डेल्फिनियम : (सं. निर्विषी, त्रायमाणा इं. लार्कस्पर कुल-रॅनन्क्युलेसी). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) काही वनस्पतींच्या वंशाचे हे शास्त्रीय नाव असून त्याचा समावेश मोरवेल कुलात [रॅनन्क्युलेसी → रॅनेलीझ] केला जातो. ह्या वंशातील एकूण सु. चाळीस (विलिस यांच्या मते २५०) जाती बहुतेक उ. गोलार्धातील समशीतोष्ण कटिबंधात विशेषेकरून सापडतात. पाच-सहा जाती हिमालय, काश्मीर व तिबेट येथे आढळतात. भारतातील इतर भागांत सु. पंधरा जाती व महाराष्ट्रात एक जाती (डेल्फिनियम डॅसिकॉलोन) जंगलात सापडते. काही थोड्या (डे. ॲजॅसिस) बागेत आणून लावलेल्या आहेत. काही (डे. स्टॅफिसॅग्रिया) औषधी आहेत. सामान्य इंग्रजी भाषेत सर्वांना लार्कस्पर म्हणतात. सर्व जाती एक किंवा अनेक वर्षे जगतात. त्या ओषधीय [→ ओषधि] असून त्यांची पाने एकाआड एक, हस्ताकृती विभागलेली किंवा खंडित (पूर्णपणे विभागलेली) असतात. मंजिऱ्यांवर किंवा परिमंजिऱ्यांवर [फुलोरा → पुष्पबंध] मोठी, निळी, जांभळी, पांढरी किंवा गुलाबी फुले येतात. ती एकसमात्र व द्विलिंगी असतात. प्रदले (पाकळ्या) दोन किंवा चार असून वरच्या दोन पाकळ्यांपासून आलेली शुंडिका (सोंडेसारखी बंद नळी) खालच्या भागाच्या (संवर्त) शुंडिकेत शिरते संवर्ताचे पाच भाग (संदले) असून एकावर ही शुंडिका असते. केसरदले व किंजदले बहुधा अनेक व सर्पिल किंजदले अनेक व सुटी केसरदलांचे तंतू क्वचित तळाशी पसरट पेटिकाफळे एक ते सात, सुटी व अनेकबीजी असतात [→ फूल]. पूर्णपणे विकास झालेली फुले आडवी असून पुढे पेटिकाफळे मात्र उभी वाढतात त्यांतील बीजे जोराच्या वाऱ्यामुळे उधळली जातात [धूपपात्र-यंत्रणा → विकिरण, फळांचे व बीजांचे].
घाट लार्कस्पर : (डे. डॅसिकॉलोन). याला भडक निळी फुले ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये येतात तेव्हा ते फार शोभिवंत दिसते. जुन्नर, पुरंदर, सिंहगड, तोरणा (पुणे जिल्हा) इ. टेकड्यांवर ते कोठे कोठे दिसते.
रॉकट लार्कस्पर : (डे. ॲजॅसिस). यालाही निळी फुले येतात व याची पाने फार विभागलेली असतात. याचे बी कृमिनाशक असल्याने डोक्यातील उवांकरिता आसवरूपात वापरतात. बियांत एक टक्का अल्कलॉइड व एकोणचाळीस टक्के स्थिर (उडून न जाणारे) तेल असते. बहुतेक सर्व जाती विषारी आहेत. वर्षायूंची (एक वर्ष जगणाऱ्यांची) नवीन लागवड बियांपासून व बहुवर्षायूंची (अनेक वर्षे जगणाऱ्यांची) बियांपेक्षा कलमांनी किंवा मुळांच्या तुकड्यांनी करतात. चांगली खतावलेली, खोल, सकस व रेतीयुक्त जमीन आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्यास फुलोरे चांगले येतात. एकदा फुले येऊन गेल्यावर फांद्या छाटून टाकल्यास पुन्हा बहार येतो.
वैद्य, प्र. भ.
“