आणि कारखानदारांच्या अडचणी सरकारच्या निदर्शनास आणणे असे दुहेरी कार्य ही संस्था करते. या संस्थेने भारतीय कारखानदारांना निर्यातीस योग्य असे कातडे करण्याकडे प्रवृत्त करण्याचे कार्य बऱ्याच प्रमाणात केले आहे. संस्थेतर्फे अभ्यास करण्याकरिता आणि विक्री वाढविण्याकरिता तज्ञांच्या तुकड्यांच्या तसेच व्यापारी प्रतिनिधी मंडळांच्या विशिष्ट क्षेत्रात भेटी आयोजित करणे, निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय चर्म प्रदर्शनांमध्ये भाग घेणे, भारतीय कातड्याविषयीच्या पुस्तिका विविध भाषांत तयार करून त्या विविध प्रदर्शनांतून वाटणे इ. कार्ये करण्यात येतात. उत्पादित वस्तूंत सुधारणा करण्याच्या दृष्टीने अभ्यासक करणारा या संस्थेचा एक खास विभाग असून त्याच्यातर्फे निर्यातीच्या वस्तूंमध्ये विविध सुधारणा व नाविन्यपूर्ण कल्पना सुचविण्यात येतात.
कातडी कमावण्यासाठी लागणारे पदार्थ : भारतात विविध प्रकारचे वनस्पतिज पदार्थ कातडी कमावण्यासाठी वापरतात. स्थानिक उपलब्धतेनुसार हे पदार्थ विविध प्रदेशांत वापरले जातात. सर्वसाधारणतः तरवड, बाभूळ आणि हिरडा यांचा वापर केला जातो. साल, अर्क, फळे इ. स्वरूपांत हे पदार्थ वापरले जातात. वॅटल साल व अर्कही कमावण्यासाठी वापरण्यात येतो. १९५७ मध्ये तमिळनाडू राज्यात वॅटलची यशस्वी लागवड करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्या आयातीत घट झाली आहे.
हिरड्याचा अर्क द्रव व घन स्वरूपात भारतात बनविला जातो. श्री लक्ष्मी टॅनीन एक्स्ट्रॅक्ट फॅक्टरी, खरगपूर न्यू इंडिया टॅनिन्स लि., राणीगंज आणि अंबा टॅनीन अँड फार्मास्युटिकल्स लि., अंबा (जि. कोल्हापूर) या तीन मोठ्या कारखान्यांतून हिरड्याचा अर्क काढण्यात येतो. त्यांतील बराच भाग निर्यात होतो.
याशिवाय क्रोम प्रक्रियेत लागणारी क्रोमियम संयुगे, झिर्कोनियम संयुगे, सिनटॅन यांची आयात करण्यात येते. तुरटी भारतातच तयार होते. कमावण्याच्या प्रक्रियेला लागणारी इतर बरीच संयुगे आयात करावी लागतात. काही तेलेही आयात करावी लागतात.
चर्मोद्योगासाठी लागणारी बरीच यंत्रे आयात करावी लागतात. थोडीफार यंत्रे भारतात तयार होतात.
शिक्षण : कातडी सोलणे, कमावणे आणि पादत्राणांचे उत्पादन ह्याबाबतचे प्रशिक्षण देणारी भारतातील
केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत. सेंट्रल फूट वेअर ट्रेनिंग सेंटर, मद्रास व आग्रा मॉडेल ट्रेनिंग-कम-प्रॉडक्शन सेंटर, लखनौ आणि सेंट्रल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कानपूर.
निरनिराळ्या राज्यांतून चर्मोद्योगांचे तांत्रिक शिक्षण देणारे अभ्यासक्रम आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम इन्स्टिट्यूट ऑफ लेदर टेक्नॉलॉजी, कलकत्ता व टेक्नॉलॉजी कॉलेज, मद्रास येथे आहेत. हे अभ्यासक्रम विद्यापीठांमार्फत चालतात. तंत्रज्ञ व कुशल कारागीर यांना शिक्षण देणारे पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम मद्रास, कलकत्ता, कानपूर, मुंबई, ग्वाल्हेर व जलंदर येथे आहेत.
वाय्. आर. गायतोंडे यांच्या १९३७ सालच्या अहवालातील शिफारशीनुसार चर्मोद्योगाचे तांत्रिक शिक्षण देणारे पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. बाळासाहेब खेर यांच्या पुढाकारामुळे १९३०-३१ च्या सुमारास मुंबईत कातडी कमावण्याचे शिक्षण देणारी एक शाळा स्थापन झाली. ही शाळा नंतर सरकारने ताब्यात घेतली व तिचेच इन्स्टिट्यूट ऑफ लेदर टेक्नॉलॉजी व लेदर वर्किंग स्कूल या ख्यातनाम संस्थेत रूपांतर झाले. केंद्र सरकारतर्फे व राज्य सरकारतर्फे चालू असलेल्या पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांव्यतिरिक्त राज्यामध्ये काही उत्पादन व प्रशिक्षण केंद्रे आणि ग्रामीण चर्मोद्योगामधील कारागिरांना धंदेशिक्षण देणाऱ्या फिरत्या शाळा सुरू करण्यात आल्या. १९६२ पासून ह्या शाळा आणि प्रशिक्षण केंद्रे जिल्हा परिषदांकडे सोपविण्यात आली. अशा शाळा कोल्हापूर, सातारा, सोलापूर, चाळीसगाव, अमरावती, नांदेड इ. ठिकाणी आहेत. नागपूर व औरंगाबाद येथील केंद्रे राज्याच्या तांत्रिक शिक्षण खात्यामार्फत चालविली जातात. ह्या शाळांतून एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकविला जातो. या व्यतिरिक्त विकास गटांमधून जरूरीप्रमाणे एक वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या तात्पुरत्या शाळा सुरू करण्यात येतात व तो पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना सहकारी संस्था स्थापन करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येते.
संशोधन : दुसऱ्या महायुद्धापूर्वी भारतीय चर्मकारांना क्रोम प्रक्रियेचे तंत्र आणि कमावण्याच्या पद्धतीतील वनस्पतिज पदार्थांचा आधुनिक तऱ्हेने वापर ह्यांविषयी माहिती देण्यासाठी मद्रास येथे लेदर ट्रेड्स इन्स्टिट्यूट (सध्याची इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) आणि कलकत्ता येथे बेंगॉल टॅनिंग इन्स्टिट्यूट (सध्याचे कॉलेज ऑफ लेदर टेक्नॉलॉजी) या संस्था स्थापना झाल्या. या संस्थांमुळेच भारतात चर्मोद्योगाविषयीचे संशोधन सुरू झाले.
दुसऱ्या महायुद्धानंतर भारतात चर्मोद्योगासंबंधी संशोधन करणारी स्वतंत्र संस्था असावी अशी गरज भासली. त्या वेळचा भारतीय चर्मोद्योग अमेरिका, जर्मनी, ब्रिटन इ. प्रगत देशांशी तुलना करता फार मागे होता. त्या देशांत उच्च प्रतीचे संस्कारित कातडे तयार होत असे. असे कातडे तयार करण्यासाठी त्या देशांतील प्रगत असलेल्या यांत्रिक व रासायनिक उद्योगाचे पाठबळ कारणीभूत झाले. तसेच तयार झालेले कातडे मागणी भरपूर असल्याने लवकर खपे. इतर देशांशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने किंवा त्यांची बरोबरी करण्याच्या दृष्टीने भारतात संशोधन संस्था असणे आवश्यक आहे. असे कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) या संस्थेतील चर्म संशोधन समितीला वाटले. तिच्या शिफारशीनुसार ‘सीएसआयआर’ ने मद्रास येथे ‘सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट’ यासंस्थेची १९५३ मध्ये स्थापना केली. विज्ञानातील नवीन शोधांचा उपयोग चर्मोद्योगांसाठी करून त्यास आधुनिक स्वरूप देणे आर्थिक, सामाजिक व इतर समस्या सोडवून चर्मोद्योग एक प्रगतिशील धंदा बनविणे हा या संस्थेचा उद्देश होय. या दृष्टीने संस्थेने पुढीलप्रमाणे कार्ये केली : (१) चर्मालयात कातडी येईपर्यंत ती कशी टिकतील यासंबंधीचे संशोधन, (२) ई. आय. टॅनिंग, ढोरी पद्धत व क्रोम पद्धत या प्रकियांत सुधारणा, (३) वनस्पतिज पदार्थाच्या आयातीस आळा घालण्यासाठी देशात उपलब्ध असलेल्या टॅनीनयुक्त वनस्पतींचा वापर करून मिश्र टॅनिंग पदार्थ तयार करणे, (४) चर्मोद्योगात लागणारी काही रसायने व यंत्रे तयार करणे, (५) चर्मालयातील अपशिष्टांपासून उप-पदार्थ मिळविणे आणि प्रदूषण टाळणे यांविषयी संशोधन. ह्यांशिवाय कातड्यांसंबंधीचे मुलभूत संशोधन येथे चालते. तसेच धंद्यास आवश्यक असे तंत्रज्ञ ही संस्था प्रशिक्षण देऊन तयार करते. मद्रास विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी ही संस्था मदत करते. डॉक्टरेट पदवीसाठीही या संस्थेत संशोधन चालते. ही संस्था चर्मतंत्राच्या शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. आशिया व आफ्रिका येथील देशांतून येथे विद्यार्थी येतात, तसेच भारतीय तज्ञही त्या देशांत काम करतात.
भारतीय अर्थव्यवस्थेतील चर्मोद्योगाचे स्थान व महत्त्व पाहून धंद्याच्या विविध आर्थिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संस्थेने एक वेगळी शाखा स्थापन केली आहे. या शाखेतर्फे तांत्रिक-आर्थिक सर्वेक्षण व योजना हाती घेण्यात येतात.
चर्मोद्यागातील लोकांपर्यंत या संस्थेचे संशोधन नेण्यासाठी संस्थेत व इतरत्र विविध प्रायोगिक प्रदर्शने भरविणे चर्मालयात तांत्रिक माहिती देणे नियतकालिके, पुस्तके इत्यादींचे प्रकाशन करणे, एकस्व घेणे उद्योगाला संस्थेतर्फे तज्ञ पुरविणे व तांत्रिक साहाय्य देणे इ. मार्गांचा अवलंब करण्यात येतो. संस्थेने लावलेल्या शोधांमुळे पट्ट्यांची व औद्योगिक कातड्यांची आयात जवळजवळ बंद झाली आहे. तसेच चर्मोद्योग साहाय्यक तज्ञांची आयातही बऱ्याच प्रमाणात कमी झाली. संस्थेच्या संशोधनामुळे कातड्यांचा दर्जा सुधारला असून निर्यातीत वाढ होण्यास मदत झाली आहे. कलकत्ता, राजकोट, जलंदर, कानपूर व मुंबई येथे संस्थेच्या शाखा आहेत.
टाकाऊ समजल्या जाणाऱ्या कातड्यांचा वापर आर्थिक दृष्ट्या कसा करावा, ही भारतीय चर्मोद्योगाची एक मोठी समस्या आहे. शेळ्यांच्या एकूण कातड्यांपैकी फक्त १५-२०% कातडी चांगली असतात, बाकीची टाकाऊ समजतात. मेंढ्यांच्या बाबतीत ही टक्केवारी थोडी जास्त आहे. कातड्यांवर करण्यात येणाऱ्या पूर्व-प्रक्रियांमुळे ही कातडी टाकाऊ होताच. तसेच कातडी सोलल्यानंतर त्यांच्यावर करावयाच्या प्रक्रिया करण्यास वेळ लागल्यानेही बरीच कातडी टाकाऊ होतात. अशी कातडी वापरण्यायोग्य करण्यासाठी बांधणी पद्धतीचा (कापड छपाईतील एका प्रक्रियेचा) उपयोग करण्याची पद्धत वरील संस्थेने शोधून काढली आहे. कापड छपाईतील बांधणी पद्धत आणि लवदार पृष्ठभाग तयार करण्याची क्रोम प्रक्रिया यांची एकत्रित पद्धत म्हणजेच ही नवी पद्धत होय. एक टक्का अमोनिया व योग्य आर्द्रकारक संयुग यांच्या पाण्यातील विद्रावात कातडी एक रात्र भिजत ठेवतात. नंतर ती पिळतात आणि टेबलावर पसरतात व त्यांवर फर्म्यांच्या साहाय्याने योग्य तो आकृतिबंध कातड्याच्या कणीदार भागाकडे काढतात. आकृतिबंधानुसार योग्य ठिकाणी कातडी बळकट दोऱ्यांनी बांधतात. गाठींना आधार म्हणून त्यांतून बारीक काड्या ओवतात व कुंडामध्ये त्यांवर रंजन क्रिया करतात. फॉर्मिक अम्ल वापरून कातड्यावर रंग पक्का करतात. कातडी पाण्यात खळबळतात व त्यांच्या गाठी सोडतात. यानंतर थोडी जास्त जागा घेऊन पहिल्याच जागी परत गाठी बांधतात आणि तो भाग रंगवितात. यावेळी गडद रंग वापरतात. याप्रमाणे आणखी एकवेळ प्रक्रिया करतात. रंगविलेली कातडी पाण्यात खळबळतात, पिळतात, गाठी सोडतात व माथा फिरविता येईल अशा टेबलावर (टॉगल फ्रेम) वाळवितात. नंतर त्या कातड्यांवर अंतिम संस्करण करतात. लवदार कातडे तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पुढील सर्व क्रिया या कातड्यांवर करतात. तयार कपडे, हातमोजे, पाकिटे, पिशव्या, विशिष्ट प्रकारची पादत्राणे इ. आकर्षक व सुशोभित वस्तूंच्या निर्मितीसाठी ही बांधणी कातडी वापरतात. भारतातील बऱ्याच चर्मालयांत असे कातडे तयार करण्यात येते व त्याची निर्यातही होते.
क्रोम प्रक्रियित कातडे जर उकळत्या पाण्यात बुडविले, तर ते २० मिनिटांत आकसते. पण क्रोम प्रक्रियेत योग्यवेळी जर ‘लॅडरलिंक’ नावाचे नवीन संयुग योग्य प्रमाणात वापरले, तर त्या कातड्यावर उकळत्या पाण्याचा जवळजवळ दोन तास परिणाम होत नाही. लोकर वा कापड याप्रमाणेच, कातड्यांना दिलेला रंग वाढत्या तापमानाला दाटपणा व पक्केपणा यात चांगल्या प्रकारचा राहतो, हा या पद्धतीचा फायदा होय. तसेच लॅडरलिंक वापरून फर कातड्यांना वाढत्या तापमानाला रंग देता येतो. लॅडरलिंक हे संयुग बहुगुणी असून त्याच्यामुळे कातड्यातील प्रथिनामध्ये चिकटलेल्या दोन क्रोमियम अणूंमध्ये शिडीच्या आकाराचा बंध निर्माण होतो. या प्रक्रियेने मऊ कातडी व वायुमापकाच्या पटलाचे कातडे तयार करता येते आणि कातडी व फर यांना पक्के व चकचकीत रंग देता येतात. हे संयुगही वरील संस्थेनेच शोधून काढले आहे.
गायी-म्हशींच्या पोटातील श्लेष्मल (बुळबुळीत), अर्धश्लेष्मल आणि स्नायुमय ऊतकांच्या थरांचा आतापर्यंत टाकाऊ पदार्थात समावेश होत होता. त्यांचा कातडे म्हणून उपयोग करून त्यांपासून आकर्षक वस्तू तयार करण्याची एक नवीन पद्धत संस्थेने शोधून काढली आहे. भारतातून गायी-म्हशींची अशी कातडी प्रतिवर्षी सु. २·७ कोटी इतकी उपलब्ध होऊ शकतील असा संस्थेचा अंदाज आहे. संस्कारित कातडे कशाकरिता वापरावयाचे आहे त्यानुसार कातड्यावर प्रक्रिया कराव्या लागतात. मात्र पूर्व प्रक्रिया नेहमीप्रमाणेच करतात. चुन्याच्या प्रक्रियेचा काळ २-४ दिवसांचा असतो. मात्र मांस खरवडण्याची क्रिया टाळतात. केस काढण्याचा यामध्ये प्रश्नच उद्भवत नाही. क्रोम प्रक्रिया व सिनटॅनांचा वापर करणे सामान्यतः सोयीस्कर असते. तयार झालेले कातडे ०·४-०·७ मिमी. जाडीचे असते व त्याला टर्किश टॉवेलासारखे स्वरूप आणता येते. या कातड्यापासून हातमोजे, स्कूटरच्या व रॅकेटच्या मुठी, स्त्रियांच्या हातपिशव्या, दागिन्याच्या पेट्या, पाकिटे, तयार कपडे, नेकटाय इ. आकर्षक वस्तू तयार करण्यात येतात.
चर्मोद्योगात व निर्यातीत ई. आय. कातड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटने या प्रक्रियेत सुधारणा केल्या आहेत. या सुधारित प्रक्रियेत ५०% वॅटल व ५०% हिरडा यांचे अर्क मिसळून वापरतात. त्यामुळे कातडी कमावण्याचा वेळ वाचतो आणि गुणधर्म व प्रत यांत सुधारणा होते, तसेच निर्मितीचा खर्चही कमी होतो.
संघटना व नियतकालिके : चर्मोद्योग संस्था, कारखाने व व्यापारी यांच्या माहितीकरिता या उद्योगातील
घडामोडी, नवीन प्रक्रिया व सुधारणा इत्यादींविषयी अद्ययावत माहिती देणारी पुढील नियतकालिके प्रसिद्ध होतात : टॅनर (इंग्रजी मासिक), मुंबई : सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटचे लेदर सायन्स (इंग्रजी मासिक), मद्रास : फूटवेअर इंडिया (इंग्रजी व हिंदी मासिक), कानपूर आणि इंडियन लेदर टेक्नॉलॉजिस्ट ॲसोसिएशन (इंग्रजी मासिक), कलकत्ता.
चर्मोद्योगातील तंत्रज्ञ आणि कारागीर यांची ‘इंडियन लेदर टेक्नॉलॉजिस्ट ॲसोसिएशन’ ही संस्था १९५६ मध्ये कलकत्ता येथे स्थापन झाली. याशिवाय या उद्योगाच्या प्रमुख केंद्रांमधील व्यापारी वर्गाच्या संस्थाही असून त्यांच्या हितसंबंधात त्या लक्ष घालतात. ‘रॉ हाईड अँड स्किन डीलर्स ॲसोसिएशन’, ‘फूटवेअर अँड लेदर गुड्स मॅन्युफॅक्चरर्स ॲसोसिएशन’, ‘टॅनर्स ॲसोसिएशन’ ह्या त्यांपैकी काही महत्त्वाच्या संस्था होत.
पहा : चर्मकलाकाम : पादत्राणे फर-२.
संदर्भ : 1. Attwater, W.A. Leathercraft, London, 1961.
2. O’Flaherty, F. Roddy, W. T. Lollar, R. M. Eds., The Chemistry and Technology of
Leather, 4 Vols., New York, 1956-65.
3. Sarkar, K. T. Theory and Practice of Leather Manufacture, Madras, 1965.
4. Thorstensen, T. C. Practical Leather Technology, New York, 1969.
5. Woodroffee, D. Fundamentals of Leather Science, Cryodon, 1942.
6. Woodroffee, D. Ed., Standard Handbook of Industrial Leather, London, 1949.
गांगल, चिं. वा. मिठारी, भू. चिं.
“