डॅम्पिअर, विल्यम : (१६५२–१७१५). पश्चिम ऑस्ट्रेलियाला भेट देणारा पहिला ब्रिटिश दर्यावर्दी व नाविक अधिकारी. त्याचा जन्म ईस्ट कोकर (सॉमरसेट) येथे एका खंडकऱ्याच्या कुटुंबात झाला. वयाच्या सातव्या वर्षी त्याचे वडील वारले, तरीदेखील जमीनदाराच्या मदतीमुळे त्याला प्राथमिक शिक्षण पुरे करता आले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने न्यू फाउंडलंड व ईस्ट इंडीज प्रदेशांत सफरी केल्या. डच युद्धातही (१६७२–७४) त्याने भाग घेतला. त्यानंतर जमेकामधील माळ्यावर त्याने अल्पकाळ काम केले. १६७९ ते १६९१ च्या दरम्यान तो निरनिराळ्या दर्यावर्दी चाच्यांच्या संघात होता. १६८८ मध्ये तो प. ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर पोहोचला. तेथून आग्नेय आशियातील बंदरांना भेटी देऊन तो १६९१ मध्ये इंग्लंडला परतला व तेथेच १६९९ पर्यंत राहिला. याच काळात अखेरीअखेरीस त्याने ए न्यू व्हॉयिज राउंड द वर्ल्ड (१६९७), व्हॉयिजीस अँड डिस्कव्हरीज (१६९९) व ए डिस्कोर्स ऑफ विंड्स (१६९९) ही पुस्तके प्रसिद्ध केली. ही पुस्तके लोकप्रिय ठरून डॅम्पिअरला मोठी प्रतिष्ठा लाभली.
ब्रिटिश नौ-अधिकरणाने त्याची योग्यता ओळखून त्याला कॅप्टनपद दिले व नैर्ऋत्य पॅसिफिकच्या संशोधनाच्या मोहिमेवर त्याची नेमणूक केली. सफरीत प. ऑस्ट्रेलियाजवळील बेटसमूह ( डॅम्पिअर आर्किपेलगो) तसेच न्यू ब्रिटन हे बेट व त्याला न्यू गिनीशी जोडणारी सामुद्रधुनी (हीदेखील त्याच्याच नावाने ओळखली जाते) त्याने शोधून काढली. परतीच्या मार्गावर दक्षिण अटलांटिक महासागरातील ॲसेन्शन बेटांजवळ त्याचे जहाज बुडाले पण डॅम्पिअर व त्याचे सहकारी यांना मात्र वाचविण्यात आले. इंग्लंडमध्ये परतल्यावर आपल्या एका अधिकाऱ्याचा अवमान केला म्हणून त्यावर सेना न्यायालयात खटला करण्यात आला. परिणामतः त्याची नाविक सेवा संपुष्टात आली.
१७०३ पासून १७०७ पर्यंत डॅम्पिअर अयशस्वी ठरलेल्या साउथ सीमधील लूटमारीच्या मोहिमेवर होता. पुढील तीन वर्षे (१७०८–११) त्याने कॅप्टन वुड्स रॉजर्सबरोबर त्याच भागात सफरी केल्या. या सफरीतच वान फेर्नांदेस बेटावर एकाकीपणे अडकून पडलेल्या अलेक्झांडर सेल्कर्कची त्यांनी सुटका केली. डॅन्यल डीफो याला रॉबिन्सन क्रूसो ही कादंबरी लिहिण्याची प्रेरणा त्याच्यापासूनच मिळाली, असे म्हणतात. या दुसऱ्या सफरीत डॅम्पिअरला खूप फायदा झाला पण तो प्रत्यक्षात हाती पडण्यापूर्वीच तो लंडन येथे मरण पावला. भ्रमंतीचे वेड व नव्या अनुभवांची व ज्ञानाची ओढ ही आपल्या सागरी मोहिमांची उद्दिष्टे होत, असे त्याने म्हटले आहे.
संदर्भ : 1. Lloyd, C. William Dampier, London, 1967.
2. Wilkinson, C. Dampier: Explorer and Buccaneer, 1929.