चतर्जी, शरत्‌चंद्र : (१५ सप्टेंबर १८७६—१६ जानेवारी १९३८). प्रख्यात बंगाली कादंबरीकार आणि कथाकार. बंकिमचंद्र चतर्जी व रवींद्रनाथ टागोरांनंतर बंगाली कादंबरीक्षेत्रात शरदबाबूंनी अफाट लोकप्रियता मिळविली. बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील देवानंदपूर नावाच्या एका लहान गावात मध्यमवर्गीय कुटुंबात शरदबाबूंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल व आईचे भुवनमोहिनी होते. ह्या दांपत्यास नऊ मुले झाली, त्यांपैकी वाचली मात्र पाचच. शरत्‌चंद्र हे त्यांचे दुसरे अपत्य. मोतीलाल चतर्जी देवानंदपुरातील तुरुंगावर मासिक २० रुपये वेतन घेऊन नोकरी करीत होते. तीतही नियमितपणा नव्हता. कविता, कथा, साहित्यचर्चा व चित्रकला यांचा त्यांना छंद होता पण त्यातही धरसोड व लहरी स्वभाव यांमुळे त्यांनी एकही कथा-कादंबरी पूर्ण केली नाही. यामुळे घरात पैशाची ददात नेहमी असायची आणि भुवनमोहिनीला मधूनमधून मुलांना घेऊन भागलपूरला आपल्या भावाच्या आश्रयास जावे लागे.

वडिलांचे मुलांवर तसेच संसारात लक्ष नाही, गाठीस पैसा नाही, अशा परिस्थितीत बाल शरत्‌चंद्रांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. त्यांचे सर्व लक्ष अभ्यासापेक्षा गावात, आमराईत, उनाडक्या करण्याकडे असायचे. मासे पकडण्यात त्यांचा बहुतेक वेळ जाई. गरीब, अडल्या-नडलेल्यांबद्दल करुणा वाटली, की शरत्‌चंद्र व त्यांचे मित्र परोपकाराकरता धावपळ करीत. कधी घर सोडून शरत्‌चंद्र रानात एकांतस्थळी बसायचे घरी परत आले, की वडिलांचा राग ओढवून घ्यायचा व रात्री गुपचूप कथा-कादंबऱ्या वाचण्यात मग्न व्हायचे. भागलपूर—देवानंदपूरच्या वाऱ्या करता करता वयाच्या अठराव्या वर्षी शरदबाबू प्रवेश परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणाकरिता त्यांनी भागलपूरच्या तेजनारायण ज्युबिली कॉलेजात नाव घातले आणि बंकिमचंद्र, रवींद्रनाथ, थॅकरी, हेन्‍री वुड, डिकिन्झ यांच्या साहित्याचे वाचन सुरू केले. ‘भागलपूर’ साहित्य सभेची त्यांनी स्थापना केली व छाया  नावाचे हस्तलिखित मासिक सुरू केले. शरत्‌चंद्र प्रती रविंद्रनाथ बनण्याची स्वप्ने रंगवत असतानाच इंटरच्या परीक्षेची वीस रुपये फी भरू न शकल्यामुळे, त्यांना आपल्या उच्च शिक्षणावर कायमचे पाणी सोडावे लागले. दारुण निराशेने ते इकडेतिकडे भटकू लागले. १८९५ मध्ये त्यांची आई वारली. १८९६—९९ पर्यंत त्यांनी साहित्यचर्चेत आणि वाचनात वेळ घालवला बनेली संस्थानात नोकरीही करून पाहिली पण कशातच त्यांचे मन रमेना. शेवटी १९०० मध्ये शरदबाबू संन्यासी बनले व भगवी वस्त्रे धारण करून भ्रमण करू लागले. डोळे व संवेदनशील मन उघडे ठेवून त्यांनी समाजाच्या सर्व थरांतील लोकांचे जीवन जवळून पाहिले. पतित, उपेक्षित, वंचित, पददलित, शोषित अशा भारतीय समाजाची आणि तत्कालीन हिंदू स्त्रीची दुःखे त्यांनी पाहिली व या अवलोकनातूनच त्यांचे साहित्यविश्व पुढे साकार झाले. १९०२ मध्ये ते कलकत्त्यास त्यांचे मामा लालमोहन बंदोपाध्यायांकडे आले. १९०३ मध्ये त्यांचे वडील वारले. ही दुःखद वार्ता कळताच भगवी वस्त्रे फेकून देऊन शरदबाबू भावा-बहिणींच्या ओढीने त्यांची जबाबदारी उचलण्यास धावून आले. नातेवाइकांकडे भावंडांची सोय करून त्यांनी स्वतः कलकत्त्यास एका वकिलाकडे भाषांतरकाराचे काम स्वीकारले. वाचन व साहित्यचर्चाही रंगू लागल्या. ‘कुंतलिन’ ह्या स्वदेशी केशतेलाच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कथास्पर्धेत ‘मंदिर’ या त्यांच्या कथेस प्रथम पारितोषिक मिळाले.

आर्थिक विवंचनांना कंटाळून त्यांनी कलकत्ता सोडले आणि १९०३ मध्ये ते ब्रह्मदेशात रंगूनला अघोरनाथ चट्टोपाध्याय (शरदबाबूंच्या मावशीचे यजमान) यांच्याकडे पोहोचले. तेथे त्यांनी विविध उद्योगधंदे केले. त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास केला आणि भरपूर वाचनही केले. शेवटी उपमहालेखापालाच्या कचेरीत, सरकारी बांधकाम लेखाविभागात त्यांनी कायमची नोकरी धरली. प्रकृति-अस्वास्थ्यामुळे जवळजवळ चौदा वर्षांनी (१९१६) ते परत कलकत्त्याला आले. रंगूनच्या वास्तव्यातच त्यांचा विवाह झाला. कलकत्यात स्थायिक झाल्यावर त्यांनी स्वतःला साहित्यसेवेस संपूर्णपणे वाहून घेतले.

शरदबाबूंनी लेखनाचा गुण वडिलांपासून उचलला होता, याची कबुली त्यांनी स्वतःच दिली आहे. वयाच्या सतराव्या वर्षापासून त्यांनी हातात लेखणी धरली. बासा  म्हणजे घर ही त्यांची पहिली कादंबरी त्यांनी फाडून टाकली कारण रविंद्रनाथ टागोरांसारखे अभिजात साहित्य जोपर्यंत आपणास निर्माण करता येत नाही, तोपर्यंत ते प्रकाशित करायचे नाही, असा त्यांचा निश्चय होता. त्यामुळे साहित्यिक म्हणून ते फार उशिरा प्रसिद्धीस आले आणि तेही मित्रांमुळेच. शरदबाबू रंगूनला असताना १९०७ मध्ये त्यांच्या मित्रांनी भारती 

शरत्‌चंद्र चतर्जी

मासिकातून त्यांची हस्तलिखित कादंबरी बडदिदि  क्रमशः प्रकाशित करण्यास सुरुवात केली. या कादंबरीचा पहिला भाग प्रसिद्ध होताच वंग (बंगाली) समाजात खळबळ उडाली. रवींद्रनाथांनीच ती लिहिली असावी, असा सर्वांचा ग्रह होता पण तो ग्रह स्वतः रवींद्रनाथांनीच दूर केला. ह्या कादंबरीच्या शेवटच्या प्रकरणाच्या अखेरीस शरदचंद्र हे नाव पाहताच वंग साहित्याच्या क्षितिजावर एक नवा तेजस्वी तारा उदयास आल्याचे सर्वांना समजले. प्रत्यक्ष शरदबाबूंना मात्र ही गोष्ट पाच वर्षांनी कळली. पुढे १९१३ मध्ये ही कादंबरी ग्रंथरूपाने प्रकाशित झाली. १९१४ ते १९१९ ह्या कालावधीत त्यांच्या गाजलेल्या बहुतांश कथा-कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. शरदबाबूंच्या महत्त्वपूर्ण साहित्यकृती अशा : बिराज बउ (कादंबरी — १९१४), बिंदुर छेले (कथा — १९१४), परिणीता (कादं — १९१४), पंडित मशाइ (कादं.— १९१४), मेजदिदि (कथा — १९१५), पल्ली समाज (कादं. — १९१६), चंद्रनाथ (कादं. — १९१६), बैकुंठेर उइल (कादं. — १९१६), अरक्षणीया (कादं. — १९१६), श्रीकांत (कादं. — ४ भागांत, १९१७, १८, २७, ३३), देवदास (कादं. — १९१७), निष्कृति (कादं. — १९१७), काशीनाथ (कथा — १९१७), चरित्रहीन (कादं. — १९१७), दत्ता (कादं. — १९१८), गृहदाह (कादं. — १९२०), छवि (कथा — १९२०), देना पोओना (कादं. — १९२३), हरिलक्ष्मी (कथा — १९२६), पथेर दाबी (कादं. — १९२६), नवविधान (कादं. — १९२६), नारीर मूल्य (निबंध — १९३०), शेष प्रश्न (कादं. — १९३१), स्वदेशओ साहित्य (निबंध — १९३२), बिप्रदास (काद. — १९३५) इत्यादी.


यांशिवाय त्यांनी आपल्या देना पाओना, पल्ली समाज, बिराज बउ  आणि दत्ता  ह्या कादंबऱ्यांची अनुक्रमे षोडशी (१९२०), रमा (१९२८), बिराज बउ (१९३४) आणि बिजया (१९३४) ह्या नावांनी नाट्यरूपांतरेही केलेली आहेत. साहित्य संमेलनात व इतरत्र त्यांनी दिलेल्या साहित्यविषयक तसेच राजकीय व्याख्यानांचे संग्रही प्रकाशित झालेले आहेत.

वास्तववादी कादंबरीकार म्हणून शरदबाबूंचे नाव वंग साहित्यात लोकप्रिय झाले आहे. खालच्या थरातील उपेक्षित समाजाचे अंतर्बाह्य चित्रण इतक्या मनोवेधकतेने, सहृदयतेने आणि मार्मिकतेने करणारा कादंबरीकार भारतीय साहित्यात झाला नाही, असा त्यांचा सार्थ नाव लौकिक आहे. शरदबाबूंची स्त्रीसृष्टी इतक्या वैविध्याने व वैचित्र्याने नटलेली आहे, की ती पाहून मन थक्क होते. परंपरागत रूढ चालीरीतींत अडकलेल्या भारतीय स्त्रीच्या भावभावनांने दर्शन घडविण्याचे त्यांचे कसब आगळे आहे. बंगालमधील स्त्रियांनी तर शरदबाबूंना आपले ‘सुहृद’ मानून त्यांचा गौरव केला व त्यांच्याविषयी आपला आदरभाव व्यक्त केला. या पतितांना ते ‘शापभ्रष्ट देवता’ समजतात. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांत विविध स्वभावांची व थराची पात्रे दिसत असली, तरी त्यांचा प्रामुख्याने विषय आहे पददलित, पतित, दुःखी-कष्टी माणसेच. वंग साहित्यात प्रचलित असलेले जुने लेखनतंत्र त्यांनी झुगारून दिले व स्वतःच्या स्वतंत्र तंत्राचा व शैलीचा पाया घातला. पथेर दाबी  या त्यांच्या राजकीय कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी वंग समाजातच नव्हे, तर ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली. तिची वाढती लोकप्रियता पाहून ब्रिटिश सरकारने ती जप्त केली. भारती (१९४०) या नावाने तिचे पु. बा. कुलकर्णी यांनी मराठीत भाषांतरही केले आहे. त्यांच्या बहुतेक कादंबऱ्या भारतीय भाषांतून अनुवादित झाल्या आहे आणि काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांची भा. वि. वरेरकर, शं.बा. शास्त्री, वि.सी. गुर्जर यांनी मराठीत भाषांतरे केलेली आहेत.

शरदबाबूंनी १९२१ पासून राजकीय आंदोलनात भाग घेण्यास सुरुवात केली. १९२२ मध्ये ते हावडा काँग्रेस समितीचे अध्यक्ष नियुक्त झाले होते. १९३१ मध्ये ते ‘वंग साहित्य परिषदे’चे अध्यक्ष निवडले गेले. १९२२ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने त्यांच्या श्रीकांतच्या पहिल्या खंडाचे इंग्रजी रूपांतर प्रसिद्ध केले. १९३६ मध्ये डाक्का विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी. लिट्. देऊन त्यांचा गौरव केला. १९३८ मध्ये कलकत्ता विद्यापीठाने ‘जगत्तारिणी’ ही बहुमानाची पदवी देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला.

शरदबाबूंची प्रकृती १९३६ पासून बिघडली व दीड—दोन वर्षांच्या आजारानंतर ते कलकत्ता येथे निधन पावले.

संदर्भ : 1. Kabir, Humayun, Sarat Chandra Chatterjee, Calcutta, 1963.

           2. Sen, Gupta, S. C. Sarat Chandra : Man and Artist, Calcutta, 1945.

           ३. गुप्त, मन्मथनाथ, शरत्‌चंद्र : व्यक्ति और साहित्यकार, दिल्ली, १९६३.

           ४. चतुर्वेदी, रामस्वरूप, शरत्‌‌ के नारी पात्र, बनारस, १९५५.

           ५. जोशी, प्र.न. शरच्चंद्र चट्टोपाध्याय, पुणे, १९५५.

           ६. विष्णू प्रभाकर, आवारा मसिहा, दिल्ली, १९७४.

संत—यादव, जान्हवी