टंड्रा : ज्या प्रदेशाचे वर्षातील एखाद्या तरी महिन्याचे तपमान ०º से. ते १०º से.पर्यंत असते, अशा प्रदेशाचा समावेश टंड्रामध्ये केला जातो. टंड्रा प्रदेश सामान्यतः तीन ठिकाणी आढळतात. त्यांतील मुख्य म्हणजे सूचिपर्णी अरण्याच्या उत्तरेकडील, उत्तर ध्रुव प्रदेशालगतचा भाग आर्क्टिक टंड्रा म्हणून ओळखला जातो. समशीतोष्ण कटिबंधातील पर्वत प्रदेशापैकी तरुरेषेपेक्षा उंचावरील प्रदेशास अल्पाइन टंड्रा म्हणतात. अंटार्क्टिकाचा टंड्रा प्रदेश अल्प आहे. भूपृष्ठाचा दहावा हिस्सा टंड्रा प्रदेशाने व्यापला आहे. उत्तर अमेरिकेतील ६०º उ. पलीकडील भाग यूरेशियातील ७०º उ. पलीकडील भाग, पूर्व सायबीरियातील ६०º उ. पलीकडील कॅमचॅटकाजवळचा भाग आर्क्टिक टंड्रामध्ये येतो.
प्राणिजीवन : अनेक प्रकारचे पक्षी व प्राणी या प्रदेशात आढळतात. ससे, कोल्हे, लांडगे, लेमिंग, अस्वले इ. प्राणी या भागात आढळतात. रेनडियर, कॅरिबू, कस्तुरी वृषभ (मस्क ऑक्स) हे मोठे प्राणी गवत खाणारे आहेत. कस्तुरी वृषभाच्या अंगावरील जाड कातडी व केस यांमुळे त्याचे तीव्र थंडीपासून रक्षण होते. रेनडियर व कॅरिबू आपल्या टणक खुरांनी बर्फ उकरून त्याखालील दगडफूल, शैवाल यांसारख्या वनस्पती खातात. त्यांची शिंगेही बर्फ उकरण्यास व दाट झुडुपांतून वाट काढण्यास उपयोगी पडतात. अमेरिकन व यूरेशियन टंड्राच्या सर्वच भागांत ते आढळत नाहीत. रेनडियर प्रामुख्याने उत्तर यूरोपात आढळतात. नंतर उ. अमेरिकेत त्यांना नेण्यात आले. रेनडियरचे मांस उत्तर आणि पश्चिम अलास्कामध्ये लोकांचे अन्न म्हणून उपयोगी येते. फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, कोला द्वीपकल्प या भागांत रेनडियरला फारच महत्त्व आहे. पांढऱ्या रंगाची ध्रुवीय अस्वले विशेषतः समुद्राकाठी अधिक आढळतात. मासे हे येथील प्राण्यांचे व माणसांचे मुख्य अन्न. सील जातीचा मासा उन्हाळ्यात स्थलांतर करतो. बेरिंग सामुद्रधुनीच्या भागात सील माशाची पकड मोठ्या प्रमाणावर केली जाते. व्हेल मासाही तितकाच महत्त्वाचा असून नॉर्वेमध्ये ते पकडण्यासाठी केंद्रे उभारलेली आहेत.
याशिवाय रानमांजरे, घुबडे, पाणबदके व कोंबड्यांसारखे पक्षी या प्रदेशात आढळतात. डास व माशा भरपूर असून त्यांचा त्रास माणसांना व प्राण्यांनाही होतो. वनस्पतींची वाढ व प्राण्यांचा रहिवास चार महिन्यांपुरताच मर्यादित असतो. निसर्गाशी जुळवून घेता यावे म्हणून काही सूक्ष्म जीवांना व कोळ्यांना निसर्गतःच काळे, लाल यांसारखे गडद रंग मिळालेले आढळतात. काही बेडूक हिवाळ्यात स्वतःला दिर्घकाळ चिखलात पुरून घेऊन राहतात. शीतनिष्क्रयता हा विशेष बऱ्याच प्राण्यांत दिसून येतो. स्थलांतर करणारे पक्षीही या भागात आढळतात. ते फुले, कळ्या, कीटक इ. खाऊन जगतात. अंटार्क्टिकाच्याभागात पेंग्वीन पक्षी आढळतो. टंड्रातील वनस्पती व प्राणी यांच्या जाती कमी असल्या तरी त्यांची संख्या मोठी असते. लेमिंगसारखे तृणभक्षक आणि त्यांच्यावर जगणारे हिमघुबड, हिमकोल्हा यांसारखे मांसभक्षक यांच्या संख्येतील चढउतारात सुसंगती आढळते. अल्पाइन टंड्रातील रानमेंढ्या, आयबेक्स, शॅमॉय इ. प्राणी व बरेच पक्षी हिवाळ्यात कमी उंचीच्या प्रदेशात स्थलांतर करतात. हिवाळ्यात पांढऱ्या रंगामुळे पुष्कळ प्राण्यांना संरक्षण मिळते.
मानवी जीवन : एस्किमो हे टंड्रातील प्रमुख रहिवासी उ. अमेरिका व ग्रीनलंडच्या किनारी भागांत यांच्या वसाहती आढळतात. लोकसंख्येचे वितरण फारच विरळ असते. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. १ पेक्षाही कधी कधी कमी आढळते. यूरेशियाच्या टंड्राच्या भागात लॅप, सॅमॉइड व इतर श्वेतवर्णी जमाती विशेषतः उत्तरवाहिनी नद्यांच्या काठी वसाहती करून राहतात. एस्किमोंप्रमाणेच रेनडियरचे कळप पाळणे, शिकार करणे, मासेमारी करणे हे यांचे मुख्य व्यवसाय आहेत. यांशिवाय लाकूडतोड हाही एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. अलीकडे खनिजांचा शोध, ध्रुव प्रदेशावरून जाणारे जवळचे विमानमार्ग, हवामाननिरीक्षण, प्रदेशांवरील स्वामित्व व व्यापारी माल आणि शस्त्रास्त्रे यांची वाहतूक यांमुळे टंड्रा प्रदेशातील वर्दळ वाढली आहे. त्यामुळे येथील लोकांचा इतर लोकांशी अधिक संपर्क येऊन त्यांच्या सर्वस्वी निसर्गाधीन जीवनपद्धतीत बराच फरक पडू लागला आहे. रेडिओसारखी संपर्क व करमणूकसाधने, वनस्पतिज अन्नपदार्थ, मद्ये, आधुनिक शस्त्रास्त्रे व नवनवीन व्यवसायांत शिरकाव यांचा जाणवण्याजोगा परिणाम होऊ लागला आहे.
“