चतुर्वर्गचिंतामणि : महादेव यादव आणि रामदेवराव यादव ह्यांचा श्रीकरणाधिप ⇨ हेमाद्री (हेमाडपंत) याचा संस्कृत धर्मशास्त्रकोश. महादेव यादवाच्या कारकीर्दीत १२६० ते १२७० च्या दरम्यान हा रचिला गेला. त्याची विभागणी व्रत, दान, तीर्थ, मोक्ष आणि परिशेष या पाच भागांत केल्याचे ह्या ग्रंथात सांगितले असून परिशेषाची देवता, कालनिर्णय, कर्मविपाक व लक्षणसमुच्चय अशी चार प्रकरणे कल्पिली आहेत. परंतु आज व्रत व दान हे खंड आणि परिशेषातील श्राद्ध व काल ही प्रकरणेच तेवढी समग्र उपलब्ध आहेत. बाकीच्या भागांची हस्तलिखिते अद्याप मिळालेली नाहीत. व्रतखंडात जवळजवळ २,००० व्रतांच्या पालनाचे नियम सांगोपांग चर्चिले असून तत्पूर्वी हेमाद्रीने स्वतःच्या व यादव राजांच्या वंशाविषयी माहिती दिली आहे. शिलालेख आणि ताम्रपट यांतील उल्लेखांशी बरीचशी जुळणारी ही माहिती ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची ठरते. दानखंडात नानाविध दानांचे महत्त्व सविस्तर वर्णिले आहे. तीर्थखंडात तीर्थक्षेत्रे व तेथील विधिविधाने आणि मोक्षखंडात मोक्षमार्गाचे परिशीलन अभिप्रेत दिसते. पूर्वमीमांसेत निष्णात असलेल्या हेमाद्रीने विशेषतः श्राद्ध व काल यांचे विवरण त्या मीमांसेनुसार केले आहे. स्मृती, पुराणे व सूत्रे, त्यांवरील भाष्यकार व भाष्ये विशेषतः अपरार्क, कर्कोपाध्याय, देवस्वामी, शंखधर, हरिहर, स्मृतिचंद्रिका, स्मतिमहार्णवप्रकाश यांची उद्धरणे ठिकठिकाणी आढळतात. मिताक्षराकार विज्ञानेश्वर हा त्याच्या पूर्वी सु. २०० वर्षे होऊन गेलेला असूनही त्याचा मात्र उल्लेख आढळत नाही. माधवादी धर्मशास्त्रकारांनी त्याच्या खंडांचा व प्रकरणांचा निर्देश केलेला आहे.
चतुर्वर्गचिंतामणीमधील कर्मकांड, विधिविधाने, देवदेवता, तीर्थक्षेत्रे, प्रतिमाप्रतीके इत्यादींची माहिती ऐतिहासिक, सामाजिक व धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्वाची ठरते. हेमाद्रीच्या चिकित्सक बहुश्रुततेमुळे ती बव्हंशी प्रमाणभूतही आहे. त्यांचे उपलब्ध भाग बंगालच्या एशियाटिक सोसायटीने प्रसिद्ध केले आहेत. (संपा — पंडित भरतचंद्र शिरोमणी). काशीच्या चौखंबा संस्कृत मालेमध्येही हा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे.
देशपांडे, सु. र.