चर्म भुंगेरा : कोलिऑप्टेरा गणाच्या डर्मिस्टिडी कुलातील कीटकांना चर्म भुंगेरे म्हणतात. प्रौढ भुंगेरे लहान, गोलसर, बहिर्वक्र असून त्यांच्या शृंगिका (लांब, सांधेयुक्त स्पर्शेंद्रिये) आखूड, गदाकार असतात. त्यांची लांबी २ ते १० किंवा १२ मिमी. असते. सामान्यतः ते केसाळ किंवा खवल्यांनी आच्छादिलेले असतात. ते प्राणिज आणि वनस्पतिज पदार्थांवर यथेच्च ताव मारतात. बरेचसे भुंगेरे फुले खातात. काहींचा रंग काळा किंवा मंद असतो. मात्र पुष्कळांच्या अंगावर रंगाचे नमुनेदार पट्टे असतात. अळ्या सर्वसाधारणपणे तपकिरी असून त्यांच्या अंगावर लांब केसांचे आच्छादन असते.

चर्म भुंगेरा (डर्मिस्टिस व्हल्पिनस)

हे भुंगेरे फारच संहारक असून आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. अळ्या व प्रौढ संमार्जक (मृत जैव पदार्थांवर उपजीविका करणारे) असून ते मृत प्राणी व वनस्पती पदार्थ मोठ्या प्रमाणावर खातात. त्यात चामडे, शिंगे, केस, लोकर, रेशीम, रग, गालिचे, अभिसाधित (संस्करण केलेले) मांस, चीज, टॅलो (प्राण्यांतील चरबीयुक्त भाग), कुजके मांस, संग्रहालयातील कीटकांचे नमुने व तृणधान्ये आणि त्यांचे पदार्थ इत्यादींचा समावेश होतो. प्राणिज व वनस्पतिज पदार्थांची उत्पादन केंद्रे, वखारी, गुदामे इ. ठिकाणी त्याचा कीड म्हणून बराच उपद्रव होतो. या कीटकांपासून पेंढा भरलेले प्राणी व चामडी यांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यावर आर्सेनिक किंवा तत्सम विषाचे संस्करण करतात. कीटकांचे नमुने कीटकरोधी कपाटात ठेवतात व त्यांना नियमित धुरी देतात. फर शीतगृहात ठेवतात व लोकरी कपडे व गालिचे यांचे त्यांच्याकडून नुकसान होणार नाही याची काळजी घेतात. डर्मिस्टिस व्हल्पिनस  ह्या जातीचा उपयोग संग्रहालयात हाडावरील वाळलेले मांस साफ करण्यासाठी करतात.

                                                                       जमदाडे, ज. वि.