चक्रीय एंजिन : चक्रीय गतीच्या (फिरत्या) घटकाच्या साहाय्याने शक्तिजनन करणारा व एंजिनदंडाला शक्तिप्रदानही सरळ चक्रीय गतीतच करणारा ⇨ अंतर्ज्वलन एंजिनाचा एक प्रकार. आतापर्यंतच्या चक्रीय एंजिनांत ओटो आवर्तन वापरले जात असून आवर्तनातील चोषण (इंधन सिलिंडरात ओढून घेणे), संपीडन (इंधनावर दाब देणे), शक्तिप्रदान व निष्कासन (इंधन जळाल्यावर निरुपयोगी भाग बाहेर घालविणे) या सर्व क्रिया पश्चाग्र गतीच्या (दट्ट्याच्या पुढेमागे होणाऱ्या गतीच्या) एंजिनातील क्रमानेच घडविल्या जात आहेत.

चक्रीय एंजिनांचे पुढीलप्रमाणे चार वर्ग करता येतात : (१) पाठशिवी करणाऱ्या दट्ट्यांची, (२) बहुघूर्णकी (एकापेक्षा अधिक फिरणाऱ्या भागांची), (३) फिरत्या ठोकळ्यांची व (४) विकेंद्रीघूर्णकांची (ज्यातील घूर्णकांचा अक्ष व ज्या दंडाला गती दिली जाते त्या दंडाचा फिरण्याचा अक्ष भिन्न असतात अशा घूर्णकांची) एंजिने.

पाठशिवी करणाऱ्या दट्ट्यांची एंजिने : या वर्गात टी. चूडी यांनी १९२७ मध्ये प्रथम बनविलेले प्रायोगिक एंजिन येते. या एंजिनातील सिलिंडर पोफळ कड्यासारखा म्हणजे वृत्तज वलयी असतो व त्यामध्ये नीट जुळून फिरणारे चार दट्ट्ये असतात. हे दट्ट्ये आपसात पाठशिवीचा खेळ खेळत असल्याप्रमाणे एकाच दिशेने थोडेसे फिरतात व काही वेळ थांबतात. त्यामुळे दोन दट्ट्यांमधील अंतर कधी वाढते व कधी कमी होते. या एंजिनाचे कार्य कसे चालते ते आ. १ वरून लक्षात येईल.

या एंजिनातील १ व ३ आणि २ व ४ हे समोरासमोरील दट्टे एकमेकांशी जोडलेले असून त्यांच्या जोड्या निरनिराळ्या घूर्णकांवर बसविलेल्या आहेत. या चार दट्ट्यांमुळे सिलिंडरात य, र, ल, आणि अशा चार स्वतंत्र पोकळ्या निर्माण होतात. या चारी पोकळ्यांत क्रमाक्रमाने चोषण, संपीडन, प्रज्वलन, प्रसरण व निष्कासन या अंतर्ज्वलन एंजिनाच्या क्रियांचे आवर्तन दट्ट्यांच्या एका फेऱ्यातच पूर्ण होते व त्यामुळे सिलिंडरामध्ये घूर्णकांच्या एका फेऱ्यात चार ठिकाणी हे आवर्तन होते, म्हणजेच एका फेऱ्यात चार आवर्तने घडून येतात.

आ. १. टी. चूडी यांचे पाठशिवी करणाऱ्या दट्ट्यांचे एंजिन : य - पोकळीतीळ आवर्तन. (अ) चोषण, (आ) संपीडन, (इ) प्रज्वलन, (ई) प्रसरण, (उ) निष्कासन.

   

आ. १ (अ) मधील स्थितीत दट्ट्ये १ व ३ क्षणभर थांबलेले असून दट्ट्ये २ व ४ पुढे जात आहेत. यावेळी दट्ट्ये १ व २ यांच्यामधील या (दट्ट्या २ च्या गतीमुळे) वाढत्या पोकळीत कार्‌ब्युरेटराकडून (इंधन व हवा मिसळण्याच्या साधनाकडून) येणारे इंधन मिश्रण चोषले जात आहे. दट्ट्या २ हा ६० पुढे सरकला म्हणजे दट्ट्या १ व ३ यांची जोडीही फिरू लागते व २ हा दट्ट्या सिलिंडराच्या शीर्ष स्थिर स्थानावर येऊन थांबतो. यावेळी दट्ट्या १ फिरत असल्याने आ. १ (आ) मध्ये दाखविल्याप्रमाणे या पोकळीतल्या वायूचे संपीडन होते. हे संपीडन पूर्ण झाले म्हणजे दट्ट्या २ ही फिरू लागतो आणि हे दट्ट्ये आ. १ (इ) या स्थितीत आले म्हणजे या पोकळीत ठिणग्या पडतात व संपीडित मिश्रण पेटते. यावेळी दट्ट्या १ हा नुकताच थांबलेला असतो आणि पेटलेल्या मिश्रणाचे प्रसरण होऊन आ. १ (ई) मध्ये दाखविल्याप्रमाणे दट्ट्या २ पुढे सरकतो आणि शक्तीचे उत्पादन होते. २ हा दट्ट्या पुढे सरकत जाऊन आ. १ (उ) या स्थितीत आल्यावर थांबतो. दट्ट्या १ हा लगेच याच्या जवळ येऊ लागतो आणि पोकळीतील जळालेल्या वायूंचे निष्कासन होते.

  


आ. २. बहुघूर्णकी एंजिनाचा नमुना : (१) इंधन मिश्रणाचा आगम मार्ग, (२) घूर्णक, (३) जळालेल्या वायूंचा निर्गम मार्ग.

बहुघूर्णकी एंजिने : या प्रकारच्या एंजिनांचे एक उदाहरण आ. २ मध्ये दाखविले आहे. या एंजिनात दोन दोन कानांसारखे भाग असलेले दोन घूर्णक वेगळ्या दंडांवर बसविले आहेत व सिलिंडराला घूर्णकांना जुळेल असा आकार दिलेला आहे. वरच्या द्वारातील झडप उघडून हवा-इंधन मिश्रण आत येते. वाटेत एक ठिणगी गुडदी (ठिणगी पाडण्याचे साधन, स्पार्क प्लग) आहे आणि त्यातून ठिणगी पडताच झडप बंद होते व हे मिश्रण पेटून त्याचे तापमान आणि दाब वाढतात. या दाबवृद्धीमुळे डाव्या बाजूचा घूर्णक फिरू लागून उजवीकडील घूर्णकालाही फिरवितो व अशा तऱ्हेने एंजिन चालू राहते. यात वायूचे नेहमीचे ज्वलनपूर्व संपीडन होत नाही, त्यामुळे एंजिनाची शक्ती कमी असते. तसेच याची औष्णिक कार्यक्षमताही ४·५% पेक्षा जास्त असत नाही. या पद्धतीवर अनसिन, वॅली व शेफेल यांनी एंजिने बनविली होती.

आ. ३. फिरत्या ठोकळ्याचे मर्सर एंजिन : (अ) हवा-इंधन मिश्रण आत येत असण्याची स्थिती, (आ) मिश्रणाचे संपीडन, (इ) जळालेल्या वायूंचे निष्कासन : (१) दट्ट्ये, (२) चाकोरी, (३) इंधन प्रवेश, (४) रूळ, (५) ठोकळा, (६) संपीडन, (७) ज्वलन, (८) ठिणगी गुडदी, (९) निष्कास मार्ग, (१०) वायूचे विस्थापन.

फिरत्या ठोकळ्याची एंजिने : या एंजिनामध्ये पश्चाग्र गती असलेले दट्ट्ये असतात पण त्याचबरोबर त्यांच्यायोगे एंजिनाच्या सिलिंडराला म्हणजे संबंध ठोकळ्यालाच चक्रीय गती मिळते. अर्थात संयोगदांडा व भुजा यांच्या मध्यस्थीशिवाय ही चक्रीय गती उत्त्पन्न होते हे गृहीतच आहे. मर्सर एंजिन हे या प्रकारातील एंजिनांचे एक चांगले उदाहरण आहे. या एंजिनाचे मुख्य भाग, त्यांची जोडणी आणि एंजिनाची सामान्य रचना आ. ३ वरून समजून येईल. आ. ३ (अ) मध्ये असलेला आडवा ठोकळा हा एंजिनाचा सिलिंडर असून त्यात दोन मुक्त दट्ट्ये आहेत. ओटो आवर्तनातील सर्व क्रिया या सिलिंडरात घडवून आणण्यासाठी त्यात निरनिराळे मार्ग, द्वारे, झडपा, ठिणगी गुडदी यांची व्यवस्था केलेली आहे. एंजिनाचा सिलिंडर ठोकळा एका दंडगोल कवचात फिरतो. कवच स्थिर असून आतून त्याला मध्यभागी दाबलेल्या दीर्घवर्तुळाच्या आकाराची एक चाकोरी लावलेली आहे. प्रत्येक दट्ट्याला दोन रूळ जोडलेले असून ते नेहमी या चाकोरीला चिकटून राहतील असा चाकोरीचा आकार आहे. एंजिन चालू होताच दट्ट्ये पुढे-मागे होऊ लागले की, हे रूळही पुढे-मागे होऊ लागतात पण त्यांच्या सरकण्याला चाकोरीचे बंधन पडते आणि त्यामुळे रूळासकट सिलिंडर-ठोकळाच फिरतो. हीच या एंजिनाच्या रचनेची मुख्य क्लृप्ती आहे.

एंजिनाच्या सिलिंडरात दोन दट्ट्यांमुळे तीन पोकळ्या निर्माण होता. सिलिंडराच्या दोन्ही टोकांना हवा-इंधन मिश्रण आत येण्याची द्वारे असून आ. ३ (अ) मध्ये ते मिश्रण आत येत असण्याची स्थिती दाखविली आहे. आ. ३ (आ) मध्ये दट्ट्यांच्या टोकाकडे सरकण्याने मिश्रणाचे संपीडन झालेले आहे. आता हे संपीडित मिश्रण योग्य अशा दोन मार्गांनी दट्ट्यांच्या मधील जागेत येते व त्याचे पुन्हा आणखी संपीडन होते. दट्ट्ये शक्य तितके एकमेकांजवळ आले की, तेथे असलेल्या ठिणगी गुडदीतून ठिणगी पडते व या मिश्रणाचा स्फोट होऊन ते प्रसरण पावते आणि दट्ट्ये टोकांकडे ढकलले जातात. याच वेळी दट्ट्यांच्या टोकांशी आलेल्या मिश्रणाचे संपीडनही होते. तसेच मधल्या पोकळीतील जळालेले वायू निष्कासनासाठी ठेवलेल्या द्वाराने बाहेर निघून जातात. निष्कासनाचे कार्य दोन्ही टोकांकडून मध्ये येत असलेल्या [आ. ३ (इ)] अंशतः संपीडित वायूने पूर्ण केले जाते. दट्ट्ये पुढे-मागे होत असताना रूळ व चाकोरी यांच्यामुळे सिलिंडर ठोकळा सारखा फिरत राहतो. 

या एंजिनाला प्रचक्र (दंडाला जोडण्यात येणारे व वेगातील चढउतार कमी करणारे जड चक्र) लागत नाही व त्यात कंपनेही नसतात, हे त्याचे फायदे आहेत, तर निष्कासनासाठी थोडा ताजा वायू खर्ची पडतो. रूळ, चाकोरी आणि सिलिंडर यांवर मोठी प्रतिबले (विकृती उत्पन्न करणाऱ्या प्रेरणा) येणे व दट्ट्यांचे शीतन सहन करता न येणे या मोठ्या अडचणी आहेत.


आ. ४. राजकरूण एंजिन: (अ) चोषण, (आ) संपीडन: (१) चाकोरी, (२) ठोकळा, (३) ठिणगी गुडदी, (४) ज्वलन कोठी, (५) वायुप्रवेश, (६) वायुचा निष्कास मार्ग.

या प्रकारातील आणखी एक नाव घेण्याजोगे एंजिन म्हणजे राजकरूण एंजिन हे आहे (आ. ४). या एंजिनात सिलिंडर व दट्ट्ये यांची काही वेगळीच तऱ्हा आहे. एंजिनाचा मुख्य भाग म्हणजे चित्रातील मधला भाग. ही ज्वलनकोठी आहे व हिला चार वक्र बाजू असून त्या टोकाशी बिजागरी सांध्यांनी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. या सांध्यांना मोठाल्या खिळी असून त्यांना रूळ बसविलेले आहेत. हे रूळ वरील मर्सर एंजिनातल्याप्रमाणेच एका मध्यभागी दाबलेल्या दीर्घवर्तुळाकार चाकोरीला सदैव लागलेले असतात. ज्वलन कोठी स्थिर राहून चाकोरी असलेले कवच फिरण्याची योजना या एंजिनात आहे. आकृतीत ज्वलन कोठीच्या पोटात लहान चौकोनी भोके दिसतात ती वायूची आगम व निर्गम द्वारे आहेत. आ. ४ (अ) मध्ये हवा-इंधन मिश्रणाचे चोषण झाले आहे व (आ) मध्ये (४५ विस्थापनानंतर) त्या मिश्रणाचे संपीडन होऊन ठिणगी पडण्याच्या बेतात आहे. या एंजिनाचे कार्य ज्वलन कोठीच्या रचनेमुळे शक्य होणाऱ्या तिच्या आकाराच्या व म्हणून तिच्या व्यापाच्या विकृतीवर अवलंबून आहे. कोठीचा आकार बदलताना चाकोरी व कवच फिरतात. वायूचे प्रसरण व शक्तिप्रदान होताना कवच ४५ फिरते आणि पुढील ४५ मध्ये वायूचे निष्कासन होऊन दुसऱ्या आवर्तनाला सुरुवात होते. याच प्रकारची इतर एंजिने सेलवूड, लीथ व पोर्शे यांनी बनविलेली आहेत. मर्सरसकट ही सर्व एंजिने प्रयोगावस्थेच्या पलीकडे गेलेली दिसत नाहीत.

आ. ५. वँकेल एंजिन (१९७२) : (१) विकेंद्री घूर्णक, (२) कवच, (३) एंजिन दंड, (४) विकेंद्र, (५) अंतर्दंतचक्र, (६) लहान दंतचक्र, (७) पाणी.

विकेंद्री घूर्णक एंजिने :वॅंकेल एंजिन : या वर्गात वॅंकेल एंजिन हे प्रमुख आहे. जर्मन अभियंते आणि संशोधक फेलाक्स वँकेल यांनी विकेंद्री घूर्णकाचे एंजिन प्रथम १९२६ मध्ये बनविले. त्यांचे मूळ एंजिन आधुनिक आवृत्तीपेक्षा बरेच निराळे होते. पण वॅंकेल यांच्या चक्रीय एंजिनाच्या कल्पनेत एनएसयू मोटोरेन्व्हेर्के या जर्मन मोटारगाड्या बनविणाऱ्या कंपनीच्या चालकांना एका नव्या धर्तीच्या फायदेशीर  आणि कार्यक्षम एंजिनाची बीजे दिसली व त्यांनी वँकेल यांच्या एंजिनाचा विकास करण्याचे ठरविले. या कंपनीचे एक तज्ञ वॉल्टर फ्र्‌यडे व वॅंकेल यांनी मिळून या एंजिनाचा एक चांगले कार्य करणारा नमुना बनविण्यात १९५६ साली यश मिळविले. पुढे कर्टिस-राइट कॉर्पोरेशन या अमेरिकी कंपनीला या एंजिनाबद्दल स्वारस्य वाटले व तिने या एंजिनाच्या उत्पादनाचे उत्तर अमेरिकेपुरते हक्क १९६८ मध्ये जर्मन कंपनीकडून विकत घेतले. यामुळे या एंजिनाच्या विकासाला चांगला हातभार लागला. एम्. बेंटेल व चार्लस जोन्स या कर्टिस-राइटच्या तज्ञ अभियंत्यांच्या मार्गदर्शनाने झालेल्या विकास कार्यामुळे या एंजिनाला मोठ्या प्रमाणावरील उत्पादनास योग्य असे रूप मिळू शकेल हे स्पष्ट झाले. कर्टिस-राइटच्या संशोधनाचे फळ म्हणून या कंपनीने १९६०  मध्ये, पुढे आरसी–२–६० म्हणून नाव दिलेल्या मालिकेतील, पहिले पूर्णमानातील एंजिन बनविले. यानंतर जर्मन कंपनीने आपल्या विकास कार्याला अमेरिकी संशोधनाची जोड देऊन १९६५ मध्ये वॅंकेल एंजिन बसविलेली एनएसयू ‘स्पायडर’ ही पहिली खासगी प्रकारची मोटारगाडी बनविली. सांप्रत एनएसयू ही जर्मन कंपनी व टोयो कोग्यो ही जपानी कंपनी अशा दोन कंपन्या वॅंकेल एंजिनाच्या मोटारगाड्या बनवीत आहेत. मझदा आरएक्स–२ व आरएक्स–३ या दोन प्रकारच्या गाड्या टोयो कोग्यो अमेरिकेस निर्यात करीत आहे. या गाड्यांच्या एंजिनात दोन घूर्णक असून एंजिनाची अश्वशक्ती १२० आहे. ही गाडी चालविण्यास अगदी सोपी व सोयीस्कर वाटते. याचे मूळ तिच्या वॅंकेल एंजिनात आहे, हे महत्त्वाचे आहे.


रचना : वॅंकेल एंजिन हे तेवढ्याच शक्तीच्या दट्ट्या एंजिनापेक्षा बरेच लहान, सुटसुटीत आणि हलके असून त्यातील घटकसंख्या लहान असल्यामुळे त्याची रचनाही साधी व सोपी वाटते. १९७२ मधील वॅंकेल एंजिनाची रचना आ. ५ मध्ये दाखविली आहे. या आकृतीवरून एंजिनाचा आकार आणि कवचाचा व्यास व त्याची रुंदी यांच्या सापेक्ष मापांची कल्पना येईल व तसेच ते अगदी साध्या रचनेचे असल्याचेही दिसून येईल. एंजिनात महत्त्वाचे असे फक्त दोनच हालते-फिरते भाग आहेत—विकेंद्री फिरणारा घूर्णक-दट्ट्या व एंजिन दंड. एंजिनाला झडपा, कॅमदंड (झडपा कार्यान्वित करणारी प्रयुक्ती) वगैरे लागत नाहीत. घूर्णकाचा (१) आकार समभुज त्रिकोणी प्रचिनाचा असून तो कवचाच्या (२) आतील विशिष्ट आकाराच्या जागेत (चाकोरीत फिरतो. या जागेच्या परिरेषेचे वर्णन लघु-अक्षावर थोडे दाबलेले दीर्घवर्तुळ असे करता येईल. घूर्णकाच्या आकाराने उत्पन्न झालेली तीन पृष्ठे व कवच यांच्यामध्ये तीन पोकळ्या तयार होतात व त्या नेहमीच्या एंजिनाच्या तीन सिलिंडरांशी सममूल्य आहेत.

कवचाचा अक्ष व एंजिन दंडाचा (३) अक्ष हे एकच आहेत. दंडावर (४) हे विकेंद्र बसविलेले असून त्याच्यामुळे घूर्णकाला फिरताना मार्गण होते. घूर्णकाला आतून दात असलेले चक्र (५) हे आतल्या अंगाने लावले आहे. हे दंतचक्र कवचाशी घट्ट जोडलेल्या स्थिर अशा (६) या लहान दंतचक्राशी संयोजित असते. लहान चक्राची दंतसंख्या मोठ्याच्या / आहे. या तऱ्हेच्या जोडणीमुळे मोठे चक्र लहान चक्राच्या (६) भोवती प्रदक्षणिक फिरते आणि त्याचा व त्याच्या बरोबर घूर्णकाचा जेव्हा एक फेरा होतो तेव्हा लहान दंतचक्रातून पार जाणाऱ्या दंडाचे (३) फेरे होतात. एंजिन थंड ठेवण्यासाठी (७) या जागेत पाणी खेळवितात. संपीडनाची पोकळ्यांतील जागा वाढविण्यासाठी घूर्णकाच्या तीनही पृष्ठांवर खोलगट भाग करतात (आ. ५). आ. ६ मध्ये कवचात वर असलेल्या दोन द्वारांपैकी उजवीकडील हवा इंधन मिश्रणाचा आगम मार्ग आहे व डावीकडील जळालेल्या वायूचा निर्गम मार्ग आहे. खालच्या बाजूला विद्युत्‌ गुडदी आहे.

आ. ६. वँकेल एंजिनाची कार्यपद्दती: (अ) चोषण, (आ)संपीडन, (इ)शक्तीप्रदान, (ई)निष्कासन: (१)विकेंद्री घूर्णक, (२) कवच, (३)एंजिन दंड, (४)विकेंद्र, (५)अंतर्दतचक्र, (६)लहान दंतचक्र, (७) पाणी, (८)हवा-इंधन मिश्रण प्रवेश, (९)निष्कास मार्ग, (१०)ठिणगी गुडदी.

कार्यपद्धती : घूर्णकाच्या तीन कडांची टोके क, च, ट ही आहेत (आ. ६). त्यांवरून एंजिनातील तीन पोकळ्या अनुक्रमे कच, चटटक अशा दर्शविता येतील. ते चार पोट-आकृत्यांत कच, पोकळीच्या ओटो आवर्तनातील चोषण, संपीडन, प्रसरण शक्तिप्रदान व निष्कासन या चार अवस्था अनुक्रमाने दाखविल्या आहेत. () मध्ये चोषण पूर्ण होण्याच्या बेतात आहे. () मध्ये कचतील वायूंचे संपीडन होऊन त्यात ठिणगी पडली आहे. कचतील वायूंचा व्याप जेव्हा किमान होतो त्याच क्षणाला ठिणगी पडते. () मध्ये पेटलेल्या वायूंचे प्रसरण व शक्तिप्रदान होत असलेले दिसत आहे. शेवटी () मध्ये निष्कासन होत असून पुढील आवर्तनाच्या चोषणाची सुरुवात तिच्या पाठोपाठ येणाऱ्या अनुक्रमे टकचट या जागांतही या चारही क्रिया घूर्णकाच्या त्याच फेऱ्यात पुऱ्या होतील हे उघड आहे. यावरून असे दिसून येते की, घूर्णकाच्या एका फेऱ्यात तीन वेळा शक्तिप्रदान होते. घूर्णकाचा एक फेरा होतो तेव्हा एंजिन दंडाचे तीन फेरे होतात म्हणजेच या दंडाच्या प्रत्येक फेऱ्यात एक आवर्तन घडते.

वॅंकेल एंजिनाचा विकास करताना त्याच्या भागांच्या हालचालींबाबत तसेच त्यातील पोकळ्यांचे एकमेकांपासून व कवचातही मुद्रण (गळबंदी) करण्यात अडचणी आल्या. संपीडन गुणोत्तर (संपीडनापूर्वीचे इंधन मिश्रणाचे घनफळ व ते प्रज्वलित होतानाचे घनफळ यांचे गुणोत्तर) ८-९ असल्यामुळे उच्च दाब व तापमान सहन करून शिवाय टिकाऊ अशी मुद्रण व्यवस्था आवश्यक होती. धातूंबाबत अवकाशयानांच्या रचनेसाठी शोधण्यात आलेल्या मिश्रधातूंचा उपयोग होऊन या अडचणी दूर झाल्या व अशा रीतीने हे एंजिन व्यवहारात आणण्यात यश मिळविता आले. एकंदरीत पाहता दट्ट्या एंजिनाच्या तुलनेत वँकेल एंजिनात पुढील फायदे आढळतात.

(१) साधारणतः तेवढ्याच शक्तीच्या दट्ट्या एंजिनाच्या मानाने वॅंकेल एंजिनाचे वजन निम्मे असते व आकारमानही लहान असते. एका २० अश. च्या एंजिनात वजन १.२७ किग्रॅ./अश. भरले. (२) एंजिनाला झडपा नसतात त्यामुळे रचना सोपी होते व आवाजाचाही त्रास होत नाही. झडपा उघडाव्या वा बंद कराव्या लागत नसल्यामुळे इंधन मिश्रणाचा प्रवाह एकाच गतीने सारखा चालू राहतो. (३) वरील दोन्ही कारणांमुळे एंजिनाची किंमत कमी असते. (४) एंजिनाची शक्ती वाढवावयाची झाल्यास आणखी सिलिंडर जोडणे सोपे असते व त्याला जागाही कमी लागते. (५) विकेंद्री घूर्णक व एंजिन दंड यांना फक्त चक्रीय गतीच असल्याने त्यांचे संतुलन चांगले होते आणि त्यामुळे कंपनांचा अभाव असतो. (६) प्रयोगांतही असे आढळले आहे की, वॅंकेल एंजिन विविध प्रकारच्या इंधनांवर, नेहमीचे पेट्रोल व त्याहूनही स्वस्त इंधनांवर, चालू शकते. (७) वॅंकेल एंजिनाच्या निष्कास वायूतील वातावरण दूषित करणारे घटक दट्ट्या एंजिनाच्या मानाने अंदाजे निम्म्या प्रमाणात असतात.

मोटारवाहनांत बसविण्याव्यतिरिक्त वॅंकेल एंजिन जनित्र चालवून वीज उत्पन्न करण्यासाठी गवत कापण्याचे, झाडे कापून तोडण्याचे वगैरे लहान लहान यंत्रे चालविण्यासाठी वापरले जाऊ लागले आहे.


रेनॉल्ट-रँबलर एंजिन : रेनॉल्ड इन्कॉर्पोरेटेड आणि अमेरिकन मोटर कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांनी मिळून आ. ७ मध्ये दाखविलेले हे विकेंद्री घूर्णक प्रकारचे एंजिन बनविले. त्यातील व वॅंकेल एंजिनातील मूलभूत कल्पना सारख्याच आहेत. आकृतीत दाखविल्याप्रमाणे या एंजिनाच्या घूर्णकाला चार कान आहेत व त्याच्या कवचाला (सिलिंडराला) पाच जुळते कोनाडे आहेत. जेव्हा घूर्णकाचा कान कवचातील कोनाड्यात जाऊ लागतो तेव्हा तेथील वायूचे संपीडन होते. कवचातील पाचही कोनाड्यांत आगम व निर्गम द्वारे ठेवावी लागतात हा या एंजिनाचा दोष आहे. पण पाच ठिकाणी कार्य होत असल्यामुळे एंजिनाच्या तापण्यात कमीजास्तीपणा फारसा येत नाही. तसेच घूर्णक-कवच मुद्रण वॅंकेलच्या मानाने सोपे होते.

आ.७. रेनॉल्ट-रँबलर एंजिन : (१) घूर्णक, (२) इंधन प्रवेश मार्ग, (३) मुद्रण घटक, (४) एंजिन दंड, (५)विकेंद्र, (६) ठिणगी गुडदी.

चक्रीय एंजिनांचा विकास करण्यास शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ उद्युक्त होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पश्चाग्र एंजिनात पुढेमागे होणारा दट्ट्या व आंदोलित होणारा संयोगदांडा यांच्या विषम गतीमुळे एंजिन दंडाच्या गतीवर परिणाम होऊन ती एकसम राहत नाही. पश्चाग्र एंजिने वाहनात वापरल्यास त्यांच्या विषम गतीमुळे वाहनाला सारखे हादरे बसत राहतात. चक्रीय एंजिनामुळे असे हादरे उत्पन्नच होत नाहीत आणि त्यामुळे वाहनातील प्रवास पुष्कळच सुखकर होतो. याशिवाय शक्तीच्या मानाने चक्रीय एंजिनाचे वजन आणि आकारमान पश्चाग्र एंजिनाशी तुलना करता कमी असतात. तथापि चक्रीय एंजिनांच्या विकासातील मुख्य अडचणी म्हणजे त्यांतील फिरत्या भागांचे मुद्रण व त्यांचे वंगण ह्या आहेत.

संदर्भ : Cole, D. E. The Wankel Engine, An article in Scientific American, New York, August 1972.

ओगले, कृ. ह.