टँपीको : मेक्सिकोच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रसिद्ध तेलबंदर. लोकसंख्या १,९६,१०० (१९७०). हे पानूको नदीवर मेक्सिकोच्या आखातापासून १० किमी. असून खनिज तेलशुद्धीकरणाचे व निर्यातीचे सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज बंदर आहे. येथून चांदी, साखर, गुरे, कातडी, कॉफी, शेतमाल, तांब्याचे धातूक यांचीही निर्यात होते. हे एक आधुनिक प्रवासी विश्रामस्थान आहे. १५३२ मध्ये वसलेले हे गाव १६८३ मध्ये चाच्यांनी नष्ट केल्यावर १८२३ मध्ये पुन्हा वसविले गेले. १६० किमी. परिसरात भरपूर तेल सापडल्यामुळे विसाव्या शतकात याला अधिक महत्त्व आले. काही काळ ते जगातील पहिल्या क्रमांकाचे तेलबंदर होते.
शहाणे, मो. ज्ञा.