चंगडू : चीनच्या सेचवान प्रांताची राजधानी. लोकसंख्या सु. २० लाख (१९७०). इ. स. पू. तिसऱ्या शतकापासूनच्या मिन नदीच्या कालव्यांमुळे कृषिसमृद्ध झालेल्या सुपीक प्रदेशाचे हे केंद्र अलीकडे लोखंड आणि पोलाद, रेल्वेएंजिने, यंत्रे इत्यादिकांच्या कारखान्यांमुळे औद्योगिक दृष्ट्याही विकसित झाले आहे. आजूबाजूच्या प्रदेशांशी याचे सर्व प्रकारे सुलभ दळणवळण आहे. प्राचीन काळापासून कारभार, संपत्ती व विद्वत्ता यांचे केंद्र असलेले हे शहर एके काळी देशाचीही राजधानी होते. आजही येथे तीन विद्यापीठे, अनेक शिक्षणसंस्था व चिनीतर अल्पसंख्याकांसाठी आठ प्रमुख संस्था आहेत.
ओक, द. ह.