टांझानिया : पूर्व आफ्रिकेतील टांगानिका आणि झांझिबार बेट (पेंबासह) मिळून १९६४ मध्ये अस्तित्वात आलेले संयुक्त प्रजासत्ताक. विस्तार १° द. ते ११° ४५’ द. २९° २१’ पू. ते ४०° २५’ पू. यांदरम्यान द. उ. सु. १,१८४ किमी. पू. प. सु. १,२१६ किमी. असून क्षेत्रफळ ९,४५,२०८ चौ. किमी.–पैकी मुख्य भूमीचे क्षेत्रफळ ९,४२,०५६ चौ. किमी. आणि त्यापैकी ५९,०६५ चौ. किमी. पाण्याखाली आहे. झांझिबार बेटाचे क्षेत्रफळ सु. १,६५८ चौ. किमी. असून पेंबा बेटाचे सु. ९८४ चौ. किमी. आहे. मुख्य भूमी आणि ही बेटे यांदरम्यान सु. ३६ किमी. रुंदीची खाडी आहे. यांच्या दक्षिणेचे सु. ५१८ चौ. किमी. माफीआ बेट टांझानियातच समाविष्ट आहे. संयुक्त प्रजासत्ताकाची लोकसंख्या १,२२,३१,३४२ (१९६७) असून त्यापैकी १,१८,७६,९८२ मुख्य भूमीवर व झांझिबारमध्ये ३,५४,३६० (झांझिबार १,९०११७ पेंबा १,६४,२४३) आहे. १९७३ चा अंदाज १,४३,७६,६०० चा आहे. टांझानियाच्या उत्तरेस केन्या आणि युगांडा असून व्हिक्टोरिया सरोवराचा जवळजवळ निम्मा भाग टांझानियात आहे. पूर्वेस हिंदी महासागर असून दक्षिणेस मोझँबीक–टांझानिया सरहद्दीवर रूवूमा नदी आहे. नैऋत्येस झँबिया व मालावी असून मालावी न्यासा सरोवराच्या पूर्व किनाऱ्‍यावर हक्क सांगत आहे, तर टांझानियाला टांझानिया, मालावी व मोझँबीक एकत्र येतात त्या ठिकाणापर्यंत सरोवरातून जाणारी सरहद्द हवी आहे. पश्चिमेस निम्मे टांगानिका सरोवर टांझानियाचे असून त्यापलीकडे झाईरे व वायव्येस रूआंडा, बुरूंडी आहे. डोडोमा ही टांझानियाची नवी राजधानी आहे जुनी दारेसलाम होती.

भूवर्णन : पूर्वेकडील सु. १६ ते ६४ किमी. रुंदीची व सु. ८०० किमी. लांबीची सखल किनारपट्टी सोडल्यास मुख्य भूमीची (टांगा निकाची) उंची सु. ३३० मी. आहे. प्रदेश पठारी व डोंगराळ असून सर्वांत उंच भूभाग सु. १,००० ते १,५०० मी. उंच आहे. आफ्रिकेतील सर्वांत उंच पर्वत किलिमांजारो (५,८९५ मी.) देशाच्या ईशान्येस केन्याच्या हद्दीजवळ असून त्याच्या पश्चिमेस ४,५६५ मी. उंचीचा म्वेरू पर्वत आहे. जवळच एन्‌गोराँगोरो ज्वालामुखीचे वर्तुळाकार विवर आहे. किलिमांजारोच्या पश्चिमेस आणि नेट्रॉन सरोवराच्या दक्षिणेस ऑल डॉइन्यो लेंगाई हा येथील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. किनाऱ्‍याजवळ वायव्य-आग्नेय दिशेने गेलेले पारे व ऊसांबारा पर्वत असून दारेसलामच्या पश्चिमेस सु. २०० किमी. ऊलूगूरू व त्याच्या पश्चिमेस रूबेहॉर्न पर्वत आहे. यांच्या उत्तरेस ऊकागूरू पर्वत असून अगदी दक्षिणेस न्यासा सरोवराजवळ किपेनगेरे व लिव्हिंग्स्टन पर्वत आहे. यांच्या पश्चिमेस एम्‌बेया व रुंग्वे पर्वत असून त्यांच्या वायव्येस टांगानिका व रूक्वा सरोवरांच्या दरम्यान ऊफीपा पठार आहे. सामान्यतः पश्चिम, आग्नेय व ईशान्य भाग डोंगराळ आहेत.

झांझिबार व पेंबा ही प्रवाळी बेटे असून झांझिबारचा पूर्व भाग सखल व पश्चिम भाग सु. ६० मी. उंचीच्या प्रवाळी कटकांचा आहे. सर्वांत उंच कटक मसिंगिनी सु. ११९ मी. उंच आहे. पेंबाची सर्वांत जास्त उंची सिनिओन्गानी सु. ९५ मी. असून नद्यांच्या क्षरण कार्यामुळे काही भाग टेकड्यांनी बनलेला वाटतो. 

झांझिबारमधील प्रवाह उत्तरेकडे व पश्चिमेकडे वाहतात. पूर्वेकडील प्रवाह प्रवाळी खडकांत लुप्त होतात. पेंबा बेटावर छोटे छोटे प्रवाह आहेत. मुख्य भूमीवरील सर्वांत मोठी नदी रूफीजी बहुतेक सर्व दक्षिण भागाचे जलवाहन करते आणि हिंदी महासागरास मिळते. किलिमांजारोत उगम पावल्यामुळे वितळणाऱ्‍या बर्फाचे पाणी मिळणारी पान्‌गानी, वामी, रूव्हू, रूवूमा, ग्रेट रूआहा, बेंकुरू इ. नद्याही हिंदी महासागरासच मिळतात. कागेरा व इतर बऱ्‍याच लहान नद्या व्हिक्टोरिया सरोवरास मिळतात. बुबू, वेंबेरे व इतर काही नद्या अंतर्गत द्रोणीप्रदेशात वाहत जातात. मध्यवर्ती पठारावरून जाणारी ऊगाला नदी टांगानिका सरोवराला मिळणाऱ्‍या मालागारासी नदीला मिळते.

सरहद्दीवरील व्हिक्टोरिया, टांगानिका व न्यासा या सरोवरांशिवाय रूक्वा, इयासी, नेट्रॉन, मान्यारा व इतर छोटी सरोवरे देशात आहेत. न्यासा, टांगानिका, इफसी, नेट्रॉन ही आफ्रिकेच्या प्रसिद्ध खचदरीत साचलेली आहेत. मालागारासी दलदल टांगानिका सरोवराला मिळणाऱ्‍या मालागारासी नदीच्या पूर्वेचा बराच मोठा प्रदेश व्यापते. यासारखे काही खोलगट प्रदेश खचदरीमुळे निर्माण झाले आहेत. 

मृदा : आर्द्र आणि उंच प्रदेशात स्फटिकी खडकांवर साचलेल्या पिंगट ज्वालामुखी मृदा आणि लोहयुक्त मृदा या सर्वांत उत्पादनक्षम आहेत. सु. १४० सेंमी. पर्जन्याच्या प्रदेशात कमी सुपीक असलेल्या पिवळ्या पिंगट किंवा पिवळ्या तांबूस मृदा आहेत. उत्तरेकडील व ईशान्येकडील पठारी प्रदेशातील मृदा सुपीक आहेत. परंतु त्यांच्यातील पाणी बाष्पीभवनामुळे व वनस्पतींच्या बाष्पोत्सर्जनामुळे बरेच कमी होते. मध्य पठारावर व दक्षिणेकडे वालुकाश्मावर आणि स्फटिकी खडकांवर नापीक, अम्ल, जंगली मृदा आढळते. नद्यांच्या खोऱ्‍यातील मृदा योग्य जलवाहनाने सुपीक राखाव्या लागतात. ठिकठिकाणी विखुरलेली खडकाळ, दगडधोंड्यांनी युक्त मृदाही दिसते.

झांझिबारमध्ये वालुकायुक्त दुमट व गडद तांबड्या रंगाच्या सुपीक मृदा उंच भागात आढळतात. नदीखोऱ्‍यांच्या तळावर कमी सुपीक, राखी व पिवळ्या वालुकायुक्त मृदा आढळतात. पेंबा बेटावर पिंगट, दुमट मृदा व मधूनमधून नापीक वाळूचे भाग आहेत. झांझिबारमध्ये मृदांचे दहा, तर पेंबात आठ प्रकार आहेत.

हवामान : टांझानियाचे हवामान विषुववृत्तीय प्रकारचे आहे. मात्र उंचीप्रमाणे तपमान व पर्जन्यमान यांत फरक पडत जातो. मार्च ते सप्टेंबर येथे आग्नेयीकडून हिंदी महासागरावरून आर्द्र वारे येतात. एरवी ईशान्येकडून आशियातून येणारे वारे कमी आर्द्र असतात. मासिक सरासरी तापमानात व्हिक्टोरिया सरोवराजवळ म्वांझा येथे २° सें., किनाऱ्‍यावर दारेसलाम येथे ४° से. तर मध्य भागात डोडोमा येथे ५° से. एवढाच फरक पडतो. दैनिक तपमानकक्षा मोठी असते. किनाऱ्‍याजवळ कमाल तपमान ३२° से., तर उंच प्रदेशात किमान तपमान २०° से. पर्यंत असते. उत्तरेकडे पाऊस मार्च ते मे आणि ऑक्टोबर ते डिसेंबर असा दोनदा पडतो, तर दक्षिणेकडे तो एकदाच डिसेंबर ते एप्रिल पडतो. समुद्राच्या आणि सरोवरांच्या काठी मध्यवर्ती पठारांपेक्षा जास्त पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण उंची आणि सन्मुखता यांवर अवलंबून असते. ऊलूगूरू पर्वताच्या वाताभिमुख बाजूवर २५२ सेंमी. तर वातविन्मुख बाजूवर ५८ ते ७८ सेंमी. पाऊस पडतो. अंतर्भागातील पर्जन्यमान ३२ ते ४३ सेंमी. तर किनारी प्रदेशात ६४ ते ११३ सेंमी, असते.

झांझिबार बेटावर सरासरी तपमान २७° सें. व पर्जन्यमान १५० सेंमी. आणि पेंबा बेटावर सरासरी तपमान २६° से. व पर्जन्यमान २०० सेंमी. असते. एप्रिल ते मे मध्ये सर्वांत जास्त आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सर्वांत कमी पाऊस पडतो. आर्द्रता जास्त असते.

वनस्पती : समुद्र किनाऱ्‍याला खाड्यांच्या काठी दाट खारफुटीकच्छ वनश्री असते. सखल भागात कठीण लाकडाचे आणि डोंगराळ भागात मऊ लाकडाचे वृक्ष आहेत. तथापि मुख्य भूमीवर गवत हीच मुख्य वनस्पती दिसते. गवताळ भागाच्या सु. निम्म्या भागात झाडे आढळतात. तो भाग उद्यानभूमीसारखा दिसतो. अनेक प्रकारची छोटी अरण्ये ठिकठिकाणी विखुरलेली दिसतात. डोंगराळ भागात अरण्यरेषेच्या वर पर्वतवेष्टित तृणभूमी आहे. पारे, ऊसांबारा, किलिमांजारो यांच्या वातविन्मुख बाजूंवर निमओसाड प्रदेशीय वनस्पती आहेत. पाणथळ भागात लव्हाळे व गवत आढळतात. झांझिबारच्या पूर्व भागात झुडुपे आहेत. परंतु इतर भागात व पेंबा बेटावर बहुतेक अरण्ये तुटली असून येथे लागवडी व मळे झाले आहेत.

प्राणी : मुख्य भूमीवर विविध प्रकारचे प्राणी विपुल आहेत. हत्ती, गेंडा, रेडा, सिंह, बिबळ्या, तरस, रानटी कुत्रा, चित्ता, झेब्रा, जिराफ, अनेक प्रकारचे हरिण, चितळ सांबार असून चिंपांझी अल्प प्रमाणात आहेत, परंतु इतर माकडे पुष्कळ आहेत. नद्या-सरोवरांतून हिप्पो व सुसरी आहेत. पक्षांच्या सु. दीडहजार जाती, कीटकांच्या हजारो जाती, साप, सरडे अनेक प्रकारचे असून समुद्रात व नद्या-सरोवरांत विविध प्रकारचे मासे सापडतात. उत्तरेकडील एन्‌गोराँगोरो ज्वालामुखी विवर व त्याजवळचे सेरँगेटी नॅशनल पार्क तसेच आग्नेय भागातील सेलूस वन्यपशुसंरक्षण विभाग हे सर्व आफ्रिकेत वन्यपशुसंरक्षण आणि दर्शन यांसाठी प्रसिद्ध आहेत.


इतिहास : इ. स. पू. सातव्या शतकात झांझिबारपर्यंतच्या पूर्व आफ्रिकेचा किनारा औसान या अरबी राज्याच्या अंमलात होता. पहिल्या शतकात त्यावर हिम्यराइट प्रमुखाची सत्ता होती. पहिल्या शतकातील पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सी या ग्रंथात वर्णिलेले मेनुथियास हे बेट झांझिबार किंवा पेंबा असावे. तेथे मुझा–हल्लीचे येमेनमधील मोरवा (मोचा) च्या लोकांची सत्ता होती. तिकडून आलेले अरब या भागात राहिले आणि आफ्रिकी लोकांशी त्यांचे रोटीबेटी व्यवहारही झाले. सातव्या शतकात मुंहमद पैगंबराच्या मृत्यूनंतरच्या बंडाळीतील निर्वासित आफ्रिकेच्या किनाऱ्‍यावर येऊन राहिले. नंतरच्या पाचसहा शतकांत अरब व इराणी लोकांच्या वसाहती येथे चांगल्या भरभराटल्या. अरब व स्थानिक बांटू भाषी लोक यांच्या संकरातून स्वाहिली लोक व स्वाहिली भाषा निर्माण झाली. नवव्या-दहाव्या शतकांत येथे इस्लामचा प्रभाव वाढला. लोक बहुतेक सुन्नी पंथीय होते. ९७५ मध्ये इराणमधील शीराझहून येथे स्वारी झाली. भारतातील दाभोळ व मालदीव बेटे येथूनही काही लोक आले असावे. १४९८ च्या वास्को द गामाच्या सफरीनंतर पोर्तुगीज आले. त्यांनी १५८९ मध्ये मालिंदी व मोंबासाच्या राजाकडे सत्ता दिली. त्याने १६३१ मध्ये बंड करुन पोर्तुगीजांची कत्तल केली. पोर्तुगीजांनी पुन्हा मोंबासा घेतले परंतु त्यांचे सागरमार्गावरील प्रभुत्व संपुष्टात आले होते. १६९८ मध्ये ओमानच्या इबादींनी मोझँबीकच्या उत्तरेकडून पोर्तुगीजांना हुसकून लावले. अनेक घडामोडीनंतर १८२२ मध्ये अल् बू सैदच्या कारकीर्दीत झांझिबार व पेंबा एका छत्राखाली आले. ओमानच्या या सुलतानाने झांझिबार ही आपली राजधानी केली. तो खुल्या व्यापाराचा पुरस्कर्ता होता. अरबांची मक्तेदारी मोडून त्याने अमेरिका व ब्रिटन यांच्याशी व्यापारी तह केले. त्याने गुलामांच्या व्यापारालाही आळा घातला. पोर्तुगीज व अरब यांच्या गुलामांच्या व्यापाराचे पेंबा हे प्रमुख केंद्र होते. त्याने केलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे झांझिबार व पेंबा येथील लवंगांची लागवड. प्रत्येक मळेवाल्याने एका नारळीच्या झाडाबरोबर लवंगेची तीन रोपे लावलीच पाहिजेत नाहीतर मळा जप्त होईल, असा कायदा केला. तो १८५६ मध्ये मरण पावला, तेव्हा त्याचे मोठे परंतु विस्कळित साम्राज्य होते. १८५७ मध्ये रिचर्ड एफ्. बर्टन आणि जॉन हॅनिंग स्पीक यांनी श्वेत नाईलच्या उगमाचा शोध लावण्यासाठी म्हणून मुख्य भूमीवर (टांगानिकाच्या) अंतर्भागात प्रवेश केला. १८६६ मध्ये झांझिबारच्या सुलतानाने दारेसलामची स्थापना केली.

टांगानिकातील टोळी-प्रमुखांशी तहनामे करुन कार्ल पीटर्स याने १८८४–८५ मध्ये तेथे जर्मन प्रभुत्व स्थापिले. १८८६ मध्ये फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन यांनी झांझिबारच्या सुलतानाकडे फक्त १६ किमी. रुंदीची किनारपट्टी ठेवली. १८९० मध्ये जर्मनीने सुलतानाकडून किनारपट्टी विकत घेऊन टांगानिका व रुआंडा-बुरुंडी यांचा मिळून जर्मन-पूर्व आफ्रिका हा प्रदेश केला. त्याच वेळी ब्रिटिशांनी झांझिबार व पेंबा हा आपला संरक्षित प्रदेश केला. जर्मनांनी स्थानिक लोकांची माजी-माजी ही संघटित चळवळ निर्घृणपणे दडपून टाकली. त्यांनी गुलामांचा व्यापार बंद करुन मळे, लोहमार्ग, वसाहती इ. केल्या परंतु वेठबिगार चालू केली. पहिल्या महायुद्धात तेथील जर्मनांनी गनिमीकाव्यात ब्रिटिशांशी दीर्घकाळ लढा देऊन सारा प्रदेश उद्ध्वस्त केला नंतर राष्ट्रसंघाचा महादिष्ट प्रदेश म्हणून तो ब्रिटिशांकडे आला. १८४६–४७ मध्ये संयुक्त राष्ट्रांचा विश्वस्त प्रदेश म्हणून तो त्यांच्याकडेच राहिला. 

टांगानिकाचे विधिमंडळ १९२६ मध्ये अस्तित्वात आले परंतु १९४५ पर्यंत त्यात आफ्रिकी लोकांस जागा नव्हती. १९५१ मध्ये कार्यकारी मंडळावर पहिला आफ्रिकी सभासद नेमला गेला. १९५४ नंतर टांगानिका आफ्रिकन नॅशनल युनियन (टानु) ने ब्रिटिश कारभारावर राजकीय विकास, स्वायत्तता व स्वातंत्र्य यांची निश्चित कालावधीत स्थापना व्हावी, असे दडपण आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रांवर दबाब आणला. १९५८–६० च्या निवडणुकात ‘टानु’ पक्षाने ७१ पैकी ७० जागा सहज जिंकल्या व सप्टेंबर १९६० मध्ये ज्यूलियस न्येरेरे मुख्य प्रधान झाला. डिसेंबर १९६१ मध्ये टांगानिका स्वतंत्र झाल्यावर बरोबर एका वर्षाने तो प्रजासत्ताक होऊन न्येरेरे पहिला अध्यक्ष झाला.

झांझिबार (झांझिबार व पेंबा) मध्ये १९५६ मध्ये कायदे कौन्सिल स्थापन झाले होते. जून १९६३ मध्ये झांझिबारला अंतर्गत स्वायत्तता मिळाली व डिसेंबर १९६३ मध्ये ते पूर्ण स्वतंत्र झाले. जानेवारी १९६४ मध्ये अरबी प्रभावाखालील शासन आफ्रो-शिराझी पक्षाच्या नेतृत्वाने उलथून पाडण्यात आले. सुलतान पळून गेला व त्याला पदभ्रष्ट करुन अबीद कारुमे हा अध्यक्ष झाला. एप्रिल १९६४ मध्ये टांगानिका व झांझिबार यांचे संयुक्त प्रजासत्ताक स्थापन झाले व ऑक्टोबर १९६४ मध्ये त्याचे टांझानिया असे नामकरण करण्यात आले. १९६५ आणि १९७० च्या निवडणुकांत न्येरेरे प्रचंड बहुमाताने निवडून आला. डिसेंबर १९६७ मध्ये स्थापन झालेला ईस्ट आफ्रिकन कम्युनिटीचा केन्या व युगांडा यांचेबरोबर टांझानिया सभासद झाला. ब्रिटिश कॉमनवेल्थमध्येही तो आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात काम केलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्‍यांना निवृत्तिवेतन देण्याचे टांझानियाने नाकारल्यामुळे ब्रिटनने टांझानियाची आर्थिक व तांत्रिक मदत १९६८ मध्ये बंद केली. तथापि पुढे राजनैतिक संबंध सुधारून १९७४ मध्ये मदतही पुन्हा चालू झाली. युगांडात १९७१ मध्ये डॉ. ओबोटे पदभ्रष्ट होऊन त्याला टांझानियाने आश्रय दिल्यामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले परंतु केन्याच्या जोमो केन्याटाच्या मध्यस्थीने सुधारले. १९७२ मध्ये पुन्हा कटकटी झाल्या, चकमकी झाल्या, परंतु सोमालीच्या मध्यस्थीने शांतता झाली. पुढील वर्षी पुन्हा तक्रारी झाल्या, तरी ऑगस्ट १९७३ नंतर ईस्ट आफ्रिकन कम्युनिटीचे कार्य पुन्हा सुरळीत चालू झाले. १९७२ मध्ये झांझिबारचा अध्यक्ष व टांझानियाचा पहिला उपाध्यक्ष शेख अबीद कारुमे याचा वध झाला व आफ्रो-शिराझी पक्षाचे सामर्थ्य वाढून अबूद कारुमे याचा वध झाला व आफ्रो-शिराझी पक्षाचे सामर्थ्य वाढून अबूद जुंबे हा अध्यक्ष झाला. झांझिबारवरील कडक हुकूमशाही अंमल चालूच राहिला.

राज्यव्यवस्था : १९६५ च्या अंतरित संविधानाप्रमाणे राज्याचा व शासनाचा प्रमुख अध्यक्ष असतो व तो सेनाप्रमुखही असतो. तो सार्वत्रिक प्रौढ मतदानाने निवडला जातो. तो दोन उपाध्यक्ष नेमतो. पहिला उपाध्यक्ष झांझिबारचा अध्यक्ष असतो दुसरा उपाध्यक्ष राष्ट्रीय विधिमंडळातून निवडलेला असून तो त्या मंडळाचा नेता व मुख्य प्रधान असतो. अध्यक्षाने नेमलेले मंत्री व उपाध्यक्ष यांचे मंत्रिमंडळ होते व अध्यक्ष हा त्याचाही अध्यक्ष असतो. या देशात एकपक्षीय राज्यव्यवस्था आहे. टांगानिकात ‘टानु’ पक्ष व झांझिबारमध्ये आफ्रो-शिराझी पक्ष व अधिकारावर आहे. राष्ट्रीय विधिमंडळात नॅशनल असेंब्ली व मुख्यभूमीचे १२० निर्वाचित सदस्य, टांगानिका व झांझिबार यांतून नेमलेले १० सदस्य, विविध राष्ट्रीय संस्थांनी सुचविलेल्यांतून राष्ट्रीय विधिमंडळाने निवडलेले १५ सदस्य, २० विभागीय आयुक्त, झांझिबार क्रांतिकारी मंडळाचे ३२ पर्यंत सभासद व झांझिबारच्या अध्यक्षांच्या अनुमतीने अध्यक्षाने नेमलेले झांझिबारचे २० पर्यंत इतर सभासद असतात. विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकास अध्यक्षाने संमती नाकारली, तर विधिमंडळाला ते पुन्हा दोन तृतीयांश बहुमताने संमत करावे लागते. तरीही अध्यक्षाची त्यास २१ दिवसात संमती न मिळाली, तर अध्यक्ष  विधिमंडळ बरखास्त करून नवीन निवडणुका घेतो. विधिमंडळाच्या संमतीशिवाय अध्यक्षाला कायदा करता येत नाही. झांझिरबारचे वेगळे विधिमंडळ व कार्यकारी मंडळ आहे. राज्यकारभारासाठी टांझानियाचे २० विभाग केलेले आहेत.


राजकीय पक्ष : १९५४ मध्ये ज्यूलियस न्येरेरे याने स्थापन केलेला ‘टानु’ पक्ष व झांझिबारमधील आफ्रो-शिराझी हा त्याचा सहकारी पक्ष याची एकपक्षीय राजवट सध्या टांझानियात चालू आहे. १९६० च्या निवडणुकीत या पक्षाच्या व त्याने पुरस्कृत केलेल्या सदस्यांनी ७१ पैकी ७० जागा जिंकल्या. त्यात यूरोपीय व आशियाई यांच्या जागांचाही समावेश होता. १९६५ च्या निवडणुकीत जवळजवळ प्रत्येक जागेसाठी याच पक्षाचे दोन दोन उमेदवार उभे केले गेले. हा एक एकपक्षीय लोकशाहीचा अभिनव प्रयोग होता. या निवडणुकीत आठ मंत्री व पूर्वीच्या विधिमंडळाचे १६ सदस्य पराभूत झाले. आता यूरोपीय व आशियाई यांचेसाठी राखीव जागा नाहीत.

‘टानु’ चे धोरण वंशभेदाविरुद्ध आणि आफ्रिकी समाजवादाचे आहे. आर्थिक संधी, साधनसंपत्तीचा उपयोग समानतेच्या तत्त्वावर करावा व सहकारी संस्था आणि कामगार यांस पाठिंबा द्यावा असे धोरण आहे. ‘टानु राष्ट्रीय कार्यकारी मंडळ’ हे पक्षाचे धोरण आखणारे व मार्गदर्शक मंडळ आहे. त्यात कामगार महासभा, सहकारी संघटना, युवक संघटना, विभागीय समित्यांचे अध्यक्ष, विधिमंडळाचे सभासद, अध्यक्ष व महान्यायवादी (ॲटर्नी जनरल) हे असतात. शासन व लोक यांमधील मतभेद व गैरसमज मिटविण्यासाठी न्येरेरेने १९६२ मध्ये मुख्यप्रधानकी सोडली होती. तो पुन्हा १९६५ व १९७० मध्ये निवडून आला. ‘टानु’ हा बहुजनपक्ष असून १८ वर्षावरील कोणाही प्रौढाला त्याचा सभासद होता येते. पक्षाचा अगदी मूल घटक कुलक हा होय. हा १० गृहकुलांचा गट असून त्याचा निर्वाचित नेता पक्षाच्या स्थानिक शाखेच्या वार्षिक अधिवेशनाचे वेळी कुलकाचे प्रतिनिधित्व करतो. अशा प्रत्येक अधिवेशनाचे एक कार्यकारी मंडळ असते. राष्ट्रीय विभागीय व उपविभागीय स्तरांवरही पक्षांचे समित्या व अधिवेशने इ. घटक असतात. राष्ट्रीय कार्यकारी मंडळ हे त्यांपैकीच होय. टांझानियाने समाजवादी शासन अंगीकारले असल्यामुळे कोणत्याही विधिमंडळ सदस्याला किंवा भारी पगाराच्या अधिकाऱ्‍याला एकापेक्षा अधिक ठिकाणचा पगार घेता येत नाही व कंपन्यांचे शेअर धारण करता येत नाहीत.

स्थानिक शासन : स्थानिक शासनासाठी टांगानिकाचे १७ आणि झांझिबार व पेंबा यांचे ३ विभाग केलेले आहेत. त्यांच्यावर मध्यवर्ती शासनातर्फे विभागीय आयुक्त नेमलेले असतात. नगरपालिका, नगरमंडळे व जिल्हा किंवा प्रादेशिक मंडळे यांच्याकडे स्थानिक शासन सोपविलेले असते. शहरी विभाग सोडून एकूण ६८ प्रादेशिक विभाग आहेत. यांचे सदस्य आणि अध्यक्ष व उपाध्यक्षही निर्वाचित असतात. संबंधित खात्याचा मंत्री व खुद्द हे मंडळ प्रत्येकी आणखी तीन सदस्य नेमू शकतात. स्थानिक कर, परवाने, राष्ट्रीय शासनाने सुपूर्त केलेल्या बाबी व अनुदान यांवर या मंडळांचा कारभार चालतो. ही मंडळे विशिष्ट प्रदेशांसाठी व गावांसाठी समित्या नेमू शकतात. प्राथमिक शिक्षण, शेती, बाजार, जंगल, पशुसेवा, आरोग्य, पाणीपुरवठा आणि स्थानिक दळणवळण या गोष्टी ह्या मंडळांकडे सोपविलेल्या असतात.

न्यायव्यवस्था : संविधानाप्रमाणे न्यायसंस्थाही राजकीय किंवा कारभारी दडपणापासून मुक्त आहे. सु. ९०० स्थानिक न्यायमंडळे असून त्यांवर टोळीप्रमुख, उपप्रमुख व त्याचे न्याय साहाय्यक मुख्य असत. आता त्यांचे जागी न्यायाधीशांच्या नेमणुका होत आहेत. इतर दुय्यम न्यायालयांवर पहिल्या, दुसऱ्‍या व तिसऱ्‍या वर्गाचे न्यायाधीश असून त्यांस दिवाणी व फौजदारी अधिकार असतात. ते कारभारी अधिकारीही असू शकतात. उच्च न्यायालयात व ईस्ट आफ्रिकन अपील कोर्टाकडे अपील करता येते. कारभारातील गाऱ्‍हाण्यांसाठी कायम स्वरूपाच्या चौकशी आयोगाकडे दाद मागता येते. ज्या कज्जात झांझिबारच्या १९२४ च्या आदेशानुसार कौन्सिलाच्या कक्षेत येणाऱ्‍या व्यक्ती असतील त्यांचा निवडा दुय्यम न्यायालये, उच्च न्यायालय, पूर्व आफ्रिकेचे अपील कोर्ट व प्रिव्ही कौन्सिल या पायऱ्‍यांनी होतो. झांझिबार आणि पेंबा येथे मुस्लिम न्यायालये, विवाह, विवाहविच्छेद, वारसा इ. बाबतींत न्याय देतात. क्रांतिकारक मंडळ त्यांच्या निवाड्यांची शहानिशा करते.

संरक्षण : मुख्य सुरक्षादल १०,००० सैनिकांचे आहे. पायदळाच्या चार बटालियानांना १२ हलके टँक, इतर सशस्त्र वाहने व थोडासा तोफखाना असतो. राष्ट्रीय सेवेच्या काळातच प्राथमिक सैनिकी शिक्षण दिले जाते. शंभर नौसैनिकांच्या दलाजवळ चार छोट्या शस्त्रनौका आहेत. वायुदल सशस्त्र नाही. त्यात दहा वाहतूक विमाने व सात प्रशिक्षण विमाने आहेत.

आर्थिक स्थिती : अंतर्गत उपयोगासाठी अन्नपदार्थांचे उत्पादन व प्राथमिक स्वरुपाचे शेती उत्पादन व त्याची निर्यात हा टांझानियाच्या आर्थिक स्थितीचा पाया आहे. वाख, काजू व लवंगा यांच्या जागतिक पुरवठ्याचा मोठा हिस्सा या देशाकडे आहे. हिरे व सोने, कथिल व मीठ निर्यात होतात. उपलब्ध साधनसंपत्तीचा पूर्ण उपयोग होण्याच्या दृष्टीने देश अद्याप बराच मागासलेला आहे. टांझानिया शिलिंग हे येथील अधिकृत चलन असून एप्रिल १९७४ मध्ये १ पौंड स्टर्लिंग = १६·८४५ टां. शि. व १ अमे. डॉ. = ७·१४३ टां. शि. असा विनिमय दर होता. १ टां. शि. चे १०० सेंट होतात. ५, २०, ५० सेंट आणि १ व ५ टां. शि. यांची नाणी असतात. ५, १०, २० व १०० टां. शि.च्या नोटा असतात.

शेती : टांझानिया हा शेतीप्रधान देश असून सु. ९०% लोक शेतीवर अवलंबून आहेत. १९६६ मध्ये देशातील १३·२% जमीन लागवडीखाली होती. शेतकरी पारंपरिक पद्धतीने पोटापुरती पिके काढीत असला, तरी शासनपुरस्कृत जमीन-पद्धतींचा अवलंब करुन उत्पादनात वाढ केली जात आहे. मका, तांदूळ, ज्वारी, द्विदलधान्ये ही प्रमुख अन्नपिके आहेत.

झांझिबार व पेंबा येथे तांदूळ, केळी, कसावा, कडधान्य, मका व ज्वारी ही प्रमुख अन्नपिके आहेत. लवंगा मुख्यतः पेंबा बेटावर होतात. दोन्ही बेटांवर नारळ हे महत्त्वाचे पीक आहे. झांझिबारवर मिरच्या, कोको, लिंबे व इतर फळे व तंबाखू होतात. मुख्य भूमीवर वाख, काजू यांशिवाय कापूस, पायरेथ्रम (एक वनस्पतिजन्य कीटकनाशक), तंबाखू, साखर, भुईमूग, कॉफी, चहा, तेलबिया इ. धनदायी उत्पन्ने आहेत. सहकाराला मोठे महत्त्व दिले जात आहे. न्येरेरेप्रणीत ‘उजामाव्हिजिजिनी’ म्हणजे समाजवादी खेडे योजनेप्रमाणे १९७४ पर्यंत ५,५०० गावे स्थापन झाली होती. तेथे सामुदायिक उत्पादन, संधीची समानता व स्वावलंबन यांस प्राधान्य असून शेतकऱ्‍यांच्या अशा सामुदायिक उपक्रमांस उत्पादनाच्या आणि समाजजीवनाच्या सोयी उपलब्ध करुन देण्यास शासन बांधलेले आहे. समाजवादी मतप्रणाली व तदानुषंगिक नीती अगदी खालच्या थरापर्यंत पोहोचविण्याची ही योजना आहे. निरनिराळ्या पिकांसाठी नियंत्रण मंडळे स्थापिलेली आहेत. बहुउद्देशी प्रकल्पांतून शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या योजना होत आहेत.

पशुधन : त्से त्से माशीमुळे पशुपालन व्यावसायात व्यत्यय येत असला, तरी दूध, मांस, कातडी इ. रूपांनी राष्ट्रीय संपत्तीत मोलाची भर पडते. १९७०-७१ मध्ये देशात १,३३,००,००० गुरे, २८,००,००० मेंढ्या, ४४,५०,००० शेळ्या, २२,००० डुकरे, १,६०,००० गाढवे आणि २,०६,००,००० कोंबड्या-बदके होती. नद्या, सरोवरे व समुद्र येथे मत्स्यसंपत्ती विपुल आहे. सागरी मासेमारीचा विकास अलीकडेच सुरू झाला आहे. देशातील ५०·५ टक्के जमीन चराऊ कुरणे आणि गवताळ प्रदेश यांखाली होती.


जंगले : टांझानियाचा सु. १२ टक्के प्रदेश वनाच्छादित आहे. १९७० मध्ये ४,४०,००० घ. मी. कापीव ओंडके, ६,५५,००० घ. मी. इतर औद्योगीक लाकूड व ३,०५,००,००० घ. मी. जळाऊ लाकूड असे उत्पादन झाले. मॉहॉगनी, पोडोकॉर्पस, कापराची झाडे, खारफुटी, सागवान इ. वृक्ष महत्त्वाचे आहेत.

खनिजे : कित्येक ज्वालामुखींच्या विवरांत हिरे सापडतात. दक्षिणेकडे व व्हिक्टोरिया सरोवराच्या पूर्वेस सोने मिळते. पश्चिम भागात कथिल व टंगस्टन आहे. मध्य व पूर्व भागात अभ्रक आहे. दक्षिण भागात शिसे, तांबे, चांदी व सोने आढळले आहे. नैर्ऋत्य भागात कोळसा व लोखंड यांचे मोठे मोठे साठे आहेत. चुनखडक, जिप्सम, मीठ, केओलीन, फॉस्फेट हे किनारी व सरोवरी प्रदेशात सापडतात. टांझानाइट व इतर मौल्यवान खडे काही ठिकाणी मिळतात. उद्योगधंदे व वाहतूक यांची चांगली वाढ झाली म्हणजे या संपत्तीचा योग्य उपयोग होऊ शकेल.

शक्तिसाधने : देशातील कोळशाचा अद्याप नीटसा उपयोग होत नाही. पान्‌गानी नदीवरील हाले व पान्‌गानी फॉल्स येथील ४१,२०० किवॉ.ची जलविद्युत्‌ केंद्रे व दारेसलाम येथील ३०,४०० किवॉ. ची दोन औष्णिक केंद्रे यांनी दारेसलाम, टांगा व मोरोगोरो यांस वीजपुरवठा होतो. किडाटू हे २०० मे. वॉ. उत्पादनाचे नवीन केंद्रे आहे. किविरा नदीप्रकल्प हाती घेतला आहे. पान्‌गानी नदीवरील ‘न्युम्बा या मुंगू’ हा बहुउद्देशी प्रकल्प आहे. एकूण तीस गावांना औद्योगिक व घरगुती कामांसाठी वीज पुरविली जाते. दारेसलाम येथील तेलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ७,५०,००० टनांची आहे. टॅनझॅम या १,७२८ किमी.च्या तेलनळाद्वारे झँबियाला खनिज पदार्थ निर्यात होतात.

उद्योगधंदे : अन्नपदार्थांवरील प्रक्रिया हा सर्वांत मोठा उद्योग असून कापडाचे उत्पादन वाढत आहे. दारेसलाम येथे अन्नपदार्थ, मद्ये, कापड, पादत्राणे, तेलशुद्धी, रबर, सिमेंट, मोटारीचे भाग जोडणे टांगा येथे वाखाचा दोरा, फर्निचर, अन्नप्रक्रिया, खते आरूशा व मोशी येथे अन्नपदार्थ, पेये, कापड व फर्निचर म्वांझा येथे अन्नपदार्थ, पेये व कापड हे उद्योग चालतात. औद्योगिक उत्पादनाचा ९५ टक्के भाग देशातल्या देशातच खपतो. झांझिबारमध्ये काथ्या, पोती, दोरखंड, साबण, शिंपले, हस्तिदंती व एबनीवरील नक्षीकाम, धातुकाम इ. उद्योग आहेत. यांशिवाय ॲल्युमिनियमची भांडी, विटा व कौले, रासायनिक पदार्थ, काथ्याच्या व वाखाच्या चटया व वस्तू, काच, खिळे, कातडी सामान, रंग, क्राँक्रीट, वस्तऱ्‍याची पाती, रबराच्या वस्तू, धातूच्या पत्र्याच्या वस्तू, साबण, प्लॅस्टिक, कीटकनाशके इ. वस्तूंची निर्मिती होते.

कामगार : १९६८ मध्ये एकूण चार लक्ष कामगारांपैकी दोन लक्ष शेतमजूर, मच्छीमार आणि जंगलकामगार होते. ८,००० खाणकामगार, ३०,००० बांधकामावर, ३,००० निर्मिती उद्योगात, १८,००० व्यापारात, ३०,००० वाहतूक व्यवसायात, ७५,००० विविध सेवांत व उरलेले शासकीय सेवेत होते. कायद्याने किमान वेतन ठरवून दिले आहे. आधी समझोत्याचा प्रयत्न केल्याशिवाय समेट करणे बेकायदा आहे. दारेसलाम येथे कामगारांना परवाना लागतो. बेकारांनी आपापल्या मूळ विभागात जावयाचे असते. १९६४ मध्ये टांगानिका कामगारांची राष्ट्रीय संघटना स्थापन झाली. तिचे कार्यवाहक, उपकार्यवाहक अध्यक्षाने नेमलेले असतात. कामाचा दिवस ८ तासांचा व आठवडा ४५ तासांचा असतो. शेतमजुरांना काम नेमून दिले जाते ते सु. ६ तासांत सपंते, कामगारविषयक कायदे सामान्यतः आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आदेशांनुसार केले जातात.

बँका : ईस्ट आफ्रिकन करन्सी बोर्डाऐवजी १९६६ मध्ये बँक ऑफ टांझानियाची स्थापना झाली. १९६७ मध्ये सर्व बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. त्यांच्या जागी नंतर नॅशनल बँक ऑफ कॉमर्स व झांझिबारमध्ये पीपल्स बँक आली. तिच्या शाखोपशाखा सर्वत्र पसरलेल्या आहेत. त्याशिवाय रूरल डेव्हलपमेंट बँक, इन्व्हेस्टमेंट बँक व टांझानिया हौसिंग बँक आहेत. दि नॅशनल इन्शुअरन्स कंपनी, दि नॅशनल प्रॉव्हीडंट फंड, दि टांझानिया पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक, दि पर्मनंट हौसिंग ॲड फायनॅन्स कंपनी, दि टांझानिका डेव्हलपमेंट फायनॅन्स कंपनी, दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक, दि नॅशनल डेव्हलपमेंट क्रेडिट एजन्सी व नॅशनल लॉटरीज यांतर्फे आर्थिक गरजा भागविल्या जातात. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांची वसुली तीन वेगवेगळ्या संस्थांकडून होते. प्राप्तिकर, उपरी कर, आयात कर व अबकारी कर आणि काही विशेष उत्पादनावरील ट्रान्सफर टॅक्स हे ईस्ट आफ्रिकन कम्युनिटीतर्फे वसूल होतात. व्यक्तिगत कर, निगम कर, पिकांवरील निर्यात कर, अप्रत्यक्ष विक्रीकर व मालमत्तेवरील व इतर कर मध्यवर्ती सरकार वसूल करते. वाहन नोंदणी, मद्य परवाने व बाजारबाकी (मार्केटड्यूज) यांची वसुली स्थानिक शासनातर्फे होते.

अर्थसंकल्प : १९७१–७२ सालच्या अर्थसंकल्पात जमेच्या बाजूस १,८५,९२,००,००० टां. शि. व खर्चाच्या बाजूस १,७८,०६,००,००० टां. शि. होते व ७,८६,००,००० टां. शि. ची शिल्लक होती. १९७४–७५ च्या अर्थसंकल्पात ३५,३५० लक्ष टां. शि. जमा व ३६,६१० लक्ष टां. शि. खर्च धरला होता. जमेच्या मुख्य बाबी आयातजकात, अबकारी, निर्यातकर, प्राप्तिकर, परवाने व इतर कर, विक्रीकर या असून खर्चाच्या मुख्य बाबी दळणवळण, वाहतूक, कामगार शिक्षण, शेती, अन्न व सहकार या होत्या. १९७१–७२ चा विकासखर्च ७७·२८ कोटी टां. शि. व १९६९–७० चे परदेशी कर्ज १४१·२४४ कोटी टां. शि. होते. वाढते आफ्रिकीकरण, वेगवान राष्ट्रीयीकरण व मोठी करवाढ यांमुळे परदेशी खाजगी भांडवलगुंतवणुकीवर मोठाच विपरीत परिणाम झाला आहे.

विदेश व्यापार : १९७० मध्ये १,९३,९२,१५,७९४ टां. शि. ची आयात व १,६८,८७,३३,७५३ टां शि. ची निर्यात झाली. आयातीत विजेशिवाय इतर यंत्रसामग्री १७·९ टक्के, वाहतूक सामग्री १४·८ टक्के, त्यांपैकी बसगाड्या, मालट्रक वगैरे ५·३ टक्के, लोखंड व पोलाद ५·५ टक्के, विजेची यंत्रे, उपकरणे वगैरे ५·२ टक्के, खनिज तेल वस्तू ४·४ टक्के, क्रूड पेट्रोलियम ३·७ टक्के, कापड व त्याच्या वस्तू ३ टक्के, रबरी धावा व ट्यूब २·५ टक्के, वैद्यकीय व औषधी सामान २·३ टक्के, कागद पुठ्ठे व त्यांच्या वस्तू २·२ टक्के होत्या. प्रमुख आयात ग्रेट ब्रिटनकडून २१·२ टक्के, चीन १३·७ टक्के, प. जर्मनी ९·४ टक्के, अमेरिका ८·६ टक्के, जपान ७·४ टक्के, इटली ५·६ टक्के, इराण ५·६ टक्के व नेदरलँड्स ४·३ टक्के अशी झाली. निर्यातीत कॉफी १८·५ टक्के, कापूस १४·६ टक्के, वाख १०·६ टक्के, हिरे ९·५ टक्के, काजू ६·८ टक्के, खनिज तेल वस्तू ६·६ टक्के, लवंगा ६·५ टक्के, तंबाखू २·७ टक्के, चहा २·५ टक्के होते. घेणारे देश मुख्यतः ग्रेट ब्रिटन २२ टक्के, अमेरिका ९·६ टक्के, हाँगकाँग ७·५ टक्के, भारत ७·३ टक्के, झँबिया ७ टक्के, सिंगापूर ५·८ टक्के, जपान ५·७ टक्के व प. जर्मनी ४·७ टक्के असे होते. १९७१, ७२ व ७३ मध्ये आयात अनुक्रमे २४१·४ कोटी २५९·८ कोटी आणि ३०७·४ कोटी टां. शि. ची झाली व निर्यात अनुक्रमे १७९·२ कोटी २०६·३ कोटी व २०५·८ कोटी टां. शि. ची झाली. या तीन वर्षांत चीन व ग्रेट ब्रिटनकडून मोठ्या प्रमाणावर आयात व ग्रेट ब्रिटनकडे मोठ्या प्रमाणावर निर्यात झाल्याचे दिसते. समाजवादी राष्ट्रांबरोबरचा व्यापार वाढत आहे.

केन्या व युगांडा यांच्याकडून १९६९, ७०, ७१, ७२ या वर्षी आयात अनुक्रमे २९·१, ३३·५, ३१·१ व ३३·२ कोटी टां. शि. ची व त्यांच्याकडे निर्यात अनुक्रमे १०·४, १४·८, १९·७ व १३·३ कोटी टां. शि. ची झाली. अलीकडे टांझानिया व भारत यांचे मैत्रीचे व व्यापारी संबंध वाढत आहेत.


आर्थिक धोरण : दारिद्र्य, अज्ञान व रोगराई यांचे उच्चाटन करण्यासाठी देशाची सर्व साधनसंपत्ती कारणी लागावी म्हणून प्रमुख उत्पादन व विनियम साधने शासन नियंत्रित करण्याचे टांझानियाचे धोरण आहे. त्यासाठी १९६९–७४ च्या दुसऱ्‍या पंचवार्षिक योजनेत विकासासाठी फार मोठी तरतूद केलेली होती. खाजगी क्षेत्राचे महत्त्व कमी झाले असले, तरी किरकोळ व्यापार अद्याप खाजगी क्षेत्रातच आहे. १९६० पर्यंत याबाबत आशियाई व्यापाऱ्‍यांचे वर्चस्व होते परंतु आता त्याचे जागी तिप्पट संख्येने आफ्रिकी व्यापारी आले आहेत. वाहनांची आयात, वाहतूक, शेती, बांधकाम व इतर अनेक लहानसहान व्यवसाय खाजगी क्षेत्राकडे आहेत. शासकीय उपक्रमात खाजगी औद्योगिक कंपन्या सहभागी होतात. १९६७ पासून सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व एकदम वाढले. बँका, आयात-निर्यात कंपन्या, गिरण्या व अन्नोत्पादक व्यवसाय यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा कार्यक्रम वेगाने सुरु झाला. राष्ट्रीय विमा कंपनी सार्वजनिक क्षेत्रात घेऊन तिच्याकडे विमा व्यवसायाची मक्तेदारी दिली गेली. शासनाने घाऊक व्यापार व वाखाचा व्यवसाय यांतील मोठा भांडवल भाग आपल्याकडे घेतला. टांझानियाचे राष्ट्रीय विकास महामंडळ, पर्यटन महामंडळ, शेती व अन्न महामंडळ, चहा, प्राधिकरण, वीजपुरवठा कंपनी, व्यापार महामंडळ यांच्यावर १९७०–७१ मध्ये मोठा भांडवली खर्च करण्यात आला. किंमती व उत्पादन यांत चढउतार होणाऱ्‍या प्राथमिक गरजांच्या वस्तूंबाबत अवलंबन कमी करुन उत्पादनात विविधता आणण्याचे धोरण अंमलात आणले गेले. उजामाव्हिजिजिनीच्या प्रयोगाकडे आर्थिक दृष्ट्याही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ईस्ट आफ्रिकन कम्युनिटी–केन्या, युगांडा व टांगानिका यांची ईस्ट आफ्रिका हाय कमिशन ही संघटना १९४७ पासून समाईक गोष्टींच्या कारभारासाठी अस्तित्वात होती. टांगानिका स्वतंत्र झाल्यावर १९६१ मध्ये तिचे ईस्ट आफ्रिका कॉमन सर्व्हिसेस ऑर्गनायझेशनमध्ये रुपांतर झाले. १९६७ मध्ये केन्या, युगांडा व टांझानिया यांच्या प्रमुखांचा कांपाला येथे तह होऊन ईस्ट आफ्रिकन कम्युनिटी ही संघटना अस्तित्वात आली. तिची पाच मंडळे असतात : कॉमन मार्केट कौन्सिल, कम्युनिकेशन्स कौन्सिल, इकॉनॉमिक कन्सल्टेटिव्ह ॲड प्लॅनिंग कौन्सिल, फायनॅन्स कौन्सिल व रिसर्च अँड सोशल कौन्सिल. एका संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली व्यापारी तत्त्वावर रेल्वे, बंदरे, विमानमार्ग व पोस्ट आणि टेलिकम्युनिकेशन्स यांची महामंडळे कार्य करतात.

वाहतूक व दळणवळण : टांझानियात १,२४८ किमी.चा दारेसलाम ते किगोमा व ३५० किमी. चा टांगा ते मोशी हे दोन प्रमुख लोहमार्ग आहेत. त्यांशिवाय मोशी–आरुशा ८५ किमी., अम्न्यूसी–रुव्हू १८७ किमी., कीलोसा–किडाटू १०९ किमी., ताबोरा–म्वांझा ३७७ किमी., कालीऊआ–एम्‌पांडा २१० किमी. हे लोहमार्ग आहेत. चीनच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याने १९७० मध्ये सुरू झालेल्या ‘टॅनझॅम रेल्वे’ प्रकल्पाच्या दारेसलाम ते झँबियातील लूसाकापर्यंत होणाऱ्‍या १,८६० किमी. लोहमार्गाच्या टूंडूमापर्यंतचा भाग १९७३ पर्यंत पुरा झाला व सर्व मार्ग १९७६ मध्येच पुरा झाला आहे.

टांझानियातील चार पूर्व-पश्चिम व तीन दक्षिणोत्तर प्रमुख रस्ते व त्यांना जोडणारे रस्ते यांचे जाळे १६,७४२ किमी.चे आहे. त्यांत राष्ट्रीय मुख्य रस्ते ५,४२१ किमी., विभागीय दुय्यम रस्ते १,४५९ किमी. व इतर रस्ते ९,८६२ किमी. आहेत. झांझिबारमधील ६१९ किमी.पैकी ४४२ किमी. डांबरी व पेंबामधील ३६३ किमी. पैकी १३० किमी. डांबरी आहेत. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, स्वीडन व जागतिक बँक यांच्या साहाय्याने ईरिंगा व एम्‌बेया यांवरून जाणाऱ्‍या दारेसलाम ते लूसाका १,९३० किमी. रस्त्याचे काही भाग पुरे झाले आहेत. यामुळे दक्षिण टांझानियाही एकाकी राहिला नाही. 

टांगानिका व व्हिक्टोरिया सरोवरांतून होणाऱ्‍या जलवाहतुकीमुळे केन्या, युगांडा, झाईरे, बुरंडी व झँबिया या देशांशी संपर्क साधला जातो. दारेसलाम हे मुख्य बंदर असून टांगा व मटवारा (मीकींदानी) ही बंदरे अनुक्रमे मुख्यतः वाख व काजू यांच्या निर्यातीची आहेत. म्वांझा हे व्हिक्टोरिया सरोवरातील बंदर आहे. झांझिबार हे बेटाचे बंदर असून तेथून मुख्यतः लवंगा, खोबरे व खारफुटीची साल निर्यात होते.

ईस्ट आफ्रिकन एअरवेज कॉर्पोरेशन्सतर्फे अंतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक होते. दारेसलाम येथे प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ असून १९७१ मध्ये किलिमांजारो येथे आणि १९७३ मध्ये पेंबावर आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले आहेत. सु. २० देशांतर्गत विमानतळ व सु. २०० धावपट्ट्या देशात आहेत. झांझिबार येथे एक विमानतळ आहे.

देशात चार दैनिके निघतात. त्यांपैकी तीन स्वाहिली भाषेत असतात. ‘टानु’चे मुखपत्र ऊहूस व अन्गुरूमो ही त्यांत प्रमुख आहेत. स्टँडर्ड टांझानिया हे इंग्रजी वृत्तपत्र आहे. संडे न्यूज हे त्याचे साप्ताहिक आहे. नॅशनालिस्ट हे आणखी एक इंग्रजी दैनिक आहे. यंग आफ्रिका हे गुजराती साप्ताहिक असून पंचवीसचे वर मासिके निघतात. त्यांतील बहुतेक स्वाहिली असतात. झांझिबारमध्ये अदल इन्साफ इंग्रजी व स्वाहिली आणि डेली कमर्शियल रिपोर्ट इंग्रजी व गुजराती या दैनिकांशिवाय इंग्रजी, स्वाहिली, गुजराती व अरबीमध्ये अनेक साप्ताहिके निघतात.

दारेसलाम येथे बिनतारी प्रक्षेपण केंद्र असून तेथून स्वाहिली व इंग्रजीत कार्यक्रम प्रसारित होतात. रेडिओ टांझानियाचे कार्यक्रम मोझँबीक, ऱ्‍होडेशिया, द. आफ्रिका व नामीबिया यांच्या भाषांतूनही प्रक्षेपित होतात. १९७४ मध्ये देशात ५,००,००० रेडिओ होते. देशात दूरचित्रवाणी नाही परंतु १९७३ मध्ये झांझिबार येथे पहिले रंगीत दूरचित्रवाणी केंद्र सुरू झाले. १९६८ मध्ये देशात २३० डाक घरे होती. १९७२ अखेर ४३,८२० दूरध्वनियंत्रे होती. झांझिबारमध्ये दूरध्वनी केंद्र असून तेथून पेंबा बेटावरील वेटे, चाकेचाके व एम्‌कोआनी येथे संपर्क साधता येतो. दोन्ही बेटांची मिळून ७ डाक घरे व १,७५० दूरध्वनियंत्रे आहेत.

लोक व समाजजीवन : टांझानियात अनेक टोळ्यांचे लोक राहत आले आहेत, तरी कोणत्याही एका टोळीचे लोक राजकीय, सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक दृष्ट्या वरचढ होऊ शकलेले नाहीत. पाषाणयुगात येथे जे बुशमेनसदृश्य लोक होते, त्यांचेच वंशज हल्लीचे सांदावे होत. इ. स. पू. १००० च्या सुमारास बुरूंगी, गॉरॉवा, इराक्व व अंबुगू हे कुशायटिक इथिओपियातून येऊन येथील पठारी प्रदेश व खचदरी येथे पसरले. पुढील सहस्त्रकात पश्चिमेकडून व नैर्ऋत्येकडून आलेले बांटूभाषी बहुसंख्य शेती करणारे व लोखंडी हत्यारे वापरणारे असल्यामुळे त्यांनी आधीच्या लोकांना सामावून घेतले किंवा दुसरीकडे पिटाळले. हळूहळू चालीरीती, समाजव्यवस्था व भाषा स्थिर झाल्या. सध्या फक्त सुकुमांचीच संख्या दहा लाख आहे. न्याम्वेझी, हेहेत न्याकूसा, हाया चग्गा, गोगो आणि हा हे प्रत्येकी तीस हजारांवर आहेत. अन्गोनी, न्याकूसू व याओ उत्तरेकडे सरकलेले बांटू होत. लूओ, टाटोगा आणि मसाई या नायलोटिकांचा वेगळाच गट आहे. या मूळच्या आफ्रिकी लोकांशिवाय येथे आशियाई व यूरोपीय अल्पसंख्य आहेत. आशियाईमध्ये इस्माइली, बोहरा, शीख, पंजाबी, जैन आणि गोवेकर आहेत. यूरोपीयांत इंग्लीश भाषी बहुसंख्य आहेत. त्यांशिवाय जर्मन, स्कँडिनेव्हियन, इटालियन व ग्रीक आहेत. अरब ही एक वेगळीच अल्पसंख्य जमात आहे. १९६७ च्या जनगणनेप्रमाणे त्या वेळी देशात १६,८८४ यूरोपीय, ७५,०१५ भारतीय व पाकिस्तानी, २९,७७५ अरब आणि इतर ८३९, न नोंदलेले १,५९,०४२ व १,१४,८१,५९५ आफ्रिकी होते. वेगवेगळ्या बोलीभाषा व चालीरीती असलेल्या आफ्रिकींच्या शंभरांहून अधिक टोळ्या होत्या. १९६६ मध्ये रूआंडामधून १३,५००, काँगोमधून ८०० व मोझँबीकमधून १२,००० निर्वासित येथे आलेले होते.


दक्षिण भागातून मध्य आफ्रिकेवर आणि दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाच्या खाणप्रदेशाकडे होणारे देशांतर थांबले असले, तरी आर्थिक कारणांमुळे देशाच्या दक्षिण भागाकडून उत्तर भागाकडे स्थित्यंतर चालूच आहे. अरब व इतर आशियाई आणि यूरोपीय आप्रवाशांपैकी आशियाईंचे आप्रवासन जवळजवळ थांबलेलेच आहे.

लोकवस्तीचे वितरण बरेचसे विषम आहे. उंचीवरील प्रदेश, व्हिक्टोरिया सरोवराजवळचा प्रदेश व इतर जलसमृद्ध प्रदेशांत ती दाट आहे, तर मध्य व पश्चिम भागात त्से त्से माशीच्या त्रासामुळे व रुक्षपणामुळे ती विरळ आहे. १९६७ च्या जनगणनेनुसार मुख्या भूमीवरील लोकवस्तीची घनता दर चौ. किमी. ला १३·३५ होती. म्वांझा आणि किलिमांजरो विभागात ती दर चौ. किमी. ला अनुक्रमे ५३·८४ व ४८·८४ होती, तर रूवूमा व ताबोरा विभागात ती दर चौ. किमी. ला ६·९ पेक्षाही कमी होती. मसाई, मोंडूली, नाचिंग्वा आणि एम्‌पांडा भागात ती दर चौ. किमी. ला फक्त १·९, तर ऊकेरेवे भागात ती दर चौ. किमी.ला १७० इतकी आहे.

मुख्य भूमीवरील लोकसंख्या १९५७–६७ या दशकाच्या ३५ टक्के वाढली. मृत्यूप्रमाण दरहजारी २४-२५ वरून २२ वर आले, तर जननप्रमाण दरहजारी ४५–४६ वरून ४७ वर गेले. आयुर्मर्यादा ३५ ते ४० वर्षे होती, ती ४०–४१ वर्षे झाली. लोकसंख्येचे एक वैशिष्ट्य असे की ४४ टक्के १५ वर्षे वयाखालचे आहेत, तर ७५ वर्षे वयावरील लोक फक्त ३ टक्के आहेत. पुरुष आणि स्त्रिया यांचे प्रमाण ९५ : १०० आहे. टांगा, पान्‌गानी व  एम्‌झिझी भागात ते १२० : १०० आहे, तर कीबोन्डो, कासूलू व एन्जोम्बे भागात ते ८० : १०० असे आहे.

भाषा : इंग्रजी व किउंगुजा (अभिजात स्वाहिली) या अधिकृत भाषा आहेत. स्वाहिली ही किनारी भागात उद्‌गम पावून पश्चिमेकडे पसरत गेली व लोकांची मुख्य भाषा बनली. ती मूलतः एक बांटू भाषा असून तिच्यात अरबी, इंग्रजी, हिंदी व पोर्तुगीज शब्दांची मोठी भर पडलेली आहे. ९५% लोक बांटू भाषा बोलतात. त्यांच्या शंभराहून अधिक बोली ओळखता येतात. किसूकूमा, किन्याम्वेझी, किमाकोंडे, किहाया, किचग्गा, किगोगो, किहा, किहेहे, किन्याक्यूसा व किलुगुरू या त्यांत प्रमुख आहेत. मसाई, टाटोगा व ल्युओ लोक नायलॉटिक भाषा बोलतात. इराक, गॉरॉवा, अलावा, अन्गोम्विया व अंबुगू हे कुशायटिक भाषा बोलतात. सांदावे व हाड्झा हे दक्षिण आफ्रिकेतील बुशमेन व हॉटेंटॉट यांच्या खोइसान किंवा क्लिक भाषा बोलतात. किनारी प्रदेशात अरबी प्रचलित आहे. आशियाई लोक गुजराती, हिंदी, पंजाबी व उर्दू बोलतात. गोवेकर कोकणी बोलतात.

धर्म : जडप्राणवादी लोकांची संख्या हळूहळू कमी होत आहे. १९६७ मध्ये ३१ टक्के लोक निरनिराळ्या ख्रिस्ती पंथांचे, ३१ टक्के शिया आणि सुन्नी पंथीय मुस्लीम आणि आशियाई लोकांत इस्माइली, हिंदू, जैन, बौद्ध, रोमन कॅथलिक व पारशी लोक होते. रोमन कॅथलिक बहुतेक गोवेकर होते.

झांझिबार व पेंबा बेटांत सु. तिसरा हिस्सा लोक अलीकडे मुख्य भूमीवरून गेलेले आहेत. स्थानिक बांटू लोकांपैकी पेंबा बेटावर पेंबा व झांझिबार हाडिमू व टुंबाटू आहेत. दहाव्या शतकात आलेल्या पर्शियनांना त्यांनी सामावून घेतले. हे व काही गुलामांचे वंशज आपणास शिराझी म्हणवितात. आफ्रो-शिराझी या बेटांवर बहुसंख्य आहेत. काही कॉमोरियन आणि सोमाली आहेत. अरबही बरेच आधी स्थिर झाले होते. ओमानमधून आलेले अरब उच्च समजले जात. नंतर आलेले गरीब अरब मांगा होत. आशियाई लोकांत मुस्लिम व मुस्लिमेतर आहेत. झांझिबारमधील ९६ टक्के अरब आणि आफ्रिकी लोक मुस्लिम आहेत. काही तेथील पारंपरिक धर्मांचे आहेत. स्थानिक मुस्लिम बहुतेक सुन्नी आहेत. इतर इस्लामीत आशियाई इस्माइली, इथना आशारी, सुन्नी व बोहरा आहेत. मुस्लिमेतर आशियाई अल्पसंख्यांक बहुतेक हिंदू आणि गोवेकर ख्रिस्ती आहेत.

झांझिबार व पेंबा यांची १९६७ ची लोकसंख्या ३,५४,३६० होती. १९५७–६७ पर्यंत १८ टक्के वाढ झालेली होती. झांझिबारमध्ये लोक जास्त असले, तरी पेंबामधील लोकसंख्येची घनता जास्त आहे (दर चौ. किमी. ला १६४.२३).

पुरूष आणि स्त्रिया यांचे प्रमाण १०२ : १०० आहे. झांझिबारच्या मागरिब भागात ते १२४ : १०० आहे. मुख्य भूमीवर नागरी वस्तीचे प्रमाण ६ टक्के, तर या बेटांवर ते २३ टक्के आहे. १९५७–६७ या दशकात बालमृत्यूचे प्रमाण हजारी १६० वरून १४० वर आले, तरी एकंदर मृत्यूप्रमाण हजारी २०–२१ इतकेच राहिले. आर्युर्मयादा ४२–४३ वरून ४३–४४ वर गेली.

या बेटांवर स्वाहिली हीच प्रमुख भाषा आहे. किपेंबा, किहडिम् आणि किटुंबाटू या बांटूभाषा चालतात. बोलीभाषा पुष्कळ आहेत. आशियाई लोक गुजराती, कच्छ व हिंदुस्तानी बोलतात. शाळांत इंग्रजी शिकविले जाते व ती भाषा पुष्कळशी वापरातही आहे.

या बेटांवरील ग्रामीण वस्तीत पूर्वी पन्नासाहून कमी अरब कुटुंबांकडे नारळ व लवंगा यांच्या बागा होत्या. जमिनीचे राष्ट्रीयीकरण व त्यापाठोपाठच्या शेतीसुधारणा यांमुळे सर्वत्र चित्र आमूलाग्र बदलून गेले. १९७० पर्यंत २४,००० शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १·२ हे. जमीन देऊन अन्नधान्यांच्या, विशेषतः भाताच्या उत्पादनास उत्तेजन देण्यात आले. पूर्वेकडे मच्छीमारी अद्यापही महत्त्वाची आहे. नागरी वस्तीत जुन्या, अरुंद रस्त्यांच्या, विशिष्ट पौर्वात्य छापाच्या विभागांकडून आधुनिक सुखसोयींच्या विभागांकडे लोकवस्ती आकर्षित होत आहे. तथापि झांझिबार (लोक. ६८,४९०–१९६७) चे मुस्लिम स्वरूप अद्याप कायम आहे. अन्गांबो या पूर्वीच्या आफ्रिकी विभागाला आधुनिक स्वरूप दिले जात आहे. किलिमानी, बांबी व चानी ही नवीन ग्रामीण शहरे विकसित होत आहेत. पेंबामध्ये एम्‌कोआनी, चाकेचाके व वेटे येथे अशाच प्रकारचे रूपांतर होत आहे.

मुख्य भूमीवर ग्रामीण भागात बहुतेक लोक दूरदूर पसरलेल्या शेतांवरील घरात राहतात. किनारी प्रदेशातील शेती व मच्छीमारी गावे वेड्यावाकड्या रस्त्यांची, नारळी, काजू, कसावा व इतर पिके यांच्या अंगणांनी वेढलेल्या मातीच्या घरांची असतात. किलीमांजारो व म्वेरू विभागात घरे व त्यांची अंगणे दाटीवाटीने वसलेली असतात. त्यापेक्षा थोड्या कमी उंचीवर केळी व कॉफी यांच्या बागा दिसतात. शंकूच्या आकाराच्या छपराच्या वाटोळ्या झोपड्यांऐवजी चौकोनी नवीन घरे येत आहेत. सुकुमांच्या गावात बाग, गृहप्रमुख व त्याच्या बायकांची घरे, धान्याची कोठारे, गोठा यांभोवती एका बाहेर एक अशी कुंपणे असतात. गोगोंच्या बसकी, सपाट छपरांची चौकोनी घरे गोठ्याभोवती बांधलेली असतात. या सर्वांत आता वेगाने सुधारणा होऊन आधुनिक चौकोनी घरे येत आहेत. नागरी विभागात ग्रामीण समाजाची बंधने सैल झालेली असतात आणि वस्ती बहुदेशीय असते. दारेसलामच्या व्यापारी विभागात अलीकडेपर्यंत आशियाईंचा प्रभाव होता. कमी उत्पन्नाच्या लोकांच्या उपनगरातील स्वाहिली घरांतही खूप गर्दी असते. श्रीमंतांचे बंगले सुंदर परिसरात दूरवर असतात. टांगा या पेंबासमोरच्या शहरात जुन्या जर्मन इमारती कायम आहेत. आरूशा हे नवे शहर ईस्ट आफ्रिकन कम्युनिटीची राजधानी आहे.

कमी उत्पन्नाच्या गटातील लोकांसाठी घरबांधणीची योजना आहे. १९६२ च्या नॅशनल हौसिंग कॉर्पोरेशनचा १९७१ पर्यत बराचसा खर्च दारेसलाममधील गलिच्छ वस्तीसुधारणा व सु. ४,००० कमी खर्चाची व ४०० मध्यम खर्चाची घरे यांवर झालेला आहे.

   


शासनाची समाजकल्याण योजना नाही. शासनाचे समूह विकास व राष्ट्रीय संस्कृती मंत्रालय समूह विकासावर लक्ष केंद्रित करते. ते ग्रामविकास मंडळांच्या स्थापनेस उत्तेजन व साहाय्य देते तसेच प्रशिक्षित नोकरवर्ग पुरवून स्थानिक रस्ते, पूल, पाणीपुरवठा, बाजार, शाळा, दवाखाने व सामूहिक केंद्रे इत्यादींस चालना देते. साक्षरता व आरोग्य मोहिमा आणि अधिक उत्पादन कार्यक्षम यांसही मदत करते. वृद्ध, विधवा, शारीरिक किंवा मानसिक न्यूनतेच्या लोकांची जबाबदारी पारंपरिक टोळीव्यवस्था घेते. अनाथ मुलांचा प्रश्नही असाच सोडविला जातो. त्यात मिशन व स्वयंसेवामंडळेही सक्रिय भाग घेतात.

आरोग्य : टांझानियात हिवताप, निद्रारोग, काही परोपजीवी जंतूंमुळे होणारे रोग आणि देवी, बालपक्षाघात, कुष्ठरोग, क्षय, आमांश, आंत्रज्वर यांसारखे संसर्गजन्य रोग आहेत. त्यांत अपपोषणाचीही भर पडते. यांस आळा घालण्याच्या योजनांना यश येत आहे. देशभर शासन, स्थानिक संस्था आणि मिशन यांनी चालविलेले वैद्यकीय सेवेचे जाळे पसरले आहे. शासन व मिशन यांनी चालविलेली १२० हून अधिक रुग्णालये आहेत परंतु लोकांस मुख्यतः १,६०० दवाखान्यांचाच वैद्यकीय मदत म्हणून उपयोग होतो. सार्वजनिक वैद्यकीय सेवेचे सामाजिकीकरण झाले असले, तरी खाजगी वैद्यकीय व्यवसाय चालू आहे. सु. २२,००० लोकांना १ डॉक्टर असे प्रमाण पडते. रोगप्रतिबंधके, पोषण, परिसराची स्वच्छता, सूतिका व बालआरोग्य, सांसर्गिक रोगांचे नियंत्रण आणि ग्रामीण आरोग्य केंद्रांची स्थापना यांवर भर दिला जात आहे. १९६७ मध्ये देशात २९५ डॉक्टर, ५ दंतवैद्य, ११ औषधनिर्माते, १,८०७ परिचारिका व दाया होत्या. रुग्णालये, दवाखाने व चिकित्सालये १,३९९ होती व २२,११७ खाटा होत्या. शासकीय रुग्णालयात व चिकित्सालयात प्रवेश, राहणे, देखरेख, उपचार ही सर्व मोफत असतात. दारेसलाम येथील मुहिंबिली रुग्णालय व वैद्यकीय केंद्रे येथे ५०० परिचारिका व इतर सेवक यांच्या शिक्षणाची सोय आहे.

शिक्षण : अध्यक्ष न्येरेरे यांनी १९६७ मध्ये स्वावलंबनासाठी शिक्षण–एज्युकेशन फॉर सेल्फ रिलायन्स  या पुस्तकात व्यक्त केलेल्या मतांनुसार शिक्षणाचा रोख विद्यापीठीय शिक्षणाकडून समाजसेवेकडे वळविला गेला आहे. प्राथमिक शाळा प्रवेशाचे वय ७ वर्षे करून प्रात्यक्षिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. १९७३–७४ पासून शिक्षण निःशुल्क करण्यात आले आहे. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था व मिशन ही शाळा चालवितात. १९७१ मध्ये ४,१३३ प्राथमिक शाळांतून १९,७८६ शिक्षक आणि ९,०२,६०९ विद्यार्थी होते १४१ माध्यमिक शाळांतून २,१९९ शिक्षक व ३२,६०३ विद्यार्थी होते व्यावसायिक शिक्षणाच्या चार शाळा होत्या. शिक्षक प्रशिक्षणाच्या २२ विद्यालयांतून ३२७ शिक्षक व ४,४७१ विद्यार्थी होते. त्यांपैकी दरवर्षी २,७२५ कामावर रुजू होत आहेत. दारेसलाम येथील विद्यापीठीय महाविद्यालय ईस्ट आफ्रिका युनिव्हर्सिटीचा एक भाग आहे. तेथे ३०८ शिक्षक व २,०६० विद्यार्थी होते. झांझिबारमध्ये १९६७ मध्ये ९० प्राथमिक शाळांतून ३९,००० विद्यार्थी व १२ माध्यमिक शाळांतून १,९६१ विद्यार्थी होते. १९६१ पर्यंत आफ्रिकी, आशियाई व यूरोपीय मुलांसाठी वेगवेगळ्या शाळा व पद्धती होत्या. आता सर्वांसाठी एकाच प्रकारची शाळा व पद्धती आहे.

टांगा येथील टांगा मेमोरियल लायब्ररी दारेसलामची टेक्निकल इन्स्टिट्यूट लायब्ररी व युनिव्हर्सिटी कॉलेजची लायब्ररी ही प्रमुख ग्रंथालये आहेत. दारेसलामची कम्युनिटी सेंटर फ्री लायब्ररी सबंध देशात डाकेने पुस्तके वाचण्यासाठी पुरविते. अमेरिकेच्या माहिती खात्याचेही ग्रंथालय आहे.

दारेसलाम येथील नॅशनल म्यूझीयम ऑफ टांझानियामध्ये तांत्रिक, पुरातत्त्वीय, ऐतिहासिक, भूशास्त्रीय व निसर्गेतिहास यांचे विभाग आहेत. डोडोमा येथे भूशास्त्रीय संग्रहालय आहे. झांझिबार येथे पीस मेमोरियल संग्रहालय व ग्रंथालय आहे. तेथे झांझिबार व पेंबा यांचे वंश, इतिहास, उद्योग, निसर्गेतिहास याचे विभाग आहेत.

कला व क्रीडा इत्यादी : इयासी सरोवराच्या उत्तरेस ओल्डुवायी निदरीत सु. अठरा लक्ष वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीचा पुरावा मिळाला आहे. खडकावरील चित्रे, ढिगारे व इतिहासपूर्व मानवी वस्त्यांचे पुरावे सापडतच आहेत. चीन, भारत, अरबस्तान व नंतर यूरोप या सागरपार देशांशी आलेल्या संबंधांचे परिणाम येथे दिसून येतात. तथापि येथील परंपरा, भाषा व चालीरीती यांची विविधता हा या देशाचा सांस्कृतिक वारसा आहे. येथील स्वाहिली भाषा आफ्रिकेच्या फार मोठ्या प्रदेशात पसरली आहे. येथील रूपणकलात लाकडांवरील माकोंडे, अप्रतिरूप कोरीवकाम, प्राणी आणि लोक यांचे झारामो कोरीवकाम, मसाईची शस्त्रनिर्मिती यांचा समावेश होतो. झांझिबार येथील लाकडी अरबी संदुका व उत्कृष्ट कोरीवकामाचे जडावाचे दरवाजे प्रसिद्ध होते. इतरत्र टोपल्या, चटया विणणे, भांडी, कातडी वस्तू, ढोल आणि वाद्ये तयार करणे या दैनंदिन व्यवहाराच्या कला आहेतच. प्रत्येक टोळीची विशिष्ट नृत्ये आणि लोककथा असतात. स्वाहिली गद्य व काव्य यांस पुन्हा बहर येत आहे. शाबन रॉबर्ट यांचे गद्य व काव्य लक्षणीय आहे. अध्यक्ष न्येरेरे यांनी आपल्या राजकीय व सामाजिक मतांच्या लिखाणाबरोबरच शेक्सपिअरच्या नाटकांचे स्वाहिलीत भाषांतर केले आहे.

टांझानियात फुटबॉल, क्रिकेट, मैदानी व मर्दानी खेळ, कसरती, टेनिस, पोहणे, मासे पकडणे हे क्रीडाप्रकार लोकप्रिय आहेत. यांच्या संघटनाही आहेत.

पर्यटन : टांझानियातील आठ राष्ट्रीय उद्याने सर्व आफ्रिकेतील उत्कृष्ट उद्यानांपैकी आहेत. सेरेंगेटी व रूआहा उद्यानाचे क्षेत्रफळ २५,००० चौ. किमी. हून अधिक आहे. गोंबे येथे चिंपँझी पहावयास सापडतात. एन्‌गोराँगोरो उद्यानातील प्रचंड ज्वालामुखी विवर, किलिमांजारो व म्वेरू पर्वत शिखरे, व्हिक्टोरिया व टांगानिका सरोवरे ही निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. पर्यटकांसाठी गिर्यारोहण, शिकार, जलपर्यटन, मच्छीमारी इत्यादींच्या सोयी केल्या जातात. पर्यटन व्यवसाय वाढत असून त्यास उत्तेजन दिले जाते. १९७२ मध्ये १०४ निवासांतून ५,७१५ स्वारांची सोय केलेली होती. दारेसलाम येथे टांझानिया पर्यटन महामंडळाची कचेरी असून आरूशा येथील तिच्या शाखेतर्फे देशातील वन्यपशुदर्शनाच्या सहलींची योजना होती.

 दारेसलाम, डोडोमा, झांझिबार, आरूशा यांशिवाय म्वांझा, किगोमा, मूसोमा, बूकोबा ही सरोवरांवरील बंदरे, टांगा व मटवारा ही सागरी बंदरे आणि मोशी, मोरोगोरो, ईरिंगा, ताबोरा ही शहरे महत्त्वाची आहेत.

संदर्भ :

1. International Bank for Reconstruction and Development, The Economic Development of Tanganyika, Baltimore, 1960.

2. Middleton, J. Campbell, J. Zanzibar : Its Society and Its Politics, London, 1965.

3. Oliver, R. Mathew, G. Harlow, V. Eds. History of East Africa, 2 Vols., London, 1963, 1965.

परांजपे, श. द. लिमये, दि. ह. कुमठेकर, ज. ब. 


टांझानिया