डिझ्नी, वॉल्ट (वॉल्टर) इलायस : (५ डिसेंबर १९०१–१५ डिसेंबर १९६६). सुप्रसिद्ध अमेरिकन व्यंगपटनिर्माता आणि दूरचित्रवाणीवरील व्यंगचित्रमालिकेचा जनक. शिकागो येथे जन्म. शेती, सुतारकाम व ठेकेदारी हे त्याच्या वडिलांचे व्यवसाय असून त्याची आई शिक्षिका होती. डिझ्नी लहान असतानाच त्यांनी मिसूरीजवळील मार्सलीनच्या एका शेतावर स्थलांतर केले. डिझ्नीचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले. याच वेळी त्याला रंगीत चित्रे काढण्याचा छंद जडला. पुढे ते कुटुंब कॅनझस सिटीला गेले व डिझ्नीच्या वडिलांनी तेथे वृत्तपत्रविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या या व्यवसायात डिझ्नी त्यांना मदत करी. याच वेळी त्याने पत्रद्वारा शिक्षण घेऊन व्यंगचित्र-रेखाटनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला व नंतर ‘कॅनझस सिटी आर्ट इन्स्टिट्यूट अँड स्कूल ऑफ डिझाइन’ मधून त्याने कलाशिक्षण घेतले.१९१७ मध्ये डिझ्नी शिकागोला आला. तेथे छायाचित्रण शिकला. एखाद्या वृत्तपत्रामधून व्यंगचित्रकार म्हणून काम करावे, अशी त्याची इच्छा होती परंतु पहिल्या महायुद्धाच्या धुमश्चक्रीमुळे त्याला फ्रान्स व जर्मनीमध्ये अमेरिकन रुग्णपथकात मोटारड्रायव्हिंगचे काम करावे लागले.
यानंतर १९१९ मध्ये डिझ्नी कॅनझस सिटीला परत आला व एका कमर्शियल आर्ट स्टुडिओमध्ये आरेखकाची नोकरी करू लागला. याच ठिकाणी त्याची आयवर्क्सशी ओळख झाली. पुढे या दोघांनी मिळून एक स्टुडिओ काढला व एक चलत्चित्रपटाचा जुना कॅमेरा विकत घेऊन त्याच्या साहाय्याने एक-दोन मिनिटे चालणाऱ्या जाहिरात-फिल्म तयार केल्या. तसेच लॉफ-ओ-ग्राम नावाची एक व्यंगचित्रमालिका व सात मिनिटे चालणारी ॲलिस इन कार्टून लँड ही परीकथामालाही त्यांनी तयार केली परंतु न्यूयॉर्कच्या वितरकाकडून फसविले गेल्यामुळे त्यांनी तो नाद सोडून दिला.
स्नो व्हाइट अँड द सेव्हन ड्वार्फ्स (१९३७) या डिझ्नीच्या संपूर्ण लांबीच्या व्यंगपटाप्रमाणेच पिनोशिओ (१९४०) व डम्बो (१९४०) हे हत्तीच्या कथेवर आधारित व्यंगपटही मुलांना रिझविणारे ठरले. फ्लॉवर्स अँड ट्रीज (१९३२) हा डिझ्नीचा पहिला यशस्वी रंगीत व्यंगपट असून झोरो, डॅव्ही क्रोकेट व वंडरफूल वर्ल्ड ऑफ कलर या त्याच्या दूरचित्रवाणीवरील रंगीत व्यंगचित्रमालिकेने त्याला आर्थिक दृष्ट्या खूपच यश मिळवून दिले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी डिझ्नीने विमानाचे महत्त्व पटवून देणारा व्हिक्टरी थ्रू एअर पॉवर (१९४३) हा चित्रपट काढला, तसेच शासनाला त्याने सैनिकांना शिक्षण-प्रसाराच्या दृष्टीने सहायक ठरणारी एक व्यंगचित्रपट मालिकाही तयार करून दिली. याप्रमाणे डिझ्नीने इतर अनेक यशस्वी व्यंगचित्रपट तयार केले. या क्षेत्रातील त्याच्या या अपूर्व, कल्पनारम्य व मनोरंजक कामगिरीबद्दल त्याला बरीच पारितोषिके व पुरस्कार मिळाले. पाच वर्षे खपून ॲनाहीम येथे १९५५ मध्ये डिझ्नीने ⇨ डिझ्नीलॅंड नावाची एक अद्भुतरम्य व विस्तीर्ण नगरी तयार केली. या अभिनव नगरीची कल्पना त्याला मिसूरी येथील वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण वातावरणातून स्फुरली, असा उल्लेख आढळतो. एक कलावंत म्हणून डिझ्नीचे वैशिष्ट्य त्याच्या अद्भुत कल्पनाप्रवण मनोवृत्तींत आढळते. तथापि त्याच्या एकूण निर्मितीत हिंसकता, क्रौर्य, परपीडन यांचेही अनिष्ट दर्शन घडते, असे म्हटले जाते. त्याची सौंदर्याभिरुचीही काहीशी उथळ मानली जाते. तथापि आपण एक प्रदर्शक आहोत व आपली निर्मिती हा एक प्रदर्शन-व्यवसाय आहे, हे त्याचे समर्थन पुरेसे सूचक आहे. लॉस अँजेल्स येथे १९६६ मध्ये डिझ्नीचे निधन झाले.
“