ट्रीएस्ट : इटलीच्या ईशान्य भागातील ट्रीएस्ट प्रांताची राजधानी व एड्रिॲटिक समुद्रावरील बंदर. लोकसंख्या २,७२,४२३ (१९७३). हे व्हेनिसच्या ईशान्येस ११२ किमी. आहे. येथील हवामान सौम्य असले, तरी जुलै-ऑगस्टमध्ये उष्मा बराच होतो व हिवाळ्यात तापमान गोठणबिंदूखाली क्वचितच जात असले, तरी बोरा हे कधी कधी ताशी १६० किमी. वेगाने वाहणारे बोचरे वारे त्रासदायक ठरतात. हे महत्त्वाचे व्यापारी व औद्योगिक शहर सिंप्लॉन ओरिएंट एक्स्प्रेस मार्गावर असून मध्य यूरोपातील देशांची उतारपेठ असल्याने येथील वाहतुकीला जागतिक महत्त्व आहे. ट्रीएस्टच्या आखाताजवळ या बंदराचा विस्तार १२·८ चौ. किमी. असून उत्तरेकडील जुने मुक्त बंदर आणि दक्षिणेकडील नवे मुक्त बंदर तसेच मध्यभागातील जकात विभाग, असे याचे तीन स्पष्ट भाग पडलेले दिसतात. झाले हा औद्योगिक विभाग दुसऱ्या महायुद्धानंतर विकसित झाला आहे. ट्रीएस्टच्या मोठमोठ्या जहाज बांधणी व दुरुस्ती, गोद्या व तेलशुद्धीकरणाचे कारखाने विख्यात असून पोलाद, दगडी कोळशाच्या गॅसची एंजिने, जहाजांची एंजिने, याऱ्या, तागाचे कापड व पोती, विविध मद्ये, सिगारेटींचे कागद, रंग, व्हार्निश असे विविध उत्पादन येथील कारखान्यांतून होते. महत्त्वाचे बंदर व व्यापारी शहर असल्याने येथे विमा व जहाज कंपन्यांच्या मोठमोठ्या कचेऱ्या आहेत. १९२४ मध्ये येथे विद्यापीठाची स्थापना झाल्यापासून शैक्षणिक क्षेत्रातही याचे महत्त्व वाढले आहे. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या ट्रीएस्टमध्ये रोमनकालीन व मध्ययुगीन प्रार्थनामंदिरे, किल्ले, वाडे यांचे अवशेष आहेत. येथील इतिहास, कला व विज्ञानविषयक संग्रहालयेही समृद्ध व प्रेक्षणीय आहेत.
ट्रीएस्टची रोमन वसाहत वैभवसंपन्न होती. मध्ययुगात व्हेनिसशी झालेल्या स्पर्धेत याची स्थिती खालावली. तेराव्या शतकापासून ट्रीएस्ट ऑस्ट्रियाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभावाखाली होते, तरी त्याचे इटालीय स्वरूप बदलले नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर शहराची स्थिती खालावली तरी इटली आणि यूगोस्लाव्हियात त्यासाठी संघर्ष सुरू झाल्याने इंग्लंड, अमेरिकेच्या मध्यस्थीने १९४७ मध्ये ट्रीएस्टची मुक्त भूमी म्हणून सु. ५१८ चौ. किमी. क्षेत्रफळाचा पट्टा संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या देखरेखीखाली सोपविण्यात आला. बऱ्याच वादानंतर १९५४ मध्ये इटली यूगोस्लाव्हियात तह होऊन मुक्त भूमीचे अ व ब विभागात विभाजन होऊन अ इटलीला आणि ब यूगोस्लाव्हियाला मिळाला. अ विभागात सु. २,२५,००० नागरिक, सु. २३७ चौ. किमी प्रदेश व ट्रीएस्ट बंदर आणि ब मध्ये सु. ७५,००० नागरिक व ५२३ चौ. किमी.चा ग्रामीण विभाग गेला असून ट्रीएस्ट बंदर शुल्कमुक्त ठेवण्यात आले आहे.
ओक, द. ह.
“