झुरिक : झुरिक कँटनचे व स्वित्झर्लंडचे आर्थिक व औद्योगिक केंद्र. लोकसंख्या ४,२२,६४० (१९७०). हे लिमात व झील नद्यांच्या मुखाजवळ झुरिक सरोवराच्या उत्तर टोकाशी मोक्याच्या जागी ४०६ मी. उंचीवर आहे. गरम फॉन वारे व हिवाळ्यात उबदार हवेच्या खालील थंड हवेमुळे बरेच दिवस टिकणारे धुके यांचा त्रास वाटला, तरी येथून जवळपासच्या हिरव्यागार पर्वतराजी आणि बर्फाच्छादित शिखरे सतत दिसत असल्याने शहर व त्याचा परिसरही अप्रतिम सृष्टिसौंदर्याने नटलेला वाटतो. झुरिकइतके सुबक, सुंदर शहर क्वचितच असेल. शहराचा विस्तार आता सरोवराच्या दोन्ही बाजूंवर होऊन त्यात जवळची काही गावे व पूर्वेकडील टेकड्यांपलीकडे लिमातच्या दरीचाही काही भाग समाविष्ट झाला आहे. या महानगराची लोकसंख्या ७,१९,३०० च्याही पुढे गेलेली आहे. दळणवळणाच्या व वाहतुकीच्या सोयी तसेच क्लोटन व ड्यूबन्डॉर्फ विमानतळांमुळे हवाई वाहतुकीची सुलभता यांमुळे हौशी प्रवाशांची येथे सतत गर्दी असते.
झुरिक, जागतिक विमाव्यवसायाचे प्रमुख केंद्र व स्वित्झर्लंडचे प्रमुख औद्योगिक शहर असून डीझेल एंजिने, मोटारी, रेडिओ, विजेचे सामान, सुती व रेशमी कापड, कागद, सिमेंट, डबाबंद खाद्यपदार्थ, मद्ये, रसायने इत्यादींचे मोठमोठे कारखाने येथे आहेत. शेतीमालाची मोठी बाजारपेठही येथे आहे. साहजिकच जगातील प्रसिद्ध कारखानदारांच्या व व्यापाऱ्यांच्या कचेऱ्या येथे आढळतात.
स्वित्झर्लंडच्या सांस्कृतिक व शैक्षणिक जीवनात झुरिकला महत्त्वाचे स्थान आहे. झुरिक विद्यापीठ स्वित्झर्लंडमध्ये सर्वांत मोठे असून येथील तांत्रिक शिक्षणाचे विद्यालयही विख्यात आहे. येथील कलाविथी, प्राणिसंग्रहालय, वनस्पती उद्याने व विविध संग्रहालयांवरून झुरिकच्या सांस्कृतिक वैभवाची कल्पना येते. येथून जवळ असलेल्या टेकडीवर आयंझीडेल्न शहरात ब्लॅक व्हर्जिन ही ख्रिस्तमातेची मूर्ती असल्याने भाविकांचे ते महत्त्वाचे यात्रास्थान आहे. येथे दरवर्षी शंभरांवर आंतरराष्ट्रीय परिषदा भरतात आणि त्यांत चार लाखांहून अधिक लोक भाग घेतात.
नवाश्मयुगापासून आजपर्यंत झुरिकने अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. ग्रॉसमन्स्टर, फ्रॉमन्स्टर ही मध्ययुगीन कॅथीड्रल, सतराव्या शतकातील नगर भुवन आणि अनेक भव्य आधुनिक इमारतींची येथील विख्यात वास्तूंत गणना होते. शिक्षणशास्त्रज्ञ पेस्टालोत्सीचे जन्मस्थान व साहित्यिक जेम्स जॉइसचे निधनस्थळ तसेच १८५९ च्या फ्रँको-इटालियन तहाची जागा म्हणूनही झुरिकला महत्त्व आहे.
ओक, द. ह.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..