चंदर, कृष्ण : (२३ नोव्हेंबर १९१४ — ). प्रख्यात उर्दू लेखक. ‘कृष्णचंद्र’ या नावाने ते प्रसिद्ध आहेत. जन्म पाकिस्तानातील वझीराबाद येथे. उर्दूतील श्रेष्ठ ललित लेखकांपैकी ते एक मानले जातात. वयाच्या पाचव्या वर्षीच आपल्या वडिलांबरोबर ते पूंछ येथे गेले व तेथे त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. लाहोर येथील फोरमन ख्रिश्चन कॉलेजमधून १९३४ मध्ये इंग्रजी घेऊन ते एम्.ए. झाले. नंतर ते एल्एल्. बी. झाले. सुरुवातीपासूनच साम्यवादी विचारसरणीचे त्यांना आकर्षण होते. १९३८ साली कलकत्ता येथे भरलेल्या अधिवेशनात पंजाब प्रांतीय शाखेचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. उर्दूतील पुरोगामी लेखनाशीही त्यांचा संपर्क होता. १९३९ व ४० मध्ये अनुक्रमे लाहोर व दिल्ली आकाशवाणी केंद्रांवर त्यांनी नोकरी केली व नंतर ते लखनौला गेले. १९४२ ते ४४ या कालावधीत ‘शालिमार’ चित्रसंस्थेचे कथालेखक म्हणून पुणे येथे त्यांचे वास्तव्य होते. १९४४ मध्ये मुंबई येथे येऊन सराय के बाहर हा चित्रपट त्यांनी काढला. त्यानंतर राख हा चित्रपट निर्माण करताना त्यांना जबर आर्थिक नुकसान सोसावे लागले, त्यामुळे चित्रपटांसाठी केवळ कथा व संवाद लिहिण्यापुरताच चित्रपटसृष्टीशी त्यांचा संबंध उरला. पुढे प्रामुख्याने त्यांनी स्वतःस ललित लेखनाला वाहून घेतले. त्यांच्याप्रमाणे त्यांच्या पत्नी सलमा सिद्दिकी ह्यादेखील एक दर्जेदार उर्दू लेखिका आहेत.
सुरुवातीपासूनच कला आणि वाङ्मय यांची त्यांना आवड होती. अरेबियन नाइट्स तसेच सरशार, रवींद्रनाथ टागोर आणि प्रेमचंद यांच्या साहित्याचे शालेय जीवनात त्यांनी वाचन केले होते. महाविद्यालयीन जीवनातदेखील सामाजिक व राजकीय कार्यात भाग घेऊन त्यांनी आपली मानवतावादी आणि समाजवादी तत्त्वप्रणाली विकसित केली. भंगी-संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची एकदा निवड झाली. भगतसिंगांच्या संघटनेतील सदस्यांशी त्यांची जवळीक असल्यामुळे सु. महिनाभर लाहोरच्या किल्ल्यामध्ये त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्याचे ते उपासक होते व केवळ राजकीयच नव्हे, तर व्यक्तिगत स्वातंत्र्याचाही त्यांना ध्यास होता. आकाशवाणीच्या नाट्यविभागाचे अधिकारी म्हणून त्यांनी काम केले.
मॅट्रिकमध्ये असतानाच त्यांनी आपल्या शिक्षकावर एक विनोदी लघुनिबंध लिहिला होता. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या कथा लाहोरच्या हुमायुन व अदबी दुनिया यांसारख्या प्रसिद्ध मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या ‘यरकान’ या कथेने टीकाकारांचे लक्ष वेधून घेतले, तर ‘दो फर्लांग लंबी सडक’ या कथेने उर्दूतील एक असामान्य कथालेखक म्हणून त्यांना लौकिक मिळवून दिला. तिलिस्मे खयाल (१९३७) हा त्यांचा पहिला लघुकथासंग्रह. ते विपुल लिहितात आणि अतिशय जलदही लिहितात. आपली पहिली कादंबरी शिकस्त (१९४३) ही त्यांनी अवघ्या एकवीस दिवसांत लिहून पूर्ण केली.
उर्दू कथेत प्रेमचंद यांनी प्रथम सामान्य माणसांच्या भावनांचा आविष्कार केला, तर कृष्णचंद्रांनी विविध थरांतील बांधवांच्या आशाआकांक्षांची अभिव्यक्ती करून ते क्षेत्र अधिक व्यापक केले. त्यांच्या लेखनाचा विस्तृत आवाका अपवादात्मकच म्हणावा लागेल. त्यात शेतकरी, मजूर, शिक्षक, नट, आधुनिक तरुणी वगैरे अनेकांचा समावेश होतो. लाला जगन्नाथ व कालू भंगी यांसारख्या प्रत्ययकारी व्यक्तिरेखांवरून कृष्णचंद्रांच्या सर्वसमावेशक अनुभवविश्वाचे प्रत्यंतर येते. शेतकरी आणि कामगार यांचे चित्रण त्यांनी सारख्याच सहजतेने व यशस्वीपणे केले. कार्यालयीन लाल फितीचा कारभारही त्यांच्या नजरेतून सुटला नाही. चित्रपट व्यवसायाशी असलेल्या दीर्घकालीन संबंधामुळे त्या जीवनाचे त्यांनी केलेले चांदी के घाव सारख्या कादंबरीतील व अन्य कथांतील चित्रण मर्मभेदी झाले आहे. राष्ट्रीय जीवनातील जवळजवळ सर्व महत्त्वाच्या घडामोडींना त्यांनी वाङ्मयीन रूप दिले आहे. ‘अनदाता’ कथेत बंगालचा दुष्काळ, तर ‘पेशावर एक्स्प्रेस’ मध्ये जातीय दंगल हे विषय त्यांनी हाताळले आहेत. जातीय दंगलींवर आधारलेल्या त्यांच्या गद्दार (१९६०) या कादंबरीतील ‘बीजनाथ’ची आदर्श मानवतावादी व्यक्तीरेखा चिरस्मरणीय म्हणावी लागेल. माणसाच्या हातात बंदूक न देता फूल द्यावे, यावर त्यांची श्रद्धा आहे. त्यांच्या शिकस्तमधील ‘श्याम’ मध्ये तर तरुणांना आपल्याच आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब दिसते व त्यामुळे तरुणांंना कृष्णचंद्र हे आपलेच वाटतात.
कृष्णचंद्रांचे भाषेवरील प्रभुत्व असाधारण असून निसर्गसौंदर्याचे चित्रण करण्यात आणि सर्व थरांतील लोकांचे बोलीविशेष शब्दांकित करण्यात ते सिद्धहस्त आहेत. कथानकविरहित कथा आणि काव्यात्म व औपरोधिक शैली या त्यांच्या तंत्रविषयक प्रयोगांमुळे त्यांचे लेखन वौशिष्ट्यपूर्ण झाले आहे.
त्यांनी अनेक कांदबऱ्या लिहिल्या. त्यांपैकी शिकस्त, जब खेत जागे (१९५२), एक गधे की सरगुझस्त (१९५६-५७) तूफान की कलियां, दिल की वादियां सो गई, आसमान रोशन है (१९६४), दादर पूल के बच्चे, मेरी यादों के चनार, चांदी के घाव, मिट्टी के सनम, झरगांव की रानी, पांच लोफर (१९६६), बहादुर गारजंग (१९६९), एक करोड की बोतल (१९७१) या विशेष गाजल्या. एक गधे की सरगुझस्त ही संपूर्ण विनोदी कादंबरी कार्यालये तसेच साहित्य-संगीत-संस्था यांचा उपहास यामुळे वेधक झाली आहे.
‘दो फर्लांग लंबी सडक’, ‘आधे घंटे का खुदा’, ‘पूरे चांद की रात’, ‘महालक्ष्मी का पूल’, ‘जिंदगी के मोड पर’, ‘अनदाता’, ‘पेशावर एक्स्प्रेस’ या त्यांच्या काही गाजलेल्या प्रसिद्ध कथा होत. त्यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांतील तिलिस्मे खयाल, नजारे (१९४०), जिंदगी के मोड पर (१९४३), अनदाता, तीन गुंडे, अजंठा के आगे (१९४८), हम वहशी है (१९४९), किताब का कफन (१९५६), मीना बाजार (१९६४), दसवाँ पूल (१९६४), नये अफसाने, कृष्णचंद्र के अफसाने, समंदर दूर है इ. विशेष प्रसिद्ध होत.
नाटक, बालवाङ्मय, निबंध, चरित्र या साहित्यप्रकारांतही त्यांनी मोलाची भर घातली. सराय के बाहर हे त्यांच्या विनोदी नाटकांपैकी एक प्रसिद्ध नाटक असून हवाई किले (१९४०) हा त्यांचा विनोदी निबंधसंग्रह आहे.
त्यांच्या पुस्तकांचे इंग्रजी, रशियन वगैरे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. रा. भि. जोशी आणि नारायण सुर्वे यांनी त्यांच्या काही पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले असून रंगनाथ कुलकर्णी यांनी रूपांतरित केलेल्या एका गाढवाची कहाणी या कादंबरीचे एकपात्री प्रयोग महाराष्ट्रात बरेच गाजले. मराठी वाचकवर्गात सर्वपरिचित असलेले उर्दूतील आधुनिक लेखक बहुधा कृष्णचंद्र हेच असावेत. १९६६ मध्ये ‘सोव्हिएट लँड नेहरू पारितोषिक’ त्यांना मिळाले. १९६९ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा सन्मान केला.
कृष्णचंद्रांच्या ललित लेखनातील अतिनाट्य आणि भावविवशता या गोष्टी काही समीक्षकांना खटकतात. शिवाय इतर भाषांप्रमाणेच अस्तित्ववाद व प्रतीकवाद या प्रवृत्तीमुळे उर्दू वाङ्मयाला नवे वळण मिळाले असले, तरी कलात्मक निसर्ग-चित्रण आणि आधुनिक समाजाचे जिवंत व भेदक विश्लेषण यांमुळे कृष्णचंद्रांचे वाङ्मय उर्दू भाषिकांमध्ये आजही आवडीने वाचले जाते.
नईमुद्दीन, सैय्यद.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..