टॅलमुड : (तलमूद). हिब्रू भाषेतील ‘तलमूद’ शब्दाचा अर्थ ‘शिक्षण’ असा आहे. ज्यू (यहुदी) लोकांच्या नागरी कायदा आणि धर्मशास्त्र या विषयांवरील बायबलला (जुना करार) पूरक असलेल्या प्राचीन धार्मिक ग्रंथाला टॅलमुड हे नाव आहे. ज्यू समाजात बायबलाच्या खालोखाल टॅलमुडला धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. टॅलमुडमध्ये अंतर्भूत असलेले लेखन इ. स. पू. सु. २०० ते इ. स. सु. ५०० ह्या सातशे वर्षांच्या काळात झाले असून तत्कालीन ज्यू समाजाच्या सांस्कृतिक विकासाचे प्रतिबिंब त्यात पडलेले दिसते. टॅलमुडच्या दोन मुख्य प्रती आढळतात : पॅलेस्टाइन प्रत व बॅबिलोनियन प्रत. यांतील बॅबिलोनियन प्रत हीच ज्यू समाजात विशेष मान्य असून तिचाच मुख्यत्वे टॅलमुड ह्या नावाने निर्देश केला जातो. ह्या दोन्हीही प्रतींत ‘मिश्नाह’ नावाचा जो भाग आहे त्याची संहिता सारखीच आहे परंतु ह्या संहितेवरील भाष्याच्या स्वरूपाचा जो ‘गेमारा’ नावाचा भाग आहे, त्यात मात्र फरक आहे. ज्यूडा (सु. १३५–सु. २२०) नावाच्या प्राचीन ज्यू धर्मगुरूने कायद्यासंबंधी व धर्मासंबंधी मिश्नाह नावाचा ग्रंथ इ. स. २०० च्या सुमारास लिहिला होता. ‘गेमारा’ हे मुख्यत्वे या मिश्नाहवरील विस्तृत भाष्य आहे. हे भाष्य संवादरूपाने असून त्यात मधूनमधून जे अवांतर लेखन आढळते, त्याला ‘हग्गादा’ म्हणतात. या हग्गादात तत्कालीन जीवनाची वर्णने, भ्रामक समजुती, राबींची ज्ञानवचने इत्यादींचा अंतर्भाव आहे. उदा., ‘प्रत्येकास शंका घेण्यास वाव द्या’, ‘वर्गात पंचवीसपेक्षा जास्त विद्यार्थी असू नयेत’, ‘पाठ सुरू करताना त्यासंबंधी काही तरी विनोदी उदाहरण द्या’ इत्यादी. ‘मिश्नाह’ आणि ‘गेमारा’ ह्या दोहोंंना मिळून टॅलमुड असे म्हटले जाते.
टॅलमुडची पॅलेस्टाइन प्रत सु. ४०० मध्ये आणि बॅबिलोनियन प्रत सु. ५०० मध्ये पूर्ण रूपात तयार झाली. बॅबिलोनियन प्रतीत सु. २५,००,००० शब्द असून ही प्रत पॅलेस्टाइन प्रतीपेक्षा जवळजवळ तिप्पट मोठी आहे. मिश्नाहच्या लेखकांना ‘तन्नैम’ आणि गेमाराच्या लेखकांना ‘ॲमोरैम’ म्हटले जाते. मिश्नाहची भाषा हिब्रू आणि गेमाराची भाषा हिब्रुमिश्रित ॲरेमाइक आहे. मिश्नाहचे इंग्रजी भाषांतर १९३३ मध्ये झाले आणि टॅलमुडच्या बॅबिलोनियन प्रतीचे इंग्रजी भाषांतर १९४८ मध्ये झाले. जर्मन, फ्रेंच, लॅटिन इ. भाषांतही टॅलमुडची भाषांतरे झालेली आहेत.
मिश्नाहचे विषयांच्या दृष्टीने सहा विभाग पाडलेले असून परत त्यांची विभागणी ६३ उपविभागांत आणि त्यांचीही विभागणी ५२४ प्रकरणांत केलेली आहे. मूळ मिश्नाह संहितेवरील स्थलकालपरिस्थितीच्या संदर्भात केलेल्या वेगवेगळ्या भाष्यांनुसार गेमाराचा भाग बनलेला असून त्यावरूनच टॅलमुडची पॅलेस्टाइन प्रत आणि बॅबिलोनियन प्रत अशा दोन मुख्य प्रती तयार झालेल्या आहेत.
संदर्भ : 1. Bokser, Ben Zion, Wisdom of the Talmud, New York, 1962.
2. Cohen, A Everyman,s Talmud, London, 1949.
माहुलकर, दि. द.