डलूथ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिनेसोटा राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर. ते सु. २०० ते २५० मी. उंचीच्या एका भूशिरावर, सुपीरिअर सरोवराच्या पश्चिम टोकावर व सेंट लुईस नदीच्या मुखावर वसले आहे. हे शहर सेंट पॉल शहराच्या ईशान्येस २२५ किमी. अंतरावर आहे. लोकसंख्या १,००,५७८ (१९७०). येथील बंदर डलूथ-सुपीरिअर या जोडनावाने प्रसिद्ध असून अमेरिकेतील ते एक मोठे व उत्तम नैसर्गिक बंदर आहे. डलूथ किंवा दान्येल ग्रेसॉलाँ द्यूल्यूत या फ्रेंच समन्वेषकाने १६७९ मध्ये प्रथम हे शोधून काढले. म्हणून त्याला ‘डलूथ’ हे नाव देण्यात आले तथापि १८७० नंतरच त्यास शहराचा दर्जा प्राप्त झाला. त्याच्या आसपास लोखंडाच्या विपुल खाणी असल्यामुळे येथून कच्चे लोखंड व धान्य निर्यात होते आणि कोळसा आयात होतो. डलूथ येथे लोखंड शुद्ध करण्याचे, पोलाद व इतर कारखाने आहेत. युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनच्या मॉर्गन पार्क ह्या उपनगरात एक जंगी पोलादनिर्मितीचा कारखाना आहे. डलूथ येथे कृषी अवजारे, दूरध्वनी यंत्रे, पेये, लाकडाच्या गिरण्या, संग्रहागाराला लागणारी यंत्रे, कातडी कमावणे, मृत्तिकाशिल्प वगैरेंची उत्पादने आहेत. येथील बंदराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील कालव्यावरील विद्युत उद्वाहक पूल. हा पूल केवळ ५५ सेकंदांमध्ये ४२ मी. उंच उचलला जातो व कालव्यातून आगबोट जाऊ शकते. शहरात स्कायलाइन पार्क वे, पशुसंग्रहालय, ग्रंथालय, पदार्थसंग्रहालय, मत्स्यालय, शिशुसंग्रहालय इ. प्रेक्षणीय स्थळे व पदवीपूर्व महाविद्यालय, शिक्षक विद्यालय, धर्म व तत्त्वज्ञान महाविद्यालय इ. शैक्षणिक सोयी उपलब्ध आहेत. शहराचा व सरोवराचा विहंगम देखावा पाहण्याकरिता असंख्य प्रवासी येतात. आठ मार्गांनी डलूथ विविध शहरांशी जोडले असून येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ जगप्रसिद्ध आहे. सुखसोयी व नैसर्गिक दृश्ये यांमुळे ते पर्यटनाचे केंद्र झाले असून सुखद हवामानामुळे भूशिर वातानुकूलीत शहर म्हणून ख्यातनाम आहे.