डंकर्क : उत्तर फ्रान्सच्या नॉर प्रांतातील डोव्हर सामुद्रधुनींवरील महत्त्वाचे तिसऱ्या क्रमांकाचे बंदर व औद्योगिक शहर. ते कॅलेच्या ईशान्येस ३७ किमी. आणि लीलच्या वायव्येस सडकेने ७९ किमी. आहे. लोकसंख्या २७,५०४ (१९६८). लील, तूर्क्वीं, रूबे यांसारख्या औद्योगिक शहरांकरिता हेच सोयीचे बंदर आहे.

‘वाळूच्या टेकड्यांमधील चर्च’ असा अर्थ असलेले हे तटबंदीचे शहर सु. दहाव्या शतकात वसविले गेले. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, नेदर्लंड्स व पवित्र रोमन साम्राज्य यांच्यामधील चार-पाच शतकांच्या संघर्षामुळे ते निरनिराळ्या देशांच्या अंमलाखाली राहिले. १६६२ मध्ये फ्रान्सच्या चौदाव्या लुईने ते इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सकडून कायमचे विकत घेतले. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत जर्मन तोफांच्या भाडिमारामुळे डंकर्कची अपरिमित हानी झाली. ‘डंकर्कची माघार’ ही दुसऱ्या महायुद्धातील चित्तथरारक, निर्णायक व आश्चर्यकारक घटना मानली जाते. जर्मन सेनेची झंझावात आगेकूच व पिछेहाटीचे खुष्कीचे सर्व मार्ग बंद झालेले असतानाही २६ मे ते ४ जून १९४० या अल्पकाळात दोस्त राष्ट्रांचे सु. साडेतीन लक्ष सैन्य समुद्रमार्गे इंग्लंडला यशस्वीपणे हलविण्यात आले. इंग्लंडच्या हवाईदलाने बहुमोल कामगिरी बजावली. ९ मे १९४५ रोजी दोस्त राष्ट्रांनी डंकर्क जर्मनांपासून परत मिळविले त्या वेळी डंकर्कची ८५ टक्के हानी झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर डंकर्क बंदराची पुनर्रचना करण्यात आली. बंदरधक्क्यांची लांबी १४ किमी. असून अद्ययावत यंत्रणेने बंदर सुसज्ज आहे. तेलटाके जहाजही बंदरात थांबू शकते. बंदरात तीन सुक्या व दोन तरत्या गोद्या आहेत. इंधनतेल, कोळसा, फॉस्फेट व खनिजे यांची आयात, तर साखर, सिमेंट व रासायनिक पदार्थ यांची निर्यात या बंदरामधून होते. जहाज बांधणी, तेलशुद्धीकरण आणि लोखंड व पोलाद हे उद्योगही येथे आहेत.

ओक, द. ह.