डेल्फ्ट : पश्चिम नेदर्लंड्समधील शहर. लोकसंख्या ८६,१८९ (१९७१). हे स्की नदीवर हेग-रॉटरडॅम मार्गावर आहे. १०७५ मध्ये स्थापन झालेले हे शहर सोळाव्या व सतराव्या शतकांत व्यापाराचे केंद्र होते पण अठराव्या शतकात रॉटरडॅमने यास मागे टाकले. येथील चिनी मातीची भांडी, फरशा, कौले आगळ्या सौंदर्यामुळे ‘डेल्फ्टच्या चिजा’ म्हणूनच विख्यात आहेत. नेदर्लंड्सचा राष्ट्रपुरुष विल्यम दी सायलेंटचा खून येथे झाला. त्याचे थडगे राष्ट्रीय स्मारक समजले जाते. आंतराष्ट्रीय कायद्याचा जनक ग्रोशिअस ह्यूगो आणि चित्रकार जॅन व्हरमेर यांचे जन्मस्थान म्हणूनही डेल्फ्ट प्रसिद्ध आहे. सध्या येथे चिनी मातीची भांडी, मृत्तिकाशिल्प, केबल्स, मद्ये, तेले व पेनिसिलिन इत्यादींचे उद्योग आहेत. येथे तांत्रिक विद्यापीठ (१८४२) जलसंशोधन प्रयोगशाळा, मध्ययुगीन गॉथिक चर्च, सतराव्या शतकातील शस्त्रसंग्रह, आंतरराष्ट्रीय फरशांचा (टाइल्स) संग्रह आणि इतर वस्तुसंग्रहालये इ. संस्था आहेत.

ओक, द. ह.