ट्रिमॅटोडा : प्लॅटिहेल्मिंथिस संघाच्या (पृथुकृमी संघाच्या) तीन वर्गांपैकी एक. या वर्गातील चापट कृमी अथवा पर्णाभकृमी इतर प्राण्यांच्या (बव्हंशी पृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांच्या) शरीरावर किंवा शरीराच्या आत परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणारे) असतात. या प्राण्यांत कोशिकामय (पेशीमय) बाह्यत्वचा व पक्ष्माभिका (हालचालींना उपयुक्त अशा केसांसारख्या वाढी) नसतात, परंतु सर्व शरीर सामान्यतः उपत्वचेने आच्छादिलेले असते. पुढच्या टोकाशी मुखाभोवती एक चूषक असतो व अधर पृष्ठावर एक किंवा अधिक चूषक असतात. यांचा उपयोग पोषकाच्या (ज्याच्यावर परजीवी राहतो त्याच्या) शरीराला चिकटण्याकरिता होतो. बहुतेक ट्रिमॅटोडांमध्ये आहारनाल (अन्नमार्ग) असतो. सामान्यतः हे प्राणी उभयलिंगी असतात म्हणजे पुंजननेंद्रियी व स्त्रीजननेंद्रिये एकाच व्यक्तीत आढळतात. परजीवी आयुष्यक्रमाकरिता प्रौढ प्राण्याचे पूर्णपणे अनुकूलन (ज्या प्रक्रियेने विशिष्ट परिस्थितीत प्राणी राहण्यास योग्य होतो ती प्रक्रिया) झालेले असते. पोषकाच्या ऊतकांवर (समान रचना आणि कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांवर) किंवा शरीरातील द्रव पदार्थांवर हे प्राणी उपजीविका करतात. आपल्या स्नायुमय ग्रसनीचा (घशासारख्या अवयवाचा) उपयोग करून ते भक्ष्य पदार्थ चोखून घेतात. पण ज्या अगदी थोड्या ट्रिमॅटोडांमध्ये आहारनाल नसतो ते आपल्या देहभित्तीमधून पोषक पदार्थ शोषून घेतात. स्नायूंचे स्तर, उत्सर्जनेंद्रिये (निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकणारे अवयव) आणि तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) ही ⇨टर्बेलॅरियातल्याप्रमाणेच जटिल असतात.
ॲस्पिडोकॉटीलिया गण : या गणात एकच कुल असून त्यातील कृमी बहुधा मासे, कूर्म, कालवे इ. प्राण्यांच्या शरीरांत परजीवी असतात. सामान्यतः पोषक असतो. प्रौढांच्या अधर (खालील) पृष्ठावर एकच मोठा चूषक असतो. उदा., ॲस्पिडोगॅस्टर आणि स्टायकोकॉटिल.
माणसाच्या शरीरात परजीवी असणारे कित्येक पर्णाभकृमी उष्ण कटिबंधातील देशांत आढळतात यांपैकी शिस्टोसोमा हा महत्त्वाचा होय, कारण त्याच्यामुळे माणसाला ‘शिस्टोसोमियासिस’ हा रोग जडतो [→ खंडितकायी – कृमिरोग]. अतिपूर्वेकडील देशांमध्ये वेगवेगळ्या जातींच्या परजीवी पर्णाभकृमींकडून माणसांच्या निरनिराळ्या अंगांवर आक्रमण झालेले दिसून येते. ऑपिस्थॉर्किस यकृत दूषित करतो पॅरॅगोनिमस फुप्फुसांवर परिणाम करतो आणि फॅसिओलॉप्सिस व हेटेरोफाइज आत्रांला रोगट बनवितात. पौर्वात्य देशांतील पर्णाभकृमींच्या बेसुमारपणाचा संबंध अन्न न शिजविता खाण्याच्या त्या देशांतील पद्धतीशी जोडण्यात येतो.
यकृत पर्णाभकृमीचे जीवनचक्र : माणसाळलेल्या किंवा पाळीव प्राण्यांमध्ये कित्येक पर्णाभकृमी आढळतात. यांच्यापैकी सर्व जगात आढळणारा मेंढ्यांच्या आणि गुरांच्या शरीरात सापडणारा आणि ज्याचा
विशेष अभ्यास झालेला आहे असा फॅसिओला हेपॅटिका (यकृत पर्णाभकृमी) हा एक होय. हा पानासारखा दिसणारा मोठा पर्णाभकृमी ३० मिमी. लांब व १० मिमी. रुंद असून यकृताच्या पित्तवाहिन्यांमध्ये राहतो. शरीराच्या पुढच्या टोकाशी मुखाभोवती अग्र चूषक असतो. याच्याजवळच मागच्या बाजूला अधर पृष्ठावर पश्च किंवा अधर चूषक असतो. या दोहोंच्या मध्ये जनन-रंध्र असते. मुख, स्नायुमय ग्रसनी, आखूड ग्रसिका (ग्रसनी व जठर यांतील आहारनालाचा भाग) आणि द्विशाखित आंत्र यांचे पचन तंत्र बनलेले असते. आंत्राच्या प्रत्येक शाखेपासून अंधनाल (बंद पिशव्या किंवा नळ्या) निघालेले असून ते आणि त्यांच्या शाखा सर्व शरीरात पसरलेल्या असतात. स्नायू जटिल असून आंतरेद्रियांच्या मधून असणाऱ्या जागा मृदूतकाने (द्रवाने अथवा बुळबुळीत आधार-द्रव्याने भरलेल्या जागांनी विभक्त झालेल्या कोशिका असलेल्या आणि साधारणपणे मध्यस्तरापासून उत्पन्न झालेल्या अनिश्चित आकाराच्या मऊ स्पंजासारख्या ऊतकाने) भरलेल्या असतात. उत्सर्जन तंत्रात (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणाऱ्या संस्थेत) पुष्कळ ज्वालाकोशिका (एक प्रकारच्या पोकळ, टोकावर असलेल्या आणि ज्यांच्यात सतत हलणाऱ्या पक्ष्माभिकांचे समूह असतात अशा उत्सर्जक कोशिका) असून त्या एका मुख्य नालाला जोडलेल्या असतात व हा नाल मागच्या टोकाकडे एका छिद्राने बाहेर उघडतो. तंत्रिका तंत्रामध्ये ग्रसनीभोवती असणारे तंत्रिका-वलय, त्याच्यावर असणारी एक मध्य अधर गुच्छिका (ज्यांच्यापासून मज्जातंतू निघतात अशा तंत्रिकाकोशिकांचा समूह) व दोन पार्श्व गुच्छिका आणि दोन पार्श्व तंत्रिकारज्जू (मज्जारज्जू) यांचा समावेश होतो. हा कृमी उभयलिंगी आहे.
अंडी पित्तवाहिनीमधून पित्ताबरोबर आहारनालात जातात आणि तेथून ती विष्ठेबरोबर शरीराबाहेर जातात. या जागी पाणी असले, तर ती फुटतात. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पक्ष्माभिकायुक्त डिंभाला ‘मिरॅसीडियम’ म्हणतात. हा डिंभ काही काळ पोहत राहतो. त्याला त्याचा ठराविक मध्यस्थ पोषक (लिम्निया ही गोगलगाय) आढळला, तर तो त्याच्या शरीराला भोक पाडून त्याच्या ऊतकात शिरतो पण ही गोगलगाय
जर आढळली नाही, तर काही तासांतच हा डिंभ मरतो. गोगलगायीच्या शरीरात अलिंगी रीतीने डिंभांची एक नवी पिढी तयार करून अखेरीस गोगलगायीच्या शरीरात तो मरतो. नवीन उत्पन्न झालेला डिंभ पिशवीसारखा असून त्याच्या अंगावर पक्ष्माभिका नसतात याला ‘रेडिया’ म्हणतात. रेडिया गोगलगायीच्या यकृतात शिरतो आणि तेथे अलिंगी रीतीने तो डिंभांची आणखी एक पिढी तयार करतो. या तिसऱ्या पिढीतील डिंभाला ‘सरकॅरिया’ म्हणतात. हा एखाद्या लहान पर्णाभकृमीसारखा दिसतो, पण त्याला लांब शेपटी असते. गोगलगायीच्या शरीरातून बाहेर पडून तो पाण्यात शिरतो तेथे काही काळ पोहत राहतो आणि अखेरीस पाण्याच्या कडेने असणाऱ्या गवताच्या पात्याला चिकटतो नंतर त्याची शेपटी निघून जाते आणि शरीराचे एका बारीक पुटीत (कोशिकेला वेढणाऱ्या निर्जीव कलेत) रूपांतर होते. ही सांसर्गिक अवस्था असून चरणाऱ्या मेंढीच्या किंवा बैलाच्या पोटात गेल्याशिवाय तिची पुढे वाढ होत नाही. या प्राण्यांच्या पाचक रसामुळे पुटीची भित्ती फुटून पर्णाभकृमीचे पिल्लू आंत्रात मोकळे होते आणि यकृतात स्थलांतर करते. यानंतर त्याची वाढ होऊन त्याला प्रौढ दशा येते. एखाद्या पित्तवाहिनीत जाऊन तेथे कायम राहण्यापूर्वी यकृताच्या ऊतकांमधून हिंडत असताना यकृताला पुष्कळ इजा पोहोचते. यकृत पर्णाभकृमीच्या वर थोडक्यात दिलेल्या जीवनचक्रावरून असे दिसून येईल की, गोगलगायीच्या शरीरात एका अंड्यापासून शेकडो सांसर्गिक सरकॅरिये उत्पन्न होतात.
पहा : टर्बेलॅरिया प्लॅटिहेल्मिंथिस.
कर्वे, ज. नी.
“