कॅव्हेंडिश, हेन्‍री :(१० ऑक्टोबर १७३१— १० मार्च १८१०). इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिकी विज्ञ. गुरुत्वाकर्षण व पाण्याचे रासायनिक घटक यांसंबंधीच्या संशोधनाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म फ्रान्समधील नाइसि येथे झाला. त्यांचे शिक्षण केंब्रिज येथे झाले(१७४९—५३). घरच्या आर्थिक स्वास्थ्यामुळे त्यांना आपल्या आवडत्या शास्त्रीय संशोधनकार्यात अखंडपणे निमग्न राहणे शक्य झाले.

वायूंच्या गुणधर्मांच्या अभ्यासपद्धतीचा पाया घालण्यात कॅव्हेंडिश यांचा महत्त्वाचा भाग होता. १७६६ मध्ये त्यांनी ‘ज्वालाग्राही वायू’चा (आता हायड्रोजन या नावाने ओळखला जाणारा) शोध लावला. या वायूच्या ज्वलनामुळे पाणी तयार होते व पाण्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन यांच्या घनफळाचे प्रमाण १:२ असते असे त्यांनी १७४८ मध्ये सिद्ध केले. नायट्रोजन व ऑक्सिजन या हवेतील दोन घटकांतून विद्युत ठिणगी नेली असता नायट्रिक अम्ल तयार होते असे १७८५  साली त्यांना आढळून आले. हा शोध औद्योगिक दृष्टया(विशेषतः खते तयार करण्यासाठी)अतिशय उपयुक्त ठरला आहे. हवेचा सु (१/१२०) पट भाग हवेच्या इतर घटकांपेक्षा निराळ्या गुणधर्माचा आहे असे कॅर्व्हेडिश यांनी दाखविले तो हवेच्या इतर घटकांपासून वेगळा करण्यातही त्यांना यश आले, परंतु तो त्यांना ओळखता न आल्यामुळे या वायूच्या (आर्‌गॉन)शोधाचे श्रेय एका शतकांनतर रॅम्झी यांना मिळाले. सुप्त उष्णता व विशिष्ट उष्णता यांसंबधी त्यांनी १७९६–९८ मध्ये संशोधन केले. वायूंच्या विश्लेषणासाठी उपयुक्त असणारी युडिऑमीटर नावाची नलिका त्यांनी तयार केली. परिपीडन-तुला(गुरुत्वाकर्षण, विद्युत भार यांसारख्या लहान प्रेरणा मोजण्यासाठी त्या प्रेरणांनी एका बारीक धाग्याला पडणारा पीळ मोजणारी सूक्ष्मग्राही प्रयुक्ती)या उपकरणाच्या साहाय्याने त्यांनी १७९८ साली गुरुत्वाकर्षण स्थिरांक मोजण्याचा प्रयोग केला व त्यावरुन पृथ्वीची सरासरी घनता काढली. आधुनिक प्रयोगावंरुन काढलेले घनतेचे मूल्य व कॅव्हेंडिश यांनी काढलेले मूल्य यांत केवळ एक टक्क्याचाच फरक आहे. यावरुन त्यांचे प्रयोग कौशल्य दिसून येते. भूविज्ञान, ध्रुवीय प्रकाश(ध्रुवीय प्रदेशांत आढळणारा विविधरंगी प्रकाशीय अविष्कार), हिंदू पंचांग यांसारख्या भिन्न विषयांतही त्यांनी लक्ष घातले होते. उष्णता म्हणजे पदार्थातील कणांची एक प्रकारची गती आहे याची कल्पना आलेली होती. विजेसंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनावरुन असे दिसून येते की, पुढे कुलंब, फॅराडे व ओहम यांनी माडंलेल्या नियमाचं स्थूल कल्पना कॅव्हेंडिश यांना आलेली होती.

ते रॉयल सोसायटीचे फेलो (१७६०) व इन्स्टिट्यूट ऑफ फ्रान्सचे परदेशीय सदस्य (१८०३) होते. त्यांचे शास्त्रीय निंबध क्लार्क मॅक्सवेल, लार्‌मॉर व थॉर्प यांनी एकत्रित स्वरुपात प्रसिद्ध केले. केंब्रिज येथील एका प्रयोगशाळेला त्यांच्या कार्याच्या बहुमानार्थ कॅव्हेंडिश फिजिकल लॅबोरेटरी असे नाव देण्यात आले असून तेथे त्यांची बरीच उपकरणे जतन करून ठेवण्यात आली आहेत. ते लंडन येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.