टॅरँटो : प्राचीन–तारास, टरेन्टम. इटलीच्या आप्यूल्या विभागातील याच नावाच्या प्रांताचे मुख्य ठिकाण व इटलीचे एक उत्तम बंदर. लोकसंख्या २,३६,३६४ (१९७१). हे टॅरँटो आखाताच्या उत्तर फाट्यावर मुख्य भूमी आणि जवळचे एक बेट यांवर मिळून वसलेले असून बारीच्या दक्षिण आग्नेयीस ८० किमी. आहे. ग्रीकांनी इ. स. पू. आठव्या शतकात तारास जिंकून तेथे नवीन गाव वसविले. ते लवकरच त्या वसाहतीत भरभराटले. नंतर रोमन, ऑस्ट्रॉगॉथ, बायझंटिन, लाँबर्ड, अरब, सॅरसन्झ, नॉर्मन इत्यादींची सत्तांतरे झाली. तुर्कांनीही स्वाऱ्या केल्या. नेपोलियनी युद्धांत येथे फ्रेंच नाविक तळ होता. शेवटी १८६० मध्ये याचा इटलीत समावेश झाला. येथे इटलीचा स्पेत्स्याच्या खालोखाल मुख्य नाविक तळ असून हे युद्ध-साहित्यनिर्मिती, व्यापार आणि कालव-संवर्धन इत्यादींचे केंद्र आहे. तसेच येथे जहाजबांधणी, लोखंड व पोलाद, फळे व अन्नपदार्थ डबाबंदी, रसायने, मद्य, ऑलिव्ह तेल, विटा, कापड, सिमेंट, काच, मृत्तिकाशिल्प इ. उद्योग आहेत. ओहोटीच्या वेळी मासेमारीही चालते. हे लाहमार्गाने बारी, ब्रिंडिसी व मेतापाँतो यांच्याशी जोडलेले आहे. येथून दारू, ऑलिव्ह तेल, फळे, टोमॅटो, मासे इ. माल निर्यात होतो. येथे अकराव्या शतकातील एक कॅथीड्रल आणि किल्ला आहे. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याने केलेल्या बाँब हल्ल्यात याचे फार नुकसान झाले.

कांबळे, य. रा.