डोडो : पक्षिवर्गाच्या कोलंबिफॉर्मिस या गणातील रॅफिडी कुलात या पक्ष्याचा समावेश केलेला आहे. याचे शास्त्रीय नाव रॅफस क्युक्युलेटस आहे. हिंदी महासागरातील मॅलॅगॅसीच्या पूर्वेस असलेल्या मॅस्करीन बेटांमध्ये (मॉरिशस, रियून्यन, रॉड्रिगेस वगैरे) हा पक्षी मुबलक आढळत असे पण सन १६८१ च्या सुमारास तो लुप्त झाला. हा ⇨ कबुतराचा नातेवाईक होता, असे समजले जाते कोणत्याही प्रकारचा धोका नसलेल्या परिस्थितीत (बेटावर) राहत असल्यामुळे तो आकाराने बराच मोठा झाला आणि त्याची उडण्याची शक्ती नाहीशी झाली.
डोडो साधारणपणे ⇨ टर्की पक्ष्याएवढा आणि अरण्यात राहणारा एक बेढब पक्षी होता. त्याचे शरीर अवजड असून चोच अवाढव्य, मजबूत, आणि काळपट रंगाची होती व तिच्या टोकावर शृंगी आकडा होता नाकाची भोके चोचीच्या टोकाजवळ वरच्या बाजूला होती. डोके फार मोठे होते. पाय मजबूत, जाड आणि आखूड असून पिवळ्या रंगाचे होते. शेपटी अगदीच लहान आणि थोड्या कुरळ्या पिसांच्या गुच्छाची बनलेली होती. पिसारा निळ्या करड्या किंवा तपकिरी रंगाचा होता. छाती व शेपूट पांढरट रंगाचे होते. पंख अल्पवर्धित (फारच थोडी वाढ झालेले) असून पिवळसर पांढऱ्या रंगाचे होते. उरोस्थीवर अगदीच लहानसा कणा होता. हा पक्षी अगदी हळूहळू चालणारा होता.
मादी प्रत्येक खेपेला गवताच्या ढिगाऱ्यावर एकच मोठे पांढरे अंडे घालीत असे. या पक्ष्याच्या समूळ नाशाला माणूस व त्याने आपल्या बरोबर नेलेली डुकरे आणि इतर प्राणी सर्वस्वी जबाबदार आहेत.
इ. स. १६८१ आणि १६८५ मध्ये मॉरिशस बेटावरील चिखलाच्या एका मोठ्या डबक्यात या पक्ष्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांचे नमुने सापडले ते जुळवून याचे सबंध सांगाडे आणि प्रतिकृती तयार करण्यात आल्या. हे सांगाडे आणि प्रतिकृती मॉरिशस आणि यूरोपातील निरनिराळ्या देशांच्या संग्रहालयांत ठेवण्यात आल्या आहेत.
कर्वे, ज. नी.
“