घाना : पश्चिम आफ्रिकेतील एक प्रजासत्ताक. क्षेत्रफळ २,३८,५३९ चौ. किमी. लोकसंख्या ९०,८७,००० (१९७२ अंदाज). गिनीच्या आखातातील हा देश ४० ४५’ उ. ते ११० १०’ उ. व ३० १५’ प. ते १० १२’ पू. यांदरम्यान असून त्याच्या पूर्वेस टोगो प्रजासत्ताक, उत्तरेस अपर व्होल्टा, पश्चिमेस आयव्हरी कोस्ट व दक्षिणेस अटलांटिक महासागराचे गिनीचे आखात आहे. याला ५३७ किमी. समुद्रकिनारा असून जास्तीत जास्त दक्षिणोत्तर लांबी सु. ७०० किमी. आहे. ॲक्रा (लोकसंख्या ३६,०६७ १९७०) ही राजधानी किनाऱ्यावर आहे.
भूवर्णन : घानाचा बहुतेक प्रदेश व्होल्टा नदीच्या सपाट, सखल खोऱ्याने व्यापलेला आहे. आग्नेयीस ॲक्राच्या उत्तरेपासून टोगोच्या सीमेपर्यंत अक्वापीम-टोगो टेकड्यांची सरासरी ४५० मी. उंचीची रांग असून तिच्यात मौंट जेबोबों व मौंट अफाज्जातो ही अनुक्रमे ८७६ मी. व ८८९ मी. उंचीची घानातील सर्वांत उंच शिखरे आहेत. या रांगेस ॲक्राच्या उत्तरेस ८० किमी. वर मिळणारा जास्तीत जास्त ६०० मी. उंचीच्या अशांटी-क्वाहू पठारी प्रदेश वायव्य आग्नेय दिशेने गेलेला असून या दोहोंमधून व्होल्टा नदीने दक्षिणेकडे मार्ग काढला आहे. ईशान्य भागात गांबागा पठारी प्रदेश असून अगदी उत्तरेस, वायव्येस व नैर्ऋत्येस विच्छिक स्थलीप्राय प्रदेश सु. ३०० मी. उंचीचा आहे. समुद्रकिनारा सपाट, खारकच्छ व वाळू यांनी भरलेला असून केप थ्री पॉइंट्स व ॲक्रा यांदरम्यान त्यावर छोटी आखाते व खडकाळ भूशिरे आहेत. ॲक्राच्या पूर्वेस, अक्वापीम-टोगो टेकड्या आणि किनारा यांदरम्यान पूर्वेकडे रुंद होत गेलेला मैदानी त्रिकोणी प्रदेश असून त्यावर व्होल्टाचा त्रिभुज प्रदेश आहे. नैर्ऋत्य, पश्चिम व अगदी उत्तरेकडील भाग आणि अक्वापीम-टोगोम टेकड्या कँब्रियनपूर्व खडकांच्या असून व्होल्टाचे खोरे प्राथमिक वालुकाश्माचे आहे.
घानाची प्रमुख नदी श्वेत व्होल्टा ही उत्तरेकडून अपर व्होल्टामधून घानात येते. तिला तांबडी व्होल्टा व देशाच्या जवळजवळ मध्यात पश्चिम सीमेवरून वाहत आलेली काळी व्होल्टा मिळते. तेथपासून दक्षिणेस अमेडिका (आकूसे) पर्यंत लेक व्होल्टा हा ८,४८२ चौ. किमी. क्षेत्रफळाचा व सू ४०० किमी. लांबीचा जलाशय बनविलेला आहे. क्वाहू पठारापासून समुद्रापर्यंत प्रा. (२५७ किमी.), आंग्कोब्रा (२०९ किमी.) व टानो (३८६ किमी.) या नद्या वाहतात. नद्यांवरील द्रुतवाह व ऋतूंप्रमाणे त्यांची कमीजास्त होणारी पातळी यांमुळे त्यांच्या नौसुलभतेस मर्यादा पडली आहे. इतर नद्या लहान व समुद्रापर्यंत न पोहोचणाऱ्या आहेत.
घाना संपूर्णपणे उष्ण कटिबंधात असल्यामुळे तेथील हवामान उष्ण आहे. उत्तरेस ते रूक्ष व अधिक कोरडे असून दक्षिणेस सापेक्षतः कमी उष्ण व आर्द्र आहे. ईशान्येकडून सहारावरून येणारे उष्ण, कोरडे, धुलियुक्त, ‘हरमॅटन’ वारे व नैर्ऋत्येकडून येणारे सौम्य, आर्द्र, मोसमीसारखे वारे जेथे एकत्र येतात, ते आंतर-उष्णकटिबंधीय अभिसारण क्षेत्र सूर्याच्या भासमान दक्षिणोत्तर गतीबरोबर जानेवारीत किनाऱ्याजवळ, तर जुलैत उत्तर भागाच्याही पलीकडे असे आंदोलन पावत असते. त्याच्यावरच घानाचे हवामान बहुशः अवलंबून असते. या क्षेत्रात जोरदार गडगडाटी वादळे होतात. नैर्ऋत्येकडून येणारे हवेचे लोट प्रबळ असतात तेव्हा पाऊस पडतो. ईशान्येकडील लोट हवा रुक्ष व कोरडी करतात. वार्षिक सरासरी तपमान २६० ते २९० से. असते. दैनिक तपमानकक्षा दक्षिणेत किनाऱ्याजवळ सु. ७० से. व उत्तरेस सु. १०० ते १६० से. असते. सामान्यतः पावसाळ्याच्या आधी फ्रेब्रुवारी, मार्चमध्ये उष्णता वाढलेली असते व जानेवारीत वा ऑगस्टमध्ये ती कमी असते.
किनाऱ्यावर हरमॅटनमुळे टामलीचे वार्षिक सरासरी तपमान ३३·३० से. आणि उत्तरेकडील नाव्हराँग्गो येथे ४२० से. पेक्षा जास्त असते. क्वाहू पठाराच्या उत्तरेकडील भागात एप्रिल ते ऑक्टोबर हे पावसाळ्याचे दिवस असतात आणि ऑगस्ट, सप्टेंबर हे जास्तीत जास्त पावसाचे महिने असतात. या भागात दक्षिणेकडून उत्तरेकडे पर्जन्यमान ११२ सेंमी. ते ८७ सेंमी. पर्यंत असते. नोव्हेंबर ते मार्च हा काळ अगदी कोरडा व उष्ण असतो. दक्षिणेकडील भागात पावसाळा दोनदा येतो आणि मे-जून व ऑक्टोबर हे जास्त पावसाचे महिने असतात. डिसेंबर ते फ्रेब्रुवारी व पुन्हा ऑगस्ट हे कोरडे असतात. किनाऱ्यावर पश्चिमेकडे २१५ सेंमी. ते पूर्वेकडे ११२ सेंमी. असा पाऊस कमी कमी होत जातो. ॲक्राच्या जवळपास उत्तर भागासारखा कमी म्हणजे ७५ सेंमी. ते १०० सेंमी. पाऊस पडतो. दक्षिण भागात सापेक्ष आर्द्रता ९० ते १००% असते आणि उत्तर भागात ६५% असते. हरमॅटनच्या काळात ॲक्राच्या जवळपास ती १२% इतकीही कमी होते.
दक्षिणेकडे विषुववृत्तीय अरण्ये व उत्तरेकडे सॅव्हाना गवताळ प्रदेश व उपवने अशी सामान्य वाटणी आहे. तथापि मूळची अरण्ये फिरत्या शेतीसाठी पुष्कळ ठिकाणी तोडली गेली असून शेतीनंतर तेथे दुय्यम अरण्ये वाढलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी अरण्यप्रदेशात कायम स्वरूपाचे कोकोचे मळे आहेत. फिरत्या शेतीत मका, केळी, तेल्या ताड, भाजीपाला इ. होतात. निकस जमिनीत कॅसावा पिकवितात व गावाजवळ फळझाडे लावतात. आता शेती किंवा इतर कारणांनी होणारा जंगलांचा नाश थांबविण्यात येत आहे. राखीव वनविभागात मात्र दाट अरण्ये आहेत. तेथे आफ्रिकन मॉहॉगनी, युटाइल, वाया, शेवरी इ. झाडे उंच वाढलेली दिसतात. त्यांच्या फांद्यावर जाडजूड वेली चढलेल्या असतात व तेथे शेवाळी, ऑर्किड इत्यादींने फांद्या लगडलेल्या असतात. परकिया नावाच्या झाडापासून वनस्पती तूप तयार करतात.
जमिनीवर छायेत अनेक झुडपांची दाटी झालेली असते. या भागात गवत मात्र क्वचितच दिसते. दलदलीजवळ रफिया गवत, बांबू इ. आहेत. व्होल्टाच्या खालच्या भागात व नॉर्दन आणि अप्पर विभागांत दूर दूर असलेली लहान झाडे व भरदार उंच गवत असा देखावा दिसतो. अरण्ये व गवताळ प्रदेश ह्यांच्या सीमेवर पंख्याच्या आकाराची ताडाची झाडे हे वैशिष्ट्य आहे. किनाऱ्याजवळ कच्छ वनस्पती आढळते.
अरण्यप्रदेशातील छोटे हत्ती, हिप्पो, सुसरी यांप्रमाणेच विरळ अरण्य व गवताळ प्रदेश येथे रेडे, काळवीट, अनेक जातींची माकडे, तरस, चित्ते व अजगर, नाग, मांबा इ. प्रकारचे सर्प विपुल आहेत. राघू, किंगफिशर, कबूतर, गिधाडे, बगळे, चिमण्या इ. अनेक प्रकारचे पक्षी व मुंग्या, फुलपाखरे, डास, त्से त्से इ. विविध जातींचे कीटक भरपूर आहेत, त्यांतील काही रोगप्रसारक आहे. डास मलेरिया आणतात, तर त्से त्से माशीने जनावरे मरतात आणि माणसांस निद्रारोग होतो.
इतिहास : सु. सोळाव्या शतकापर्यंत सहाराच्या दक्षिणेकडील सूदानी राज्ये दक्षिणेकडे राज्यविस्तार करण्याचा प्रयत्न करीत. त्यामुळे त्यांना सोने, कोलाकवची फळे, गुलाम इ. मिळवून ते उत्तर आफ्रिकेत विकता येत असत. सध्याचा घानाचा प्रदेश त्यांच्या राज्यात समाविष्ट होण्याइतका जवळ नव्हता परंतु त्यांच्यावर त्यांचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. गोल्ड कोस्ट च्या पार्श्वप्रदेशातील लहानलहान लोकसमूहांत शिरून व्यापारी व राजकीय उलाढाली करण्यासाठी उत्तरेकडून काही व्यापारी व राजकीय हेतू असलेले तुरळक लोक तेराव्या शतकापासून येऊ लागले होते. तशात चौथ्या ते तेराव्या शतकांपर्यंतच्या प्राचीन घाना व नंतरच्या प्राचीन माली साम्राज्यापर्यंत वायव्येकडे जाणारा व मांडे व्यापाऱ्यांच्या वर्चस्वाखाली असलेला एक आणि हौसा व्यापाऱ्यांच्या वर्चस्वाखाली असलेला हौसा प्रदेश आणि कानेम याकडे ईशान्येकडे जाणारा दुसरा, असे दोन व्यापारी मार्ग उपलब्ध झाले होते. बोनो, बांडा व गोंजा ही पहिली महत्त्वाची राज्ये घानाच्या अरण्यप्रदेशापर्यंत येऊन ठेपली. त्यांच्यावर प्राचीन घाना आणि माली साम्राज्यांचा प्रभाव होता, तसाच त्यांचाही दक्षिणेकडील त्यांच्यासारख्याच लोकांच्या विकासावर परिणाम झाला. हेच घानाच्या अरण्यप्रदेशातील व किनाऱ्यावरील अशांटी आणि फांटी लोक होत. घानाच्या उत्तर भागात पंधराव्या शतकाच्या सुमारात ईशान्येकडून आलेल्या सैनिकी आक्रमकांनी दागोंबा व मांप्रुसी आणि त्यांच्याशी संलग्न असलेली राज्ये स्थापिली. त्याच सुमारास हल्लीच्या गा, आडांग्मो व ईवी लोकांनी आग्नेय भागात पाय रोविले. ‘घाना’ हा देश आधी ‘गोल्ड कोस्ट’ ह्या नावाने ओळखला जात असे. कारण पूर्वी ह्या देशाच्या किनाऱ्यावर गाळ प्रदेशात सोने मोठ्या प्रमाणात सापडत असे. घानातील लोकांच्या मूळ स्थानाबद्दल अजूनही वादच आहे पण त्यांनी स्वातंत्र्यानंतर १९५७ मध्ये आपल्या देशाला ‘घाना’ हे नाव घेतले. त्यांची समजूत अशी आहे, की त्यांचे पूर्वज प्राचीन घाना साम्राज्याचे नागरिक होते. त्याचा व हल्लीच्या घाना राज्याचा निश्चित संबंध काय होता, याबद्दलचा निर्विवाद विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही. घानाचा अधिकृत असा इतिहास १४७१ पासून उपलब्ध होतो. त्या आधीचा इतिहास तोंडी आहे. १४७१ मध्ये अगदी प्रथम सोन्याच्या, हस्तीदंताच्या व मसाल्याच्या व्यापारासाठी पोर्तुगीज लोक आले आणि त्यांनी १४८२ मध्ये घानाच्या समुद्रकिनाऱ्यावर एल्मीना नावाचा किल्ला बांधला. पोर्तुगीजांमागोमाग फ्रेंच, डच, स्वीडिश व इंग्रज असे बरेच यूरोपीय लोक व्यापारासाठी तेथे आले व त्यांनीही काही प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन आपापले किल्ले बांधले. ह्या सर्व युरोपीय व्यापाऱ्यांचा येथे येण्याचा मूळ उद्देश कापड, धातूंच्या वस्तू, मणी, मद्ये, शस्त्रे व दारूगोळा यांच्या बदल्यात सोन्याचा व हस्तिदंताचा व्यापार हाच होता पण पुढे त्यांनी फायदेशीर म्हणून गुलामांचा व्यापार सुरू केला. येथून गुलाम नेऊन त्यांना ते आपल्या वसाहतींत शेतीच्या कामासाठी वापरीत असत. पुढे संपुर्ण सत्ता इंग्रजांकडे आल्यावर गुलामांच्या व्यापाराला कायद्याने बंदी घातली गेली व गुलामांचा व्यापार थांबला.
एकोणिसाव्या शतकापासून व्यापाराला खरे कायदेशीर वळण लागले. पुढे इंग्रजांनी हळूहळू सर्व युरोपीय व्यापाऱ्यांना हुसकावून लावले व स्वतःचा व्यापार वाढवावयास सुरुवात केली. इंग्रजांना आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अशांटी लोकांशी पुष्कळ युद्धे करावी लागली. कारण १६५९ ते १७३० पर्यंतच्या आक्वामू साम्राज्याच्या ऱ्हासानंतर बोनो व बांडा राज्यांस जिंकून, गोंजा व दागोंबा यांजकडून सक्तीने खंडणी वसूल करून आणि किनारी प्रदेशातील फांटी लोकांवर दबाव आणून हे अरण्यवासी अशांटी लोकच प्रबळ झाले होते पण पुढे त्यांचेच इंग्रजांना व्यापारासाठी साहाय्य होऊ लागले. अशांटी लोकांची इतर स्थानिक लोकांशीही वारंवार युद्धे होत. याचे कारण म्हणजे अशांटी लोक युरोपीयांना गुलामांचा पुरवठा करीत असत. याचा परिणाम इतर स्थानिक जमातींवर झाला. म्हणून अशांटी लोकांना किनाऱ्यावरील इतर जमातींशी बरेच वेळा युद्ध करावे लागले. त्यानंतर इंग्रजींनी गुलामांचा व्यापार बंद केला. त्यामुळे व अशांटी लोकांच्या प्रभावामुळे प्रथम डेन आणि नंतर डच लोकांनी आपले किल्ले ब्रिटिशांच्या हवाली करून गोल्ड कोस्टमधून काढता पाय घेतला आणि अशांटी लोकांचे व इंग्रजांचे पुन्हा बिनसले. १८०६ ते १९०० पर्यंतच्या काळात अशांटी लोकांची इंग्रजांशी सात युद्धे झाली व शेवटी अशांटी प्रदेश इंग्रजांनी जिंकून घेतला.किनाऱ्यावरील फांटी राज्यांशी ब्रिटिशांचे व्यापारवर्धनासाठी सामोपचाराचे धोरण होते. परंतु १८७४ मध्ये ब्रिटिशांनी किनारी प्रदेशही आपली वसाहत म्हणून जाहीर केला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास ब्रिटशांनी समान भागीदारीचे धोरण ठेवून पुढे युरोपीय व आफ्रिकी राज्यतत्त्वांवर आधारलेले या प्रदेशाचे स्वतंत्र राज्य उदयास येईल, अशी फांटी राज्यांची शिक्षणप्रसारामुळे कल्पना झालेली होती. तिला या वसाहती राज्यामुळे धक्का बसला. यामुळे अशांटी पुन्हा प्रबळ झाले. सोने खाणीवाल्यांची सुरक्षिततेची व वाहतुकीच्या साधनांची मागणी आणि फ्रेंच व जर्मन वर्चस्वाची भीती यांमुळे १८९६ मध्ये पुन्हा अशांटीचा पराभव करून तो प्रदेशही वसाहतीत समाविष्ट केला.
१८८६ पासून किनाऱ्यावरील सर्व प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला व त्याला गोल्ड कोस्ट कॉलनी असे नाव देण्यात आले. पुढे १८९७ पासून उत्तर भाग देखील गोल्ड कोस्ट कॉलनीला इंग्रजांकडील विश्वस्त प्रदेश म्हणून जोडण्यात आला. तसेच १९२२ साली जर्मन वसाहतीचा टोगोलँड हा भागदेखील इंग्रजांकडेच विश्वस्त प्रदेश म्हणून ‘लिग ऑफ नेशन’ ने दिला. पुढे संयुक्त राष्ट्रांनीही दुसऱ्या, महायुद्धानंतर तो तसाच ठेवला. त्यामुळे १९२२ पासून टोगोलँडचा हा भाग गोल्ड कोस्टचाच एक भाग म्हणून राहिला आहे.
विसाव्या शतकाच्या पहिल्या चरणात अरण्यप्रदेशातील कोकोच्या लागवडी कोकोच्या निर्यातीमुळे आर्थिक दृष्ट्या यशस्वी झाल्या. पैसा उपलब्ध झाल्यामुळे लोहमार्ग, शाळा, रुग्णालये, टाकोराडी बंदर इत्यादींची वाढ झाली. १९२५ पर्यंत वसाहतीचा कारभार राज्यपाल आणि त्याच्या मदतीस विधिमंडळ यांचेकडे होता. या मंडळावर राज्यपालाने नेमलेले थोडेसे आफ्रिकी सभासद असत. १९२५ नंतर काही आफ्रिकी सभासद मंडळावर निवडून येऊ लागले.
दुसऱ्या महायुद्धानंतर घाना राजकीय दृष्ट्या अधिक जागृत झाला आणि इतर देशांप्रमाणे तेथील लोकांनी राजकीय स्वातंत्र्याची मागणी केली. सुरुवातीला तेथील लोकांना १९४६ साली स्थानिक स्वायत्तता देण्यात आली. पुढे स्वातंत्र्याची मागणी अधिकच तीव्र झाली. इंग्रजांनी १९४९ मध्ये आफ्रिकी लोकांचीच एक समिती नेमली. या समितीच्या अहवालाप्रमाणे १९५१ मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. ताबडतोब स्वराज्यासाठी प्रत्यक्ष कृती करू इच्छिणाऱ्या एन्क्रुमाहची बंदिवासातून सुटका झाली व तो मुख्य प्रधान झाला. त्या वेळी प्रथमच आफ्रिकन प्रतिनिधींना अधिकाधिक स्वातंत्र्य देऊन त्यांचेकडे राज्यकारभाराची भरपूर प्रमाणात जबाबदारी सोपविण्यात आली. १९५४ मध्ये गोल्ड कोस्टला सर्व बाबतींत स्वायत्तता देण्यात यावी असा ठराव लोकसभेने केला व त्याप्रमाणे १९५६ मध्ये सार्वजनिक निवडणुका घेण्यात आल्या. त्यात वसाहतीच्या सचिवाने असे वचन दिले, की जर या निवडणुकीत आफ्रिकन प्रतिनिधींना मताधिक्य मिळाले व त्यांनी बहुमताने असा ठराव केला की, गोल्ड कोस्टला स्वातंत्र्य देण्यात यावे तर गोल्ड कोस्टला स्वातंत्र्य देण्याची तारीख निश्चित करण्यात येईल. त्याप्रमाणे १९५६ मध्ये तसा स्वातंत्र्याबाबतचा ठराव होऊन ६ मार्च १९५७ ही स्वातंत्र्य देण्याची तारीख निश्चित करण्यात आली. ६ मार्च १९५७ रोजी गोल्ड कोस्टला राष्ट्रकुलांतर्गत स्वातंत्र्य देण्यात आले. गोल्ड कोस्ट, अशांटी उत्तरेकडील संरक्षित प्रदेश व इंग्रजांच्या ताब्यात असलेला टोगोलँडचा भाग ह्या सगळ्यांचा एक प्रदेश करण्यात आला व त्याला घाना हे नाव देण्यात आले. त्याला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्वही मिळाले. १ जुलै १९६० पासून हा देश प्रजासत्ताक झाला व डॉ. क्वाहमेह एन्क्रुमाह त्याचा पहिला अध्यक्ष झाला.
घानाच्या स्वातंत्र्याच्या साहाय्याने आफ्रिकेतील इतर वसाहती मुक्त करून समाजवादी आफ्रिकी एकता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणे हे एन्क्रुमाहचे ध्येय होते. त्यासाठी त्याने १९५८ मध्ये गिनिशी आणि १९६० मध्ये मालीशी ऐक्य प्रस्थापित केले. स्वतंत्र काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांतर्फे सुव्यवस्था स्थापन करण्याच्या कामी घानाच्या सैन्याने आणि पोलीस दलाने महत्त्वाचा वाटा उचलला. १९६० मध्ये एन्क्रुमाह घानाचा आजीव अध्यक्ष झाला व त्याचा सी. पी. पी. (कन्व्हेन्शन पीपल्स पार्टी) पक्ष देशातील एकमेव अधिकृत पक्ष झाला. एका पक्षाच्या व एकाच व्यक्तीच्या हातात सत्ता केंद्रित होऊ लागल्याने देशाच्या काही भागांत त्यांना विरोध होऊ लागला. विरोधकांना चौकशीशिवाय कैदेत डांबून ठेवणे, मंत्री व न्यायाधीशांच्या नेमणुका व बडतर्फी लहरीप्रमाणे करणे आणि घानाची संपत्ती प्रतिष्ठेपायी अनुत्पादक प्रकल्पांसाठी उधळणे, यांमुळे देशात व बाहेरही एन्क्रुमाहबद्दल अप्रीती वाढू लागली. १९६२, ६३ व ६४ साली त्याचा वध करण्याचे प्रयत्न झाले व देशाच्या कारभारात भ्रष्टाचार, परदेशी कर्जांचा बोजा, जीवनमानाची घसरगुंडी यांची वेगाने वाढ झाली. अखेर फेब्रुवारी १९६६ मध्ये एन्क्रुमाह पीकिंगला गेला असताना देशात एन्. एल्. सी. (नॅशनल लिबरेशन कौन्सिल) चा अध्यक्ष ले. ज. जोसेफ ए. अंक्रायाच्या नेतृत्वाखाली अवचित सत्तांतर होऊन कारभार, न्याय, आर्थिक धोरण यांत सुधारणा करण्यात आली. २९ ऑगस्टच्या निवडणुकीत यशस्वी झालेल्या प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या के. ए. बूसिया याच्या नेतृत्वाखाली घानाच्या दुसऱ्या प्रजासत्ताकाचे नवे शासन अधिकारावर आले. अध्यक्षपदाची सुत्रे तिघाजणांच्या अध्यक्षसमितीकडे देण्यात आली. ७ ऑगस्ट १९७० रोजी ही समिती विसर्जित करून २९ ऑगस्टला निवडणुका घेण्यात आल्या आणि १ सप्टेंबर १९७० रोजी एडवर्ड आकुफो-आर्डो घानाचा अध्यक्ष झाला.
१३ जानेवारी १९७२ रोजी पुन्हा रक्तरहित अवचित सत्तांतर होऊन बुसिया यांचेकडून लष्कराने सत्ता हाती घेतली. देशाच्या कारभारासाठी राष्ट्रीय विमोचन परिषद एन्. आर्. सी. स्थापण्यात आली. ऑगस्ट १९६९ मध्ये दुसऱ्या प्रजासत्ताकाचे अध्यक्ष, मुख्यप्रधान आणि संसद यांची तरतूद करणारे संविधान निलंबित करण्यात आले. अध्यक्षाची जागा रद्द करण्यात आली व राष्ट्रीय संसद विसर्जित करण्यात आली. १३ जानेवारी ७२ पूर्वीचे सर्व पक्ष बेकायदा ठरविण्यात आले. कर्नल आसू. के. आशिअंपाँग हे एन्. आर्. सी. चे अध्यक्ष झाले आणि निरनिराळ्या मंत्रालयांवर आयुक्त नेमण्यात आले. १९७४ च्या सुरुवातीस आशिअंपाँग यांनी एन्. आर्. सी. ला सल्ला देण्यास अनेक मंडळावर मुलकी लोक नेमले जातील असे सांगितले. तथापि घानात पुन्हा मुलकी कारभार सुरू करण्याची काही योजना नाही.
राज्यव्यवस्था : कारभारासाठी घानाचे नऊ शासकीय विभाग पाडण्यात आले आहेत : ईस्टर्न, वेस्टर्न, अशांटी, नॉर्दर्न, व्होल्टा, सेंट्रल, अपर, ब्राँग-अहाफे आणि ग्रेटर ॲक्रा प्रदेश. प्रत्येक विभागावर एक लष्करी अधिकारी विभागीय आयुक्त म्हणून असतो.
न्यायसंस्था मुख्य न्यायाधीशाच्या आधिपत्याखाली असून तिच्याकडे सर्व दिवाणी व फौजदारी न्यायाधिकार आहेत. सुपीरिअर कोर्ट ऑफ जूडिकेचर, कोर्ट ऑफ अपील व हायकोर्ट ऑफ जस्टिस अशी न्यायालये असून १९६९ मध्ये, आता निलंबित, संविधानाने निर्मिलेले सर्वोच्च न्यायालय रद्द झाले आहे. त्याचे अधिकार कोर्ट ऑफ अपीलकडे आले आहेत. घानातील सर्वोच्च आणि अखेरचे न्यायालय आता कोर्ट ऑफ अपील हे असून देशातील कोणत्याही न्यायालयाचे अधिकार, सत्ता व अधिकारक्षेत्र त्याला आहे. त्याचे अध्यक्ष चीफ जस्टिस (प्रमुख न्यायाधीश) हे असून त्याशिवाय निदान सहा अपील कोर्टांचे न्यायाधीश असतात. तसेच प्रमुख न्यायाधीशाला हवे असतील ते सुपीरिअर कोर्टाचे न्यायाधीश त्याला मिळू शकतात. पाच न्यायमूर्तींच्या फुलबेंचला कायद्याचे प्रश्न वगैरेवर अधिकार असतो. हायकोर्ट ऑफ जस्टिसकडे दिवाणी व फौजदारी कज्जे, कामगार–औद्योगिक तंटे व कारभारविषयक तक्रारी यांबाबत अधिकार आहे. शिवाय सात सर्किट कोर्टे व त्यांचे अकरा न्यायाधीश, जिल्हा न्यायालये, बाल न्यायालये इ. न्यायव्यवस्था आहे.
सुव्यवस्थेसाठी ४७९ ठाण्यांवर मिळून १९७१ मध्ये ३५१ पोलीसअधिकारी, ६४९ इन्स्पेक्टर व १५,१९१ इतर पोलीस होते. याशिवाय पोलीस दलात एका संगीत दिग्दर्शकाचीही नेमणूक आहे.
संरक्षण मंत्रालयाकडे हत्यारी दले, सैनिकी अकादमी व समीक्षक दले आहेत. लष्करी अधिकाऱ्यांसाठी सैनिकी अकादमीत दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून हवाईदलासाठी एक वर्षाचा व नौदलासाठी सहा महिन्यांचा प्राथमिक अभ्यासक्रम आहे. भूदलात घाना लष्कराची सात पायदळ बटालियन, दोन टेहळणी पथके, पाच चिलखती गाड्यादळे व सहायक दल आहेत. तसेच तीन सीमारक्षक दले व ३,००० पॅरामिलिशिया सैनिक आहेत. एकूण भूदल सु. १६,००० आहे. १९५९ मध्ये स्थापन झालेल्या घानाच्या आरमारात २ कॉर्व्हेट, ३ सुरुंगकाढ्या, २ सागरीसंरक्षक नौका, ३ गस्तनौका व एक देखभाल दुरुस्ती विभाग आहे. १९७३ मध्ये आरमारातील अधिकारी व सैनिक मिळून १,००० लोक होते. १९५९ मध्ये स्थापन झालेल्या वायुदलाची ॲक्रा येथे हवाई शिक्षण शाळा असून निरनिराळ्या प्रकारची ४८ विमाने आहेत. टाकोराडी व टामाली येथेही विमानतळ असून शोध, सुटका, पीकफवारणी, हवाईपाहणी इ. कामेही वायुदलाकडे असतात व वायुदलात एकूण सु. १,६०० लोक आहेत.
आर्थिक स्थिती : १९६५ मध्ये घाना पौंडाऐवजी सेदी हे दशमान पद्धतीचे नवीनच चलन घानात सुरू झाले. १ सेदीचे १०० पेसेवा होते आणि १ सेदी = १·१५ अमेरिकन डॉलर होते. जुलै १९६७ मध्ये नवा सेदी हे चलन सुरू झाले. त्याची किंमत ०·८७०८९७ शुद्ध सोन्याच्या किंमतीइतकी ठेवण्यात आली. त्याचप्रमाणे एक नवा सेदी = १·०२ अमेरिकन डॉलर किंवा १ अमेरिकन डॉलर = ०·९८ नवा सेदी असा दर होता. वजने, मापे ब्रिटिश पद्धतीची आहेत. १९७१-७२ च्या अर्थसंकल्पात आय ४२.०३३ कोटी सेदी व व्यय ४३·०३८२ कोटी सेदी होता. २७ एप्रिल १९७४ रोजी १ पौंड = २·७१५ सेदी आणि १ अमेरिकन डॉलर = १·१५ सेदी होते.
प्राथमिक स्वरूपाच्या शेती व खनिज उत्पन्नांची निर्यात हा घानाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. एकूण निर्यातीपैकी सु. ६७% निर्यात कोकोची असते. कोकोचे जागतिक उत्पादन आणि किंमती बदलत्या स्वरूपाच्या असतात. जगाची कोकोची ३०% गरज घाना पुरवितो. मँगॅनीज, बॉक्साइट, सोने, हिरे ही प्रमुख निर्यात खनिजे आहेत. इतर शेती उत्पन्नापेक्षा कोकोवरच जास्त अवलंबून राहणे रस्ते, बंदरे, शाळा, रुग्णालये यांसारख्या प्रकल्पात मोठ्या स्वरूपाची गुंतवणूक, एन्क्रुमाह राजवटीतील भारी परदेशी कर्जाचा बोजा यांमुळे व्यापार संतुलनाबाबत मोठ्याच अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे घानाच्या सोन्याच्या आणि परदेशी चलनाच्या गंगाजळीवर मोठाच प्रतिकूल परिणाम झाला. अन्नपदार्थ व शेतीपदार्थ यांची आयात केल्याचाही आर्थिक स्थितीवर परिणाम झाला. ते पदार्थ देशाताही उत्पन्न होऊ शकले असते. १९६९ च्या मध्यास घानाला परदेशी कर्ज ४९·९७ कोटी नवा सेदीचे व अंतर्गत कर्ज ५६·४४ कोटी नवा सेदीचे होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून ७·३७ कोटी डॉलर व ५·८९ कोटी डॉलर्सचे दीर्घ मुदतीचे कर्ज यांची त्यात भरच पडली. १९६९ चे एकूण राष्ट्रीय उत्पन्न २२८·५ कोटी सेदी व १९७० चे २५२·७ कोटी सेदी होते.
कृषी : घाना हा कृषिप्रधान देश असून मुख्य पीक कोकोचे आहे. कोकोखाली सु. २० लक्ष हेक्टर असून सुधारलेल्या जातींचा उपयोग व कीडनियंत्रण यांमुळे उत्पादन वाढले आहे. १९७१ मध्ये कोकोचे ४ लक्ष टनांहून अधिक उत्पादन झाले. कॉफी, तेल्या माडाच्या सुधारलेल्या जाती, नारळ, कोला व काजू यांच्या लागवडी अधिक प्रमाणात होत आहेत व त्यांचे उत्पादनही वाढत आहे. नैर्ऋत्य घानात सुधारित रबराची लागवड केली जात आहे. आग्नेय भागात सिंचनसोयी झाल्या आहेत. घानातील मुख्य अन्नपिके मका, भात, कॅसावा, केळी, भुईमूग, गिनीकॉर्न, भरड धान्ये, सुरण ही असून तंबाखू, मिरी, सुंठ ॲव्होकॅडे, लिंबूजातीची फळे याही नगदी पिकांचे उत्पादन निर्यातीसाठी केले जात आहे. कापूस, केनाफ, तंबाखू, ताडतेल, आंबा, अननस, ऊस इत्यादींचे उत्पादन स्थानिक कारखान्यांसाठी कच्चा माल म्हणून वाढविले जात आहे. राज्यशेती महामंडळाकडील सर्व उपलब्ध अन्न शेती अन्नोत्पादन महामंडळाकडे वर्ग केली आहे. तेथे १०,००० कामगार १,२०,००० हेक्टर शेतीवर खपत आहेत. अन्नस्वावलंबनाचा एक धडक कार्यक्रमच हाती घेण्यात आला आहे.
एकूण ८२,५७५ चौ. किमी. प्रदेश वनाच्छादित असून त्यापैकी १४·२१३ चौ. किमी क्षेत्र राखीव आहे. सॅव्हाना जंगल प्रवेश १,५६,७२६ चौ. किमी. असून त्यापैकी ६,४९० चौ. किमी. राखीव आहे. कठीण लाकूड ही घानाची मुख्य निर्यात असून १९७० मध्ये ३९·५ कोटी घ. मी. ओंडके आणि सु. ३ कोटी घ. मी. कापीव लाकूड निर्यात झाले. लागवडीसाठी होणारा बिनराखीव जंगलांचा नाश थांबविण्यासाठी जंगलजमीनरक्षण कायदा, अधिक राखीव जंगल व वनसंवर्धन हे उपाय योजिले जातात.
१९७१ मध्ये घानात ६,१४,०४९ गुरे ७,१५,१८१ मेंढ्या ६,०२,९४० शेळ्या ३,०१० घोडे १,३७,०८६ डुकरे आणि ३९४ लक्ष कोंबड्या-बदके होती. टामाली येथे मध्यवर्ती पशुप्रयोगशाळा असून तेथे गुरांच्या रोगावर संशोधन केले जाते. पशुपालनाचा व्यवसाय मुख्यतः उत्तरेकडे व ॲक्रा मैदानी प्रदेशात चालतो. सु. १,५०,००० कोळी, ८,७०० मच्छिमार बोटी व ४३२ यंत्रसज्ज बोटी यांच्या साहाय्याने मासे पडतात. १९७१ मध्ये स्थानिक मत्स्योत्पादन १,८१,१३५ मे. टन झाले. घाना मत्स्योत्पादन महामंडळाकडे हा व्यवसाय आहे. नद्यांत व समुद्रांत पुष्कळ मासे मिळतात, तथापि तेवढ्याने देशाची गरज भागत नाही.
उद्योग : १९७२ मध्ये सोन्याचे उत्पादन सु. १९,७७५ किग्रॅ. हिऱ्यांचे २५,६१, ७४८ कॅरट मँगॅनीजचे ४,५९,१९५ टन व बॉक्साइटचे ३,२३,४०१ टन इतके झाले. सोन्याच्या उत्पादनाचा वाढता खर्च आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची ठराविक किंमत, तसेच त्याचा चोरटा व्यापार यांमुळे खाण कंपन्यांची कुचंबणा होऊ लागली. तेव्हा घाना राष्ट्रीय खनिमहामंडळ स्थापन होऊन त्याने सोने व हिरे उत्पादकांचे भागभांडवल आपल्याकडे घेतले. नॉर्दर्न ब्राँग-अहापो विभागात सोन्याचे मोठे साठे अलीकडे सापडले आहेत. तसेच बेरिल, टँटॅलोकोलंबाइट व क्रोमाइट ही खनिजेही आढळली आहेत. मँगॅनीजचे उत्पादन बव्हंशी आफ्रिकन मँगॅनीज कंपनीकडे आहे. हिऱ्यांचे उत्पादन प्राथमिक पद्धतीने होते. १९६८ मध्ये १,७४,३०,००० नवे सेदी किंमतीचे हिरे निर्यात झाले. बॉक्साइटची एकच खाण १९६८ मध्ये चालू होती. परंतु व्होल्टा नदीप्रकल्प पुरा झाल्यावर मिळणाऱ्या विजेच्या साह्याने ॲल्युमिनियमची निर्मिती होऊ शकेल. १९६९ मध्ये किनाऱ्यापासून १३ किमी. वर तेल व नैसर्गिक वायू सापडले आहेत. १९६३ मध्ये एक तेलशुद्धी कारखाना निघाला आहे.
आयात कोळसा व डिझेल यांवर वीज निर्माण केली जाते. १९६१ मध्ये ३९ कोटी किवॉ. ता. उत्पादन होते, ते १९६८ मध्ये २५८·९ कोटी किवॉ. ता. झाले. यापैकी २·९ कोटी किवॉ. ता. औद्योगिक उपयोगासाठी होते. १९६८ अखेर ५·९९ लक्ष किवॉ. विजेची उत्पादनक्षमता होती. १९७० मध्ये २९२ कोटी किवॉ. ता. विजेचे उत्पादन झाले. व्होल्टा नदीप्रकल्प हा घानाच्या वीजपुरवठ्याचा सर्वांत मोठा आधार आहे. ॲक्राच्या ईशान्येस ९६ किमी. वरील आकोसोंबो येथे व्होल्टावर धरण बांधण्याचा हा प्रकल्प १९६२ मध्ये सुरू झाला व १९६५ मध्ये धरण पुरे झाले. १९६७ च्या मध्यास ५,१२,००० किवॉ. उत्पादनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. खर्चाचा सु. निम्मा भार घानाने उचलला व बाकीचा दीर्घ मुदतीचा परदेशी-मुख्यतः ब्रिटिश व अमेरिकन कर्जपुरवठा मंडळांकडून मिळविण्यात आला. या प्रकल्पामुळे टेमा येथील व्होल्टा ॲल्युमिनियम कंपनीचे उत्पादन वाढून घानाची १९७७ पर्यंतची वीजगरज पुरविली जाणार आहे. १९७३ मधील वीज उत्पादनक्षमता ९४८ मेवॉ. आहे. प्रतिवर्षी १५% वाढणारी अंतर्गत गरज भागवून डिसेंबर १९७२ पासून टोगो व दाहोमी यांसही वीज देता येऊ लागली.
घानातील उद्योगधंदे खासगी, शासकीय, खासगी-शासकीय आणि सहकारी या चार क्षेत्रांत १९६६ मध्ये विभागण्यात आले. त्यात खासगी क्षेत्रच सर्वांत मोठे आहे. देशाचा आर्थिक पाया मुख्यतः शेती व खाणी असल्याने उद्यागधंदे विशेष विकसित झालेले नाहीत. १९६७ मध्ये निर्मिती उद्योगात एकूण ४०,००० लोक होते. त्यापैकी ३८,५०० मजूर होते. त्यावर्षी एकूण औद्योगिक उत्पादन ९·७८ कोटी नवे सेदीचे झाले आणि मजुरी २·२९ कोटी नवे सेदी झाली. कातडीकाम, विणकाम, जवाहीर, लोहारकाम, कुंभारकाम हे घरगुती उद्योग आहेत, लाकूड कापणे, छपाई व प्रकाशन आणि फर्निचर, पेये, कपडे, पावरोटी बनविणे हे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर चालतात परंतु कारखाने असे थोडेच आहेत. ते बीर, सिगारेट, सौम्य पेये, साबण, खाद्य तेले, बिस्किटे खिळे, ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन, ॲल्युमिनियम पत्रा इ. बनविणे, मोटारीचे भाग जुळविणे या स्वरूपाचे आहेत. फळे व मासे डबाबंद करणे, बोटी बांधणे, प्लायवुड आणि आगपेट्या बनविणे, विटा व कौले बनविणे हे उद्योगही चालतात. १९६७ मध्ये बांधकामात १७%, शेतीवर १४%, व्यापारात ९%, निर्मिती उद्योग ८%, वाहतूक ८% व खाणी ७% अशी मजूरवर्गाची वाटणी होती. अकुशल कामगार देशाच्याच इतर भागांतून व शेजारच्या देशांतून येतात. प्रत्येक मान्य उद्योगास एक कामगार संघटना व एकच मध्यवर्ती कामगार संघटना कायद्याने नियंत्रित आहेत.
व्यापार : १९७० मध्ये एकूण आयात ४१,९०,४७,००० सेदी व निर्यात ४६,७३,७८,००० सेदी होती. आयातीपैकी २४% ब्रिटन, १८% अमेरिका, ११% प. जर्मनी आणि ६% जपान यांचेकडून व निर्यातीपैकी २३% ब्रिटन, १८% अमेरिका, १०% प. जर्मनी, ९% नेदर्लंड्स व ९% रशिया यांजकडून होती. १९७१ मध्ये कोको, लाकूड, हिरे, मँगॅनीज यांची निर्यात घटली आणि सोने व बॉक्साइट यांची थोडीशी वाढली. १९७१ ची एकूण आयात ४४,३१,४२,००० सेदी व निर्यात ३५,७४,८४,००० सेदी झाली. १९७० च्या निर्यातीपैकी एकूण ६४% कोको, ८% लाकूड, ७% सोने व ६% कोकोबटर होते. सामान्यतः निर्यातीत लाकूड सु. १२%, सोने सु. ९%, हिरे सु. ६% आणि मँगॅनीज सु. ४% असते. आयातीत मुख्यतः भांडवली साहित्य सु. ३०%, बांधकामसामग्री १५%, इतर कच्चा माल १५%, कापड १३%, अन्नपदार्थ ८% व इंधने सु. ५% असतात.
१९६७ मध्ये ॲक्रा येथे बारा पश्चिमी आफ्रिकी राष्ट्रांनी वेस्ट आफ्रिकन कॉमन मार्केट स्थापन करून एकमेकांतील जकात आणि व्यापारी अडथळे काढून टाकले.
आयात व्यापार मुख्यतः घाना राष्ट्रीय व्यापार महामंडळामार्फत होतो. आयात होणारा पक्का माल व अन्नपदार्थ यांचा व्यापार काही मोठ्या मूळच्या ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन, स्विस कंपन्यांच्या हाती असून काही लेबानी, सिरियन व भारतीय व्यापारीही सु. १०% आयात व्यापार करतात. अंतर्गत व्यापार मुख्यतः अन्नपदार्थ आणि स्थानिक उत्पादनाचा असतो. तो छोट्या व्यापाऱ्यांच्या हाती असून तो बऱ्याच प्रमाणावर स्त्रियांकडे आहे. शासकीय बाजारसमित्या व त्यांचे सहकार पद्धतीचे आणि कंपनीस्वरूप दलालही असतात. स्थानिक बाजार व रस्त्याकडची दुकाने सर्वत्र दिसतात. द बँक ऑफ घाना ही मध्यवर्ती बँक असून ती चलनपुरवठा करते. घाना कमर्शिअल बँकेशिवाय देशात स्टँडर्ड बँक ऑफ वेस्ट आफ्रिका व बार्क्ले बँक यांच्या शाखा सर्वत्र आहेत. यांशिवाय घाना नॅशनल इन्व्हेस्टमेंट बँक, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक इ. बँका आहेत. विम्याचे काम घानाची एक राष्ट्रीय कंपनी व प्रमुख ब्रिटिश कंपन्या करतात.
दळणवळण व वाहतूक : घानाचा परदेश व्यापार बहुधा परदेशी जहाज कंपन्यांमार्फत होतो. तथापि शासकीय ‘ब्लॅक स्टार लाइन’ च्या आधाराने घानाच्या व्यापारी नौकावहनाचा विकास होत आहे. घानाला नैसर्गिक बंदरे नाहीत. टाकोराडी व टेमा दोन्ही कृत्रिम बंदरे आहेत. बंदरे व लोहमार्ग शासनाच्या मालकीचे असून शासनातर्फे चालविली जातात. घानात एकूण सु. ९५१ किमी. मीटरमापी लोहमार्ग असून ते टाकोराडी आणि टेमा या प्रमुख बंदरांना ॲक्रा व कूमासी या प्रमुख शहरांस जोडतात. कोको, लाकूड, खनिजे इत्यादींची बहुतेक वाहतूक लोहमार्गांनी होते. नॉर्दर्न व अपर या विभागांत लोहमार्ग नाहीत. १९७३ मध्ये देशात ३०,७७८ किमी. रस्ते असून त्यापैकी ३,९२० किमी. डामरी आहेत. ६,६१९ किमी. खडीचे रस्ते असून स्वयंचलित वाहने ७४,६०२, त्यापैकी ४२,०९४ प्रवासी गाड्या १५,६९२ मालवाहू गाड्या ४,५४४ मोटार सायकली व ३,०४० खास वाहने होती. काही मोटारगाड्या माल व प्रवासी दोहोंचीही वाहतूक करतात. ॲक्रा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून तेथून घाना एअरवेजची विमाने देशातील व आफ्रिकेतील प्रमुख ठिकाणी व लंडनला जातात. टाकोराडी, कूमासी, टामाली व केप कोस्ट येथे विमानतळ आहेत. १९७१ च्या सुरुवातीस १८७ डाकघरे, ६६९ पोस्टल एजन्सी, ३५९ दूरध्वनी केंद्रे व ६१,१८३ दूरध्वनी होते. घाना नभोवाणी केंद्र ॲक्रा येथे असून इंग्रजी व सहा इतर भाषांतून देशभर ध्वनिक्षेपण केले जाते. आंतरराष्ट्रीय ध्वनिक्षेपण अनेक युरोपीय व आफ्रिकी भाषांतून केले जाते. घाना वृत्तसंस्थेसाठी व खासगी उपयोगासाठी टेलिप्रिंटर सेवा आणि टेलेक्स संपर्कसेवाही उपलब्ध आहे. १९६५ मध्ये दूरचित्रवाणी केंद्रे ॲक्रा, कूमासी, सेकोंदी-टाकोराडी व टामाली येथे सुरू झाली. देशभर सामूहिक दूरचित्रवाणी ग्राहक आहेत. १९७३ मध्ये देशात १०,५७,००० रेडिओ यंत्रे आणि २५,००० दूरचित्रवाणी ग्राहकयंत्रे होती. १९७४ मध्ये उपग्रह दळणवळण केंद्र निघावयाचे होते. १९७४ मध्ये घानात वृत्तसंस्था ३, दैनिके ४, साप्ताहिके १६, पाक्षिके ३, मासिके १३, द्वैमासिके ३, त्रैमासिके २ व इतर ४ नियतकालिके होती.
लोक व समाजजीवन : १९७० मध्ये घानाची लोकसंख्या ८५,५९,३१३ होती. जननप्रमाण हजारी ४७ ते ५२ व मृत्युप्रमाण हजारी २३ आहे. जुलै १९७२ चा लोकसंख्या अंदाज ९०,८७,००० होता. ॲक्रा राजधानीची लोकसंख्या ६,३६,०६७ व ॲक्रा-टेमानगर समूहाची ७,३८,४९८ होती. तसेच कूमासी नगराची २,६०,२८६ व नगरसमूहाची ३,४५,११७ आणि टाकोराडी नगराची ५८,१६१ व सेकोंदी-टाकोराडी नगरसमूहाची १,६१,०७१ होती. लोकवस्तीची सरासरी घनता ३५·९ चौ. किमी. असून ग्रेटर ॲक्रा, सेंट्रल व नॉर्दर्न या विभागाची अनुक्रमे ३२९·३ चौ. किमी., ९०·३४ चौ. किमी. व १०·४२ चौ. किमी. आहे. १९६० च्या जनगणनेप्रमाणे घानात ४२·८% खिस्ती, ३८·२% पारंपरिक जडप्राणवादी, १२% मुस्लिम व ७% निधर्मी लोक होते. १९६८ मध्ये घानात २० लक्ष परकीय लोक होते. घानाची अधिकृत शासकीय भाषा इंग्रजी असली, तरी देशातील ५६ लोकभाषांपैकी नऊ प्रमुख राष्ट्रीय भाषा आहेत. उत्तर घानातील लोक सूदानी भाषांच्या गुर गटाच्या भाषा बोलतात, तर बाकीचे क्वा गटाच्या भाषा बोलतात. उत्तरेकडे डागोंबा बोली बहुतेक सर्वांना समजते. दक्षिणेकडील द्विब, फांटी या आकान भाषा चालतात. आग्नेय भागात गा, आडांग्मी व ईवी भाषा बोलतात. शाळांतून शिक्षणाचे माध्यम इंग्रजी हेच असून कारभाराची व प्रमुख व्यापाराचीही तीच भाषा आहे, फ्रेंच भाषाही चालते.
प्रागैतिहासिक काळापासून घानात निग्रॉइड लोकांची वस्ती आहे. अशांटी व मध्य घानात आकान गटाचे ट्वी लोक राहतात, तर त्याच गटाचे फांटी किनारीभागात राहतात. नैर्ऋत्येस एन् झिमा, आहंता, ईव्हाल्यू वगैरे आहेत. ॲक्रा मैदानी प्रदेशात गा व व्होल्टाच्या पूर्वेकडील भागात ईवी आहेत. आकान टोळ्या बाराव्या व पंधराव्या शतकांत, गा सोळाव्या व ईवी सतराव्या शतकात घानात आले असावेत. उत्तरेकडील बहुतेक लोक व्होल्टाइक लोकांच्या मोशी-डागोंबा गटाचे किंवा गोंजा गटाचे आहेत.
यूरोपीयांच्या संपर्काने त्यांच्या काही गोष्टी घानाच्या लोकांनी अंगीकारलेल्या असल्या, तरी त्यांच्या पुष्कळशा पारंपरिक चालीरीती वगैरे कायम आहेत. स्त्रियांचा वेश बहुधा पारंपरिक पद्धतीचा असतो आणि पुरुषांनी यूरोपीय वेशभूषा पुष्कळशी अंगीकारलेली असली, तरी विशेष समारंभ किंवा उत्सव प्रसंगी ते आपला पारंपरिक रूढ वेशच वापरतात. शहरांत आधुनिक सिमेंट काँक्रीटच्या इमारती, रुंद रस्ते वगैरे दिसतात परंतु लहान गावांत गवती छपराच्या, कुडाच्या अथवा मातीच्या भिंतींच्या वाटोळ्या छोटेखानी झोपड्याच बहुधा असतात.
शिक्षण : प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिक्षण विनाशुल्क व आवश्यक आहे. माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विनाशुल्क आहे. १९७२-७३ मध्ये ६,७३४ प्राथमिक शाळांतून १०,००,५१० विद्यार्थी पूर्व माध्यमिक शाळांतून ६२,४७९ विद्यार्थी १५ शासकीय तांत्रिक संस्थांतून ८,६३२ विद्यार्थी ६१ शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयांतून १५,२७२ शिक्षक विद्यार्थी शिकत होते. ॲक्राजवळील लेगॉन येथील युनिव्हर्सिटी ऑफ घाना, कूमासी येथील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी व केप कोस्ट येथील युनिव्हर्सिटी ऑफ केप कोस्ट यांमिळून १९७२-७३ मध्ये ५,४२१ विद्यार्थी व ९२८ शिक्षक होते. सप्टेबर १९७२ पासून माध्यमिक, पूर्व माध्यमिक, माध्यमिक शाळांतील व शिक्षक व प्रशिक्षण संस्थांतील प्रत्येक विद्यार्थ्याकडूनच पाठ्यपुस्तके व शाळेचे सामान यांसाठी अनुक्रमे ३ ४·५० १८ व १० सेदी शुल्क घेण्यात येऊ लागले. घाना विद्यापीठाला जोडलेल्या प्रौढ शिक्षण संस्थेत १९७१ मध्ये २,५९६ विद्यार्थी होते. या संस्थेने प्रमुख शहरांतून कामगारांसाठी महाविद्यालये काढली आहेत. सार्वजनिक प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिक्षण ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असून केंद्र शासन त्यासाठी भरपूर अनुदान देते. १९५१ नंतरच्या पूर्व माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे वेतन व माध्यमिक शिक्षण ही केंद्र शासनाची जबाबदारी आहे.
आरोग्य : घानात १९७३ मध्ये ४३ शासकीय रुग्णालये, ४९ आरोग्यकेंद्रे, ३ विद्यापीठीय रुग्णालये, २ मनोरुग्णालये, ४ कुष्ठरोग रुग्णालये, ६ सैनिकी रुग्णालये, १ कारागृह रुग्णालय, ४२ मिशन रुग्णालय, १३ खाणी रुग्णालये व ३१ खासगी रुग्णालये होती. परिचारिका व दाई प्रशिक्षणाच्या ११ शाळा आहेत.सेकोंदी व कूमासी येथे आफ्रिकी रोगांचे संशोधन करणारी सु. ३० रुग्णालये आहेत. ७ फिरती वैद्यकीय पथके देशात निरनिराळ्या रोगांचा प्रतिबंध करण्याचे कार्य करीत असतात.
समाजकल्याण : कामगार व समाजकल्याण मंत्रालयामार्फत साक्षरता मोहीम, गृहव्यवस्था, बालसंगोपन, ग्रामविकास, आरोग्य, शेती आणि गृहबांधणीबाबत शिक्षण व सल्ला, रस्तेबांधणी, शालागृहे, पाणीपुरवठा आणि सांडपाणीनिकाल, गावांतील सभागृहे इत्यादींबाबत गावकऱ्यांस मार्गदर्शन व साहाय्य दिले जाते. रुग्णालय आणि औषधपाणी ही अल्प खर्चात पुरविली जातात. शासकीय निवृत्तिवेतन योजना आहे. साक्षरता, बालसंगोपन, कारखाने यांबाबतच्या ग्रामीण आणि नागरी प्रश्नांचे व कायदेकानूंचे कामही हे मंत्रालय पाहते.
ग्रंथालये व संग्रहालये : घाना ग्रंथालय मंडळतर्फे १३ प्रमुख शहरांतून ग्रंथालये चालविली जातात व देशाच्या इतर भागांतील वाचकांस पुस्तके डाकेने पाठविली जातात. समाजकेंद्रे, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, खाणी, मंडळे इत्यादींस ५० पुस्तकांचा एक असे गट आळीपाळीने पुरविले जातात. त्याशिवाय १,५०० पुस्तके असलेली प्रवासी ग्रंथालये देशाच्या निरनिराळ्या भागांत संचार करतात. ॲक्रा येथे १९६२ मध्ये आफ्रिकेतील पहिली ग्रंथालयशिक्षण शाळा काढली गेली. ॲक्रा आणि केप कोस्ट येथे संशोधन असून ॲक्रा येथे एक व्यापारी ग्रंथालय, ३ बाल ग्रंथालये व ११ शाखा ग्रंथालये आहेत.
प्रथमतः घाना विद्यापीठाशी जोडलेल्या व आता संग्रहालये आणि स्मारक मंडळाने चालविलेल्या संग्रहालयात घानाचा इतिहास, संस्कृती, कला, कारागिरी यांच्या शेकडो प्रदर्शनीय वस्तू आहेत. कूमासी येथील सांस्कृतिक केंद्रातही कलेचे अनेक नमुने आहेत. इतिहासविषयक कागदपत्रांचे कसोशीने संरक्षण केले जाते. तसेच घानांची संस्कृती दाखविणारे पारंपरिक संगीत व नृत्य यांचे कार्यक्रम केले जातात व त्याचे शिक्षणही दिले जाते.
कला, क्रीडा इत्यादी : घानाची संस्कृती व वैशिष्ट्य तेथील पारंपरिक संगीत व नृत्य यांत दिसून येते. त्यांची मोठ्या कसोशीने जोपासना करण्यात येते. सॉकर व मुष्टियुद्ध हे अतिशय लोकप्रिय क्रीडाप्रकार आहेत. त्याशिवाय फुटबॉल, घोड्यांच्या शर्यती, टेनिस, शारीरिक कसरती हेसुद्धा तरुणांस विशेष प्रिय आहेत. वेस्ट आफ्रिकन फुटबॉल स्पर्धा घानाने तीन वेळा जिंकली आहे.
महत्त्वाची स्थळे : पर्यटन विकासाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. ऐतिहासिक किल्ले, राखीव वने, सुंदर पुळणी ही प्रवाशांची आकर्षणे आहेत. शासनाने ॲक्रा आणि कूमासी येथे सहा मोठी निवासस्थाने बांधली असून खाजगी निवासस्थाने व उपाहारगृहे वाढली आहेत. ॲक्रा राजधानी, टेमा व टाकोराडी बंदरे, कुमासी, टामाली, केप कोस्ट, आसामांगकेसे, एन्सावाम, स्वेड्रू (अँगोना), ओडा, ओब्वासी, कोफो रीडूआ व बोल्गटांग्गा ही घानातील महत्त्वाची व प्रेक्षणीय स्थळे आहेत.
कुऱ्हेकर, द. वि. कुमठेकर, ज. ब.
“