झेलम : सिंधूला पाणी पुरविणाऱ्या पंजाबातील पाच नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडील नदी. लांबी सु. ७२५ किमी. प्राचीन संस्कृत ग्रंथातील वितस्ता, अलेक्झांडरच्या इतिहासकारने हायडास्पीझ व टॉलेमीने बायडास्पीझ म्हणून उल्लेखिलेली, मुस्लिमांनी बिहत, विहत किंवा बिहतब नाव दिलेली व आधुनिक काश्मीरी वेथ नदी म्हणजेच झेलम होय.
झेलम जम्मू-काश्मीर राज्यात, बनिहाल खिंडीच्या पायथ्याशी, वेरिनाग येथील झऱ्यात उगम पावून पीर पंजाल पवर्ताच्या उत्तर उतारावरून, काश्मीरच्या दरीतून अनंतनाग, श्रीनगर इ. शहरांवरून वायव्येकडे वुलर सरोवरात जाते. त्यातून सोपूर येथे बाहेर पडून नैर्ऋत्येकडे बारमूलवरून ती पीर पंजालच्या अत्यंत खोल, उभ्या भिंतीच्या निदरीतून जाऊन पुन्हा वायव्येस जाते. मुझफराबाद येथे तिला किशनगंगा मिळते. इतरही लहानमोठ्या उपनद्या तिला मिळालेल्या आहेतच. मग दक्षिणेकडे वळून ती भारताचे जम्मू-काश्मीर राज्य व पाकिस्तानचा वायव्य सरहद्द प्रांत यांच्या सीमेवरून जाऊन पूंछ नदी मिळाल्यानंतर पाकिस्तानात मीरपूरला येते. मांगला येथे शिवालिक रांग भेदून ती गाळमैदानात उतरते. नैर्ऋत्येकडे झेलम गावावरून मिठाच्या डोंगराजवळून खुशाब येथे आल्यावर दक्षिणवाहिनी होऊन ती त्रिम्मू येथे चिनाबला मिळते. गाळमैदानात काश्मीरप्रमाणेच ‘कारेवा’चे उंच प्रदेश आढळतात. येथे प्लाइस्टोसीन काळातील सस्तन प्राण्यांचे जीवाश्म व मानवी वस्तीचे अवशेष सापडले आहेत.
यार्दी, ह. व्यं.
“