चंडीदास-पदावलीकार : चैतन्योत्तरकाळात होऊन गेलेला एक बंगाली कवी. त्याच्याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. श्रीकृष्णकीर्तनकार चंडीदासाने आपल्या भणितेत ‘बडु’ (मंदिरातील सेवक किंवा दुय्यम पुजारी), ‘अनंत’ , ‘चंडीदास’ असा स्वतःचा उल्लेख केला आहे, तर या चंडीदासाने आपला उल्लेख ‘द्विज’, ‘दीन चंडीदास’ असा केलेला आहे. यावरून द्विज व दीन चंडीदास ही एकच व्यक्ती असावी, असा निष्कर्ष निघतो.

या चंडीदासाच्या पदावलींची भाषा आणि शब्दयोजना श्रीकृष्णकीर्तनाच्या भाषेहून खूपच निराळी व सहजसंदर आहे. त्यावरूनच पदावलीकार चंडीदासाचे निराळेपण सिद्ध झाले आहे. बंगालमधील चैतन्यपूर्वकालीन वैष्णव धर्म व चैतन्योत्तरकालीन वैष्णव धर्म यांत मूलतः फरक होता. पूर्वीच्या कवींनी परमेश्वराचे ऐश्वर्य वर्णिले, तर नंतरच्या कवींनी त्याचे भावमाधुर्य फुलविले. चैतन्यप्रणीत वैष्णव धर्माने प्रेरित होऊन चंडीदासाने रचिलेल्या श्री राधामाधवलीलामृतातील पदे अतिशय रसाळ आणि भावमधुर आहेत. त्यातील पूर्वराग, प्रेमवैचित्त्य, भावसंमेलन या भागांतील पद्यरचनेचे श्रेष्ठत्व निर्विवाद आहे. पदावलीकार चंडीदास दुःखाचा, कातरतेचा कवी. त्याची राधा संपूर्ण योगिनी, त्यागमयी, भक्तिभावाचे मूर्तस्वरूप असलेल्या श्रीचैतन्यांचीच प्रतिकृती वाटते.

कमतनूरकर, सरोजिनी