झूडरमान, हेर्मांन : (३० सप्टेंबर १८५७–२१ नोव्हेंबर १९२८). जर्मन कादंबरीकार आणि नाटककार. जन्म पूर्व प्रशियातील मॅट्‌झिकन येथे. शिक्षण केनिग्झबर्ग विद्यापीठात. काही काळ शिक्षकाचा आणि पत्रकाराचा व्यवसाय केल्यानंतर कादंबरीलेखनाकडे वळला. स्वतःचा काहीही दोष नसताना लादल्या गेलेल्या परिस्थितीशी झगडणाऱ्या व्यक्ती त्याच्या कादंबऱ्यांतून दिसतात. फ्राउ सोर्ग (१८८७, इं. भा. डेम केअर, १८९१) ही कादंबरी त्या दृष्टीने लक्षणीय आहे. डी एर (१८८९, इं. भा. व्हॉट मनी कॅनॉट बाय, १९०६) आणि हायमाट (१८९३, इं. भा. मॅग्‌डा, १८९६) ही त्याची दोन विशेष उल्लेखनीय नाटके. जर्मनीतील निसर्गवादी चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून डी एरचा बोलबाला झाला होता. तथापि जुने नाट्यतंत्र व नवी सामाजिक जाणीव ह्यांचा कौशल्यपूर्ण संयोग त्यात घडून आल्यामुळेच ते यशस्वी ठरले असावे, असे आज काही समीक्षक मानतात. झुडरमानवर इब्सेनचा प्रभाव होता आणि हायमाटमध्ये तो विशेष जाणवतो. स्त्रीच्या समान हक्कांचा पुरस्कार त्याने ह्या नाटकात केलेला आहे. साध्यासोप्या भाषेतील परिणामकारक संवाद व रचनाकौशल्य ही झूडरमानच्या नाट्यलेखनाची लक्षणीय वैशिष्ट्ये. तथापि त्याच्या नाटकांतून अनेकदा येणारी भावविवशता टीकार्ह ठरली. त्याने काही कथाही लिहिल्या. दास बिल्डरबूख मायनेअर यूगेंड (१९२२, इं. भा. बुक ऑफ माय यूथ, १९२३) हे त्याचे आत्मचरित्र. बर्लिन–ग्रुनेवाल येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.