टर्पेटाइन: काही वनस्पतींपासून मिळणारे एक बाष्पनशील (वाफ होऊन उडून जाणारे) तेल. ज्यांना शंकूच्या आकाराची फळे येतात अशा वृक्षांच्या [⟶ कॉनिफेरेलीझ] बुंध्याला खाचा पाडल्या म्हणजे त्यांमधून एक प्रकारचा काहीसा चिकट निस्राव (द्रवरूपाने बाहेर पडणारा पदार्थ) निघतो. नंतर हा घट्ट होतो. या पदार्थाला ओलिओरेझीन असे म्हणतात. ⇨पाइन वृक्षाच्या ओलिओरेझिनापासून किंवा वृक्षाच्या लाकडापासून बनविलेल्या बाष्पनशील तेलाला टर्पेंटाइन, टर्पेंटाइन तेल किंवा स्पिरिट्स ऑफ टर्पेंटाइन म्हणतात. हा एक पारदर्शक द्रव पदार्थ असून त्याला काहीसा तिखट पण सुवास असतो व कडवट चव असते. हवेच्या संपर्काने किंवा साठवून ठेवल्याने हा सुगंध कमी होतो व वासाचा तिखटपणा वाढतो.

टर्पेंटाइन हे एक मिश्रण आहे. त्याचे मुख्य घटक C10H16 हे रेणुसूत्र (संयुगामध्ये असलेली मूलद्रव्ये आणि त्यांच्या अणूंची संख्या व्यक्त करणारे सूत्र) असलेली द्विवलयी (संयुगातील अणू एकमेकांस जोडल्यामुळे जी साखळी बनते तिची टोके जुळविली म्हणजे वलय बनते अशा प्रकारची दोन वलये असलेली) हायड्रोकार्बने (हायड्रोजन व कार्बन या दोनच मूलद्रव्यांपासून बनलेली संयुगे) असतात उदा., आल्फा व बीटा पायनीन, ३–कॅरीन [⟶ टर्पिने]. टर्पेंटाइनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. सर्वांचे घटक सारखे नसतात. झाडाची जात, लागवडीचे ठिकाण व उत्पादनाची पद्धत यांना अनुसरून ते बदलतात.

उत्पादनाच्या पद्धती: (१) अशुद्ध ओलिओरेझीन प्रथम शुद्ध करतात. त्याकरिता ते बाष्पवेष्टित पात्रात (ज्या पात्राभोवती एक वेष्टन असून त्यातून पाण्याची वाफ जाऊ दिल्याने पात्र उष्ण होते अशा पात्रात) भरून उष्णतेने वितळवितात व यांत्रिक योजनेने हलवितात. त्यामुळे त्यात मिसळलेले लाकडाचे तुकडे इत्यादींसारखा हलका केरकचरा वर तरंगू लागतो आणि माती, रेती यांसारखे जड पदार्थ तळाशी जमतात व त्यामुळे ते सुलभतेने काढून टाकता येतात. दुसऱ्या एका पद्धतीत अशुद्ध ओलिओरेझीन टर्पेंटाइनामध्ये विरघळू देतात व शिल्लक राहणारा केरकचरा दूर करतात. यातील टर्पेंटाइन काढून टाकले म्हणजे शुद्ध ओलिओरेझीन मिळते. तिचे बाष्पऊर्ध्वपातन (पदार्थातून पाण्याची वाफ जाऊ देऊन मिळणारे बाष्पमिश्रण थंड करून द्रव्य अलग मिळविण्याची प्रक्रिया) किंवा निर्वात ऊर्ध्वपातन (पात्रातील हवा काढून टाकून नंतर ऊर्ध्वपातन करण्याची प्रक्रिया) केले म्हणजे टर्पेंटाइन ऊर्ध्वपतन पावते. ते शुद्ध करण्यासाठी प्रथम चुन्याच्या निवळीबरोबर मिसळतात त्यामुळे त्यातील रोझीन अम्ले लवणरूपाने वेगळी होतात. नंतर या टर्पेंटाइनाचे पुन्हा ऊर्ध्वपातन करतात व मिळणाऱ्या तेलाचे नंतर खंडशः ऊर्ध्वपातन (भिन्न तापमानास उकळणारे मिश्रणाचे घटक वेगळे काढण्याची ऊर्ध्वपातन प्रक्रिया) करून निरनिराळ्या प्रतींचे टर्पेंटाइन बनवितात. भारतात याचे प्रत १ (हलके) व प्रत २ (जड) असे दोन प्रकार काढतात. या पद्धतीने मिळविलेल्या टर्पेंटाइनाला गम-टर्पेंटाइन असेही नाव आहे. टर्पेटाइन काढून घेतल्यावर उरणाऱ्या घन पदार्थाला रोझीन (राळ हिंदीत बिरोजा) म्हणतात. टर्पेंटाइन निर्मितीत उत्पन्न होणारा हा एक उपपदार्थ (मुख्य पदार्थ बनविताना तयार होणारा आनुषंगिक पदार्थ) आहे. कागद, साबण, रंग, रोगणे इ. उद्योगधंद्यांत तो उपयोगी पडतो. (२) पाइन वृक्ष इमारती लाकडासाठी तोडल्यावर त्यांचे बुंधे जमिनीत तसेच राहतात. काही काळानंतर ते काढतात व त्यांचे तुकडे करून ते निष्कर्षण पात्रात भरतात. नंतर दाब आणि उष्ण बेंझीन किंवा गॅसोलीन यांचा उपयोग करून लाकडातील ओलिओरेझीन विरघळून घेतात. विद्रावातील विद्रावक (विरघळविणारा पदार्थ बेंझीन अथवा गॅसोलीन) काढून घेऊन पुनःपुन्हा वापरतात. खाली राहिलेल्या ओलिओरेझिनाचे ऊर्ध्वपातन केले म्हणजे अशुद्ध टर्पेंटाइन मिळते. त्यामध्ये पाइन ऑइल व काही टर्पिन हायड्रोकार्बने टर्पेंटाइनाबरोबर मिसळलेली असतात. ती वेगळी करून शुद्ध टर्पेंटाइन बनवितात. या टर्पेंटाइन प्रकाराला ‘स्टीम डिस्टिल्ड वुड टर्पेंटाइन’ म्हणतात. (३) कागद करण्याचा लगदा बनविण्याच्या सल्फेट प्रक्रियेत पाइन वृक्षांचे तुकडे दाहक (कॉस्टिक) सोडा व सोडियम सल्फाइड यांच्याबरोबर शिजवितात. या वेळी लाकडातील ओलिओरेझिनामधील टर्पेंटाइनाची वाफ होते. ती थंड केली व मिळणारे तेल शुद्ध केले म्हणजे ‘सल्फेट टर्पेंटाइन’ म्हणून ओळखला जाणारा प्रकार मिळतो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर टर्पेंटाइनाचे उत्पादन होते. (४) पाइन वृक्षांचे ओलिओरेझीनयुक्त लाकूड व इमारतीसाठी वापरल्यावर राहिलेल्या पाइन लाकडाचे तुकडे यांचे भंजक ऊर्ध्वपातन (कार्बनी पदार्थातील घटकांच्या रेणूंचे तुकडे पडून संयुगे तयार होतील अशा तऱ्हेने ऊर्ध्वपातन) केले म्हणजेही टर्पेंटाइन मिळते त्याला डीडी टर्पेंटाइन म्हणतात. रशिया व यूरोपातील इतर काही देशांत ही पद्धत वापरतात.

विनिर्देश : टर्पेंटाइनाच्या विविध प्रकारांचे गुणधर्म लक्षात घेऊन त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. ग्राहकाला इष्ट त्या कच्च्या मालापासून बनविलेले निर्भेळ टर्पेंटाइन मिळविता यावे या हेतूने या प्रकारांचे विनिर्देश (ज्या कामासाठी एखादा पदार्थ वापरावयाचा असेल त्या दृष्टीने तो कितपत योग्य आहे हे ठरविण्यासाठी किंवा पदार्थ शुद्ध आहे. किंवा नाही हे जाणण्यासाठी उपयोगी पडणारा त्या पदार्थाच्या गुणधर्मांचा तपशील व ते ठरविण्याच्या पद्धती इत्यादींचा तपशील) निरनिराळ्या देशांनी तयार केले आहेत. त्यांमध्ये टर्पेंटाइन नमुन्याचा वर्ण, विशिष्ट गुरुत्व, अम्लांक (त्यात मुक्तरूपात किती अम्ल आहे हे व्यक्त करणारा विशिष्ट अंक) इ. भौतिक गुणांचा समावेश असतो.

उपयोग : रंग व रोगणे पातळ बनविण्यासाठी टर्पेंटाइन उपयोगी पडते. टर्पेंटाइन मिसळल्याने रंग व रोगणे वस्तूच्या पृष्ठभागावर योग्य प्रकारे पसरविता येतात व त्यामुळे थर चांगला बसतो.  

औषधामध्ये जुनाट श्वासनलिकादाह (श्वासनलिकेची आग होणे), पोट दुखणे, कंबर दुखणे, संधिशोथ (सांधे सुजणे) इ. विकारांवर टर्पेंटाइन वापरतात.

काही जंतुनाशके व कीटकनाशके बनविण्यासाठी आणि एथिल अल्कोहॉल पिण्यास अयोग्य करण्यासाठी (डिनेचर्ड स्पिरिट), तसेच आल्फा व बीटा पायनीन आणि इतर घटक द्रव्ये वेगळी काढण्यासाठी टर्पेंटाइन वापरले जाते. कारण या घटकांपासून रासायनिक क्रियांनी कृत्रिम कापूर, अनेक सुगंधी व स्वाददायक पदार्थ, आसंजके (ज्यामुळे पदार्थ चिकटविता येतात असे पदार्थ), वंगणे, विद्रावक आणि रबर, कागद इ. उद्योगांत उपयोगी पडणारी रसायने बनविता येतात. टर्पेंटाइनाचे क्लोरिनीकरण (संयुगामध्ये क्लोरिनाचा अंतर्भाव करणे) करून एक कीटकनाशक पदार्थ हैदराबाद येथील रिजनल रिसर्च लॅबोरेटरीने बनविला आहे.

उत्पादन : टर्पेंटाइनाचे जागतिक उत्पादन सु. ३२ कोटी लिटर आहे. त्यापैकी सु.४० टक्के अमेरिकेची संयुक्त संस्थाने, १५ टक्के रशिया व उरलेले चीन, स्पेन, पोर्तुगाल, भारत ग्रीस इ. देशांत मिळून होते.

 भारतातील टर्पेंटाइनाचे कारखाने बरेली, नान्ह व मीरानसाहिब येथे आहेत. होशियारपूर, सोमेश्वर, हृषिकेश इ. ठिकाणी कमी प्रमाणावर उत्पादन होते. पायनस लाँगिफोलिया (पायनस रॉक्सबर्घाय, चिर किंवा चिल) या वृक्षापासून मिळणारे ओलिओरेझीन यासाठी वापरतात. हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू, काश्मीर व उत्तर प्रदेश येथे ते जमविले जाते. पायनस खासिया या वृक्षापासूनही टर्पेंटाइन मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील इंडियन टर्पेंटाइन अँड रोझीन कंपनी या सरकारी कारखान्यात कच्च्या ओलिओरेझिनापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्पेंटाइन व रोझीन तयार करण्यात येते.

चाळीस किग्रॅ. ओलिओरेझिनापासून सामान्यतः ८ लि, प्रत १ चे व १·५ लि. प्रत २ चे टर्पेंटाइन आणि त्याबरोबर सु. ३० किग्रॅ. रोझीन मिळते. भारतातील टर्पेंटाइनाचे वार्षिक उत्पादन सु. २० लक्ष लि. आहे.

संदर्भ : 1. C. S. I. R., The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1969.

          2. Menon, A. K. Indian Essential Oils : A Review, New Delhi, 1960.

दांडेगावकर, सा. ह.