घाट, नदीचे : नदीच्या पात्रात उतरणे सुलभ व्हावे, तसेच स्नानसंध्या, धुणेपाणी, धार्मिक कृत्ये इ. गोष्टी करणे सोईचे जावे, म्हणून नदीवर दगडी पायऱ्या, बुरुज, फरशा यांच्या केलेल्या रचनेस घाट म्हणतात. घाट बांधण्याची पद्धती व कल्पना खास भारतीय आहे. भारतातील गंगा, यंमुना, गोदावरी, कृष्णा यांसारख्या सर्व मोठ्या नद्यांवर, पुण्यक्षेत्रांच्या ठिकाणी घाट बांधले आहेत. नदीवर घाट बांधणे, हे मोठे पुण्यकर्म मानले जाते. पेशवे, अहिल्याबाई होळकर यांनी अनेक घाट बांधले. घाटांची नावे त्यांच्या वापराप्रमाणे किंवा बांधणाऱ्यांच्या नावांप्रमाणे असतात.

सतराव्या शतकामध्ये रजपूत राजे-महाराजांनी बनारस येथे वैशिष्ट्यपूर्ण घाट बांधले. नागपुरच्या राजाचा गोशाळा घाट, अहिल्यादेवींचा नर्मदेवरील महेश्वरी घाट, उज्जयिनीचा घाट वगैरे प्रसिद्ध आहेत. घाटांच्या पायऱ्यांच्या वरती राजवाडे असून पायऱ्यांचे टप्पे सपाट भागांनी तोडलेले असतात. या सपाट भागांवर धार्मिक विधींसाठी पंडे छत्र्या ठोकून बसतात.

हरद्वार, मिर्झापूर, मोंघीर या ठिकाणी घाट आढळतात. तलावांनाही घाट बांधण्याची पद्धती उत्तर भारतात होती. पाण्याची पातळी जेथवर पोहोचते, तेथे हे घाट सरळ व मजबूत असतात. परंतु वरती अनेक गच्च्या, खिडक्या, छत्र्या नाजुक तीरांवर (ब्रॅकेट) आधारलेल्या असतात. जाळीदार खिडक्या, स्तंभयुक्त ओवऱ्या, सज्जे यांच्या रचनेमुळे घाटाच्या खालच्या बाजूच्या सलग दगडी पायऱ्या आणि वरचे हलके बांधकाम यांच्यातील नयनमनोहर विरोधाभास दृष्टोत्पत्तीस येतो.

कान्हेरे, गो. कृ.