डंडी–१ : स्कॉटलंडमधील तागवस्तूंसाठी प्रसिद्ध शहर. लोकसंख्या १,८०,६७४ (१९७३ अंदाज). ग्लासगोच्या खालोखाल औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे. हे शहर फर्थ ऑफ टे खाडीतीरावरील बंदर असून ते एडिंबरोपासून सु. ६४ किमी. आहे. येथील मूळ व्यवसाय मासेमारी. तागाचा धागा व देवमाशाचे तेल यांपासून बनविलेले कापड औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरल्यामुळे हे एकदम भरभराटीस आले. तागी कापड, कॅन्व्हास, दोरखंड, पोती, गालिचे यांचे तेथे उत्पादन होते. जहाज बांधणी, तेलशुद्धी, मासे डबाबंदी, डांबर, धातूंचे ओतकाम, कापड विरंजन, यंत्रे, विद्युत् उपकरणे, बिस्किटे इ. व्यवसायही चांगले चालतात. रोमन काळाच्याही पूर्वीचे या प्राचीन शहरावर बाराव्या-तेराव्या शतकांनंतर इंग्रजांनी अनेक हल्ले करून मोठा रक्तपात केला. नवीन बांधणीत एक जुनी वेस व चर्च एवढेच अवशेष राहिले आहेत. विद्यापीठ, महाविद्यालये, नाविक शाळा, शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालय इ. शैक्षणिक सोयी आहेत. येथील मनोरुग्णालय, ब्रोटी दुर्ग आणि ब्रोटी फेरी ही सधनांची विश्रामस्थाने प्रसिद्ध आहेत. उत्तर युरोप, भारत, पाकिस्तान व इतर देशांशी सतत संपर्क असतो.