चंदेल्ल घराणे : मध्य प्रदेशातील एक प्रसिद्ध राजपूत वंश. या वंशाचे नाव तद्वंशीयानी बांधलेल्या खजुराहो येथील मंदिरामुळे अजरामर झाले आहे. राजपुतांच्या श्रेष्ठ अशा छत्तीस कुलांत चंदेल्लांची गणना होते. ते आपला वंश अत्रिपुत्र चंद्र यापासून निघाला असे मानीत व म्हणून त्यांनी चन्द्रात्रेय (चंदेल्ल) असे नाव धारण केले. त्यांची राजधानी महोत्सवपुर (उत्तर प्रदेशांच्या हमीरपुर जिल्ह्यातील महोबा) येथे होती. आरंभीची राजधानी खजुराहो (खर्जूरवाहक) येथे असावी. तिचे महत्त्व शेवटपर्यंत टिकले.
या वंशाचा मूळ पुरुष नन्नूक हा नवव्या शतकाच्या आरंभी होऊन गेला. त्याचा नातू जयशक्ती वा जेज्जाक यांच्या नावावरून चंदेल्लांच्या राज्याला जेजाकभुक्ती किंवा जझौती असे म्हणत.
चंदेल्ल हे आरंभी कनौजच्या प्रतीहारांचे मांडलिक होते. राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने कनौज उद्ध्वस्त केले, तेव्हा तेथील प्रतीहार राजा महीपाल चंदेल्ल हर्षाच्या (सु. ९००—२५) आश्रयास गेला व त्याच्या साहाय्याने त्याने आपली गादी पुन्हा मिळविली. तेव्हापासून चंदेल्लांचे सामर्थ्य वाढू लागले.
हर्षाचा पुत्र यशोवर्मा याने दुर्भेद्य कालंजर किल्ला जिंकून आपली सत्ता यमुनेपर्यंत पसरविली. त्याने नंतर गौड, मिथिला, मालव, चेदी इ. देशांच्या राजांचा पराजय करून आपले सामर्थ्य जास्तच वाढवले. प्रतीहारांचे मांडलिकत्व असूनही तो यथार्थतः स्वतंत्रच झाला होता.
त्याचा पुत्र धंग हा पराक्रमी निघाला. त्याने प्रतीहार सम्राटांचा पराभव करून आपले स्वातंत्र्य जाहीर केले. त्याचे राज्य वायव्येस ग्वाल्हेर, उत्तरेस यमुना, पूर्वेस काशी आणि दक्षिणेस विदिशा येथपर्यंत पसरले होते. त्याने नंतर पाल राजांचा पराभव करून अंग (भागलपुर) आणि राढ (पश्चिम बंगाल) वर स्वाऱ्या केल्या. त्याने स्वातंत्र्यनिदर्शक महाराजाधिराज अशी पदवी धारण केली. पंजाबच्या जयपालाने सबुक्ती स्वारीच्या वेळी ज्या अनेक राजांचा संघ घडवून त्याला प्रतिकार केला, त्यांमध्ये कालंजरचा राजा धंग हा होता. धंग पूर्ण शतायुषी होऊन प्रयाग येथे १००२ च्या सुमारास मृत्यू पावला.
धंगानंतर त्याचा पुत्र गंड गादीवर आला. याच्याही कारकीर्दीत उत्तर भारतात चंदेल्ल राज्य सर्वांत विस्तृत होते. त्याचा पुत्र विद्याधर याच्या काळात गझनीच्या मुहम्मदाच्या भारतावर अनेक स्वाऱ्या झाल्या. कनौजवरच्या स्वारीत प्रतीहार राज्यपाल आपली राजधानी सोडून पळून गेला याची चीड येऊन विद्याधराच्या आज्ञेने त्याचा मांडलिक कच्छपघात (कछवाह) वंशी अर्जुन याने राज्यपालाचा पराभव करून त्याचा शिरच्छेद केला. त्यामुळे क्रुद्ध होऊन मुहम्मदाने १०१९ व १०२२ मध्ये चंदेल्लांच्या राज्यावर स्वाऱ्या केल्या. पण प्रत्येक वेळी त्याच्या आक्रमणापूर्वी आपला प्रदेश बेचीराख करून विद्याधराने त्याला प्रतिरोध केला. शेवटी मुहम्मदाला पुढे आक्रमण करून अशक्य होऊन त्याच्याशी सख्य करावे लागले. अशा रीतीने त्याला यशस्वी प्रतिकार करणारा एकमेव भारतीय राजा म्हणून विद्याधराचे नाव इतिहासात संस्मरणीय राहील.
विद्याधर आणि त्याचा पुत्र विजयपाल यांनी परमार भोज आणि कलचुरी गांगेयदेव यांच्याशी युद्धे करून जय मिळविले. नंतरचा चंदेल्ल राजा देववर्मा याला ठार मारून बलाढ्य कलचुरी राजा कर्ण याने चंदेल्लांचे राज्य आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. पण काही वर्षांनंतर चंदेल्लांचा ब्राह्मण सेनापती गोपाल याने भगीरथ प्रयत्नांनी चंदेल्ल राजा कीर्तिवर्मा याजकरिता ते राज्य परत मिळविले.
कीर्तिवर्म्याचा नातू मदनवर्मा याला गुजरातचा चालुक्य नृपती सिद्धराज जयसिंह, कलचुरी गयाकर्ण आणि गाहडवाल गोविंदचंद्र यांच्याशी युद्धे करावी लागली. जयसिंहाने त्याच्या महोबा या राजधानीपर्यंत आक्रमण केले होते. इतर दोन युद्धांत मात्र मदनवर्म्याला जय मिळालेला दिसतो.
त्याच्यानंतर त्याचा नातू परमर्दिदेव गादीवर आला. शाकंभरीचा तिसरा पृथ्वीराज याने ११८२ च्या सुमारास त्याच्या राज्यावर स्वारी करून एका तुंबळ युद्धात त्याचा पराभव केला. हे भारतीय राजे परस्परांत झगडत असता तिकडे घियासुद्दीन मुहम्मद घोरी भारतावर स्वारी करून लाहोरपर्यंत आला होता. त्याने दहा वर्षांत आपले सामर्थ्य वाढवून ११९२ मध्ये पृथ्वीराजाचा पराजय करून त्याचा वध केला. नंतर दहा वर्षांनी १२०२ मध्ये त्याचा सेनापती कुत्बुद्दीन याने चंदेल्लांचा दुर्भेद्य किल्ला कालंजर याला वेढा घातला. परमर्दीने तो काही काळ लढवला पण शेवटी त्याला शरण जाऊन खंडणी देणे भाग पडले. त्याचा शूर मंत्री अजयदेव याला हे राजाचे कृत्य पसंत पडले नाही. त्याने त्यालाच ठार मारून किल्ला काही दिवस मोठ्या शर्थीने लढविला. पण शेवटी किल्ल्यातील पाणी संपल्यामुळे त्याचा नाइलाज झाला. कुत्बुद्दीनने तो किल्ला तसेच महोबा ही गावे काबीज केली आणि तेथे आपला राज्यपाल नेमला.
तथापि अजयदेवाचा हा धाडसी प्रयत्न व्यर्थ गेला नाही. त्याजपासून स्फूर्ती घेऊन परमर्दीचा पुत्र त्रैलोक्यवर्मा (सु. १२०५—४१) याने सैन्याची जमवाजमव करून ककरादह येथे मुसलमानांचा पूर्ण पराभव केला आणि त्यांना आपल्या देशातून हाकून लावले. नंतर त्याने शेजारच्या कलचुरींच्या राज्यावर आक्रमण करून ते खालसा केले. मुसलमानांनी अल्तमशच्या कारकीर्दीत पुन्हा कालंजरवर हल्ला केला, पण तो त्यांना घेता आला नाही.
परमर्दींनंतर वीरवर्मा, भोजवर्मा व हम्मीरवर्मा यांनी १३०३ पर्यंत राज्य केले. पण नंतर अलाउद्दीन खल्जीने स्वारी करून चंदेल्लांचा बहुतेक प्रदेश काबीज केला. चंदेल्ल घराण्यातील शेवटचा राजा दुसरा वीरवर्मा हा १३१५ पर्यंत राज्य करत होता.
भारतीय कलांच्या इतिहासात चंदेल्लांचे नाव खजुराहो येथील त्यांच्या सुंदर देवालयांनी व त्यांतील उत्कृष्ट कामशिल्पांनी सुविख्यात झाले आहे. तेथे पूर्वी पंच्याऐंशी देवळे होती असे सांगतात. आज सुस्थितीत केवळ २७-२८ मंदिरेच दिसतात. त्यांतील काही वैष्णव, काही शैव व काही जैन आहेत. ती उंच अधिष्ठानावर (चबुतऱ्यांवर) बांधलेली असल्यामुळे उठावदार दिसतात. प्रत्येकात सामान्यतः गर्भगृह, अंतराल, मंडप आणि अर्धमंडप असून त्यांपैकी काही पंचायतन पद्धतीची आहेत. काहीत प्रदक्षिणापथ आहे, तर काहींच्या शिखरांना अंगशिखरांनी सुशोभित केले आहे. देवळांतील खांबांवर व बाहेरच्या भिंतींवर विविध प्रकारची सुंदर स्त्रियांची शिल्पे कोरली आहेत. त्यांपैकी बरीचशी कामशिल्पे आहेत. त्यांमध्ये तत्कालीन तंत्रमार्गाचा प्रभाव दिसतो.
चंदेल्लांचा विद्वानांनाही आश्रय होता. कीर्तिवर्मा राजाच्या सभेत प्रथम रंगभूमीवर आलेले कृष्णमिश्राचे प्रबोधचन्द्रोदय हे नाटक अध्यात्मविषयक आहे. अश्वघोषाचे या तऱ्हेचे अत्यंत प्राचीन नाटक वगळल्यास या तऱ्हेच्या नाटकात ते पहिले आहे. यानंतर अशा तऱ्हेची नाटके लिहिण्याचा प्रघात पडला.
चंदेल्लांनी आपली स्वतःची सोन्याची, चांदीची व तांब्याची नाणी पाडली होती. त्यांमध्ये कलचुरी गांगेयदेवाच्या नाण्यांचे अनुकरण केले आहे.
पहा : कामशिल्प खजुराहो.
संदर्भ : Majumdar, R. C., Ed. Struggle for Empire, Bombay, 1957.
मिराशी, वा. वि.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..