डिंभ : एखाद्या प्राण्याची भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था. अंडी घालणाऱ्या पुष्कळ प्राण्यांच्या अंड्यांत वाढणाऱ्या भ्रूणाच्या पूर्ण विकासाला जरूर असणारे पीतक (अंड्यातील पोषक निर्जीव द्रव्य) साठविलेले असते म्हणून अंड्यातून बाहेर पडणारा प्राणी प्रौढासारखाच असतो किंवा तो प्रौढाची लहान प्रतिकृतीच असतो, असे म्हटले तरी चालेल. पण कित्येकदा लहान अंड्यात पुरेसे पीतक नसते. यामुळे काही ठराविक अवस्थेपर्यंत भ्रूणाचा विकास होऊन तो तेथेच थांबतो. अशा प्रकारात वाढ होणारा भ्रूण त्या अवस्थेतच क्रियाशील बनून स्वतःला लागणारे अन्न मिळविण्याची शक्ती त्याच्या अंगी उत्पन्न होते. दिसण्यास जनकांपेक्षा तो अगदी निराळा असतो. अशा पूर्व अवस्थेतील प्राण्याला त्याचा डिंभ म्हणतात. हा डिंभ स्वतंत्रपणे कालक्रमण करतो. बेडकाच्या अंड्यातून बाहेर पडणाऱ्या प्राण्याला भैकेर म्हणतात, परंतु तो बेडकाचा डिंभच असतो. काही काळ स्वतंत्रपणे कालक्रमण केल्यानंतर त्याचे रूपांतरण होऊन त्याच्यात प्रौढाची लक्षणे उत्पन्न होतात. सुरवंट हा फुलपाखराचा अथवा पतंगाचा डिंभ होय. तो प्रौढापेक्षा अगदी निराळा असतो. प्रौढदशा येण्यापूर्वी त्याला आणखी एका अवस्थेतून जावे लागते. या अवस्थेला कोश म्हणतात. या अवस्थेतच प्रौढाची सगळी लक्षणे उत्पन्न होतात. याच प्रकारे डास आणि माशी यांच्या जीवनवृत्तात डिंभावस्था व प्रौढदशा यांच्या मध्ये कोशावस्था आढळते.
डिंभ हे त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या प्रौढांपेक्षा नेहमी इतके निराळे असतात की, त्या दोहोंमधील संबंध अनेकदा दीर्घ काळ अनिश्चित राहतात. यामुळे पुष्कळ डिंभांना जणू काही ते स्वतंत्र प्राणी आहेत, अशा समजुतीने द्विपद-नाम-पद्धतीने नावे दिली गेली आहेत. १८४६ मध्ये जे. पी. म्यूलर यांना एक लहान प्लवकजीवाचा (पाण्यावर तरंगणाऱ्या जीवाचा) शोध लागला. त्यांनी त्याचे वर्णन प्रसिद्ध करून त्याला ॲक्टिनोट्रॉका ब्रँकिएटा हे नाव दिले. अकरा वर्षांनंतर राइट यांना समुद्रतळावर राहणाऱ्या एका कृमिसदृश प्राण्याचा शोध लागला. या प्राण्याला हल्ली फोरोनिस म्हणतात. पुढे १८६७ मध्ये ए. ओ. कव्हल्येव्हस्कइ यांनी ॲक्टिनोट्रॉका ब्रँकिएटा हा फोरोनिसाचा डिंभ आहे, असे दाखवून दिले.
प्राण्याची डिंभावस्था त्याच्या जीवनात पुष्कळ विविध कार्ये आणू शकते. पुष्कळ जलीय प्राणी प्रौढावस्थेत कमीजास्त प्रमाणात स्थिर असतात काही तर समुद्र, सरोवरे अथवा नद्या यांतील खडकांना, वनस्पतींना किंवा इतर पदार्थांना चिकटूनच राहतात. अशा प्राण्यांचे डिंभ सामान्यतः चर असतात किंवा तसे नसले, तर निदान पाण्याच्या प्रवाहाबरोबर किंवा लाटांबरोबर ते अगदी दूरच्या जागी जातात. केवळ या प्रकारेच अशा प्रणिजातींना दूरच्या राहण्यायोग्य जागी वसती करता येते व त्यांचा प्रसार होतो. स्पंज, समुद्र-पुष्पे, पुष्कळ मॉलस्क (मृदुकाय) प्राणी व सागरी कृमी यांचे डिंभ अशा प्रकारे कार्य करतात. डिंभावस्थेच्या अशा तऱ्हेच्या उपयोगाचे परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणारे) कृमी हे एक उदाहरण म्हणून देता येईल. हे प्राणी पोषकाच्या (ज्या जीवापासून अन्न व संरक्षण मिळवितो त्याच्या) शरीरात प्रवेश मिळविण्याकरिता किंवा पोषकाच्या शरीरातून बाहेर पाडण्याकरिता डिंभाचा उपयोग करतात.
डिंभाचे आयुष्य हे मुख्यतः वृद्धि-अवस्था असू शकते. हजारो किंवा लाखो अंडी घालणाऱ्या प्राण्यांची अंडी साहजिकच अगदी लहान किंवा सूक्ष्म असतात. अशा अंड्यातून बाहेर पडणारा प्राणी, त्याचे पोषण सुरू होण्यापूर्वी, अगदीच लहान असतो व म्हणून त्याला प्रौढाप्रमाणे (तो ज्या जातीचा असतो त्या जातीच्या) राहणे अशक्य होते. अशा परिस्थितीत डिंभावस्थेतील पोषणामुळे प्राणी रूपांतरणोत्तर प्रौढाचे अंतिम आकारमान गाठू शकतो (उदा., पुष्कळ कीटकांतल्याप्रमाणे) अथवा प्रौढाच्या ज्या कमीतकमी आकारमानाच्या अवस्थेपासून पुढे वाढ होऊ शकते, ती अवस्था तो गाठू शकतो (उदा., बेडकाप्रमाणे).
सामान्यतः डिंभ अपक्व रूपे असून रूपांतरणानंतर आलेल्या प्रौढ दशेत लैंगिक पक्वता उत्पन्न होते. तथापि, अकालिक लैंगिक पक्वता उत्पन्न होऊन डिंभांनी प्रजोत्पादन केल्याची उदाहरणे आहेत. सॅलॅमँडराचा ॲक्झोलोटल डिंभ व पॉलिस्टोमा हा परजीवी कृमी ही याची सुप्रसिद्ध उदाहरणे होत. अशा घटनेचा स्पष्टार्थ हाच की, तीमुळे एखाद्या जातीला आपली प्रौढावस्था विकासीय बदलाने अजिबात टाळता येते. चिरडिंभतेची (ठराविक काळानंतरही डिंभांची लक्षणे दिसून येण्याच्या घटनेची) ही प्रक्रिया प्राण्यांच्या पुष्कळ मुख्य गटांच्या पूर्व क्रमविकासामध्ये (उत्क्रांतीमध्ये) विशेष महत्त्वाची होती, असा समज आहे आणि पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणारे) प्राणी हे स्थानबद्ध प्रौढ पण मुक्तप्लावी (स्वतंत्रपणे पोहणारे) डिंभ असणाऱ्या एखाद्या अपृष्ठवंशी स्कंधापासून (पाठीचा कणा नसणाऱ्या प्राण्यांच्या शाखेपासून) चिरडिंभतेने उत्पन्न झाले असले पाहिजेत, असे मानावयास सबळ कारणे आहेत.
कधीकधी काही प्राण्यांचे प्रौढदशेमध्ये एकमेकांशी फारसे साम्य नसले, तरी त्यांचे डिंभ इतके सारखे असतात की, त्यांतील फरक ओळखणे कठीण जाते. काही सागरी अकॉर्न (बॅलॅनोग्लॉसस, सॅक्कोग्लॉसस इ.) टॉर्नारिया डिंभाचे तारामिनाच्या बायपिनॅरिया डिंभाशी निकट साम्य असते. या डिंभांपासून तयार होणाऱ्या प्रौढांत स्वरूपाच्या वा रचनेच्या दृष्टीने कोणतेही सादृश्य नसते. त्यांच्या डिंभांच्या साम्यावरून भूतकाळातील त्यांचा क्रमविकास समाईक असावा, असे सूचित होते. डिंभांच्या आकारविज्ञानाच्या (प्राण्याच्या संरचनेचा व रूपांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या) शोधक परीक्षणामुळे कित्येक प्राण्यांचे क्रमविकासी संबंध प्रस्थापित करण्यास मदत झाली आहे.
पहा : चिरडिंभता डिंभजनन.
कर्वे, ज. नी.
“