गंजा, नाताल : (मॉरिशस हेंप, ग्रीन ॲलो लॅ. फर्क्रिया जायगँशिया कुल- ॲमारिलिडेसी). घायपातासारखे दिसणारे हे क्षुप(झुडूप) मूळचे अमेरिकेच्या उष्ण भागातील असून आफ्रिका (नाताल), मॉरिशस, श्रीलंका, वेस्ट इंडीज, भारत इ. अनेक देशांत आढळते. याला उष्ण हवा व भूरपूर पाणी आवश्यक असतात. खोड आखूड आणि भक्कम. पाने सु. २०–४०, व्यस्त अंडाकृती-कुंतसम (भाल्यासारखी), काटेरी, मांसल, चकचकीत हिरवी व सु. १·५ मी. लांब असतात. काटे कडांवर नसतात पण टोकास काटा असतो. फुले व इतर सामान्य लक्षणे ⇨ घायपाताप्रमाणे असतात. पानांपासून निघणारा उपयुक्त धागा ‘मॉरिशस हेंप’ नावाने प्रसिद्ध आहे. तो उत्तम प्रतीचा, पांढरा, लवचिक, नरम, ९०–१२० सेंमी. लांब असतो. प्रत्येक पानाचे वजन सु. ०·९० किग्रॅ. असून दर हेक्टरी सु. १,२४,४००–१,५०,००० पाने व ९·८ टन धागा ही मिळतात. हा धागा घायपातापेक्षा नरम, बारीक व नाजूक असल्याने मॅनिला आणि घायपात यांच्याबरोबर मिसळून मध्यम प्रतीच्या दोऱ्यांकरिता वापरतात. त्यांचा उपयोग बुटाचे तळवे, खोगीर, चटया, पिशव्या (पोती) इत्यादींकरिता करतात. पानांच्या चोथ्यापासून पोटॅश व वुड अल्कोहॉल मिळते. खोडात व कंदिकांत (लहान कंदांत) ‘पॉलिफ्रुक्टोझॅन’ हे द्रव्य असते. बागेत शोभेकरिता व लोहमार्गाच्या दुतर्फा कुंपणाकरिता लावतात. पानांच्या रसात सॅपोनीन हे द्रव्य असून त्यामुळे मासे, डुकरे व ससे यांना विषबाधा होते.

जगताप, अहिल्या पां.