टागोर, द्विजेंद्रनाथ : (११ मार्च १८४०–१९ जानेवारी १९२६). बंगाली कवी, साधक व वृत्तपत्रकार. महर्षी देवेंद्रनाथांचे ते ज्येष्ठ पुत्र व रवींद्रनाथांचे ते ज्येष्ठ बंधू. जन्म कलकत्ता येथे. सुरुवातीचे शिक्षण मुख्यतः घरीच झाले. नंतरचे शिक्षण कलकत्त्यास सेंट पॉल स्कूल व हिंदू महाविद्यालयात झाले. लहानपणापासूनच द्विजेंद्रनाथ कविता लिहीत परंतु त्यांची प्रतिभा काव्यापुरतीच मर्यादित नव्हती. संगीत, रेखाचित्रे, गणित, तत्त्वज्ञान इ. विषयांत ते पारंगत होते. बंगालीतील ‘रेखाक्षर’ (लघुलेखन) वर्णमालेचे ते जनक होत. ब्राह्मो समाजाचे सचिव, विश्वस्त, आचार्य व अध्यक्ष अशा विविध नात्यांनी त्यांनी काम केले. सारस्वत समाज (स्था. १८८२) ह्या बंगाली भाषा-साहित्य संवर्धक संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. बंगाल थिऑसॉफिकल सोसायटी (स्था. १८८२) या संस्थेचेही ते उपाध्यक्ष होते. वंगीय साहित्य परिषदेचे ते ओळीने तीन वर्षे अध्यक्ष होते.

द्विजेंद्रनाथांनी तरुणपणी प्रथम कालिदासाच्या मेघदूताचा बंगाली काव्यानुवाद केला (१८६०). रसिकांना तो आवडला. पित्याच्या ब्राह्मधर्म ह्या ग्रंथाच्या आधारे त्यांनी पद्यमय ब्राह्मधर्म हा ग्रंथ लिहिला. ‘मलिन मुखचंद्रमा भारत तोमारि’ हे द्विजेंद्रनाथांचे गीत बंगालमध्ये राष्ट्रीय आंदोलनाचा मूलमंत्र झाले होते परंतु त्यांची खरी काव्यप्रतिभा स्वप्नप्रयाण (१८७५) ह्या रूपकात्मक काव्यात प्रगट झाली. हे काव्य कलात्मक दृष्ट्या अद्वितीय असून त्याला बंगाली साहित्यात महत्त्वपूर्ण स्थान आहे. रवींद्रनाथांच्या विवाहप्रसंगी प्रेमोपहार म्हणून द्विजेंद्रनाथांनी लिहिलेले यौतुक ना कौतुक (१८८३) हे हलकेफुलके विनोदी काव्य आहे. काव्यमाला (१९२०) हा त्यांचा काव्यसंग्रहही उल्लेखनीय आहे. बंगाली भाषेवरील व छंदांवरील त्यांचे असामान्य प्रभुत्त्व ह्या काव्यांतून दिसून येते. कठीण संस्कृत छंदांचा वापर ते दैनंदिन बंगाली भाषेतील काव्यरचनेत सहज करू शकतात. बंगाली लघुलेखनावर त्यांनी रेखाक्षर-वर्णमाला (१९१२) हा पद्यग्रंथ लिहिला असून त्यात त्यांचे कौशल्य व छंदावरील प्रभुत्व प्रत्ययास येते.

द्विजेंद्रनाथ भारती (स्था. १८७७) ह्या मासिकाचे पहिले संपादक आणि हितवादी (१८९१) ह्या साप्ताहिकाचे ते जनक होत. भारती तसेच तत्त्वबोधिनी पत्रिका ह्या मासिकांचे ते सु. २५ वर्षे संपादक होते. बंगाली गद्याचे ते एक शिल्पकार मानले जातात. तत्त्वविद्या (१८६६), गीतापथ (१९१५), चिंतामणि (१९२२) इ. तात्त्विक ग्रंथांतील तसेच नाना चिंता (१९२०) व प्रबंधमाला (१९२०) ह्या निबंधसंग्रहांतील त्यांची गद्यशैली वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांची रेखाटणेही सुंदर आहेत. त्यांना संगीताचीही गोडी होती. पियानो हे वाद्य सर्वप्रथम त्यांनीच बंगालमध्ये प्रचलित केले.

नानाविध विषयांवर प्रभुत्व असले, तरी द्विजेंद्रनाथांचे मन कोणत्याही एखाद्या विषयाला चिकटून, मूळ धरून राहिले नाही. त्यांच्या काव्यात विमनस्कतेची छाप दिसते. या बाबतीत त्यांचे बिहारीलाल चक्रवर्तीशी काही अंशी साम्य आहे. शांतिनिकेतन येथे त्यांचे देहावसान झाले.

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)