चमत्कार, दैवी : चमत्कार म्हणजे अद्भुत घटना. निसर्गाचे नियम किंवा कार्यकारणभाव ज्या घटनांना लागू पडत नाहीत, अशा घटनांना ‘अद्भुत’ म्हणजे आश्चर्यकारक म्हणतात. म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन, बुद्धिवाद वा विवेकवाद यांच्या द्वारे ज्या घटनांची उपपत्ती लागत नाही, अशा घटनांना अद्भूत म्हणतात.
सूर्याला जागच्या जागी स्थिर करणे वादळ उठविणे किंवा वादळ थांबविणे पर्जन्य पाडणे किंवा अतिवृष्टी शमविणे नदी पिऊन टाकणे साथीचे रोग उत्पन्न करणे किंवा नष्ट करणे व्यक्तींचे रोग बरे करणे किंवा व्यक्तींच्या ठिकाणी रोग निर्माण करणे आशीर्वादाने मृतास जिवंत करणे किंवा जिवंत व्यक्तीस शापाने वा मंत्रादिकांनी मृत्यू आणणे शेती-बागा पिकविणे दर्शनमात्रेकरू शेत किंवा बाग नापीक करणे निरनिराळी रूपे धारण करणे माणसाचा वाघ, कुत्रा इ. बनविणे स्त्रीचा पुरूष वा पुरूषाची स्त्री करणे हस्तस्पर्शाने किंवा दृष्टीने रोग बरे करणे भूतपिशाच, राक्षस इत्यादिकांचे निवारण करणे अधांतरी आकाशात संचार करणे अदृश्य होणे रिकाम्या जागेतून वा हातांतून अन्न, वस्त्र, अलंकार, फुले, फळे काढणे कुलूप न काढता दार उघडणे बोटातून विजेरीप्रमाणे प्रकाश काढणे दिवसाची रात्र करणे वा रात्रीचा दिवस करणे दुसऱ्याच्या मनातील भाव वा विचार ओळखणे इंद्रियांनी किंवा तर्काने न कळणाऱ्या गोष्टींचे अंतर्ज्ञान होणे शुभाशुभसूचक शकून होणे किंवा स्वप्न पडणे मुक्याला वाणी, आंधळ्याला डोळे व बहिऱ्याला कान मिळवून देणे इ. घटना चमत्कार होत. पातंजल योगदर्शनात समाधी योगाने अणिमादी, सिद्द्धी प्राप्त होतात, असे सांगितले आहे. बौद्धांच्या धर्मग्रंथात अशा प्रकारच्या सिद्धींना अथवा चमत्कार सामर्थ्यांना ‘ऋद्धी’ म्हणतात.
जगातील सर्व धर्मग्रंथांत वा धर्माच्या इतिहासांत चमत्कार वर्णिले आहेत. वेद, अवेस्ता, बौद्धांचे त्रिपिटकादी धर्मग्रंथ, बायबलचा जुना करार व नवा करार, कुराण, हिंदूची व जैनांची पुराणे, ग्रीक, रोमन, चिनी इ. लोकांच्या पुराणकथा, साधुसंतांची चरित्रे इत्यादिकांमध्ये चमत्काराच्या गोष्टी भरपूर प्रमाणात सांगितलेल्या आहेत. दाशरथी राम, कृष्ण, लावज (लाउत्स), बुद्ध, येशू ख्रिस्त, मुहंमद पैगंबर यांच्या ठिकाणी अनंत दैवी शक्ती असल्यामुळे अफाट चमत्कार घडू शकतात, अशी त्या त्या धर्मीयांची श्रद्धा आहे. देवांच्या मूर्ती, देवालये, तीर्थे, पर्वत वा पवित्र भूप्रदेश, समाध्या, कबरी, थडगी, पवित्र अवशेष यांच्या ठिकाणीही दैवी शक्ती वास करते व चमत्कार घडतात, असे मानण्यात येते. अवतारांच्या ठिकाणी दैवी शक्ती जन्मसिद्धच असते. येशू ख्रिस्त हाही प्रत्यक्ष ईश्वरावतार असल्यामुळे, त्याच्या ठिकाणी जन्मसिद्ध दैवी शक्ती मानली आहे. बौद्धांच्या हीनयान पंथाप्रमाणे बुद्धाला दैवी शक्ती साक्षात्कारानंतर प्राप्त झाली.
यातुविद्या म्हणजे जादू ही संस्था मानवजातीच्या आदिम स्थितीपासून अस्तित्वात आली. जादूगारांच्या गोष्टी प्रचलित झाल्या. त्याच गोष्टींतून देव, असूर, सिद्धपुरूष, अवतार इत्यादिकांच्या तपशीलवार अद्भुत कथा निर्माण झाल्या.
या धर्मपंथप्रवर्तक उपदेशकांच्या ठिकाणी चमत्कार करण्याच्या शक्ती होत्या, असे त्यांचे अनुयायी मानतात. लाव्जने मृत मनुष्य जिवंत केला. बुद्धाने महापूर हटविला, तो पाण्यावरूनही चालत असे, पाण्यात शिरावे तसा जमिनीत शिरत असे, त्याला भिंतीचा अडथळा होत नव्हता. येशू ख्रिस्ताचा जन्म अद्भुत रीतीने झाला स्त्रीपुरूषसंभोगापासून तो जन्मला नाही. त्याची माता मेरी हिला ती कुमारी असतानाच ईश्वरापासून गर्भधारणा झाली, तोच ख्रिस्त होय. तो समुद्रावरून चालत असे त्याने स्पर्शाने महाकुष्ठ बरे केले मेलेला माणूस उठविला क्रुसावर ठोकून त्याला मारण्यात आले परंतु तीन दिवसांनी तो क्रुसावरून जिवंत उतरला नंतर चाळीस दिवसांनी स्वर्गात देवापाशी निघून गेला. येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी एक शिष्य त्या वेळच्या रोमन सरकारला फितला आणि त्याने येशूचा ठावठिकाणा सांगितला. ही गोष्ट येशूला अंतर्ज्ञानाने समजली. येशू पकडला जाण्याच्या अगोदर शिष्यांसह त्याचे जे अखेरचे भोजन झाले, त्याचेच अनुकरण म्हणजे प्रभुभोजन समारंभ ख्रिस्ती लोक तो पुनःपुन्हा करतात. या समारंभातील सामूहिक प्रार्थनेत साक्षात येशू ख्रिस्त उपस्थित असतो, अशी श्रद्धा आहे. यावेळी देण्यात येणारी भाकरी व द्राक्षारस यांचे द्रव्यांतरण होऊन भाकरी येशूचे शरीर व द्राक्षारस येशूचे रक्त बनते, असे ख्रिस्ती लोक मानतात. मुहंमदानेही थोडेसे चमत्कार केले आहेत. त्याने हाताच्या बोटाने चंद्राचे तुकडे केले जहर भरलेले शिजलेले अन्न त्याच्याशी बोलले, की ‘खाऊ नकोस.’ त्याच्या बुराक नावाच्या घोड्याला पंख होते. त्याच्यावर बसून तो कोठेही सहज जाऊ शकत असे. तो स्वर्गावर चढून गेला.
ख्रिस्त व ख्रिस्ती संत यांच्या चमत्कारांचे बौद्धिक समर्थन काही ख्रिस्ती विचारवंतानी केले आहे. ते असे : निसर्गनियम हे ईश्वरानेच आपल्या स्वतंत्र इच्छेने बनविले आहेत. त्यामुळेच ईश्वराच्या अगाध सामर्थ्याचे दर्शन होऊन ईश्वराचे अस्तित्व पटते. ईश्वराचे इच्छास्वातंत्र्य चमत्काराने विशेषतः सिद्ध होते. निसर्गनियमांचा म्हणजे ईश्वरांच्या नियमांचा चमत्कारांनी भंग होतो, असे मानण्याचे कारण नाही. ईश्वर निसर्गाच्या नियमांत बदल करू शकतो. दुसरे असे, की ईश्वराने निसर्गाचे जे नियम बनविले, त्यांत चमत्कारांनाही स्थान आहे. त्याने जे नियम बनविले, ते सगळेच मनुष्यास कळत नाही. म्हणून चमत्कार म्हणजे ईश्वरी नियमांचा भंग होतो, असे आपणास उगीचच वाटते. वस्तुतः चमत्कार हे ईश्वरी नियमांच्या भंगाने निर्माण होतच नाहीत.
जोशी, लक्ष्मणशास्त्री
“