चंदीदास-बडु : (१४१७ ?—१४७७ ?). प्राचीन बंगाली वैष्णव कवी. त्याचा काळ व जीवन यांबद्दल मतभेद आहेत तथापि जयानंदाचे चैतन्यमंगल, कृष्णदास कविराज याचे चैतन्यचरितामृत आणि बसंतरंजन राय यांना विष्णुपूर येथे सापडलेली श्रीकृष्णकीर्तन नावाची पोथी यांवरून चंडीदासाबाबत काही माहिती मिळते. १९१७ मध्ये त्यांनी ही पोथी प्रसिद्ध केली. सु. पंधराव्या शतकात चंडीदास होऊन गेला. बीरभूम जिल्ह्यातील नान्नूर (नांदूर, नानोर असेही पर्याय) गावी तो जन्मला. पित्याचे नाव दुर्गादास बागची. बांकुडा जिल्ह्यातील छातना हे चंडीदासाचे जन्मस्थान, असेही एक मत आहे. ही दोन्ही ठिकाणे केंद्रे समजून चंडीदासाबद्दल बऱ्याच दंतकथा प्रचलित आहेत. तो ब्राह्मण होता व अविवाहित राहिला. वरील ‘भणिता’ युक्त (स्वतःचा नामोल्लेख करून लिहिलेले काव्य) पोथीत कवीने स्वतःला कोठे नुसते चंडीदास, कोठे ‘बडु’ चंडीदास तर कोठे ‘अनंत बडु’ चंडीदास असे म्हटले आहे. बडू म्हणजे मंदिरातील सेवक किंवा दुय्यम पुजारी.
श्रीकृष्णकीर्तन (सु. १४३३) हे बडू चंडीदासाचे श्रेष्ठ काव्य. त्याखेरीज त्याने काही पदावल्याही रचिल्या. श्रीकृष्णकीर्तनाचे जन्मखंड, तांबूलखंड, दानखंड, नौकाखंड, भारखंड, वृंदावनखंड, कालियादमनखंड, यमुनाखंड, हारखंड, बालखंड, बंसीखंड, राधाविरहखंड असे विविध भाग पाडलेले आहेत. बडू चंडीदासांची राधिका ही एक स्वतंत्र निर्मिती आहे. या काव्याची भाषा व रस लक्षात घेता, ते चैतन्यपूर्वकालीन असल्याचे दिसते. श्रीकृष्णकीर्तनाची भाषा इतकी जुनी आहे, की चर्यागीताखेरीज अशी जुनी भाषा बंगाली साहित्यात अन्यत्र आढळत नाही. श्रीकृष्णकीर्तनात १२५ संस्कृत श्लोक सापडले असल्याने चंडीदासाचे संस्कृतचे पांडित्य सिद्ध होते. हे काव्य नुसते वर्णनात्मक नाही त्यात नाट्यगुणही विशेषत्वाने आढळतात. चंडीदास वर्षाऋतूचा कवी. त्याच्या काव्यात वर्षाऋतूची सुरेख वर्णने आहेत. श्रीकृष्णकीर्तन बंगालीत ‘पांचाली’ म्हणून गायिले जात असे आणि नाट्यगीत या दृष्टीने ते अभिनीतही होत असे.