झेंडू : (मखमल हिं. गुलजाफरी, गेंद सं. स्थूलपुष्प इं. आफ्रिकन मॅरीगोल्ड लॅ. टॅजेटस इरेक्टा कुल-कंपॉझिटी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ओषधी मूळची मेक्सिकोमधील असून हिचे विविध प्रकार बागेमधून सर्वत्र शोभेकरिता लावतात. ती सु. एक मी. उंच वाढते. फांद्या सरळ असतात. पाने अतिखंडित, एकांतरित (एकाआड एक), जाड व लोमश (केसाळ) असून त्यांना विशिष्ट प्रकारचा वास असतो. फुलोरे स्तबक [ ⟶ पुष्पबंध] प्रकारचे १५ सेंमी. व्यासापर्यंत मोठे, गर्द पिवळे किंवा काहीसे पिंगट आणि क्वचित पांढरटही असतात. एकेरी व दुहेरी प्रकार आढळतात. ⇨सूर्यफूल, ⇨डेलिया  व ⇨झिनिया यांच्या स्तबकांशी व फुलांच्या संरचनेशी याचे साम्य आढळते. फुलांचा औषधी उपयोग डोळ्यांच्या नेत्रश्लेष्मपटल शोथ (डोळे येणे) या विकारावर आणि दूषित व्रणांवर (जखमांवर) होतो. त्यांचा रस पोटात घेतल्यास रक्तशुद्धिकारक व मूळव्याधीवर गुणकारी पाने गळवे आणि काळपुळी यांवर लावतात. कानदुखीवर त्यांचा रस कानात घालतात. या ओषधीत बाष्पनशील (उडून जाणारे) तेल व रंजक द्रव्य असते. दसऱ्याला व दिवाळीला या फुलांच्या माळा शोभेसाठी आणि पूजेकरिता वापरतात एरवीसुद्धा फुले देवपूजेत वापरतात [⟶कंपॉझिटी].

जमदाडे, ज. वि.

झेंडू खरीपात येणारे फुलझाड आहे. ते कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढते म्हणून त्याची सर्वत्र लागवड होते. हलक्या जमिनीत त्याला चांगली फुले येत नाहीत. चांगल्या सुपीक जमिनीत त्याला पुष्कळ दिवसांपर्यंत मोठाली फुले येतात. जमीन १०–१५ सेंमी. खोल खणून किंवा नांगरून ढेकळे फोडून बारीक करतात. एक चौ.मी. जागेस २०–३० किग्रॅ. शेणखत घालतात. खतामुळे रोपांची वाढ चांगली होते. रोपे लावून लागण करतात. रोपे कुंड्यांत किंवा वाफ्यांत तयार करतात. रोपासाठी बी मे-जूनमध्ये पेरतात. बी उगवून रोपे ५–८ सेंमी इतकी उंच झाली म्हणजे ती उपटून कायमच्या जागी लावतात. उंच वाढणाऱ्या मोठ्या फुलांच्या आफ्रिकन प्रकारांची झाडे ३०–४० सेंमी. अंतरावर आणि बारीक फुलांच्या फ्रेंच प्रकारांची रोपे २०–३० सेंमी. हमचौरस अंतरावर जुलैमध्ये लावतात. बंगला-बगिच्यात शोभेकरिता लावताना इतर ठेंगण्या फुलझाडांच्या मागे उंच वाढणाऱ्या झेंडूची रोपे लावतात. बारीक फुलांच्या प्रकारांची रोपे वाफ्याच्या कडेने लावतात. भरपूर उन्हात झेंडूची वाढ चांगली होते. लागण केल्यापासून सु. तीन महिन्यांनी रोपांना फुले येऊ लागतात. पावसाळ्यात झाडांची छाट कलमे लावूनही लागवड करता येते. झेंडूला रोगांपासून किंवा कीटकांपासून फारसा उपद्रव होत नाही.

चौधरी, रा. मो.

झेंडू