झॉल्यो, (झां) फ्रेदेरीक : (१९ मार्च १९००–१४ ऑगस्ट १९५८). फ्रेंच भौतिकीविज्ञ. १९३५ च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म पॅरिस येथे झाला. अभियांत्रिकी आणि रसायनशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पॅरिस येथील रेडियम इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची १९२५ मध्ये प्राध्यापकपदावर नेमणूक झाली. सुप्रसिद्ध क्यूरी दांपत्याची मुलगी ईरेन यांच्याशी १९२६ मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर क्यूरी हे नाव चिरंजीव रहावे या हेतूने त्यांनी झॉल्यो-क्यूरी हे नाव धारण केले.

फ्रेदेरीक झॉल्यो

क्यूरी पतिपत्नींचेच कार्य पुढे चालवून झॉल्यो दांपत्याने १९३२ मध्ये पोलोनियमापासून उत्सर्जित होणाऱ्या आल्फा कणांसंबंधी संशोधन केले. या संशोधनाच्या आधाराने पुढे जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनाचे अस्तित्व सिद्ध केले. झॉल्यो दांपत्याने १९३४ मध्ये कृत्रिम किरणोत्सर्गाचा (कण वा किरण बाहेर टाकण्याच्या गुणधर्माचा) शोध लावला. त्यांनी बोरॉन, ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम या मूलद्रव्यांवर आल्फा कणांचा भडिमार करून नवीन तयार झालेली मूलद्रव्ये ही अनुक्रमे नायट्रोजन, फॉस्फरस व ॲल्युमिनियम यांचे किरणोत्सर्गी समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असणारे त्याच मूलद्रव्याचे प्रकार) आहेत, असे रासायनिक विश्लेषणाने सिद्ध केले. या महत्त्वाच्या कार्याकरिता झॉल्यो दांपत्याला १९३५ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.

फ्रेदेरीक झॉल्यो यांनी १९३९ मध्ये अणुकेंद्रीय विघटनातील (फुटण्यामुळे निर्माण होणाऱ्या) न्यूट्रॉन उत्सर्जनाचा शोध लावला. त्यानंतर झॉल्यो दांपत्याने अणुकेंद्रावरील न्युट्रॉन प्रतिक्रिया, पॉझिट्रॉन उत्सर्जन आणि अणुकेंद्रीय प्रकाश विद्युतीय परिणाम यांसंबंधी संशोधन केले. १९४८ मध्ये फ्रेदेरीक यांनी मेसॅट्रॉन लँब्डा या नवीन ⇨ मूलकणाचा  शोध लावला. युरेनियम अणूतील शृंखला प्रक्रियेसंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनाचा अंतिम अणु-विघटनामध्ये बराच उपयोग झाला.

फ्रेदेरीक यांनी १९३७ मध्ये कॉलेज द फ्रान्स येथे भौतिकीचे प्राध्यापकपद स्वीकारले व तेथेच त्यांनी निरनिराळ्या आणवीय संशोधन प्रयोगशाळांच्या कार्याला संघटित स्वरूप आणले. १९४६ मध्ये फ्रेंच अणुऊर्जा समितीच्या उच्चाधिकारीपदावर त्यांची नेमणूक झाली, परंतु त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सभासदत्वासंबंधी वादंग निर्माण झाल्यामुळे १९५० मध्ये त्यांची नेमणूक रद्द करण्यात आली. १९५६ मध्ये त्यांची पॅरिस विद्यापीठात प्राध्यापकपदावर नेमणूक झाली. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.