घोष, राशबिहारी : (२३ डिसेंबर १८४५ —? १९२१). एक प्रसिद्ध देशभक्त व कायदेपंडित. तोरेकोन (बरद्वान जिल्हा) येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. एम्. ए. झाल्यावर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. त्यांना डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी दिली.
कलकत्ता येथे त्यांनी वकिलीस सुरुवात केली (१८६७). थोड्याच अवधीत ते एक नामांकित वकील म्हणून प्रसिद्धीस आले. वकिलीत त्यांनी अमाप पैसा मिळविला. कायदेविषयक अभ्यासामुळे विद्यापीठाच्या कायद्याच्या परीक्षांचे परीक्षक (१८७७), विद्यापीठाच्या विधिविषयातील अधिछात्र (१८७९), सिंडिकेटचे सभासद (१८८७) वगैरे पदेही त्यांना देण्यात आली. पुढे ते कलकत्ता विद्यापीठाच्या विधिविद्याशाखेचे अध्यक्ष झाले. याशिवाय त्यांनी टागोर विधी व्याख्यानमालेत गहाण या विषयावर व्याख्याने दिली. १९०५ पर्यंत त्यांचा काँग्रेस वा तत्सम राजकारण यांच्याशी काहीच संबंध आला नव्हता. मात्र लॉर्ड कर्झनच्या आक्षेपांचा त्यांनी विद्यापीठात निषेध केला. पुढे ते कलकत्ता काँग्रेसचे स्वागताध्यक्ष (१९०६) आणि सुरत व मद्रास काँग्रेसचे (१९०७ व १९०८) अध्यक्ष झाले. या वेळी जहाज व मवाळ या दोन काँग्रेस गटांत फार मोठा कलह माजला होता. इंग्लंडला गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाचेही ते सदस्य होते (१९१७). ॲनी बेझंट यांना विरोध करण्यासाठी भरलेल्या काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्या जोड अधिवेशनाचे अध्यक्षस्थान त्यांना देण्यात आले. इंडिया मासिकाच्या व्यवस्थापक मंडळाचे ते दीर्घकाल अध्यक्ष होते.